अक्षरांची लेणी - कृषिविषयक
लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.
कृषिविषयक विधीविधानांतून प्रगटलेले आदिम कृषिजीवन
नंदीचे नाव सर्जा बानाईत, नांगर चालला नव्या इलायतीत (शेत)।
शेतामंदी गेले मले नवल वाटलं, नेणत्या बाळानं आऊत येठलं ॥
हळू टाक पाय तिफन नाचणी ।
गव्हाच्या पेरणीची मोठी बैलाले जाचणी ॥
काळया वावरात तिफन टाकतेव वला ।
रासन्या झोपी गेला ॥
पेरणी चालली हरबर्या लाखाची ।
पुढं तिफन बापाची, मांग रासनी लेकाची ॥
कृषिविषयक सुफलनाच्या आदिम धारणा
पड-पड रे पावसा तुपल्या नेमानं ।
हिरवं झालं रान गाई तुपल्या दैवानं ॥
बैल बाशींग्यानं मेरं वर तास नेलं ।
उलटून पाहे मातीचं सोनं झालं ॥
पाऊस पडतो धुर्या बंधुर्यानं ।
अशी केली मात लालाच्या जोंधळयानं ॥
तिफन नवरी सजून नेली माळी ।
पेरणारी सुन लेकुरवाळी ॥
सृष्टीतील नवसर्जनाचे विश्वात्मक आदितत्व
पडतो पाऊस गर्जू गर्जू रात्री ।
आला आला म्हणती, धरणीमाय तुहा पती ॥
मेघराज नवरदेव काळी घोडी शिनगारली ।
घडीच्या पडीत पीरथमी वल्ली केली ॥
नदीले आला पूर पाहू नाही बाई ।
मेघराज हिचा पती वरसाभराचा येतो बाई ॥
पाऊस मागणे आणि बेडुक ह्यांचा संबंध
धोंडी धोंडी पाणी दे ।
धोंडीचं दिवसं, पाणी मोठं हिवसं (थंड)
येरे येरे पावसा, तुले देवू पैसा,
पैसा पडला गाडग्यात, पाऊस आला वाडग्यात
येरे येरे पावसा, तुले देवू पैसा,
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
घडाच्या गाण्याचे उदाहरण
अवं तू बंडकुळी नारी । आर्जव कर देवा दारी ।
तुह सत्व देवाघरी । पाणी येईल चळकधारी ।
पाणी आला चळकधारी, कुणब्याचे शेतावरी ।
कुणबी दादा हरीखला । येठनं घेऊन घरी आला ।
येठनं ठेवले खुटीले । बोलंना झाला राणीले ।
आपला मुंग तासोतासी । आपला मुंग तासोतासी ।
बरस बरस रे मैथिया । भुईमुंगाच्या तासी ।
पाऊस मागणे सादृश्यानुगामी यातुक्रिया
पाप झालं लयं पुण्य झालं थोडं ।
वरसाच्या वरसा बाई मेघराज आखडतो घोडं ।
घडाच्या गाण्याचे उदाहरण
घड घालूया घडाई ।
या गावच्या मेडयाचे नाव कायी । याचं नाव मारवती ।
घड घालूया घडाई ।
याच्या राणीचं नाव कायी । हिचं नाव येसीबाई ।
घड घालूया घडाई ।
गावच्या पाटलाचं नाव कायी । ह्याचं नाव परलाद ।
घड घालूया घडाई ।
याच्या राणीचं नाव कायी । ह्याच्या राणीचं नाव लिलाई ।
लिलाई निंघली परसा । हाती सोन्याचा आरसा ।
पाच सव्वासणी । गेल्या सुताराच्या वाडया ।
अरे तू सुतार दादा आमचा सजन व्हशील । चाटू काठवद देशील ।
चाटू काठवद कशियाले । आम्हा घड घालयाले ।
तुम्हा घड कशियाले । पाणी पाऊस येईयाले ।
पाणी पाऊस कशियाले । जोंधळं बाजरी येईयाले ।
जोंधळं बाजरी कशियाले, लेकरं बाळ पोसीयाले ।
लेकरं बाळ कशियाले । सोयरे धायरे येईयाले ।
सोयरे धायरे कशियाले । मान मानता व्हयाले ।
अव तू बेंडकुळी नारी । आर्जव कर देवाचे दारी । तुह सत्व देवाघरी ।
पाणी आला चळकधारी । कुणब्याच्या शेतावरी । कुणबी दादा हरिकला
येठनं घेऊन घरी आला । बोलता झाला राणीला । आपला उडीद तासोतासी ।
डोंगरी पेरली पळाटी । पाण्यावाचून गेली ।
मेघ्या बरस रे अंगणी, सूर्या डोलतो गंगनी ।
डोंगरी पेरला जोंधळा । पाण्यावाचून गेला ।
सुताराचे पोरा तिफन भरराती, पेरणीच्या घाती कुणबी आला घायकुती
सुतार लव्हार दोघं चालले बोलत । नाही पवाराची आसामी तोलतं ।
काळया वावरात तिफन नवरी ।
जानोसा दिला हिचा सुताराचे निह्मावरी (कामठा)।
सुतार लव्हार कारागीर दोघं भाऊ भाऊ ।
सुताराले धान शिदा । लव्हाराले घाला जेवू ॥
येवढी कारागीरी सुताराचे बाळा ।
चाडयावर काढल्या घागरमाळा ।
मांगाच्या पोरा तुहा जागल कशी केली ।
माडीची रंभा नेली, तुले जाग नाही आली ॥
वारकाच्या पोरा खाली रुमाल आथर ।
तुही सोन्याची कातर, मंग जावळं उतर ।
वारकाच्या पोरा रुपया इसार देते तुले ।
सीता मालणीचा । निरोप सांग मले ॥
चला रे जावू कुणबी पाहू । कुणबी लपे तिफणीच्या आडोशानं ।
अशी तिफन लोन बाकरी । आमच्या गावचा सुतार करी ।
चला रे जावू सुतार पाहू । सुतार लपे वाकसा आडं ।
असा वाकस कोन बा करी । आमच्या गावचा लव्हार करी ।
चला रे जावू जावू लव्हार पाहू । लव्हार लपे भात्याच्या आडं ।
असा भाता कोन बा करी । आमच्या गावचा चंभार करी ।
चला रे जावू चंभार पाहू । चांभार लपे कुडाच्या आडं ।
बोलले पाटील महार मपले भाऊ ।
तहसील पटवायले दोघं कचेरीले जावू ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP