मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - देवाचे महत्त्व

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


प्रथम आमंत्रित केले जाते.
पाचा पानाचा ईडा त्यावर सगळी सुपारी ।
आधी नमीला गणेश बेपारी ।
जात्या इसवरा तुले सुपारीचा डाव ।
पारबतीसाठी नवरा झाला महादेव ।
पाच सवासणी कथाच्या पहिल्या ।
मैनाचे हळदीले बलावल्या ॥
पाचा पानांचा ईडा येसी बाईले ।
नेणंता राघो परण्या जातो मामाच्या नगराले ॥
किती जोडू हात पांढरीच्या हनुमंता ।
खेळते नमस्कार परण्या निंघता ।
हळ्द-किकस पांढरीच्या मारोतीले ।
मंग चढवा उषाबाई नवरीले ।

हळद लावण्याची रुढी व त्यामागील लोकधारणा
हळद बाईचं किती करू मी उंबलं । रुप मैनाचं चांगलं ॥
हळद किकसा आधी पांढरीच्या देवा ।
गौळण बाईले मंग नवरीले लावा ॥
नगरच्या नारी हातानं पालवते ।
चित्राबाई नवरीच्या हळदीले बोलावते ॥

लग्नविधीच्या गाण्यांतून प्रगटलेली यात्वात्मकता
राघोच्या लगनी करवल्या बारा तेरा ।
त्याच्या हळदीले नाही लागुदेला उनवारा ॥
उन्हाळया दिसाचा नाही सौंदडीले पाला ।
झाडा देवक्यानं केला ॥
हळदीचे उंडे कोण्या करवलीने केले ।
परण्या निंघता वलांडले ॥
राघो नवरदेव परण्या निंघला दुपारा ।
नवरदेवाची आत्या करे लिंबा-नारळाचा उतारा ॥
मांडवाच्या दारी शिंपीनं दहीभातं ।
मैनाचे वराले शितल जाईल वाटं ॥
नवरीची नवरकळा एकारातीतून आली चित्रा गं मैनाले ।
काळं लावा ग गालाले ॥
नणंद दादीबाई तुमचा मान तुम्ही घ्यानं ।
राघोच्या लगनी डावं गुफायाले यानं ॥
राघो नवरदेव परण्यां निंघला गाडीतून । आगदा फेकते माडीतूनं ॥

लग्नातील सुफलीकरण विधी
कुंभारीन बाई तुह्या चाकाले चुना ।
देवकाले आल्या बाई पवाराच्या सुना ।
कोण्या राजाले देली कुंभारीन बाई ।
चाकाले लाव कुंकू नाव घे देवकीबाई ॥
उन्हाळया दिसाची सौदंड झोपी गेली । देवक्यानं जागी केली ॥

बोहल्याचे गाणे
राघोवच्या लगनी करवल्या दोघी तिघी ।
कळसाचा तांब्या उचला बिगी बिगी ।
बव्हल्याची माती तुम्ही उचला गोळा गोळा ।
मैनाले मामे सोळा ।
बव्हल्याची माती उचला हातोहाती ।
नवरीले मामे किती?

नान्होरा घालण्याचा विधी
पाच सवासणी न्हानूर्‍याचे आत ।
मैनाचे हळदीले नका करु रात ॥
रुसला नवरदेव न्हानूर्‍याचे आतं ।
नखीचा धोतर जोडा मांगतो शेवंतीत ॥

कारलीचा वेल व हिरवा रंग :
समृद्धीचे व सुफलनाचे विधी
भाऊ तुमची लेक द्यानं मह्या घरी ।
कारलीचा वेल लाविन तुमच्या दारी ॥
वरमाय झाली वळखू कोण्या ताटी । हिरवा चुडा मनगटी ॥
वरमाय झाली मायबापा देखत । आली तांदूळ पेरत ॥

लग्नतील बाशिंग व फळ भरणें :
सुफलन तत्वाचे विधीविधान
उसंगळी भरता डोळा येतं पाणी
परघरी गेली तान्ही,
दादाची नवरी कळसुत्राची बाहुली
सोन्याच्या पाऊलाने मोती रगडत आली
मांडवाच्या दारी वार्‍यानं केली मात ।
बाशिंगाच्या कळया सावरती आत (आत्या)।
राघो नवरदेव त्याच्या बाशिंगाले जाई ।
नवरी जितयाले जातो शेज्या गावी ।

बाशिंग :
शिशुपाल नवरदेव । याचं बाशिंग मोडलं ।
गेला रुख्मिण जितायले याले अपयश घडलं ।
राधो नवरदेव याच्या बाशिंगाले जाई ।
नवरी जितयाले परण्या जातो मेहेकर गावी ।
मांडवाचे दारी बामन बोलतो सावधान । नवरी जिते राजाराम ।

प्राचीन राक्षस : विवाहाचे प्रथावशेष
नवरीचा बाप सार्‍या ईळाचा उपाशी ।
आधी करा कन्यादान मंग सोडा एकादशी ॥
नवरदेवाची माय हार्‍याडेर्‍याची येल्हाळ ।
नवरीच्या मायेच्या डोळा लागले पनाळे ॥
मैनाले मांगनं राजाराजाची लढाई ।
मैनाच्या रुपाची बामन टाकून सांगतो बढाई ।
मांडवाच्या दारी हळदीकुंकाच्या सांडवा ।
नवरी उचल पांडवा ॥
नवरदेव झाला ल्योक-माहा दशरथ ।
कटयारीले लिंबू राणीले इशारत ॥
पाहिली ओवाळणी माय मावश्याची पडे ।
मंग परण्या घोडयावर चढे ॥
माकन मेंढीचं काकणं असा नवरदेव रतन ।
आणल नवरी जितून ।
हंडा गंगाळाची लामन लावली सैयानं ।
बाळाची नवरी भांडे लोटली पायानं ।
राधो नवरदेव परण्या घोडयावर झोपी गेला ।
मामा याचा हौसीदार बार बंदुकीचा केला ॥
हरी नवरदेव मेहेकरा परण्या जातो ।
बाशिंगाच्या कळयामामा सावरतो ॥

लग्नातील इतर रुढी :
मनाले वाटते लहान कन्या उजवावी ।
गल्लीनं खेळती जवाई ॥

मैनाच्या लगनी वरमाय लेकूरवाळी ।
मांडीवर घेवून मामा लावती टाळी ॥
सुन मुख पाहयता मांडवी आलं ऊनं ।
सासर्‍याच्या कडेबसून सुन देते वानं ॥
आडद्या-पडद्यानं सासुनं जवाई देखला ।
हिरा जंतरी वतला ॥
नगराच्या वाटं टांगा कुणाचा पळतो ।
राघोच्या नवरीचा पदर बुदीचा लोळतो ॥

लग्नात जातिबांधवांना जेवण देण्याची प्रथा
इव्हाया सौदागरा लाव हिंमतीले हिंमत ।
येशीले देनं टिळा बुंदीची पंगत ॥
लग्नाची वेळ झाली नाही होवू द्यानं ।
पाठी मामा येवू द्यानं ॥

नवरीच्या बापा, गुढा कशानं ढिला झाला ।
हुंडा छातीच्या वर गेला ।
इव्हाई करते मावसभाऊ सख्खा ।
देर तुम्ही पाटील देशमुख हुंडा मागू नका ।

(विहिन) इनी सवंदरी चौरंगी उभी राह्य । गंगाळी धुते पाय ।
इनी सवंदरी पाया पडते पटापटा ।
लेकी मैनासाठी उचलते हलका वाटा ॥
रुसली ईहीन वाडा ईटंचा पाहून । आना वाजंत्री लावून ॥
रुसले जावई जावून बसले मळयात । साखळी मागतो गळयात ॥
मांडवाचे दारी ज्येष्ठ जावयाचा मानं । मग मैना तुझं सावधानं ॥
मैनाचं लगन आंदन द्यानं सर्व काही ।
हांडा, गंगाळ, पाच गाई. बैलासकट दमणी द्यावी ॥

इव्हाया सौदागर तुमची इहिन व्हईन ।
आधी टाका पायघडया मंग मांडवी येईन ॥
इनी सवंदरी पाय मपला मोळा । मैनाच्या शिदोरीव्र नारळ बांधले सोळा ॥
वाजतगाजत आला रुखोताचा गाडा । झोप वरमायची मोडा ॥
गडगनीर आला बाई माम्या मावश्याचा भारी । पडद्याच्या दमण्या दारी ॥
सोबन मह्याघरी तुम्ही यानं साससुना ।
गावोगावी धाडीन चिठ्ठया तुम्हा पाठवीन मेणा ॥

देरा बामन्या मही हौस मह्या मनी ।
पुण्याच्या कलवातणी आणाले जानं कोणी ।

सुनमुख पाहु दे नंद जावाच्या मेळयात ।
सोन्याची सरी घालीन सुनच्या गळयात ॥
नणंद दादीबाई तुमचा मान तुम्ही घ्यानं ।
राघोच्या लगनी डाव गुंफायाले यानं ॥

मारोतीच्या पारावर वरात नेण्यामागील भावना
मारोतीच्या पारावरी शेवंती वाटली ।
साळू तुह्या मामानं चिकन सुपारी वाटली ।
राघो नवरदेव मारोतीच्या पारावरी ।
सोन्याची आबदगिरी मामा धरे भाच्यावरी ।

धोबीणीचे तेलवानाचे गाणे
अवं हे, मांडवाचे दारीयेला गेली चिचा ।
कंकण बांधायाले रामाघरची सीता ।
अवं हे, सुताराचा चौरंग, अवं हे वठ्ठीणीची घडी ।
अवें हे, तेलनीचं तेल, अवं हे, बारनीचं पान ।
अवं हे, तेलनीचं तेल, आधी चढवा अंबिकेले ।
मग चढवा नवरीले ।
अवं हे, तेलनीचं तेल, आधी चढवा सर्व देवा ।
मग चढवा नवरदेवा ।
अवं हे, मांडवाचे दारी वेल गेला आंबा ।
काकन बांधायाले देवाघरची रंभा ।
राम गेले का पैठना, सुद लागली काकना ।
पाचा शेराची शिदोरी, बांधा रामाचे पदरी ।
राम गेले का जेजूरी । माकन मेंढीचं काकन, असा नवरदेव रतन ।
आणल नवरी जितून ।

लोकगीत पालुपद
वाजत गाजत सैय्या म्हणती काय होतं ।
बंधुचा आहेर राज-बिदीले मिरवतं ॥

नंतरचे
वाटी गं आलाबाई, आलाबाई लिंब्या ।

पालूपद
शहरचा बाई पुण्याचा, औरंगाबादची चोळी ।
लेण्याले बाई धुण्याले, दंडली बाई भुजले ।
साळी मंधीसज गुजारी, चाँद सुर्या चमकली ।
मोत्याच्या कळसाले राजा मोठा लब्ध गं ।
एवढा माझा शब्द गं ।
पुन्हा लोकगीत व पुन्हा पालूपद

हिरवं कारलं पेटारी साठवणं, सांगलं मायबाई । वर्‍हाड चाललं ।
हिरवी चुनडी लह्यर्‍यामारी, देऊळगाव पेठलां ।
वैराळ लुटीला मायबाई, लोणार साथीला ।
लोणार गाव दूरवरं नाव, तिथं जागा तिर्थाची ।
सीता बाईची न्हाणी. साता सरोवराची ।

गोरा साहेब बोलतो थोडं. ह्याच्या बंगल्यापुढं कारंजा उडं गं ।
आली आली आगीनगाडी, बहु तातडी निशाण फोडी ।
अंग्रेज मुंगलाईची जोडी गं, बिन-बैलाची गाडी पळ गं पाण्यावर खेळ गं ।
आला बैयाचा रथ, जागोजागी खुटं गं खुटं ।
लिंब नारळ वटी सावरी, वल्या पडदणीनं मारोतीला पाणी ।
घाली गं घाली गं ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP