अक्षरांची लेणी - खेळगाणी
लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.
गाण्याचे स्वरुप : १
कोंबडयाला कधी नवरा समजून गाणे म्हणताना आढळतात.
कोंबडा कू म्हणतो कू म्हणतो ।
आजारी बाजारी जाय म्हणतो. जाय म्हणतो ।
खारीक खोबरं आण म्हणतो, आण म्हणतो ।
येता जाता खातो माय खातो माय ।
मव्हच नाव घेतो माय, घेतो माय ।
आपुन जाता औताले औताले ।
मलेच धाडतो गवताले गवताले ।
गवतात होता काटा काटा ।
त्यो मुल्डा पायाले पायाले ।
सांगुन धाडा बैयाले बैयाले ।
शिळे कुटके खायाले खायाले ।
बयानं धाडल्ली चिठ्ठी चिठ्ठी ।
ती पडल्ली दह्यात दह्यात ।
आसं दही नासलं नासलं ।
फुटक्या डोळ्यात घातलं घातलं ।
फुटका डोळा भाऊ भाऊ ।
वडील मही जावू जावू ।
वडे वडे चिरती चिरती ।
वडयाले नाही सांबार सांबार ।
गावाले नाही कुंभार कुंभार, कोंबडा कू. ॥
सागरगोटी बाई सागरगोटी ।
बाई मव्हं गाव पंढरपूर बाई पंढरपूर ।
कसं दिलं बाई इतक्या दूर, इतक्या दूर, इतक्या दूर ।
सागरगोटी बाई सागरगोटी. कोंबडा कू म्हणतो कू ।
पाय-पायघसरी
एक पाय शेणाचा, एक पाय मेणाचा ।
पाय पाय घसरी, वाण्याची वसरी ।
वाण्याची वसरी, बलवा तिसरी ।
तिसरी कशाले, कोंबडा खेळायले ।
बलवा चौथी. चौथी कशाले ।
सांबार वाटायलें. सांबार वाटला ।
बलवा कुंभार, कुंभार कशाले ।
हांडे दांडे उतरायले, उतरले हांडे ।
बलवले पांडे, चिठ्ठी लिहायले ।
लिहिली चिठ्ठी, बलवा वठ्ठी ।
धुणं धुवायले, धुतलं धुणं ।
बलवा सून. पाय धुवायले ।
फुगडी रचना
दोन हाताची फुगडी, मामा देतो लुगडी ।
लुगड्यातले गोंडा, फु बाई फु नवरा कानकोंडा फु ।
बशी बाई बशी काचाची बशी ।
लागू नको पोरी मले एकादशी फू ऽऽ
माळयाची लेक कांदा खाते पातीचा ।
नवरा करते जातीचा फु ऽऽ
आपण दोघी वाण्याच्या वाण्याच्या ।
हातात पाटल्या सोन्याच्या सोन्याच्या फु ऽऽ
इंग्रजी शाळेले लावले काच ।
आपण दोघी मँट्रीक पास फु ऽऽ
पारामांगं सांडल्या तुरी ।
येसता येसता दमल्या पोरी फु ऽऽ
तिकडून आला वाणी धरली मही वेणी ।
सोड सोड मेल्या मही सोबतीन गेली फु ऽऽ
नदी काठी शेवाळगोटा । बाई शेवाळगोटा ।
सवती सवतीचा झगडा मोठा फु ऽऽ
तुही मही फुगडी तल्वार गं, तल्वार गं ।
फुटतील महे बिल्लोर गं, बिल्लोर गं ।
फुटतील तर फूटतील काचाचे । उद्या भरु पेचाचे फु फू ऽऽ
अपु गेले टपू गेले, ठेसनात गेले ।
झुम झुम तोडे मह्या बापाजीने केले फु फू ऽऽ
झिम्मा
नदीच्या पलीकडे कोकणपट्टी बाई कोकणपट्टी ।
सुपार्या आल्या देठोदेठी बाई देठोदेठी ।
तोडायला गेले भरली वटी बाई भरली वटी ।
गंगावती दारी उभी इंद्रावती बाई इंद्रावती ।
नदीच्या पलीकडे कोकणपट्टी बाई कोकणपट्टी
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP