मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - मोटेची आणि नागाची गाणी

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


पांडवाची जोड चाल बैला व्हो व्हो आ‌ऽऽऽ
गाईच्या वासरा चाल बैला व्हो व्हो आऽऽऽ
बैला चालून व्हो व्हो व्हो आऽऽऽ
गाईच्या नंदी चालून हो हो आऽऽऽ
मोती पवळयाची जोड चाल हो हो आऽऽऽ
चल गं सगुणा चल गं शेतावरी ।
करु शेताची राखणी, देऊ मोटचं पाणी ।
जाई जुई डोंगरा, फुलेल मंग एच-फोर ।
पीकं डोलाया लागे, चल गं सगुणा मोटवरं ।

नागपंचमीच्या गाण्याचे स्वरुप :
आखाडी एकादसी, नागपंचमी कोण्या दिसी गं साजणे बाई ।
नागपंचमीची लाही । पोळयानं केली घाई गं साजणे बाई ।
पोळीयाचा उंडा पुढं गणपती आला । वाकडतोंडा गं साजणे बाई ।
गणपतीचे लाडू । महालक्ष्मीले ताट वाढू गं साजणे बाई ।
महालक्ष्मीचे ताट पुढं पितर आले । पितरपाट गं साजणे बाई ।
पितराची निसु दाळ । पुढं आली घटमाळ गं साजणे बाई ।
घटमाळीच्या पडल्या गाठी । पुढं दिवाळी नं केली दाटी गं साजणे बाई ।
दिवाळीचा दिवा पुढं तिळसंक्रांत । घेती धावा गं साजणेबाई ।
तिळसंक्रांतीची ओंबी । पुढं शिमगा झोंबी गं साजणे बाई ।
शिमग्याची गाठी । पुढं पाडवा आला नेटी गं साजणेबाई ।
पाडव्याची गुढी पुढं चैतानं । मारली उडी गं साजणेबाई ।
चैताचे ऊन, उन्हानं झाले कोळ । आखजीले गेलं मूळ गं साजणेबाई ।
आखजीची पुरी । सण गेले घरोघरी गं साजणे बाई ।
आखजीचा करा, मोत्यानं भरा ।
मिरगाच्या आल्या चळकधारा गं साजणेबाई ।
आली वर्साची पंचमी माय मी खेळायाले जाते ।
काय नेसून जाती लेकी । नेसीन भाबीची कसई ।
राही उठली तनक्यानं । साती सलद उतरविले ।
त्यातून कसई काढली । गंगुच्या अंगावर फेकली ।
नटूनथटून निंघल्या । तेल्या तांबोळयाच्या पोरी ।
कुणबी, सोनार, वान्याच्या, जमल्या सर्व पोरी ।
वारुळ पुजयाले गेल्या । यायनं पाच येढे का घातले ।
तव्हा पाचव्या फेर्‍याले । पदर बोरीले गुंतला ।
हातभर कसई फाटली । गंगु रडली पडली केस कुरळे तोडले ।
गंगु घरासी आली । मायले बोलती झाली ।
मातोसरी अन्याव झाला ।
हातभर कसई फाटली । फाटू देनं गंगु लेकी ।
तिची व्हती ईसाची । घेऊन देवू तिसांची ।
राही भाबी रुसली । मही कसई भरुन पाहयजे ।
राही जेवना खावेना । बोलती झाली पतीला ।
गंगु नेऊन वधवावी । रक्तात चोळी भिजून आणून दाखवावी ।
गंगु बाईला मूळ आलं । गोईंदाच्या मनी कपट आलं ।
बोलता झाला मातेला । मी नेवून घालतो गंगु बहिणीले ।
दोघं जेवले खावले । लागले वनाच्या मारगी ।
एकवन दोन वन । चार वन तव्हा पाचव्या वनाले ।
अंधार्‍या वडाखाली । व्हती बारव, पाणी पी गं गंगुबाई ।
गोईंदादादा तहान नाही । दोन घोट पी नं पाणी ।
गंगु घोडयाखाली उतरली । पाणी पिता सुरी फिरवली ।
गंगुची चोळी वल्ली केली । लिंब बनी वाळवली ।
गोईंदा मार्गाले लागला । माडीवरुन मातेनं देखला ।
गाईंदा मह्या लेका । गंगुची काय गत रे केली ।
माढं काठीशी बारव । तिथं अंधार्‍या वडं तिथं गंगु वधवली ।
माता रडती पडती । केस कुरळे तोडती ।
गावा जवळीची पांढरी जी । त्याच्यात खंदली बारवजी ।
पाणी नाही बारव बाई जी । काय मांगती बारव बाई जी ।
बारव मांगती पहिला ल्योक जी । पहिल्या ल्योक कसा देवू जी ।
पाणी नाही बारव बाई । बारव मागती लेक राही ।
माय तिथून निंघली जी । बोलती लेकाले जाय राहीले नियाले ।
तिच्या हातची हळद जी । लगन बारवचं सांग जी ।
घोडा पागचा सोडला । भाऊ लागला वनाच्या मारगी जी ।
एक वन वलांडला दोन वन वलांडले । तव्हा तिसर्‍या वनाले जी ।
दिसू लागलं राहीचं सासर जी । चार वन वलांडले जी ।
तवा पाचव्या वनाले आला । राहीच्या नगराले जी ।
वाडयामध्ये गेला यानं रामराम केला, सासुले बोलता झाला,
आलो राईबाईले मूळ जी ।
राई माहेरा निंघाली जी । पाया सासुच्या पडती जी ।
फिरून मले येणं नाही जी । असं काय म्हणती राही सुन जी ।
गोईंदा राही निघाली जी । लागले वनाच्या मारगी जी ।
एक वन दोन वन चार, तवा पाचव्या वनाले जी, लागलं राहीचं माहेर जी ।
मायलेकी गेल्या कसाराच्या आळी जी । चांगले जोडवे भरा जी ।
फिरून मले येनं नाही जी । असं काय म्हणती राही जी ।
गेल्या चाटयाच्या आळी । चांगलं चोळी पातळ काढा जी ।
फिरुन मले येनं नाही जी । असं काय म्हणती राही लेकीबाई जी ।
मायलेकी घरी आल्या जी । साती कातीव चुली पेटवल्या जी ।
साती हंडे पाणी चढवलं । साती घंगाळी इसानलं जी ।
राही न्हानली धुनली जी । अवघ्या सैपकाचा थाट जी ।
राही जेवली खावली जी । पाच सवासनी याहयनं ताट काढलं जी ।
तुमच्या हातची पूजा लग्न बारवंच जी । गेली बारवंवरी जी ।
चांगली पूजा कर राही जी । राही बारवंत गेली जी ।
राही बारव पाणी किती जी । महे टोंगळे बुडाले जी ।
छाती दाटला पान्हा । एक घोट देते राही जी ।
राही बारव पाणी किती जी । भवरा फिरलाजी ।
छाती दाटला पान्हा । एक घोट देना राही जी ।
चल गं सये वारुळाला । नागोबा पुजायाला ।
तोडे नाही कशी येवू?
फोडा सोनाराचे घरं, काढा तोडीयाचे जोडं ।
तुहे तोडे महे तोडे एक करू डब्बा भरु ।
चल गं सये वारुळाला । नागोबाला पुंजायाला ।
पाटल्या नाही कशी येवू ?
फोडा सोनाराचे घर काढा पाटल्याचे जोडं ।
तुह्या पाटल्या मह्या पाटल्या । एक करु डब्बा भरु ।
चल गं सये वारुळाला । नागोबाला पुजायाला ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP