मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - विविध संकेत

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


लाडक्या लेकीला काय देवू खेळायले ।
सोन्याची सुपली मोती देते घोळायले ॥
पाच पानाचा ईडा वर मोत्याचा धंस ।
लग्नाआधी नमिला गणेश ॥
पाच सवासणी न्हानुयाच्या आत ।
मैनाच्या हळदीले झाली रात ।
पाचा शेराची शिदोरी । बांधा रामाचे पदरी ॥
पाचा पानाचा ईडा येसीला ठेवणे, पाचा फनीचा नाग ।
वैराळदादा तुही खाली उतर पेटारी ।
मैनाले भर पाचा रंगाची गुजरी ॥

सात अंकबंध :
सात सहस्त्र वानरानं समुद्रावर डेरा देला ।
मारोती लंकेले पाव्हना गेला ॥

किंवा
इथं जागा तीर्थाची । सीताबाईची न्हाणी सातासरोवराची ।
बोलली रुख्मिण देवा रुसुन जाईल ।
नऊलखा पंढरी तुम्हा धुंडाया लाविन ॥
बाळाच्या टोपीले नवलाख तारांगण ।
बाळाच्या साठी गुंफली नारायणानं ॥
एकलाखाची पंढरी नऊ लाखाचा कळस ।
माढीले तुळस पाणी घाले हरिदास ॥
उगवले नारायण जस गाडियाच चाक ।
जोडती हात धरतरी नवलाख ॥
साती समिंदरा गोंधळा यावे ।
लोणारचे कमळजा गोंधळाला यावे ॥
साती आसारा गोंधळा यावे ।
नवव्या झोटिंगा गोंधळा यावे ।
चंद्रसूर्या गोधंळा यावे ।
नवलाख तारांगण गोंधळा यावे ॥
मह्या चुडीयाचं सोनं कसं पिवळं आढळं ।
केली पारख पित्यानं वाढूळं ॥
नेसली हिरवी साडी शेलारी । करती थट्टा सकल नारी
कौसल्येला मूका नातू झाला म्हणती ॥

गाय गाळा फसणे : गरोदर स्त्री अडणें.
गर्भिण नार हात टेकून बसली ।
धाव धाव नारायणा गाय गाळात फसली ॥

कडूनिंब खाली उभा
शेजी देते शिव्या तुह्या तुले मुभा ।
नेणंता बाळ कडूनिंबाखाली उभा ॥

अहेव मरण किंवा भरल्या कपाळाने जाणे: वरील शब्दप्रयोगाचा पती आधी पत्नीला मरण येणे, असा अर्थ होतो.
अहेव मरण सोमवार्‍या रातचं ।
पाणी कंथाच्या हातचं ॥

कुंकू पुसून शेण लावणे : पहिला पती जिवंत असताना दुसरा करणे ह्या संदर्भात हा शब्दप्रयोग केला जातो.
कुकू कपाळीचं पुसून घासू नये शेणं ।
पुजाचा जोडा जो लिहला देवानं ॥
पानई लागीयले गौरीले धुनं धुता धुता । उतारी तिथं होता ॥
पानई लागलं राजाच्या राणीले । देला धुरबंध येनीले ॥
पानई लागलं पानपट्टीच्या रानात । हाये धुरबंध ध्यानात ॥
गाडया मागं गाडया एक गाडी उभी करा ।
बाळाच्या नवरीले चुडा भरा ॥

किंवा
उगवले नारायण झाडाझूडावरी । पडली प्रभा मालनीच्या चुडयावरी ॥
सासू पारबती सासरा भोळा राजा । गिन्यानी मव्हा चुडा ॥
पापिणीचा डोळा घातले मी मीठमोहर्‍याच्या रांधा ।
दिठं झाली गोपाचंदा ॥

किंवा
पापिणीच्या डोळा घालते ईळा ।
बंधू दिठीले कवळा ॥
वरमाय झाली वळखू कोण्या ताटी । हिरवा चुडा मनगटी ॥
पंढरी पंढरी इठूनं दिसती हिरवीगारं । देवा ईठ्ठलाचे तुळशीले आला भार ॥

किंवा
पाचवा महिना चोळी हिरव्या खनाची । देवकाबाईची मनसा पूरावा मनाची ॥
देवाच्या देवळात हिरवा शेला । बाळ राजानं पुत्राचा नवस केला ॥

किंवा
आडावरच्या पाडावर धोबी धुणं धूतो ।
भूलाबाईच्या पातळाला हिरवा रंग देतो ॥

किंवा
सांगून धाडते पाडळीच्या मामीयाले ।
हिरवी चोळी कामिनीले ॥
आडावरच्या पाडावर धोबी धूणं धूतो ।
भुलाबाईच्या साडीला निळा रंग देतो ॥

किंवा
दिवाळीचं मूळं भाऊ भासे चडावळी ।
बंधू तुमची निळी घोडी ॥
निळा रंग माडिले । गुलाबाचे फुलबाई मैनाच्या साडीले ॥
काळी कसूबाई येईना मह्या मना । फाडतील बया तुह्या सूना ॥
काळया चोळीवर मोर म्या काढीले । बाई म्या काढीले ॥

किंवा
सांगून धाडते बाळा तुह्या मावशीले ।
काळया खणाची कुच्ची शिवू नाही मेल ॥
अंगडं टोपडं कुचीले काळा खण ।
बाळाच्या मह्या गोर्‍या रंगाले जामीन ॥

किंवा
राधा नवरदेव परण्या निंघलं नटत ।
गालाले लावा काळी दिटं ॥
उगवले नारायण अहेवच्या वाडया गेले ।
सीता मालनीनं कुंकानं लाल केले ॥
उगवले नारायण उगवले लाल-लालं ॥
हिच्या गं मंदिरा देव खेळले गुलाल ॥
पांधरली पिवळी शालं ॥

किंवा
तुळसबाई कशियानं झाली लालं-लालं ।
हिच्या गं मंदिरा देव खेळले गुलाल ॥

किंवा
हळदी कुंकानं गल्ल्या झाल्या लालं ।
माम्या-मावश्यांचे गडगनेर झाले कालं ॥
लग्नाच्या दारी पिवळी मही चोळी । न्हाली चाफेकळी ॥
येसी मंधी उभा पिवळया झग्याचा । पुत्र अंजनाबाईचा ॥
सांगूण धाडते कावळयाच्या पंखोपंखी । डाळिंबी चोळी पिवळी नखी ॥

किंवा
चंद्रभागी आला पूर पाणी ढवळं-पिवळं ॥
रुख्मिन धुती पांडूरंगाचं सवळं ॥
उगवले नारायण पिवळया झाल्या भिती ।
हळदी कुंकाची मालन उभी व्हती ॥
उगवले नारायण याच पिवळं ऊनं ।
दशरथाले जन्मले रामलक्ष्मन दोनं ॥

किंवा
पुसतील शेज्या लगन कोन्या वाट गेलं ।
पिवळया बन्नातीचं पाल डांगोडांगी देलं ॥
मांडवाच्या दारी जावा-जावाचा रुसवा ।
पिवळा पितांबर नंदबाईले नेसवा ।
एकुलता एक नको म्हणून पांडवाले ॥
येल कारलीचा गर्दी झाली मांडवाले ॥
लावणीचा आंबा याले फांदोरी फुटली ।
बंधुले झाला ल्योक मले संतोषी वाटली ॥
नको घालू देवा जन्मा, बहिणी वाचून भावाले ।
शोभा नाही लिंबोणीवाचून बगिच्याले ॥

किंवा
सून सावित्री भाग्याची मले झाली ।
सोन्याच्या पावलानं मोती रगडत आली ॥
बोलले भ्रतार कुठे गेली राई रंगा ।
हिच्या पदरी लवंगा झाला ईडयाले खोळंबा ॥
नदिले आला पूर पाहू नये बाई ।
मेघ राज हिचा पती वर्षभरात येतो बाई ॥

किंवा
मेघराज नवरदेव काळी घोडी शिनगारली ।
घडीच्या घडीत पिरथमी वल्ली केली ॥
धरतरीचा भार उचलला कोणं?
गाईच्या पुतानं जुवाले देली मानं ।
माळयाच्या मळयात नको जावू कळवातणी ।
बिन पुरुषाच्या केळीबाई बाळंतीणी ॥

किंवा
माळयाच्या मळयात पतिव्रता केळीबाई ।
टाकलं कंबळ दोष पुरुषाचा नाही ॥

सीता
लक्ष्मण देवा बाण हाणा नेमाचा ।
वंश बुडल रामाचा ॥

किंवा
लक्ष्मण देवा तहान लागली वनी ।
पळसाचे पान याले काडी रोहिदासाची ।
सीता पीत नाही पाणी चारी नावं पुरुषाची ॥
केळीच्या द्रोणाले हरळीचा दोरा ।
तुळशीची तंबू झारी पाणी गंगेचं भरा ॥
सासु-सासरे मह्या माढीले कळस ।
काशी बयाच्या पतिव्रतेच्या अंगणी ॥

किंवा
पहाटच्या पारी रामाची दिंडी आली ।
तुळसबाई पतिव्रता झोपी गेली ॥

विठ्ठल-तुळस
राही रुख्मिण गुज बोलतील इठ्ठलाशी दोघी ।
तुळसबाई अवघडून दारी उभी ॥

किंवा
बोलती रुख्मिण देवा आवड कोणाची ।
तुळस गुणाची तप करते उन्हाची ॥

किंवा
बोलली रुख्मिण कव्हा उन्हाळा य़ेईल ।
तुलस बाईचं कव्हा वाळवन होईल ।
तुळस म्हणती होवू झालं वाळवन ।
देवा इठ्ठला कारण देही केली अर्पण ॥
रुसली रुख्मिण गेली राऊळाच्या मांगं ।
प्रितीचे पांडूरंग समजावया गेले अंग ॥
रुसली रुख्मिण देवा बाहेर नका जावू ।
एवढया राऊळात एकली मी कशी राहू ॥

किंवा
बोलले इठ्ठल काढ रुख्मिण झाडून ।
दोन लाख जत्रा आली परपंच सोडून ॥
सोळा सहस्त्र नारी भोगल्या अंधारात ।
दिवा जळतो रुक्मिणीच्या मंदिरात ॥

शृंगारिक संकेत
जन्म दिला पित्यानं वाढी लावलं मातेनं ।
उचलला भार बाई परनारीच्या पुरानं ॥
कोण्या गावी गेला बाई मह्या जीवाचा मव्हन ।
ह्याच्या बिगर गोड लागेना जेवन ॥
दुरुन वळखली चाल मह्या रायाची ।
सोडे शेला धुळ झटकतो पायाची ॥
कोण्या गावी गेला बाई मह्या कुंकाचा टिकला ।
पाचा पानाचा ईडा मह्या पदरी सुकला ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP