मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - पाळणागीत

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


१.
पहिल्या मासी पदर गेला । नार गर्भार हौस मनाला, झु-बाळा झु ।
गवंडी, सुतार कुनीकून आला । यान पिंडाले आकार देला ।
तिसर्‍या मासी तिन्हीताळ । तिन्हीत होतो हा खेळ ।
चवथ्या मासी चौसष्ट कळा । सांधा सांधाया मारुनी खिळा ।
पाचव्या माती पांची-परान, नऊ किल्या देल्या देवानं, दहावी गेला घेवून ।
सहाव्या माशी साहावीचा मान । सहाव्या दर्शनी सटवीचं लेणं ।
ब्रम्हानंदाचा वाचवा प्राण । नित हिंडती दोघं जोडीनं ।
सातव्या मासी सुटला वारा । नार गर्भाची कोमल चेहरा ।
लिंबडाळिंब उतार करा । साती आसराचे पाऊल धरा ।
आठव्या मासी आठही कोनं । अष्ट पादुका आणल्या कोणं ।
नवव्या मासी नवस केला, पुत्र जन्मला आनंद झाला.
साखर शेरणी वाटू लागला ।
निंबाच्या काडया घ्यायले घावा, राजाराम नाव जाहीर लोकाला,
झु- बाळा - झू ।

२.
येथे पाळणागीताअगोदर सरदा म्हटल्या जातात.
पहिली सरदा कशावरी कशावरी ।
नंदनपुरच्या कातबोळावरी कातबोळावरी बोळ घोसजी कवळे ।
अंबाई नारीचे डव्हळे ।
तिचे डव्हाळे तिले भारी । नेऊन हाका पलंगावरी ।
पलंगी नाचतील मोरा हलक्या हलवतील देरं ।
असा बापाजी सरु । सोन्या रुप्याचा करदूडा ।
बाळ बिदिले जाईल । घुगर्‍या वाणजी देईल ।
असा मामा हौसीदार । गेला इजच्या डोंगरा ।
आणला चंदनाचा भारा । टाकला सुताराच्या दारा ।
काहुन सुतारा निचित । कातीव पाळणा उचित ।
पाळण्याले आंबजांब । आत निजले गोविंद ।
पाळण्याले आमनटीका । पाळणा पिरथमीचा सखा ।
दुसरी सरदा कशावरी कशावरी ।
दुसरी सरदा खारकेवरी खारकेवरी ।
खारक घोसजी कवळे । अंबई नारीचे डव्हळे ।

३.

अठराशे सत्यान्नव (१८९७) सालात झाला आनंद नगराला
जन्मले पुत्र शाहुराजाला झु बाळा झू ॥१॥
दुसर्‍या दिवशी दोन हे रंग । येडया गवळणी बाळाच्या संगें ।
यशोदा बाळावर श्रेपती दंग, नागिन पदमिनी झाल्यासे दंग ॥२॥
तिसर्‍या दिवशी तिनशे थाट. साखर शेरण्या लोकाले वाट ॥३॥
चवथ्या दिवशी चक्रपुजेचा, गजेंद्र सारथी बाळाचा
खेळ खेळसी कृष्ण गोकुळचा, महाली प्रकाश चंद्रसुर्याचा ॥४॥
पाचव्या दिवशी पाचवीचा मान, केली आशा परमेश्वराने
सटवी लेहती आपुल्या हातानं. ब्रहम्मा वाचतो हुकूमाप्रमाणं
काढूनी बळीराजा केला सनमान ॥५॥
सहाव्या दिवशी सहा ईल्लास, लावू समया चहू बाजुस
सुगंध तेल लावू अंगास, पाणी घालती तान्ह्या बाळास ॥६॥
सातव्या दिवशी सात आसरा, सुक्त्ती गुप्तीने घालती फेरा
लिंबडाळींब करा उतारा, दृष्ट काढून लावा अंगारा ॥७॥
आठव्या दिवशी आठवे अंग, वस्त्र घालूनी बाळाच्या अंगा ॥८॥
नवव्या दिवशी नेली बाळांती, केळी कमळांची तेबी खुलती
झाली जामीन त्या बाळाची ॥९॥
दहाव्या दिशी दहाव्या राती, तेहतीस कोटी देव हे येती
तान्ह्या बाळाची प्रकृती केसी, उतरवून टाकती माणीक मोती ॥१०॥
अकराव्या दिवशी अकरावी करा, नगरच्या नारी येतील घरा
पार्वती म्हणे शिवशंकराला राजाराम नाव जाहीर लोकाला ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP