भूमिका -
रावणाने कुबुद्धीने सीता हरण करुन तिला लंकेत अरण्यात ठेवले होते व तिच्या भोवती राक्षसणींचा पहारा ठेवला होता. राम-रावण-युद्ध जोरात सुरु झाले. कुंभकर्णासारखा महाबलाढ्य योद्धा श्रीरामचंद्राने धुळीस मिळविला. ते पाहून रावणाच्या तळपायाची आग मस्तकास पोचली. आता रावणाच्या अनेक पुत्रांपैकी एकच पुत्र इंद्रजित हा राहिला होता. त्याला रावणाने तुझा काका रामाने मारल्याचे सांगितले. इंद्रजिताने घोर प्रतिज्ञा केली. मी रणांगणांत जाऊन सर्व शत्रूंचा निःपात करुन येईन, तरच तुम्हांस तोंड दाखवीन. युद्धास निघताना त्याची पत्नी महापतिव्रता सुलोचना इच्याकडे तो गेला. तिने आज आपण युद्धास जाऊ नये. आज आपणांस काल अनुकूल नाही. माझ्या सासर्यांनी सीताहरण करुन आपाअ वंश नाहीसा करण्याचे घोर पातक आचरले आहे. तेव्हा आता आपण रामास शरण जावे. परंतु हे त्याला न रुचता तो तसाच लढाईला गेला. लढाईत लक्ष्मणाने त्याचे मस्तक उडविले. ते मस्तक श्रीरामचंद्राच्या पायी जाऊन पडले व त्याचे धड युद्धजागी तसेच उभे राहिले. त्याचा हात तोडून लक्ष्मणाने उडविला व तो सुलोचनेच्या अंगणात जाऊन आपटला. कोणाचा हात आहे हे पहात असता आपल्या पतीचा हात आहे हे तिने ओळखिले. त्या वेळी तिने फार शोक केला आहे. त्यावेळी करुण रसाने ओथंबलेली कविता कोणाच्याही हृदयास पीळ पाडल्यावाचून राहात नाही.
त्या भुजेला तू माझ्या पतीस सोडून का आलीस व कशी आलीस असे विचारताच त्या निर्जीव भुजेने पत्र लिहून दाखविले. ते पत्र "शेषकुमारी पत्र लिहिलें निर्जींव करीं" या पदात अप्रतिम भाषेत वठले आहे. आता माझे शीर रामाजवळ आहे व धड सुवेळेत आहे. मी तुझी वाट पहात आहे. असाही त्यामधे मजकूर होता. नंतर ती आपलय सासूसासर्यास भेटली. रावणाचा व मंदोदरीचा पुत्रशोक पाहून कोणाचेही हृदय उकलून जाईल अशी कविता आहे. सुलोचना तडक रामाकडे गेली. तिला पाहून सर्व वानरगणाला वाटले, आपली सीताच आली आहे. तिने रामास आपल्या पतीचे शीर मागितले. आमचे पाशी तुझे पतीचे शीर आहे हे तुला कशावरुन कळले ? असे विचारताच तिने ते पत्र तसेच रामापुढे टाकले. पत्र वाचताच सर्वांना मोठा अचंबा वाटला. श्रीरामाचे अंतःकरण अत्यंत सद्गदित झाले व ते म्हणाले, तू महान पतिव्रता आहेस. जर एकदा या शिरास हसव. म्हणजे तुझी कीर्ती अजरामर होईल.
तिने शिरास प्रार्थना करताच सहज बोलली की, ’जयप्राप्तीस्तव आपणांस आणिलें असतें मी बापास, ऐकुनिया तें शीर हसलें’ ते शीर खदखद हसलें हे पाहून देवांनी तिच्यावर सुवर्णपुष्पवृष्टी केली. ती शेषतनया ’शेष’ म्हणजे लक्ष्मण. ही लक्ष्मणतनया म्हणजे लक्ष्मणाची मुलगी. लक्ष्मणानेच इंद्रजित मारिला व ही म्हणाली, मी आपलय बापास तुमच्या जयप्राप्तीसाठी आणले असते. हे भाषण ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
१.
ओवी
बंदीं घातले देवगण ॥ गर्वें त्रैलोक्य मानी तृण॥
शक्रारितात लंकारमण ॥ रावण सभेसी पातला ॥१॥
२.
पद (चाल-उखाहरणाची)
कुंभकर्ण समरंगणिं पडला ॥ हें ऐकुनि कर्णीं ॥
त्या दुःखानें व्याकुळ होऊनी ॥ रावण पडे धरणीं ॥ध्रु॥
हे घटकर्णा त्रिभुवनहरणा ॥ काय गती जाहली ॥
महाकाळ विक्राळ मुखामधें धूळ कशी पडली ॥
तुजलागि तुडवाया उरावर वानरचमू चढली ॥
हे विरश्रेष्ठा, अशी अपेष्टा, तुज कशी आवडली ॥
तुझा भरंवसा तूचि आम्हांला भवसागर तरणी ॥१॥
वानर-कटकामधें कसा तूं पावलासि मरण ॥
कसा रणामधें बा झालासी निरनासिक कर्ण ॥
खद्योतानें बळें जिंकिला उग्रचंड किर्ण ॥
तेवि रणामधें पतन पावला म्हणती कुंभकर्ण ॥
अहा कशी विचित्रची जाहली ही शंकरकरणी ॥२॥
इंदजिता प्रति म्हणे दशानन बा रे तुझा काका ॥
कुंभकर्ण परलोका गेला टाकुनिया लंका ॥
आधीं विटंबली बहीण माझी शूर्पणखा आका ॥
पाहा याचिही तशि गत केली कापुनिया नाका ॥
दुर्धर रात्रंदीन लागली ही चिंता स्मरणी ॥३॥
पुत्र म्हणे हा ताता आता न करावें रुदन ॥
आण तुझी निर्वाण करिन मी दारुण रणकंदन ॥
प्राणचि घेइन भेटवीन त्या रबिनंदन सदन ॥
शत्रुवधाविण तुला दाविना परतुन हें वदन ॥
विष्णुदास म्हणे यापरि बोलुनी मस्तक धरि चरणीं ॥४॥
३.
साकी
इंद्रजीत त्या कालीं अभ्राआड लपुन शर मारी ॥
आजि आम्हांवर कशी कोपली कपी म्हणती महानारी ॥
युद्धाविण मरती, रघुविरनाम स्मरति ॥१॥
४.
दिंडी
विलोकितां कोठें न दिसे कोणी ॥
कपी पडले निरुपाप दीनवाणी ॥
महाकपटी तो हाणी कपटबाणीं ।
पडे धरणी मूर्च्छीत चापपाणी ॥१॥
५.
साकी
त्या खळ मतिनें अशा रीतीनें सर्व कुळक्षय केला ॥
परी हरीला जय साधुन गेला इंद्रजीत लंकेला ॥
तें यश बहु यश मानी ॥ खळ रावण अभिमानी ॥१॥
पडले धरणीं रामलक्ष्मण पडले कपिगण सारे ॥
दुर्दैवाप्रती म्हणे मारुती केला घात कसा रे ॥
जय जय रघुवीरा महा समरंगण धीरा ॥२॥
राम लक्ष्मण कपिगण निद्रा त्यागुनी जागे होती ॥
या रणकुंडीं आजि सकलांची पडली होती आहुती ॥
म्हणति मारुतिला ॥ वाचविले रघुपतिला ॥३॥
६.
दिंडी
नागफणिचे तोडिता ही कुपाटे ॥
अधिक त्यासी फूटती पुन्हा काटे ॥
शत्रुमृत्यू झाल्याही ऊर फाटे ॥
कसें झालें कर्म हें उरफाटें ॥१॥
७.
साकी
करिन जरी निर्मूंळ शत्रु तरी दाविन या वदनास
नाहीं तरी मग घटकर्णा परि जाइन यमसदनास ॥
८.
दिंडी
कशासाठी येवढा आला राग ॥
पंचप्राण वल्लभे मला सांग ॥
काळचक्र लागलें पित्यामागं ॥
अशा वेळीं अवश्य जाणे भाग ॥
९.
साकी
बहुतचि राक्षस रणांत खपले त्याचा नसे लेखाही ॥
परंतु कालच रणांत खपला कुंभकर्ण काकाही ॥१॥
१०.
दिंडी
प्राणनाथ युद्धासि नका जाऊं ॥
किती आता तुम्हांसी समजाऊं ॥
बळें सीता आणून सुलंकेला ॥
रावणानें रामासि वैर केला ॥१॥
परस्त्रीचा अभिलाष पापभोग ।
प्रमादानें वाढला महारोग ।
बैसलाचि असाध्य प्राण घेवूं ॥
प्राणनाथ युद्धासि नका जाऊं ॥
शिव क्षोभे प्रतिकूळ काळ झाला ॥
रणांतून परतुनी कोण आला ॥
कसा मेला तो कुंभकर्ण भाऊ ॥ प्राण ॥१॥
माझि येवढी तुम्हांस सूचनाही ॥
तुम्हांलागी सर्वथा जय नाहीं ॥
नका माते वियोग दुःख दाऊं ॥प्राण॥२॥
परतूनि राघवा सीता द्यावी ॥
स्नेहभावें सद्भक्ति असूं द्यावी ॥
विष्णुदास अखंड पदीं राहूं ॥३॥
११.
कामदा
पहा तयानें काका आणि आत्या ॥
कशी विटंबिली योग्य काय त्या ॥
सदनें जाळिलीं जडित कांचनें ।
वधिन शत्रू मी ते सुलोचने ॥१॥
अधिकची आतां वैर वाढला ॥
मर्कटे हरि नाकि ताडिला ॥
तद्दया क्षमा तरि करोचि ने ॥
वधिन शत्रु मी ते सुलोचने ॥२॥
१२.
पद
(चाल-राम स्मरावा)
रघुवीर, कोंमल तनु घनश्याम । सदय हृदय श्रीराम ॥
दशरथनंदन जानकीजीवन ॥ दिनकर कुल विश्राम ॥ध्रु १॥
त्रिभुवनपावन दीनदयाघन ॥ मुनिजनमानसधाम ॥२॥
निर्मळ चिद्घन नाथ निरंजन ॥ निर्गुण जो निष्काम ॥३॥
विष्णुदास म्हणे जगिं सर्वोत्तम ॥ उत्तम राघवनाम ॥४॥
१३.
साकी
येवुनि आमुच्या इनें लाविली आग प्रथम लंकेला ॥
पुढे आजवरती इनें कुळासह बहुतांचा क्षय केला ॥१॥
१४.
कामदा
बोलुनी असें शास्त्र घे हातीं । शीर तोडुनि पाडले क्षितीं ॥
इंद्रजीत तो निघुन चालला ॥ दुःखें मारुती काय बोलला ॥१॥
१५.
पद
आतां जानकि देखत गेली काय दैवानें बाणेंहि केली ॥ध्रु.॥
मिळवुन वानर संगर केला ॥
वांयाचि खटपट झाली ॥१॥
दुस्तर सागर उतरुन जातां काठासि नाव बुडाली ॥२॥
कर्माचे कर्दमीं या भ्रमराची कमळाचि वेली मुराली ॥३॥
विष्णुदास म्हणे या परिनें जग लटकेंची संशयीं घाली ॥काय.॥४॥
१६.
पद (चाल-अशाश्वत संग्रह)
आहे क्षेम जानकि अशोक वनीं ॥ध्रु.॥
बोले बिभीषण आलों विलोकुनी आतांचि निजनयनीं ॥१॥
इंद्रजितानें वधु कपटाचि टाकिली ही वधुनि ॥२॥
हव्यमुखीं रथ प्राप्तचि होता अपजय न ये स्वप्नीं ॥३॥
विष्णुदास कर जोडुन प्रार्थित इच्छित वर कवनीं ॥आ.॥४॥
१७.
साकीं
शस्त्रास्त्रातें आसोनि मंडित खंडित समरिं न व्हावा ॥
विजयी असावा असाचि द्या रथ मनोरथ हा पुरवावा ॥१॥
१८.
श्लोक
वानरासहित एक धीट चोर पातला ॥
हेमभाग हारणार्थ येथें हात घातला ॥
काळ साध्य नाहिं आज आपणांस आपुला ॥
ऐकतांचि ऐसी वाणी इंद्रजीत क्षोभला ॥१॥
२०.
पद - (चाल-श्रीविधी हरिहर मूर्ति सांवळी)
लक्ष्मणाचे बाणें इंद्रजित समरंगणिं पडला ॥
सुलोचनेप्रति करी विदित कर वृत्तांत हा घडला ॥धृ.॥
निकुंबळी मधें तदा कबंधचि स्तंभ पाय उभे ॥
धावुन धरले वरचेवर शिर विर वानर वृषभे ॥
कौतुक दावावयासी नेलें, रविकुलदीप सभे ॥
गर्जति वानरगण दुर्मिळ या मंगळ जयलाभें ॥
तो दुर्धर सिंहाचा मस्तक वृषभा सांपडला ॥१॥
पुनरपि उसळुनि करपक्षापरी धावत गगनांत ॥
अवचित पडला सुलोचनेच्या येवुनि अंगणांत ॥
त्या कालीं ती स्वस्थचि होती अनंद सदनांत ॥
कच सरसावित हंसत सदोदित तांबुल वदनांत ॥
त्या संधित कर दंड पतन ध्वनि कर्णयुगीं पडला ॥२॥
२१.
पद
सुलोचने काय वदूं वदनीं ॥धृ.॥
सुरवर असुरा समरचि झाला, वाटतसे गगनीं ॥१॥
अडमार्गानें नकळत आला, आज तुझे सदनीं ॥२॥
कोण्या विराचा पाणी तुटोनि, पडला या धरणीं ॥३॥
विष्णुदास म्हणे संशयिं पडली, या संशयभुवनीं ॥४॥
२२.
साकी
थोर लागला क्षय लंकेला जानकी आणण्यासाठीं ॥
दशाननाला म्हणुनि घटका प्रतिकुल झाल्यासाठी ।
झाली वध सेना ॥ तिळभार लाभ दिसेना ॥१॥
माजली कटकट चटभट कटके रावण कटवि हटानें ।
न वरी भूमिका जयवर नवरी, सजली लालपटानें ॥
ही गति कर्माची---आणलि वधु रामाची ॥२॥
राक्षसगण कोटीच्या कोटी रणीं आटले नर हारीनें ।
विदारिता घटकर्णहि ज्यापरी आसुरनखें नरहरिनें ॥
महापुर रक्ताचे ॥ ढिग पडले प्रेतांचे ॥३॥
२३.
दिंडी
सूड त्याचा घ्यावयालागीं आजी ।
प्राणनाथ धावले रणामाजीं ॥
नाहीं आम्हां सांप्रत काळ राजी ॥
लाज सर्व शंकरा तुला माझी ॥१॥
२४.
साकी
पदर सावरित हात सरसावित कंकणें करिं खणखणती ॥
लगबग चालतां पैंजणें पदामाजीं रुणझुणतीं ॥
चाले सकुमारी ॥ दशशतवदनकुमारी ॥१॥
२५.
पद - (श्रीविधिहरिहर)
पदर सावरुन सुलोचना मग क्षणभर उभि राहे ॥
तो निर्जीव कर निश्चळ गतिनें अवलोकुन पाहे ॥
कक्षेपासुन तुटून पडला बहु शोणित वाहे ॥
शोणित नोहे पतिव्रतेचें सुकृत अथवा हें ॥
विष्णुदास म्हणे कथा सुधारस, परिसावा पुढला ॥१॥
२६.
साकी
रत्नमुद्रिका पहा विरकंकण कीर्तिमुख भुजदंडी ॥
धाराग्निनें तापुन ही भुज येथें झाली थंडी ॥
तरि भुज कोणाची, वाटे मज रमणाची ॥१॥
२७.
पद (चाल-खळ रावण लंकापती)
अहो इंद्रजितराज-अहो महाराज-तुमची भुज आज
मला मुळ आली, मला मुळ आली ॥
सखे प्राणसख्याची सांग कशी गत झाली ॥ध्रु॥
तूं मंदोदरि कुमरा-प्राणप्रियकरा, सगुण सुंदरा, पराच्या कटकीं ॥
सोडूनी आलिस कां घराकडे येकटकी ।
जाहलिस कशी बैमान, कापिता मान, दुष्ट दुष्मान, तरि या घटकीं ॥
नसे कोणि कोणाचे, उगी अशाही लटकी ।
हरविला कंठिंचा मणि, तनू साजणी ।
कुणाच्या रणीं हवाली केली ॥१॥
सखे प्रियकर काय जाहला ॥
सांग तूं मला विनविते तुला, गडे या समयीं ।
जय प्राणपतीला कसा मिळाला नाहीं ।
जो विजय वधूचा कांत, महाकृतांत, याचा अंत, जहाला कांहीं ॥
आगस्ति बुडाला केवळ मृगजळ डोहीं ॥
म्हणे विष्णुदास त्या काळीं , सगुण वेल्हाळी, वियोगानळीं, पुन्हां तनु जाळी ॥२॥
२८.
साकी
इंद्रजिताप्रति सुलोचना सती आठवुनि रडे दिनवाणी ॥
त्या काळीं खगमृग नेत्रांतुन दुःखें ढाळित पाणी ॥
हरहर मदनांता जयजय लक्ष्मीकांता ।
पशु हुंबरति मयूर झुरति रडती खाति न चारा ॥
तळमळति जल प्राशन न करिती णी म्हणती विषचारा ॥
कां तरि न मरावें वाचुन काय करावें ॥२॥
पतिव्रता सत्कर्मे पतीच्या जरि असेल लीन चरणीं ॥
यासि साक्ष द्विज हरिहर वायू अग्नि रवि शशी-धरणी ॥
तरि मग कर आता, लिहुनि दाविल वार्ता ॥३॥
२९.
कामदा
सुर आकाशीं ते चोज पाहती ॥
सतिशिरावरी पुष्पें वाहती ।
जशि उमा रमा रेणुका सिता ॥
तशी सुलोचना ही पतिव्रता ॥१॥
३०.
साकी
त्या काळीं मृत पतिशिर झरझर वृत्तांत लिहून दावी ॥
हरिहर म्हणती या साध्वीची लीला कशी न वदावी ॥
कन्या शेषाची-खाणी निर्दोषाची ॥१॥
उमा रमा सावित्री नमुनि म्हणति सुपवित्र मणी ॥
सद्गुणसरिता पतिव्रता ही इंद्रजिताची रमणी ।
कन्या धन्या ही-दशशतमुखजन्या ही ॥२॥
३१.
पद (असा धरी छंद चाल)
शेषकुमारी ॥ पत्र लिहिलें निर्जीव करीं ॥धृ॥
एक मुळ वृत्तांत प्राणेश्वरी, सुनेत्र मंगळ माहेश्वरी ॥
होणार सूत्र ईश्वरी ॥ न ढळे सुंदरी ॥१॥
शत्रु वन कंटक छेदावया ॥ रणीं जय जातां साधावया ॥
आलों हें तुज कळवावया ॥ प्रथम मंदिरीं ॥पत्र २॥
निघालों क्रोधें तुझ्यापासुन ॥ शत्रुच्या आपकृत्या त्रासुन ॥
म्यां केलें हवन बैसुन ॥ गुप्त गुहारीं ॥३॥
हवनीं तोषुनीया द्वीवदन ॥ निघाला दिव्य आंतुन स्यंदन ॥
आलोट कर्मबल गहन ॥ लोटेना नारी ॥४॥
सखे फलप्राप्तिच्या अवसरी ॥ साधिली द्वंद्विं वेळा पुरी ।
घालिता घाला रथ वानरीं॥ गेला माघारी ॥पत्र५॥
पुढे रणिं भिडलों दारुणपणें ॥ परंतु दैवचि पडलें उणें ॥
म्हणूनि प्रौढी लक्ष्मणें ॥ मिरवली भारी ॥६॥
सोडली निद्रा फलभक्षण ॥ उपाशी सुपात्र लक्ष्मण ॥
म्हणून म्यां केलें त्या अर्पण ॥ शीर समरीं॥७॥
संसाराहून मज अधिक ॥ वाटलें रघुविर चरणीं सुख ॥
हें कौतुक आलोलिक ॥ नाहिं संसारीं ॥८॥
निकुंबळी मधें आहे शरीर ॥ धाडलें रामदर्शना शीर ॥
आला मुळ तुजलागीं हा कर ॥ येई लवकरी ॥पत्र॥९॥
लाभला स्वार्थ आणि परमार्थ ॥ प्रभूच्या कृपेनें झालों कृतार्थ ॥
म्हणे विष्णुदास रघुनाथ ॥ भक्तजन तारी ॥पत्र १०॥
३२.
पद- आजि टाकुनी मजसी अकेले ॥ प्राणनाथ कुणीकडे गेले ॥ध्रु॥
आधि येवुनि या सदनाला ॥हात लावुनीया वदनाला ॥
उगी जाळुनि मदनाला ॥ नको नारी तूं करु रुदनाला ॥
चाल- तुझी आग धरणिधर दुहिते । अजि जिंकिन त्या रणमहिते ।
असें बोललें बोलू नये तें । तें घडी घडी मनीं येतें ।
वारिलें परि न ऐकियलें ॥ प्राणनाथ कुणीकडे गेले ॥१॥
हे लंकाधिपकुमारा ॥ देवेंद्राजिता सकुमारा ॥
राजेंद्रा परम उदारा ॥ कां सोडिली प्रियकर दारा ।
चाल - मी चातक पक्षावाणी, अवलोकितें भूतळ, पाणी, मेघ, छाया निर्वाणीं -
तुम्ही बैसले कोणे ठिकाणीं, कां निष्ठुर मन केलें ॥ प्राणनाथ कुणी०॥२॥
गृहिं आतां तुम्हांविण कांहीं ॥ मज क्षणभर करमत नाहीं ॥
विरहानळें झाली लाही ॥ सुख सांगा या लवलाही ॥
चाल - रात्रंदिन दुःखचि वाटे, जिव शांतवुं कोण्या वाटें ॥
मज दावा वल्लभ कोठें ॥ आड पडलें दैवचि खोटें ॥
त्यावांचुन दीन जाहालें ॥३॥
मन भ्रमलें दाहि दिशाला ॥ हे सुंदर हार कशाला ॥
पीतांबर शाल दुशाला ॥ नलगे ही रंगीत शाला ॥
चाल - तुम्ही शाश्वत पद भोगावें ॥ श्रीहरिच्या पदीं लागावें ॥
मज पतिव्रता कथि धालें ॥प्राण०॥४॥
३३.
साकी
लटकी काया लटकी माया लटका सर्व पसारा ॥
लटकी आशा लटकि निराशा लटका धंदा सारा ॥
भज भज गोविंदा ॥ अखंड ब्रह्मानंदा ॥१॥
श्वशुर सभेकडे धडक निघाली निर्भत चालत चरणीं ॥
आजवर तिष्ठुनि धन्यचि झालों म्हणती तरणी धरणी ॥
हरहर कर्मगती ॥ शिशु नरनारी म्हणती ॥२॥
गिरिशिखरिहुनि प्रचंड वातें थोर वृक्ष उन्मळला ॥
तेवीं सिंहासनावरुनियां रावण धरणीं पडला ॥३॥
३४.
पद (चाल - अशाश्वत संग्रह )
दशानन फारचि शोक करी ॥धृ॥
म्हणे वत्सा हा इंद्रजिता, कसें घातलें शोकांतरी ॥१॥
शून्यचि वाटे बा रे तुझ्याविण, कनकाचि लंकापुरी ॥२॥
आज तुझ्यापुढें केली कशी बा ॥ शत्रूनें बाणी पुरी ॥३॥
दुर्धर कर्मगतीनें दर्दूर चढला शेष शिरीं ॥४॥
अकांत ऐकुनी महाद्वारीं आली, लगबग मंदोदरी ॥५॥
विष्णुदास म्हणे अवघेचि शोकीं ॥ कोण कुणा आवरी ॥६॥
३५.
पद (चाल - भला जन्म हा तुला लाभला )
इंद्रजिताची अशी वार्ता ऐकुनि मंदोदरी ॥
पडली मूर्च्छित धरणीवरी ॥धृ॥
हा वत्सा हा इंद्रजिता बा काय गति जाहली ॥
शिराविण तनु कुठें राहिली ॥
कक्षेपासुन तुटून ही भुज रक्तानें नाहली ॥
तरी कशी शुद्धाक्षरें लिहिलीं॥
वधिन शत्रु तरि तरि मुख दाविन म्हणून आण वाहिली ॥
सख्या म्यां वाट तुझी पाहिली ॥
चाल - त्वां सिद्धिस नेला पण पुरता आपुला ।
परि शेवटीं कंठ कसा कापला ।
पहा आज आम्हांवर देव कसा कोपला ॥
कसें घातलें आम्हां दिनाला दुर्धर दुःखसागरीं ॥१॥
टाकुनि गेला मला वाटतें प्राणचि शरिरीं जसा ॥
कुठें तरी पाहुं तुला राजसा ॥
अति निकरानें तूं झालासी निष्ठुर मजवर कसा ॥
तोडला परम प्रीतिचा कसा ॥
कठिण प्रसंगीं तुझा आम्हांला बहु होता भरंवसा ॥
नाडलें चोरानें दिवसा ॥
चाल - हे निजमरणाहुन दुःख अधिक वाटतें ।
हे पंचप्राण मन कंठामधें दाटतें ॥
हें वीर शरानें चर चर फाटतें ॥
विष्णुदास म्हणे यापरि जाहली पुत्राविण घाबरी ॥पडली ॥२॥
३६.
साकी
वत्सचि माझें ओढुन नेलें गळीं लावुनी नव दावें ॥
म्यां गाईनें त्या यवनाचे अवगुण न कसे वदावे ॥१॥
३७.
पद
ऐके शेषतनये वृत्त पुढलें ॥ सुलोचने स्वप्न मला पडलें ॥
जानकि आणिली आणिली लंकेला ॥ कुळसह राक्षसक्षय केला ॥
रावण हरला हरला उगी बसला सदाशिव आपणांवरी रुसला ॥
विपरित म्हणुनी म्हणुनी हें घडलें ॥१॥
बिभीषण गेला गेला त्या शरण । जाहलें राक्षस बळहरण ॥
पडला कटकी कटकीं घटकर्ण ॥ पावला शक्रारि मरण ॥
रणीं नर कपिचे कपिचे ध्वज चढले ॥ रावण पडला पडला समरक्षितीं ।
बिभीषण केला लंकापती ॥ अष्टादश सहस्त्रावधी युवती नाडल्या दशकंदर युवती ॥
नगारे स्वर्गीं स्वर्गीं धडधडले ॥ सुलोचने॥३॥
स्वप्न हें लटकें लटकें नव्हें कांहीं येथुनि पुढें असेच होई ॥
यास्तव तूंची तूंची जा बाई ॥ राघवा शिर मागुन घेई ॥
आशा मन सोडी सोडी ईकडलें । सुलोचने ॥४॥
३८.
दिंडी
आजि मामाजी तुम्ही रणीं न जावें ॥
वर्म याचें हें मनिंच समजावें ॥
मला वाटे हें पेटलें घर विझावें ।
कृपासिंधु दिनबंधुला भजावें ॥
३९.
श्लोक
सुलोचने आतां काय मी करुं ॥
मृत्यू पावलें माझें लेकरुं ॥
वैर साधिला वारि जा सना ।
पुत्रशोक अंगार सोसेना ॥१॥
४०.
साकी
पतिशिर आणण्यास्तव युद्धाची तुम्हीं खटपट न करावी ॥
काय करावें गती राहिल्या शिर तिकडे आ ? कराहीं ॥१॥
४१.
दिंडी
म्हणे जा जा जा हालवोनि मान ॥
कोण आहे सुसाध्वी तुजसमान ॥
तुझा केल्या तिळमात्र आपमान ॥
तरी सर्व मारीन दुषमान ॥१॥
४२.
पद
इंद्रजिताची राणी चालली पतिशिर मागाया ॥धृ॥
जाता मार्गी सुलोचना सती ॥ आठविला मनीं आंबिकापति ॥
हृदयीं रमली वल्लभमूर्ती ॥ त्यागून भवमाया ॥१॥
येता पाहुनी ती सुनयना, वानर घालती खाली माना ॥
रामसभेमधें नाहिंच आणा, वासना पाप हृदया ॥२॥
४३.
साकी
इंद्रजिताची सुलोचना स्त्री दशवदनाची सून ॥
पतिशिर मागायास्तव आली पाठविली सासूनं ॥१॥
४४.
पद
जय जय रघुनंदन प्रभु, दीन दयाघना ॥भो !
अनाथनाथ तात पतितपावना ॥ध्रु.॥
जयजय घननीळ घनःश्याम सुंदरा ॥
जयजय गुणगंभिर धिर, विर धनुर्धरा ॥
जयजय महाराक्षस खळ, कटकमर्दना ॥१॥
झाला तळीं तटपक तो, शिरिं धरीं धरा ॥
झाली पदकमळयुगुलिं भ्रमरि इंदिरा ॥
लागलें तव गहन ध्यान, मदनदहना ॥जय०॥२॥
जयजय श्री सच्चिद्घन, चित्तरंजना ॥जय॥३॥भो !
जानकीनाथ, सदय हृदय कोमला ॥
हा प्रपंचताप निपट, नको नको मला ॥
आलों तुज शरण रक्षि, न करी वंचना ॥जय॥४॥
तूं करुणामृतसिंधु दीनबंधु राघवा ॥
तूं निर्गुण सगुण रुप रंग आघवा ॥
जयजय क्षिति गगनानल, जल प्रभंजना ॥जय॥२॥
तूं तारक भवसागरपूर, भक्त सारथी ॥
तुज अर्पण गंध, धूप, दीप आरती ॥
विष्णुदास भजन पुजन नमन प्रार्थना ॥जय. ॥६॥
४५.
साकी
अमुच्यापाशीं पति शिर आहे हें तुज कैसें कळलें ॥
सांग मला सुशिले, तुज पाहतां माझें मन कळवळलें ॥१॥
४६.
श्लोक
सौमित्रे कर दंड खंड करितां घेवूनि धंडारणी ॥
तो माझ्या पडला भ्रतार कर हा येवोनिया अंगणीं ॥
येणेंची कथिलें तुम्हीच आणले प्राणेश्वराचें शिर ॥
तें द्यावें करुणाघना रघुविरा, झाला मला ऊशीर ॥१॥
४७.
ओवी
निर्जीव वल्लभाचा चापपाणी ॥
कैसा बोलला नसोनी वाणी ॥
हे अघटित शुभकल्याणी ॥
सत्य मिथ्या नेणवे ॥१॥
४८.
दिंडी
उभा आहे संगोपी या जिवाचा ॥
माझी वाट पाहतो तो केव्हाचा ॥
पुढे आतां मम वंदु न शके वाचा ॥
रघुनाथा हें पत्र तुम्ही वाचा ॥
४९.
श्लोक
देवांच्या समरंगणांत मिरवे हस्ती जसा कर्दळीं ॥
त्याचा मस्तक गोल वानरबळें भो वंदुनि आदळी ॥
रुंडाचि पदरें पुसून धुळ ती दुःखें रडे अंगना ॥
कोण्या वेळिं कसा प्रसंग घडतो कांहीं कळेना मना ॥
५०.
कामदा
कपिगणासह देव वासवी । म्हणती एकदां शीर हांसवी ॥
तुजसी कार्य हें सहजची घडे । झडती कीर्तिचे स्वर्गी चौघडे ॥
५१.
पद - (चाल - उद्धवा शांतवन)
धरणीधर तनया बोले । कपिसहित रघुविर डोले ॥
मी दीन दासी दिनवाणी ॥ प्रार्थितें हात जोडोनि ॥
मजकडे प्राण प्रियनाथा ॥ तुम्ही पहा नेत्र उघडोनि ॥
एकदां हांसोनि दावा । महाराज नेत्र उघडोनी ॥
चाल- जयप्राप्तीस्तव आपणांस ।
आणलें असतें मी बापास ।
विष्णुदास म्हणे या वचनास ।
ऐकतांची तें शिर हंसलें ।
कपिसहित रघुविर डोले ॥