भूमिका -
महावीर व महाभक्त, महापराक्रमी पांडव वीर काम्यक वनात असताना झालेला प्रकार हा आहे.
ठरलेला वनवास सुखाने श्रीकृष्णचरणी भक्ती ठेवून पांडव काळ कंठीत होते. पांडवांच्या सहवासाला कित्येक ऋषी ब्राह्मणही येऊन राहिले होते.
सिंधू देशाचा राजा जयद्रथ हा दुर्योधनाच्या दुःशीला नावाच्या बहिणीचा पती होता. म्हणजे धर्मादी पांडवांचाही तो मेहुणा होता; परंतु त्याची दुष्ट नजर द्रौपदीकडे वळली व द्रौपदीचे हरण करुन आपल्या घरी नेऊन आपल्या जनानखान्यात ठेवावी अशी त्याची दुष्ट बुद्धी तयार झाली. पण त्याला सवडच सापडत नव्हती.
एकदा सर्व पांडव मृगयेकरिता आश्रमातून बाहेर गेले. हे पाहून ही संधी साधून जयद्रथ तेथे आला व द्रौपदीशी बोलू लागला की ’पांडव भिकारी आहेत, वनवासाला लागले आहेत. यांच्यापासून तुला सुख ते काय होणार ? तू माझ्याबरोबर चल. तुला पट्टराणी करतो व तुला अनेक सुखात ठेवतो.’ हे त्याचे मर्मभेदक भाषण ऐकताच द्रौपदी नागिणीसारखी चवताळली व तिने त्याची खूप निर्भत्सना केली. परस्त्रीवर नजर ठेवणे हे महापाप आहे वगैरे पुष्कळ ती बोलली. परंतु त्याच्यावर तिच्या बोलण्याचा काही एक परिणाम झाला नाही. एकदा का मनुष्याची वाईट वासना तयार झाली म्हणजे त्यातून तो सरळपणे बाहेर सुटणे मुष्किलीचे होते. दुष्ट जयद्रथाने द्रौपदीस उचलून आपल्या रथात घातले व तो पळून जाऊ लागला.
भोवतालच्या ऋषिजनांनी ओरडा केला; पण या दुष्टाच्या शस्त्रबळापुढे कुणाचेही काही चालले नाही. द्रौपदीनेही आकांत करुन श्रीकृष्णास मोठया कळवळ्याने हाक मारली. तिकडे पांडवांना अपशकुन होऊ लागले. धर्मराजाने आपल्या बंधूस सांगितले की, आज काहीतरी वाईट प्रसंग आहे, तेव्हा लवकर चला. पांडव आपल्या आश्रमात येऊन पाहतात तो द्रौपदी कोठेच दिसेना. ऋषिजनांनी, तिला जयद्रथाने रथात घालून नेली आहे असे सांगितले. ते ऐकून ते नरव्याघ्र चवताळून त्याला पकडण्यासाठी धावले. थोडयाच वेळाने जयद्रथाचा रथ त्यांना मिळाला. त्यांनी जयद्रथाचे डोक्याचे केस धरुन त्याला खाली पाडले व भीमार्जुन त्याचा वध करण्यास तयार झाले. ’दुष्टा, अहंकारमदाने व्यापलेला तू आपल्या कर्माची फळे भोग,’ म्हणून अर्जुनाने खड्ग उपसले. परंतु धर्मराजाने सांगितले की, दुष्ट जरी असला तरी तो आपल्याच चुलत बहिणीचा पती आहे. त्याचा वध करु नका. धर्मराजाची आज्ञा ऐकताच त्याला सोडले व धर्मराजांनी त्याला दोन उपदेशाच्या गोष्टी सांगून जाण्यास सांगितले. खाली मान घालून मातीत मुख भिनवलेले घेऊन तो चालता झाला.
१.
श्लोक
विद्या मान्य सतेज चातुरि कला ज्या मान्य कमलोद्भवा ॥
पुण्यश्लोक आती महाक्षितिपति आजिंक्य युद्धां शिवा ॥
काळाची गति ही पहा असुनियां ज्या साह्यही माधवा ॥
टाकोनी सुख भोग राज्यपद तें गेलें वना पांडवा ॥१॥
२.
पद
काम्यक वन रम्य सुखोद्भव म्हणति पांडव काल क्रमाया ॥
हें योग्य पुण्य स्थळ राहाया ॥ध्रु.॥
दशदिशा लता द्रुम व्यापुनि गगना चुंबुनि महिवर येति ॥
रविरथ मळ मंडपि दिसती ॥
अचाट वृक्ष घनदाट सरोवर पाट प्रांजळ वाहती ॥
पशुपक्षी स्वइच्छें रमति ॥
मद मत्त पुष्ट शरिरांनीं मृग गज रानिं निर्भय वसति ॥
वृक व्याघ्र उग्र भय देती ॥
चाल-
रस टपकति पक्क फळांचे ॥
दुर धांवति गंध फुलांचे ॥
वनिं साच श्रमति जनाचे ॥
श्रम दूर व्हाया ॥ हें योग्य०॥१॥
समवागति पांचहि बंधू महाबळसिंधु शांति वरोनि ॥
गुरुवचनीं सदा अनुसरुनि श्रीधौम्यऋषिगणमेळी सह पांचाळी आदि करुनी ॥
वनिं राहति तृणासन करुनि ॥
क्षुधा विकळ विप्रसमुदाय भोजन द्याया वन शोधोनी ॥
बहु आणिती नित्य मृग वधुनि ॥चाल॥
होणार दैविं तें सुचलें ॥ शरचापीं पांच वीर सजले ॥
दुर घोर वनाप्रति गेले ॥ मृग माराया ॥हें योग्य०॥२॥
लग्नासि जयद्रथ भूपति, घेउनि संगति, चमु समुदाया ॥
ते तिसी गमे तृणप्राया ॥ ती एकटी पाहुनी दृष्टी,
नृप म्हणे कष्टी, पिटी निजहृदया ॥ म्हणे हाय स्वरुपें काया ॥
चाल -
धन्य ब्रह्मदेव जग रचिता यावयासी सुंदरता ॥
दिला पित्यानें प्रथम कित्ता ॥ हात वळवाया ॥हे योग्य ॥३॥
मंत्रि प्रति अति अनुरागें, भूपति सांगें बा जावें ॥
हें कार्य आधीं साधावें ॥ ही कोण कोणाची जाया,
कां या ठाया, सकळ पुसावें ॥
युक्तीनें बहुत बोधावें ॥
बल राज्य रुपगुण लक्षण मदप्रति भाषण हेंहि कळवावें ॥
तुला कळेल तसे बोलावें ॥
चाल -
जाहला कामसंचार ॥ भूपहृदयीं शिरे अविचार ॥
विष्णुदास म्हणे विचार ॥ यश मिळवावा ॥
हें योग्य पुण्य स्थळ राहाया ॥४॥
३.
पद
निकट मग लवलाहया ॥ शर्मेना किंचित बोलाया ॥ध्रु.॥
म्हणे तूं कोणाची जाया ॥ कशास्तव आलीस या ठाया ॥
दिसते दुश्चित मुखचर्या ॥ कळवुनि आलों सौंदर्या ॥
असा कां तुजवर दिल फिरला ॥ जयद्रथ गर्वें भर भरला ॥निकट मग १॥
म्हणे जी गज पुरिचे राजे ॥ पराक्रमी पांडव पति माझे ॥
बहिण मी कृष्णाला साजे ॥ द्रौपदी नाम महीं गाजे ॥
हारिलें राज्य द्यूतिं पैजें ॥ वनामध्यें आलों या काजें ॥
कळविलें तुजला पुसलें जें ॥ परत जा निजकर्मासि भजे ॥
पांचही गेले मृगयेला ॥ जयद्रथें गर्वे भर भरला ॥निकट० २॥
कसे तुज वाटती प्रिय भरते ॥ दरिद्री पांडव भिक्षूते ॥
पांचजण योग्य न संगति ते ॥ बळे कां भोगिसी दुर्गति ते ॥
फिदा मन जाहलें तुजवरतें ॥ मला वर प्राणप्रिये वनिते ॥
नको भिऊं भाषण नाइकते ॥ प्रार्थितों मुख मुझे दुखतें ।
तुजवर जिव सारा धरिला ॥ जयद्रथ गर्वे भर भरिला ॥३॥
खळा मुख सांभाळीं आपुलें ॥ मुकशिल प्राणा या आकले ॥
तुटतिल शरिरांचीं शकलें ॥ महामुनी या कामीं चकले ॥
कित्येक भूप राज्यांतुनि भकले ॥ कोण या निच कर्में तरला,
जयद्रथ गर्वें भर भरला ॥४॥
वनामधें तप करुनि रहावें ॥ वाटे ना नगराला जावें ॥
तुजविण जिणें निर्फळ भावें ॥ वल्लभे वश मला व्हावें ॥
मनोगत इच्छित मागावें ॥ राज्यपद माझें भोगावें ॥
पतिनें कैवारा यावें ॥ माझें बळ कौतुक मग पहावें ॥
तुजवर त्यांचा हक्क सरला ॥ जयद्रथ ॥५॥
नाहीं मनिं शंका तिळमात्र ॥ बोलसि भलतें अपवित्र ॥
क्षत्रिय कुळीं हीना कुपात्र ॥ अधोगति धाडिसी कां गोत्रा ॥
मलिना पांडवअमित्रा ॥ करुं कां पाहसी यमयात्रा ॥
भेट जा वाचुनि निज वधुला ॥जयद्रथ ॥६॥
मदांध विषयाची गोडी ॥ वाटेना खळ नाकचि मोडी ॥
मूढमति पांडव भय सोडी ॥ बळेंचि द्रौपदीला ओढी ॥
भयानें आडमार्गें दवडी ॥ कळेना मुर्खा मति थोडी ॥
भुलला मरणा विसरला ॥ निकट मग आला लवलाहया ॥जयद्रथ गर्वे ॥७॥
४.
पद (चाल-भला जन्म हा)
आश्रमीं पांडव नसता जयद्रथ चोरमार्गे येउन ॥
पळाला द्रौपदिला घेऊन ॥धृ.॥
स्त्री सिंहाची हरण कराया नाहीं मनीं लाजला ॥
मदांधचि आंगीं भरी माजला ॥
निज नगरांतुनि निघतां उत्तम सुमुहुर्त योग साधला ॥
म्हणुनि दिव्य लाभ जाहला ॥
द्रौपदी म्हणे हरि धांव जयद्रथ, चोरुनि नेतो मला ॥
कळेना कसें हें तुजला ॥
चाल -
मज एकटिलाची आश्रमांत ठेवुनी ॥
हे कशी तयाची बुद्धी जाहली हानी ॥
इकडे पांडव वनामधें असतां थोर क्लेश पावती ॥
मनाला दुष्ट शकुन भासति ॥
रडति दिवाभीत दिवा वायस वामभागीं धावती ॥
दीर्घस्वरें भालु घोकिती ।
तनु जड जाहली हृदयी, शिरली धडकति गात्रें कांपतीं ॥
चक्षूंतुनि अश्रुपात वाहती ॥
चाल -
धर्म म्हणे बंधु हो वेगीं आश्रमी चला ॥
या चिन्हें वाटते थोर घात जाहला ॥
कीं पहिल्यापेक्षां हरि अधिक कोपला ॥
विष्णुदास म्हणे भय संशयीं भूप मृगक्रम सोडोनी ॥
आले निज आश्रमासी परतुनी ॥२॥
५.
दिंडी
म्हणती भूप द्रौपदि काय झाली ॥
कोणासंगें वनांत दुर गेली ॥
आम्ही नित्य ओळखिची ओळखिली ॥
हांक कानिं मंजुळ ऐकुं आली ॥१॥
६.
छंद
अर्जुनाप्रति म्हणति विप्र ते ॥
वेळ साधिला आजि जयद्रथें ॥
चोरमार्गें द्रौपदिला येऊनि ॥
रत्न म्हणवुनि गेला घेऊनी ॥१॥
७.
पद (पुरवणी)
ऐकतां नेली पांचाळी ॥ उरस्थळीं क्रोधाग्नी जाळी ॥
धांवले पांडव त्या काळीं ॥ निकट मग आले चमुजवळी ॥
दचकति ऐकुनि आरोळी ॥ चमुचि बसली कानठळी ॥
कांपचि भय कंपचि शिरला ॥ जयद्रथ गर्वें भर भरला ॥
तूं पळसी कां उभा राहे चोरा ॥ कोणाचि रे नेतोसि दारा ॥
आला घे शर तीक्ष्ण धारा ॥ आटोपे सांभाळी शरिरा ॥
वीरहो सोडुन द्या कमरा ॥ पळा ना व्हा शहाणें न मरा ॥
मराया पापमति सजला ॥ जयद्रथ गर्वें भर भरला ॥१॥
माजली भली वनीं कटकट ती ॥ महाविर प्राणाला कटती ॥
दाट घन शरधारा सुटती ॥ शिर जसे पिक कणसें तुटतीं ॥
कबंधें नाचति रणीं उडती, आकांती वक्षस्थळ पिटिती ॥
निकट तो पहातां घाबरला ॥जय० ॥१०॥
लौकरी द्रौपदिला सोडी ॥ पुरे म्हणे थोडयामधें गोडी ॥
भयानें आडमार्गें दवडी ॥ पार्थ पद अश्वाचे तोडी ॥
काढिली अर्धि मिशी दाढी ॥ घाशि शिर धरणीवर रगडी ॥
चिखल खळ पायीं तुडविला ॥ जयद्रथ गर्वें भर भरला ॥११॥
गुरोळया रक्ताच्या टाकी ॥ सदाशिव हरहर ज्या घोकी ॥
बांधिला बळकट रथ चाकी ॥ करिना कांहीं चुचाकी ॥
विष्णुकवी बोले खळ विरला ॥ जयद्रथ गर्वें भर भरला ॥१२॥
८.
पद
आज ओळख पडली रणांत ॥
याचे आमुचे हो शालक नातें ॥ध्रु.॥
चुलति की बहिणी आपली दुशिला ॥
यासि दिली पण जाहली खुशिला ॥
राहिली हौस मनांत ॥ याचे आमुचे हो शालक नातें ॥आज॥१॥
कधि पिचकार्या बहुरंगाच्या ॥ नाहीं उडाल्या की साठी जयाच्या ॥
राहि हौस मनांत ॥ याचे ॥२॥
विष्णुकवि म्हणे कल्पप्रणांती ॥ हांसती भीमार्जुन कौतुकिं ॥
म्हणति रंग भरा वदनांत ॥याचे॥३॥
९.
दिंडी
धर्मे केला जीवदान उपकार ॥
शांत करुनि तयासी वारंवार ॥
येरी सर्व मानुनि उपकार ॥
करुनि गेला मातेसि नमस्कार ॥१॥