भूमिका-
धर्मराजांनी एक अश्वमेध यज्ञ करण्याची तयारी केली. पृथ्वी जिंकून द्रव्य आणण्यासाठी अर्जुन व कर्णपुत्र वृषकेतु व अनेक सैन्यवीर निवडून अर्जुनाबरोबर पाठविले. यज्ञाचा घोडा मणिपूर संस्थानात गेला. मणिपूर हे संस्थान नागलोकांचे होते. तेथे बभ्रुवाहन हा राज्य करीत होता. त्याच्या वीरांनी हा घोडा पकडून नेला.त्याच्या कपाळावर एक पत्र लावले होते. त्यात सर्वांनी पार्थाला शरण यावे व त्याला पुढील प्रवासात सहाय्य करावे असे लिहिले होते.बभ्रुवाहनाने आपली माता चित्रांगी व उलूपी यांना ही हकीकत सांगितली. चित्रांगीने ’हा तुझा पिता आहे; त्याला आपले सर्वस्व राज्य समर्पण करुन शरण जा’ असे सांगताच तो मातृभक्त बभ्रुवाहन अर्जुंनास शरण गेला. परंतु ’विनाशकाले विपरीत बुद्धी’ किंवा परमात्म्यास जी घटना बनविणे होते त्याप्रमाण अर्जुनाने त्याची निर्भत्सना केली व तू नर्तिका म्हणजे नाचणारणीचा मुलगा आहेस; म्हणून तू युद्धास भ्याला आहेस. तर तूही आपल्या आईबरोबर नाचण्याचे काम कर, असा कठोर प्रहार त्याचेवर केला.
हे उपमर्दकारक भाषण ऐकताच तो सिंहाचा छावा खवळला व त्याने महायुद्धाची तयारी करुन अर्जुनावर चालून आला. लढाई जोरात सुरु झाली. दोन्ही बाजूंचे हजारो योद्धे पटापत मरु लागले. अर्जुनाकडील वीरांनी यापूर्वीच त्याला सांगितले होते की, हा पुत्र तुमचाच आहे. म्हणून यांच्याशी वैर करु नका. परंतु ते अर्जुनास पटले नव्हते. माझा पुत्र कोणास शरन जाऊ शकत नाही. पण याचे फळ अर्जुनास ताबडतोब मिळाले. कर्णपुत्र वृषकेतु याला बभ्रुवाहनान मारले. अर्जुनाने त्या वेळी फार शोक केला आहे. त्यानंतर अर्जुनाशी त्याने भयंकर लढाई केली. अर्जुनानेही खूप पराक्रम केला. पण अर्जुनास गंगेचा शाप होता. त्याला शेवटी अस्त्रांचेही मंत्र आठवेनात व शेवटी बभ्रुवाहनाने अर्जुनाचेही मस्तक उडविले. त्यावेळी बभ्रुवाहनाचे मातांनी अर्जुनासाठी अत्यंत शोक करुन आपली मंगळसूत्रे तोडली व पितृहत्यार्या, आता आमचाही वध कर म्हणजे तुला सुख लागेल, अशी निर्भत्सना त्यांनी केली. बभ्रुवाहनाच्या डोळ्यांत पितृहत्येबद्दल उजेड पडला व तो प्राण देण्यास तयार झाला. त्याची सापत्नमाता नागकन्या उलूपी इने सांगितले की, माझ्या बापाजवळ संजीवक मणी आहे; तो घेऊन आल्यास सर्वांचे प्राण वाचतील. बभ्रुवाहनाने आपल्या आजाकडे त्या मण्याची मागणी केली. परंतु मणी मिळाला नाही. नंतर बभ्रुवाहनाने त्या नागलोकावर स्वारी करुन अतिशय धुमाकुळ केला. मग वासुकीने तो मणी स्वतः घेऊन नातवाचे हवाली केला. धृतराष्ट्राचे दोन नागपुत्र दुष्ट होते. त्यांनी मणी गेला तरी उपयोग होऊ नये. म्हणून बभ्रुवाहन तेथे पोचण्यापूर्वीच अर्जुन व वृषकेतु यांची शिरे उचलून दडवून टाकली. इकडे हस्तिनापुरात कुंतीला विचित्र स्वप्न पडले. त्यात वृषकेतु व अर्जुनास अत्यंत धोका आहे असे दिसले; म्हणून श्रीकृष्ण, भीम व कुंती मणिपुराच्या रणांगणावर आले व बभ्रुवाहनाने श्रीकृष्णापुढे संजीवक मणी ठेवला; पण दोघांचीही मस्तके नाहीत हे पाहून सर्वच लोक निराश झाले.
भीमसेन म्हणाले की, श्रीकृष्णराया, संजीवक मण्याला मान कशास देतोस ? तूच कर्ता करविता आहेस. हे ऐकताच प्रभू श्रीकृष्णरायांनी प्रतिज्ञा केली की, ’मी बालब्रह्मचारी जर असेन तर त्या दुष्टांची शिरे तुटून पार्थं व वृषकेतु यांची मस्तके येथे येतील.’ ही वाणी उच्चारताच तेथे मस्तके सहज येऊन पडली. संजीवक मण्यास मान देण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांच्या शिरास ते मणी लावताच अर्जुन, वृषकेतू व सर्व सैन्य उठून बसले.
बभ्रुवाहनाने श्रीकृष्ण व पिता पार्थ, भीम व आजीबाई कुंती यांच्या पायांवर मस्तक ठेवले. कृष्नानेही त्या आपल्या भाचाची अत्यंत स्तुती केली. त्यावेळी अर्जुनाने बभ्रुवाहनास सप्रेमाने आलिंगन देऊन आज माजा पुत्र अभिमन्यूच भेटला असे त्याचे गोड शब्दात वर्णन केले. श्रीकृष्णनाथा ! मी जर प्रथमच बभ्रुवाहनाचा स्वीकार केला असता तर आज प्रत्यक्ष तुम्ही व सर्वजण माझ्या बाळाची स्तुती करीत आहात हे दिसले नसते. ’पुत्रादिच्छेत् पराजयम्’ हे सुख आज मी भोगत आहे ही आपली अत्यंत कृपा आहे.
१.
पद - (चाल - ये धावत माझे आई)
श्रीधर्मराजमुद्रांकित, पृथ्वी जिंकित, चालला वाजी ।
जनमेजय म्हणे वाहवा जी ॥
चतुरंग दळ घनदाट, धनुर्धर थाट, सभोवती राजे ॥
मधें अर्जुन रथ विराजे ॥
पदभारें दडपति, गज ऐरावत उन्मत्त माजे ॥
अनुरक्त समरकाजा जे ॥
ध्वजमंडित रथ गडगडती, भेरि धडधडति, कर्ण, दरवाजे ॥
बैसती कर्ण दरवाजे ॥
तो सेनातट महासागर, थोपला मणिपूर, ग्रामदरवाजीं ॥ जनमेजय ॥१॥
ते बभ्रुवाहनाश्रित वीर, अवलोकुन धीर, धरिती न थोडा ॥
साटोपे कर्षिती घोडा ॥
पांडव भट करिती तांडव, म्हणती खांडव वन राखोडा ॥
पूर करुन मोडूं खोडा ॥
घ्या हिसकुन परतुन घोडा, चरणकर तोडा, फरफर ओढा ॥
काय आम्हां सिंधुपुढें ओढा ॥
पुढें अद्भुत नवरसगायन, वैशंपायन, बहु नावाजी ॥जनमे॥२॥
२.
ओवी
बभ्रुवाहन विख्यात कीर्ति । श्रेष्ठ भूपति चक्रवर्ति ।
संगें घेऊनी प्रधान सुमति । शीघ्र सभेसी पातला ॥१॥
शामकर्ण धरोनि हातीं । बभ्रुवाहना सन्मुख आणिती ॥
पत्र वाचोनि सभासद म्हणती । राया पत्रार्थ जाणिजे ॥२॥
३.
श्लोक
स्वस्ति श्रीमद्धर्मराज नृपति यानें क्रतू मांडिला ॥
पत्रालंकृत शामकर्ण धरणी जिंकावया सोडला ॥
त्यानेंची धरणें असेल विर जो शस्त्रास्त्रपारंगत ॥
किंवा या करभार घेऊनी रणीं पार्थासी शरणांगत ॥१॥
४.
आर्या
किति म्हणति अजि घोडा ।
परत स्थळिं शीघ्रकाळ जावूं द्या ॥
किति म्हणती डसल आही ।
आपकीर्तिचाचि काळ जाऊं द्या ॥
५.
धनाक्षरी
तुझा वत्सा तो तात । जया अर्जुन म्हणतात ॥
शत्रु कंठींचा तात । प्राणनाथ आमुचा ॥१॥
मुला, दुखवितां बाप । बहु होईल संताप ॥
नको आचरुं हें पाप । तुला साफ सांगतें ॥२॥
धर्मयज्ञाचा हय उगा धरिला हाय हाय ॥
देई वंदुनि तत्पाय बहुं काय बोलू मी ॥३॥
तया घालुनियां आण बहू प्रार्थुनिया आण ॥
सखा हरिचा जिव जाण सख्या आण मंदिरीं ॥४॥
६.
ओवी
बभ्रुवाहन म्हणे रहा उगेचि ।
कवचें न काढावि निजांगींची ॥
मुख्य माय उलूपी चित्रांगीची ॥
आज्ञा प्रमाण आमुतें ॥१॥
७.
दिंडी
ध्वजस्तंभींचा कपि देत भुभुःकार ।
गांडिवाचा गंभीर टणत्कार ॥
होत जेथें तेथेचि निर्विकार ॥
पुत्र घाली साष्टांग नमस्कार ॥१॥
८.
श्लोक (शिखरिणी)
कुणाचाही नाहीं तरि तुजवरी बाण सुटला ॥
असा कां रे आगोदर तुजप्रति कंप उठला ॥
उगाची कां धाकें सकल शरिरीं घर्म फुटला ॥
कुणाचा तूं बाळा, द्विजकुळ मणि कोण कुठला ॥१॥
९.
घनाक्षरी
बळें कवटाळुन चरण । म्हणे आलों मी शरण ।
कृपा ठेवुन परिपूर्ण । करी स्मरण पूर्वींचें ॥१॥
१०.
साकी
आहे आपुला मी पुत्र म्हणुन घ्या शरणचि आलों भ्याला ॥
परि न म्हणावें पदरीं घ्यावें करुणामृतलोभ्याला ॥
जन्मलों दूर न धरी ॥ चित्रांगींचे उदरीं ॥१॥
११.
ओवी
कोण कोणाची चित्रांगी । कोण्या काळीं कोण्या जागीं ।
भार्या झाली कोण्या प्रसंगीं । स्वप्नीं किंवा जागृती ॥१॥
१२.
साकी
म्हणाल येथें आलों नव्हतों जरि या मणिपुरनगरीं ।
तरी अन्यानें कुणी उद्धरिल्या पंच सरोवर मगरी ॥
साक्षी देव मुनी सत्यचि मुखीं वदे मुनी ॥१॥
चित्रांगीसम तुजविण व्याकुळ आहे आहि-दुहिता उलुपी ॥
विरह मंदिरीं वस्तु पडली जशी शतकंटक कुलुपीं ।
तिचि तरि सय काहीं । आहे आथवा नाहीं ॥२॥
१३.
पद
पुर्वीं या दक्षिण सागरीं मणिपुर नगरिं तुम्ही आले होते ॥
विसरला स्मरण का हो तें ॥
जाहलें लग्न या जागीं तुम्हां चित्रांगि वधु देहाते ।
पितयानें समर्पिलें होतें ॥
येथेंचि एक संवत्सर, क्रमिता अवसर पुत्रवदनातें ॥
पाहुनि केलें गमनातें ॥
तें होतें मीच लेकरुं नका तरि करुं बेपर्वा जीवन ॥१॥
१४.
पद
जोगी-धुमाळी
क्षमा मनीं आवलंबुनि विजया । शांतवी पुत्रातें ॥
हा रणपंडित महाबळ सिंधू । या गुणरत्नांसी ॥ध्रु.॥
नको निंदूं ॥ टाकू नको दुर्वाग्विषबिंदू । अमृतपात्रातें ॥१॥
अथवा अभिमन्युचि म्हण याला । चक्री बभ्रुवाहन निमाला ॥
आलिंगुनि या यश दे आम्हांला । या सुपवित्राते । क्षमा मनिं ॥२॥
हा तरि वरि वीर्यांकुर ॥ करील कोपलिया आमुचि कुर ॥
तुडविल जैसा रणवारण खुर ॥ मृण्मय चित्राते ॥ क्षमा मनीं ॥३॥
सुज्ञानें समजत जाणावें ॥ भाषण आमुचें हें मानावें ।
विष्णुदास म्हणे सन्मानावें या सत्पात्रातें ॥क्षमा॥४॥
१५.
पद
मला जा भिक घरघर मागे ॥ नको मुख दाखवुं सर मागें ॥ध्रु॥
ममात्मज म्हणसी वदनानें । तरी कां विलपसि रुदनानें ॥
उगा मरशील रणकंदनानें ॥ प्राणधन आपुल्या सदनानें ॥
तुला हित सांगतों अनुरागें ॥ नको मुख दाखवूं सर मागें ॥१॥
अर्भकें या घोडा धरिला ॥ निरखिता चमुजीव घाबरला ॥
म्हणोनि आर्जव आदरिला ॥ आठवुनि प्रितिच्या सुंदरिला ॥
असो कुशल स्त्री सौभाग्यें ॥ नको मुख दाखवुं सर मागे ॥२॥
सकंपें जशि भिक्षूक वनिता ॥ मृदुत्वें लाजवि नवनीता ॥
ऐकता भय धरि रण ध्वनिता ॥ तयाची धिक् जननी जनिता ॥
पूर्वजा कलंक त्यायोगें नको मुख दाखवुं सर मागें ॥३॥
बाळगुनि नटनाटकशाळा ॥ घाल पैंजण कंकणमाळा ॥
रेखुनि कुंकुम टिळिं भाळा ॥ आनंदें नृत्य करी बाळा ॥
विष्णुदास नाहे हित सांगें ॥ नको मुख दाखवू सर मागें ॥४॥
१६.
आर्या
मी कोणाचा आत्मज ऐसे पुस येचि कालिमातेला ॥
निज ज्योतींचें कज्जल कालविल्या येचि काळिमा तेला ॥
१७.
ओवी
सक्रोधें होवोनि परता म्हणे बभ्रुवाहन पार्था ।
नर्तकीनंदनाच्या पुरुषार्था ॥ येचि काळी पाहासी ॥१॥
मज जननीसी गांडीवपाणी बोललासी लांछितवाणी ॥
विषार वृश्चिकाची आणि ॥ मर्मस्थानी सोसेना ॥१॥
उगेची अश्रुपात होती ॥ उष्ण शहारे अंगीं उठती ॥
सेनेसहित नृपती, कळाहीन दिसों लागले ॥२॥
अपशकुनाचा तात, जयासी अस्पर्श्य मानतात ॥
तो गृध्र येऊनी बैसत ॥ ध्वजस्तंभीं पार्थाच्या ॥१॥
१८.
पद
सक्रोधें मणिपुरनायक, अगणित सायक, चमुवर सोडी ॥
पांघरवि जसी पासोडी ॥
अनुशाल्व रणोदरिं शिरे, असंखित शिरें, चरण कर तोडी ।
दाखवी अधिक हातोडी ॥ चापाच्या धमकतिकोटी,
रिचवति कोटी गजरथघोडीं ॥ वीररसा चढली गोडी ॥
आनुशाल्व होउनी थंड, गेला मार्तंडसुत गावा जी ॥१॥
१९.
कटाव
चतुरंग दळ भार खवळला, रणसिंधुमधें सिंधु मिसळला,
क्षोभे धरणीधर खवळला । कूर्मदृष्टिचा तळ डळमळला ॥
जणूं मेरुवर मेरु आदळला ॥ निर्वाणींचा अलोट वळला ॥
शस्त्रास्त्रांचा घन कोसळला ॥ कीं रुद्राचा जिव मळमळला ॥
बळें काळकुट जहर उगळला, रस पाघळला, पतंगवत् वरति उडाला ॥
गज रथ घोडे पडति धडाडा ॥ दुःखें ओकिति रक्त भडाडा ।
बळें दंताच्या पडिती दरडा । अन्योन्याच्या दाबिती नरडा ॥
एकचि उठला अरड ओरडा ॥ वाजति कर्णे ढोल नगारे ॥
घुमति शंखाचे भुंकारे ॥ घडिघडि अश्वांचे खिंकारे ॥
किंकाटति गज महा किंकारे, हांकेवरति दीर्घ हाका रे ॥
श्वासोच्छ्वासाचे हुंकारे ॥ तो प्रति अंबरिं नाद विकारे ॥
कठिण टोचती मार तिराचे ॥ गगनीं उडती चेंडु शिरांचे ॥
निघून जाति प्राण धिराचे । नरवर दिसती रुप मोराचें ॥
क्षणभर घेति न कोणि विसावा ॥ वाटे चित्तीं जय गिवसावा ॥
मद युद्धाचा चढला सर्वां ॥ उन्मत्त झाले बहु बेपर्वा ॥
सोडुन जिव शरिराची पर्वा ॥ परस्परांच्या झाडिती गर्वा ॥
पाहुनियां रणरंग प्रभावा ॥ सुरवर म्हणती वाहवा वाहवा ॥
जे अनुसरले निजधर्माला ॥ मागे न हटले रणकर्माला ॥
सुरांगना त्या नरोत्तमाला ॥ आदरें वरोनि घालिती माला ॥
भुतें यक्षगण भक्षिती त्याला ॥ घोर भयंकर कलह माजला ॥
रक्तनदीला महापुर आला ॥ नरमांसाचा चिखल झाला ॥
विष्णुदास म्हणे किती वर्णावें ॥ नररत्नामाजि गणावें ॥
सप्रेमें ध्यानिं आणावें ॥ ते पुण्यश्लोक म्हणावे ॥१॥
२०.
ओवी
यौवनाश्वसात्यकी निळध्वज ॥ मदनसांबादी कृष्णात्मज ॥
हंसध्वजादि अनेकभूभुज ॥ तेजःपुंज निमाले ॥१॥
२.
पद
परतुन वृषकेता ॥ बा रे बा ॥धृ.॥
जाय घराकडे सत्वर ऐकुनि या मम संकेता ॥१॥
जाणवति अपशकुन पतन गती - भ्रम उठती चित्ता ॥२॥
अश्वमेध हा आज बुडविल ही वाटते रणसरिता ॥३॥
धर्मं तत्क्षणीं कुलक्षय मानिल तुज विपरित होता ॥४॥
गमले असे नच दानव सुरनर शंकर जिंकीता । बा रे बा ॥५॥
विष्णुदास म्हणे आजि असेंचि आवडलें भगवंता ॥बा रे बा ॥६॥
पृथ्वीछंद
करीन गट खांडवा, परिहारीन आजी रणीं ॥
तथापि निजशत्रुची परी हारिन आजी रणीं ॥
विषादशत दाटले म्हणुन या वधी तो रडया ॥
परी उभयपक्षिं ही फजितिच्या पदीं तोरडया ॥
२३.
पद
हरहर सोडुन या समराला जाउं कसा मी परत गृहाला ॥धृ.॥
शत्रूपुढें मुख मुरडून जाणें । तरी मरणचिन्हें उघड शूराला ॥१॥
रथध्वज मोडिन हय-गज पाडिन । पदचर धाडिन अंतःपुराला ॥२॥
अपयश पळविन जयधन मिळविन , कुशल हे कळविन चक्रधराला ॥३॥
विष्णुदास म्हणे जयविजयासह परतुन जाऊं मग नगराला ॥४॥
२४.
पद (पुरवणी)
ते कर्णार्जुन नंदन अति उग्र प्रगटविति निजतेजाला ॥
वर्णिती धनुर्धर ज्याला ॥ध्रु.॥
ते पंचानन त्या घटकीं गिळती गट गटकि कटक आजला ॥
वाटलें मनीं आजाला ॥
आन्योन्या उडविति अंबरीं पावति समरीं समदर्जाला ॥
मनिं नाहिं आट दरज्याला ॥
घडोघडी पूर्वजा स्मरति बळें पतकरति वैरभावाजी ॥१॥
२५
ओवी
वृषकेताचा कंठनाल ॥ छेदितां लंघोनि गगनमंडल ॥
पुनरपि येवुनि शिरकमल ॥ पार्थापुढें पडियलें ॥१॥
२६.
पद (चाल-मज बोध करी)
गेलासी आजि सांग मला टाकुनी कसा ॥
होता निदानिं बा तुझाचि पूर्ण भरंवसा ॥ध्रु॥
तुजसि मारवोनि गुणरत्न सागरा ॥
येकलाचि जा काय सांग मी घरा ॥
लावीन पाहा आजि आग या मी संगरा ॥
साह्य आलिया कृतांत करिन नाहिंसा ॥३॥
जो अजिंक्य शीरजोर वीर अंकिला ॥
तो क्षणात तूचि अनुशाल्व जिंकिला ॥
यौवनाश्व गर्व सर्व दूर झोकिला ॥
शामकर्ण आणिलासि तूंचि राजसा ॥१॥
कर्णासमान गूण तुझे कर्णकूमरा ॥
वाटलें न आठवलें दुःख शंभरा ॥
सत्य विजय भ्रमर कमलपुष्प भ्रामरा ॥
पंचप्राण प्रीय पात्र तूंचि राजसा ॥३॥
पापिष्ट दुष्ट नष्ट बभ्रुवाहन माजरा ॥
शंका न आली तुज द्यावयासी मांजरा ॥
निश्चित मारतो मी त्यासि थांब तूं जरा ॥
विष्णुदास म्हणे विलंब न लगे फारसा ॥४॥
२७.
पद
काय योग्य हें गांडीवपाणी ॥
कां रे युद्धाची सोडिली बाणी ॥धृ.॥
विर वृषकेताची प्रतिमाही हरपलि रत्नाचि खाणी ॥१॥
श्रीगुरु द्रोणाचार्याची विद्या गमविली कोण्या ठिकाणीं ॥का रे॥२॥
श्रीहरि कुणिकडे जाउन बसला नाहिंच या निर्वाणीं ॥३॥
साध्विशि लावितां दोषचि पडती पदरांत अपयश हानि ॥४॥
विष्णुदास म्हणे अशी कुणी कथिली उत्तम बुद्धि ही शाहाणि ॥५॥
२८.
पद (चाल-असा धरी छंद)
जसा त्रिपुरारी कोपला धनंजय भारी ॥ध्रु॥
महा नरवीर धनुर्धर बाप-महाब्रह्मांडीं उठवी ताप ॥
महाकाळासि सूटला काप, कोण त्या वरी ॥१॥
सुटले शरार्णवाचे लोट । महाभट घटोद्भवा आलो ।
ढासळे मणीपुराचा कोट ॥ पळति नरनारी ॥को.॥२॥
कुणीकडे पार्थ पार्थनंदन । कुणीकडे आश्वध्वज स्यंदन ।
कुणीकडे दिसेना रणकंदन ॥ पाडली अंधारी ॥३॥
दिसेना पिता तदा पुत्रास, दाटल्या बाण भिंती नेत्रास ।
फुटेना लेश खनट चित्रास शत्रुदळ भारी ॥४॥
म्हणे बभ्रुवाहन हा रथी ॥ धन्य हा धन्य वीर भारती ॥
म्हणे विष्णुदास वर्णिती ॥ देव परभारी ॥५॥
२९.
पद
प्रसंगीं कामि नये कोणी ॥ नवल हें म्हणे गांडिवपाणी ॥ध्रु.॥
जाहलीं बहु बळहीन गात्रें ॥ मंदता अविलंबी नेत्रें ॥
बोळलीं ढिलीं पडलीं शस्त्रें ॥ आठवितां नाठवतीं अस्त्रें ॥
आटली विद्या नाठवणी ॥नवल॥१॥
माझिया तप्तशरागारा । मानितों अर्भक अंगारा ॥
आपोआप जणुं वितळति गारा ॥ वीरश्री गेली परागारा ॥
जशी कां घर बुडवी कुटणी ॥नवल॥२॥
पाशुपत बोले त्या समयीं ॥ वधाया निजपुत्र पाही ॥
नको मज पाठवूं सहसाही ॥ तुला यश आज अनुकुल नाहीं ॥
असें मज वदला । शूलपाणी ॥नवल ३॥
जिवाचा जिवलग जो आपुला । दिसेना कोणीकडे लपला ॥
जाऊनि कोठें तरी बसला ॥कृपाघन नारायण रुसला ॥
विष्णुदासावर निर्वाणीं ॥नवल.४॥
३०.
ओवी
रिपु शब्दाचल पडतां वर ते ॥ क्रोधार्णवाचें खवळलें भरतें
कोंडुनि हृदय तटाक गर्तें । बुडवूं पाहे ब्रह्मांडा ॥१॥
भयंकर गंगेचा शाप । वारुं न शके विरंची बाप ॥
नुचले अर्जुनासि चाप । अंगीं कंप सुटला ॥२॥
असो बोलणें उदंड । बभ्रुवाहनें बाण प्रचंड ॥
सोडला जैसा मार्तंड । कीं काळ दंड दूसरा॥३॥
तया बाणाचें निवारण । करुं विसरला सुभद्रारमण ।
श्रेष्ठ पुरुषाचें शहाणपण । कोठें गेलें कळेना ॥४॥
तुटूनि शिर तये वेळीं । पडले वृषकेताचे जवळीं ॥
हर हर म्हणती देव मंडळी । चंद्रमौळी आक्रोशे ॥५॥
तोडुनि टाकिती मंगळसूत्रें ॥ म्हणती मस्तकीं वोपा शस्त्रें ।
सौभाग्यहीन आमुचीं वक्त्रें । या कुपत्रें आजि केली ॥६॥
३१.
पद (चाल-उद्धवा शांतवन कर जा )
सुंदरा वरा नरवीरा ॥ रणधीरा गुणगंभीरा ॥धृ.॥
अर्जुना विजया नारायणा मित्रा पंडुकुमारा ॥
शुभवक्त्रा । पंकज नेत्रा, प्रियपात्रा । अति सुकुमारा ॥
जें दिले शंकरें तुजला, वंचुनियां स्वामी कुमारा ॥
चाल-तें काय पाशुपत झालें । अग्नीचें तेज विझालें ॥
मेरुचें शिखर बुझालें ॥ कीं झाला अचेतन वारा ॥१॥
आजि उठा तुम्ही व्हा जागे ॥ विप्राच्या नेल्या गाई ॥
कुरुपति सुभद्रा वरितो व्हा संन्यासी लवलाही ॥
महाराज जयद्रथ मारा । रवि बुडतो अवधी नाहीं ॥
चाल-अवलंबून कुश्चल पापा ॥ कटकासि लागता झोपा ॥
गुरुपुत्रें घातला छापा ॥ लाविली आग शिबिरा ॥२॥
पुत्राचे अवगुण गेला सांगाया श्रीभगवंता ॥
कीं कांही संशय आला ऐकाया बसला गीता ॥
कीं गेला पाशुपत द्याया परतून गिरिजानाथा ॥
चाल-ये धांवत शौर्य समुद्रा ॥ दाखवी आत्ममुखचंद्रा ॥
या कामिनी यामिनि चंद्रा ॥ म्हणे विष्णुदास उदारा ॥।३॥
३२.
पद
तुम्हिं का हो प्राणनाथा स्नेह आमुचा सोडिला ॥
कां एकाएकी फासा प्रेमाचा तोडला ॥धृ.॥
न्यायाचा पंथ सारा अन्यायें मोडला ॥
तरि सांगा संग कोण्या नारिचा जोडला ॥तुम्ही.१॥
गंधाची उटी अंगा लाविता पोळती ॥
कंठीचे हार मोती क्षितिवरती लोळती ॥
मुखकमलीं ग्रास घेतां पुढें मागें घोळती ॥
दुःखाचा वृक्ष माथां मोडोनी पाडिला ॥२॥
चित्तींचे हेतू सारे चित्तिंची राहिले ॥
प्रेमानें प्रेमपाशीं मन माझें मोहिलें ॥
काय नष्टा ब्रह्मदेवा लल्लाटीं लिहिलें ॥
म्हणे विष्णुदास सारा रस पंकीं ओतिला ॥३॥
३३.
पद
आतां मी दैवा काय रे दावुं हें मुख कृष्णाला ॥
म्या दुष्टानें कुलभ्रष्टानें वधिलें बापाला ॥
दुष्कृत्य सगळें त्रिभुवन आगळें जोडिलें पापाला ॥
संकटिं पडलों वैरचि झालों मी आपणांला ॥१॥
मुळ न्यायाचें अन्यायाचें असेल सकळ कळलें ॥
परि मन पार्थाच्या प्रितिकरितां जाईल कळवळलें ॥
विष्णुदास म्हणे हृदयनिवासा दाखवि चरणाला ॥२॥
३४.
श्लोक
बापाचा जिव संभ्रमात असतां म्यां कापिला की गळा ॥
केला हा अपराध थोर, परशूरामाहुनी आगळा ॥
या दुःखें विरहज्वरीत जननी आक्रंदुनि क्षोभली ॥
आहे यास्तवची सशास्त्र मजला प्राणान्त शिक्षा भली ॥१॥
३५.
ओवी
उलुपी बोले सावधान ॥ माझ्या पित्यापाशी प्राणदान ॥
दाता समर्थमणीनिधान ॥ आहे जावुन आण ना ॥१॥
३६.
पद
बुडाला तो नरवर मित्र ॥धृ.॥
गांडवधर-खांडवदाहक जो पांडवरणछत्र ॥१॥
वानरध्वज विजयी कुंतीचा जो तिसरा पुत्र ॥२॥
कृष्णेचा पति श्रीकृष्णाचा जो प्रियकर मित्र ॥३॥
युद्धप्रसंगें प्रसन्न ज्याला झाला त्रिनेत्र ॥४॥
तत्पुत्रानें रणधर्मे त्यावर धरलें शस्त्र ॥५॥
श्रीगंगेच्या शापें भुलला रणविद्यामंत्र ॥६॥
जें न घडावें तें आजि घडलें झालें विचित्र ॥७॥
तव कन्येचें निश्चित तुटलें पहा मंगलसूत्र ॥८॥
संजिवनीमणी देऊनी मिळवी हें यश सुपवित्र ॥९॥
विष्णुदास म्हणे धन्यचि म्हणतिल सुरनर सर्वत्र ॥१०॥
३७.
आर्या
धृतराष्ट्र म्हणे राया सहसा नोहेचि बुद्धिही शहाणी ॥
संजीवनिमणि देती होइल आमुच्या कुलासि यशहानि ॥१॥
मी मणी देतों परंतु वत्से हे सर्व विघ्न करतात ॥
रुदित कपाळीं देवुनि बसला स्वस्थचि सखेद करतात ॥२॥
३८.
पद
तो केवळ सुत जमदग्नि, महाप्रळयाग्नी, चढला कोपा ॥
जाळाया महितळ खोपा ॥
अगणित फणिवर शर सुटती, तटतट तुटती,
उडती तोफा ॥
खळ म्हणती युद्ध आटोपा ॥ न्हाणिलें मातृकुल बंधु,
लवंडिला सिंधु, मधाचा डोफा ॥
शरचाप, कवच, शिरटोपा ॥
पिपिलिका नकुल मयुराचे अस्त्र गरुडाचें संकल्पें योजी ॥१॥
तो अहिपति धडकति येवुनि धरित अलिंगुनी बभ्रुवाहनातें ॥
आजाचें दर्शवुनि नातें ॥
पौत्रासि म्हणे रुष्टोनि, बळें, दुष्टानि केलें कदनातें ॥
बुडवाया आप्त सदनातें ॥ कन्येशीं सांग लवलाही,
करुं नको काहिं आतां रुदनातें ॥
सुखें पहा पतिवदनातें ॥
फणिवर मणि घेऊनि संगें, निघाला वेगें त्यजुन दावाजि ॥२॥
३९.
साकी
गेला फणिवर मणि घेऊनी संगें वृषकेत, पार्थ उठवाया ॥
तें कळताचि गमलें गेला संचित धन घटवाया ॥
नष्टा धृतराष्ट्रा ॥ चैन नसेचि दुष्टा ॥
त्या दोघांची मग शिरकमळें पुत्राहाती लपवी ॥
कां न करिल श्रीहरि कृपेचे तत्शिर तिळतीळपवी ॥
सर्वांतरसाक्षी जो अणरेणु लक्षी ॥२॥
४०.
पद
काय विचित्र गती दैवाची ॥ सारी तळमळ व्यर्थ जिवाची ॥ध्रु॥
भस्मासुर किंकर पामर । परी-पुरविली पाठ शिवाची ॥१॥
कनकमृगाला पाहुन भुलली ॥ जानकी स्त्री राघवाची ॥२॥
दैवगतिनें आपूज्य झाला जो वेद चौमुखें वाची ॥३॥
अजि विजयाला अपजय आला मर्जीही प्रभु केशवाची ॥४॥
विष्णुदास म्हणे हरि हर नाडती परवड किती मानवाची ॥५॥
४१.
श्लोक
त्या कालीं इकडे विचित्र पडले कुंतीस दुःस्वप्न तें ॥
केलें चर्चित तैल सर्व शरिरीं सारोनिया वप्न तें ॥
गेला लक्षुनि पार्थ दक्षिण दिशा बैसोनि उष्ट्रासनीं ॥
वैधव्यांगनेची घरीं उतरली लग्नार्थ अष्ट्रासनी ॥१॥
४२.
पद (पुरवणी)
गरुडारुढ होऊनी श्रीपती, वृकोदर कुंति, घेवुनि संगें ॥
मणिपुरासि आला वेगें ॥ गंगेचा शाप संकेत, पार्थ वृषकेत,
सिराविण दोघे ॥ पहुडले अचेतन अवघे ॥
स्वप्नानुभव दिसला चोख, देखिले शोक, करितां चवघें ॥
त्या रसाची हरि ही चव घे ॥
४३.
दिंडी
मंद भाग्याचा लाभ नये हाता ॥
पितृहत्येचें पाप आलें माथां ॥
आतां कोण तारील या अनाथा ॥
तुझ्यावाचोनि सांग रमानाथा ॥१॥
जे जे केले ते यत्न गेले वांया ॥
नाहीं धीर वृत्तांत नीरवाया ॥
आहे सर्व ठाऊक तुझ्या पायीं ॥
तूंचि वारी श्रीहरी या अपाया ॥२॥
४४.
श्लोक
या काळीं वृषकेत अर्जुन शिरें येतील धंडस्थळीं ॥
चोरांची पडतील शीघ्र तुटुनि आधी शिरें भूतळीं ॥
भोगातीत खरा असेन शुकसा मी ब्रह्मचारी जरी ॥
श्रीमत्च्छ्ध्वजतात् अर्जुन म्हणे होईल ऐसें तरी ॥१॥
४५.
पद (पुरवणी)
वृषकेतासह त्या समयीं, उठला विजयी, हर्ष कुंतीला ॥
कैवल्य गमे नको तीला ॥
सप्रेमानंदें आलिंगुनी, मस्तक हुंगुनि, उतरि मातीला ॥
साखरी मुलामा तीला ॥
त्वत्शोकें रडे जी वधू, तिचा कर मृदू, शांत करी तिला ॥
नको करुं आतां रोतीला ॥
कृष्नाज्ञा ही समजावी, पुत्र समजावी, त्यजुन दावाजी ॥१॥
ऊठले स्वसैन्ये भूप, म्हणति अपरुप, रंगरणरंग ॥
भेटती सकळ श्रीरंगा ॥
हरि करुणामृत रसपर्व, प्राशिती सर्व ब्रह्मपदसंगा ॥
सुखसमुद्रीं मिळाल्या गंगा ॥
म्हणे विष्णुदास बहु विमल प्रभुपदकमल, तेथे आभंगा ॥
या मिळो सदाश्रय भृंगा ॥
हा हरिल भवाब्धिभाग, कथामृत भाग सांग गावा जी ।
जन्मेजये म्हणे वाहवा जी ॥२॥