मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
अंबरीषाख्यान

कीर्तन आख्यान - अंबरीषाख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


मागे सूर्यवंशात अंबरीष या नावाचा राजा होऊन गेला. तो परम विष्णुभक्त असल्यामुळे एकादशीव्रत करीत असे. एके दिवशी साधन द्वादशीचा काल अगदी थोडा असता त्याजकडे दुर्वास ऋषि गेला. राजाने ऋषीचा सत्कार करून त्यास भोजनास बोलाविले. ते ऐकून ऋषि कालिंदीवर स्नानास गेला. तिकडून यावयास त्यास उशीर लागला असे पाहून व भोजनास उशीर केला असता साधनद्वादशीचा काल निघून जाईल म्हणून राजाने तीर्थप्राशन केले. आपणास टाकून आधी राजाने पारणा केली म्हणून दुर्वासास फार राग आला. त्याने आपल्या जटेतून एक कृत्या उत्पन्न करून तिला राजाचा छळ करण्यास सांगितले. श्रीविष्णूने राजाच्या रक्षणाकरिता सुदर्शनचक्र मागेच दिले होते, त्याने तिच्यावर एकदम चाल केली. तेव्हा ऋषि तेथून भिऊन पळाला. चक्र त्याच्या मागे लागले. ऋषि ब्रह्मलोक, कैलास इत्यादि लोक फिरला परंतु त्यास आश्रय कोठे मिळेना. शेवटी तो वैकुंठी विष्णूस शरण गेला व चक्रापासून शरण करण्याविषयी त्याची प्रार्थना करू लागला. मी भक्ताधीन आहे माझ्या भक्तालाच शरण जा, याशिवाय रक्षणाचे दुसरे साधन नाही असे विष्णूने सांगितल्यावरून दुर्वास हा पुनः अंबरीषाकडे परत आला व त्यास शरण गेला. त्याची ती स्थिति पाहून राजाला दया आली व त्याने हात जोडून चक्राची प्रार्थना केली व त्यास मागे फिरविले. ही कथा एथे वर्णिली आहे.

श्लोक

स्त्रग्धरा

अत्युग्र ब्रह्म-शापादिकहि हरि-जना ताप नेदीच काही ॥

जो कोणी देव-दास-च्छळक खळ तया रक्षिता अन्य नाही ॥

रक्षी साधूचि येता शरण निपटुनी त्यागिता उद्धत-त्व ॥

ज्ञाते हे अंबरीष-क्षिति-पति-चरिती पाहती शुद्ध तत्त्व ॥१॥

शा०वि०

दुर्वासा भगवान्‌ करी छळ बळे हे तत्त्व दावी जनी ॥

की माझीहि अशी दशा हरि-जन-द्वेषे धरा हे मनी ॥

दैवे भागवती वि-रोध घडता त्यांची धरा पावले ॥

सं-सारात तरा, म्हणाल मजला खोटा म्हणा पावले ॥२॥

पूर्वी भू-पति अंबरीष रविच्या वंशी महात्मा असे ॥

धर्मै राज्य करी सदैव भगवद्भक्तांत भावे वसे ॥

भासे सिंहचि संगरांत गमती तच्छत्रु राजे ससे ॥

तो शांतात नितांत शांत कमळा-कांतीच चित्ते वसे ॥३॥

राजा सधु-समागमे समजला सं-सर निः-सार-सा ॥

सेवी श्री-पतिच्या पदा अलि जसा अत्यादरे सारसा ॥

नामाची धरि कास करुनी सद्भक्तिचा आसरा ॥

प्राशी निर्मल विष्णूचेचि यश जे हासे सुधेच्या सरा ॥४॥

ज्यामध्ये बहु दक्षिणा सु-विधिवत्‍ विप्रादि-सं-तर्पण ॥

प्रेमे यज्ञ करून सर्व करि ते श्री-विष्णुला अर्पण ॥

आंगे होउनि सत्तपो-हुत-वही तो सर्वदा सर्पण ॥

स्वच्छ-त्वे नृ-प जाहला सु-मणिचा जैसा नवा दर्पण ॥५॥

तो भूती सम-दृष्टि साधु-भजनी राबे सदा सावरी ॥

आंगे दृग्विकळादिकांसि, भर हा टाकी न दासांवरी ॥

सेवेवचुनि आपुल्या न विषयी याचे शरीर क्षण ॥

श्रीशे जाणुनि हे सु-दर्शन दिले त्याचे करी रक्षण ॥६॥

स्त्रग्धरा

सोडीना सु-व्रते तो जसि जल-धि-जले तापले याद शीते ॥

विष्णु-प्रीत्यर्थ वर्षाऽवधि करुनि करी साधन-द्वादशीते ॥

गेला निर्विघ्न सिद्धी-प्रति नि-यम न त्या लागला शब्द, सारा ॥

कीर्ति श्री-मा-धवाच्या सतत परिसता संपला अब्द सारा ॥७॥

शा०वि०

गो-दाने शुभ साठि लक्ष नृ-प दे विप्रोत्तमाकारणे ॥

दे वाजी गजही जयांसि हरिच्या गावे हये वारणे ॥

तपी ब्राह्मण-वृंद तृप्ति अ-तुला दावी तया अन्न ती ॥

देवांलाहि न दे स्वये अ-मृत ते याते करी सन्नती ॥८॥

स्वाद्वन्ने परमादरे करुनिया विप्रोत्तमा तर्पुनी ॥

त्यांते कांचन दक्षिना सु-वसने सद्भूषणे अर्पुनी ॥

आज्ञा घेउनिया व्रतोक्त-नि-यमा रक्षावयाकारणे ॥

तो राजेंद्र करी उप-क्रम सुखे साधावया पारणे ॥९॥

तो जो केवळ सर्व कालहि तपस्येसी सुखे रातला ॥

ज्याच्या उग्रपणा प्रणाम अ-सकृत कल्पानले घातला ॥

जेणे शक्रहि शिक्षिला जइ महा संपन्मदे मातला ॥

दुर्वासा भगवंत तो अ-तिथि त्या काळी स्वये पातला ॥१०॥

पुष्पिताग्रा

मुनिस निरखितांचि होय दास ॥

प्र-मुदित जेवि मयूर तोय-दास ॥

नमुनि बसविला वरासनीच ॥

स्तवि नृ-प जेवि उमा-वरास नीच ॥११॥

दु०वि०

अ-मृत सिंधु तुम्हीच विभो जनी ॥

जरी धरा न तुम्ही चवि भोजनी ॥

मदुदयार्थ अहो तरि जेमन ॥

प्रभु करूनि सुखी करिजे मन ॥१२॥

व-ति

ऐसे हळूचि नृ-प जोडुनि हात याची ॥

ती आयके विनवणी मुनि हा तयाची ॥

स्नानार्थ जाय मग नायक तापसांचा ॥

कृष्णेसि जी नुरवि लेशहि ताप साचा ॥१३॥

हरिणी

प्रथम अमृती कालिंदीच्या करी मति-मज्जन ॥

स्तुत-पद मग ब्रह्म-ध्यानामृर्ती अति मज्जन ॥

उठविल कसा सुप्त स्वांकी महा अहि, साधुंनी ॥

शुचिपण दिले तीर्था गंगादिकांसह साधुनी ॥१४॥

पृथ्वी

उशीर बहु लागता नृ-पति पावला आधिला ॥

म्हणे नियम-पारणा-समय पाहिजे साधिला ॥

तपो-व्रत-जप-क्रतु-प्र-मुख-धर्मही साधुनी ॥

मनेहि न वि-लंघिली अ-तिथि-सत्क्रिया साधुनी ॥१५॥

द्रु-वि०

परम संकट ते मन घाबरे ॥

करि म्हणोनि तया अनघा बरे ॥

श्रुति-मत द्विज सांगति वारिते ॥

पिउनिहो अघ हे स्थिर वारिते ॥१६॥

मालिनी

अशन न जल-पाने होय पीतांहि पाणी ॥

अनशनहि नव्हेचि स्पष्ट हे वेद-वाणी ॥

श्रुतिस अनु-सरे जो त्यासि कोणी न दापी ॥

म्हणुनि मुनि-मते तो तोय राजा तदा पी ॥१७॥

स्त्रग्धरा

तो दुर्वासा करूनि स्नपन जप बृहद्ध्यान तत्काळ आला ॥

प्याला भूपाळ पाणी त्यजुनि अ-तिथिला यास्तव क्रुद्ध झाला ॥

अत्युष्ण श्वास टाकी अहि खवळविला मांत्रिके तेवि डोले ॥

तोले कल्पांत-रुद्रास न मग भगवान्‍ तो असे त्यासि बोले ॥१८॥

पृथ्वी

अरे कु-मति दुर्जना गुरु अ-लंघ्य ते पारणे ॥

न मी गुरु अ-लंघ्य हे स्व-मत ह्या जनाकारणे ॥

स्वयेचि कळवावया प्रथम आदरे बाहिले ॥

असे मग वि-लंघिले नवल आजि म्या पाहिले ॥१९॥

स्त्रग्धरा

हा दुर्वासा अ-लंघ्य त्रि-भुवनि सकळा भू-सुरांमाजि राया ॥

सत्कार प्राप्त झाला बहु बहु दिवसां ब्राह्मणा साजिरा या ॥

आम्ही सेवानु-रूप त्वरितचि फळतो त्या वृथा वाद पांचा ॥

देवांच्या सु-प्र-सिद्धां भजक-जन-तृषा-पूरका पाद-पांचा ॥२०॥

प्रहर्षिणी

कर्माचा तुज परि-पाक चाखवाया ॥

आलो मी निज-पुरुषार्थ दाखवाया ॥

दुर्वासा अव-गणिला तुवांचि शील ॥

भ्रष्टा न क्षत-सु-कृतायु वाचशील ॥२१॥

स्त्रग्धरा

ऐसे बोले प्र-बद्धांजलि-नर-पतिला क्षोभ त्या तापसाचा ॥

सांगावा काय भासे निज-मणि हरणे कोपला साप साचा ॥

दुर्वासा वज्रि-ताप-प्रद-द परि अनिळे वृक्षसा कापवीला ॥

जेणे तो कोप लज्जा जड-भय-द-बळा त्या न दे का पवीला ॥२२॥

अनुष्टुप्‍

जटा तोडूनि हुंकार-सु-महा-नाद सोडिला ॥

तोडावे जेवि लीलेने कंबलाच्या दसोडिला ॥२३॥

सु-लभा भार-भूता जी त्यजिली ते जटा किती ॥

कोपी दुर्लभ कष्टेही जोडिले तेज टाकिती ॥२४व

शालिनी

झाली उग्रा त्या जटेचीच कृत्या ॥

धावे खाया त्या नृ-पा विष्णु-भृत्या ॥

तो ती दुष्टा देखिली देव-चक्रे ॥

जैशी व्याळी स्वार्ति-दा पक्षि-शक्रे ॥२५॥

स्त्रग्धरा

ज्याचे शंभु-स्वयं-भु-प्रभृति-सुर यश प्रार्थिती पूत नाकी ॥

त्या रामे ताटिका ती जशि तशि अथवा मा-धवे पूतना की ॥

सद्बोधाने अ-विद्या जसि तसिच महा-भीति-दा विप्र-कृत्या ॥

जी उग्रा विष्णु-चक्रे त्वरित निवटली ती तदा वि-प्र-कृत्या ॥२६॥

प्रहर्षिणी

ऐसा हा बहुतचि वि-प्रकार भारी ॥

योजी जो हरि-जनि विप्र कारभारी ॥

त्या चक्र त्रि-भुवन-कंप-दास दापी ॥

जे सर्वाहित-बळ-संपदा सदा पी ॥२७॥

स्त्रग्धरा

जैसे दावानळाने प्र-खरतर बळे काननी साषिणीचे ॥

चक्राने भस्म सद्या करुनि उडविता त्या महा पापिणीचे ॥

दुर्वासा भीति पावे बहुतचि सहसा गर्व त्याचा गळाला ॥

सिंह-त्रस्त-द्विपेंद्रासम मग भगवान्‌ तो महात्मा पळाला ॥२८॥

होती अत्युग्र कृत्या परि करुनि तिचा घात दावी प्र-तापा ॥

जेव्हा ते चक्र, पावे बहुत निरखिता त्या तदा विप्र तापा ॥

प्राण-त्राणार्थ धैर्य त्यजुनि मुनि पळे सत्तपःसंपदेते ॥

वेची व्यर्थ क्षणांत, प्रभु-जनि रचिले वैरे ते कंप देते ॥२९॥

भु०प्र०

पळे विप्र तो चक्र पाठीस लागे ॥

भ्रमे सर्व दिङ्‌-मंडळी फार भागे ॥

न सोडीच ते जेवि केले स्वकर्म ॥

भ्रमे साधु वैरे न पावेचि शर्म ॥३०॥

मालिनी

मग करुनि विचार ब्रह्म-लोकासि गेला ॥

नमुनि विधि-पदाते हस्त जोडोनि ठेला ॥

व्यसन सकळ सांगे प्राण-दानासि याची ॥

स-चकित परिसे तो प्रार्थना ती तयाची ॥३१॥

व०ति०

ब्रह्मा म्हणे भगवदिष्ट-जनी न घाला ॥

तू घालितासि करितासि न या अघाला ॥

देती तुला व्यसन-सागरि हात पेंच ॥

क्षिप्र स्वये नुरवितींच महा-तपेच ॥३२॥

विश्वांत मुख्य म्हणता मजला जनांही ॥

ते काय गा परिसिता मज लाज नाही ॥

ज्याच्या भये धरितसे मनि-सानु कंप ॥

श्री-कांत तोचि विधिचा धणि सानुकंप ॥३३॥

स्त्रग्धरा

आम्ही ज्याचे धरीतो धरिति मनि जसे सासवेचे सुना भे ॥

त्याच्या मूर्त-प्र-तापे सदवन-निपुणे दुष्ट-काळे सु-नाभे ॥

जेव्हा हा क्षोभ केला तुजवरि मज हे वाटते फार भारी ॥

क्रुद्ध ज्ञात्या प्रभूचे मन वळवु शके कोण गा कारभारी ॥३४॥

शा०वि०

ब्रह्म्याने शरणागतहि मुनिला नाही दिला आसरा ॥

लत्ता मारिल काम-धेनु भगवद्भक्ताहित वासरा ॥

वाटे सद्रिपुचा न ताप हरिल श्री-शंभुचा सासरा ॥

तान्हेलाचि मरेल पावुनिहि तो जाणो सुधेच्या सरा ॥३५॥

स्त्रग्धरा

दुर्वासा ब्रह्म-लोकाहुनिहि परतला तापला विष्णु-चक्रे ॥

गेला मृत्यु-जयाला शरण मग जया सेविती योगि-चक्रे ॥

कैलासी शंकराला नमन करि म्हणे ईश्वरा आसरा हो ॥

वांचो त्वच्चिंतनार्थ द्वि-ज निज-भजकांमाजि हा दास राहो ॥३६॥

त्या विप्राला म्हणे तो त्रि-पुर-हर अगा ऐक गा बा मला जे ॥

प्राणी तापार्थ कोणी स्मरति मनि न त्यां रक्षिता नाम लाजे ॥

नाशावे ताप-पाप-प्र-कर भुज दहा वाहतो याच काजा ॥

आम्ही निःशेष वांछा पुरवुनि म्हणतो आदरे याचका जा ॥३७॥

शा०वि०

रक्षावे शरणागत व्रत असे माझे असे, लक्षिले ॥

जे काळाकुळ जीव ते सकळही तत्काळ म्यां रक्षिले ॥

मार्कंडेय-कथा तुझ्या श्रुति-पथा आली असावी क्षण ॥

ध्यान-स्तोत्र-परा जना सुखविते माझे क्रुपा-वीक्षण ॥३८॥

स्त्रग्धरा

या ऐशा रीति नीति श्रवण करुनिया सेविता मद्यशाला ॥

साधूला अन्य वार्ता गमति सु-मतिच्या मोहका मद्य-शाला ॥

यासाठी तू तपस्वी मुनि शरण महा-संकटी पातलासी ॥

त्राहि त्राहीश ऐसे म्हणुनि मज नमस्कारही घातलासी ॥३९॥

स्वागता

भस्म मी करिन गा शत कोटी ॥

काळ-दंडहि किती शत-कोटी ॥

वारणाप्रति जसे हरि-चक्र ॥

स्पष्ट हे मज तसे हरि-चक्र ॥४०॥

मालिनी

परि-हरिन नताचे मी स्वये ताप सारे ॥

परि गुरु अ-जिताचे शस्त्र हे तापसा रे ॥

मज बळ न असे बा याचिया वारणासी ॥

हरि-वध हरिच्याही होइना वारणासी ॥४१॥

अनुष्टुप

करूनि काय जिंकील रविला काजवा रण ॥

करिल गज-वक्राचे काय गा काज वारण ॥४२॥

शा०वि०

आम्ही सर्वहि दास त्यास भजतो तच्छासनी वागतो ॥

रक्षाया स्व-जनांसि शक्ति-धन त्या विश्व-भरा मागतो ॥

अस्मत्पालन-लालनादि करितो स्नेहार्द्र तो बापसा ॥

त्याची ज्यावरि त्यावरीच करितो आम्ही दया तापसा ॥४३॥

पृथ्वी

सुतासि गुरुच्या गृहा दवडितो जसा बाप हा ॥

तसा शिव न रक्षणी पटु जरी तरी बा पहा ॥

उपाय कथितो तुला व्यसन हे सराया, पदा ॥

सु-दर्शन-धराचिया धरि, हरील ते आपदा ॥४४॥

शिखरिणी

क्षमस्व श्री-जाने म्हण, शरण जा त्याचि हरिला ॥

उदंडांचा तेणे प्रणति करितां ताप हरिला ॥

दया-पीयूशाब्धि प्रभु-वर जगद्भावन, मनी ॥

न ठेवी दोषाते क्षमि-तिलक सद्भाव-नमनी ॥४५॥

स्त्रग्धरा

सांगे नाम क्षुधार्ता स-दय जन जसे आदरे अन्न-दाचे ॥

की दावी वर्त्म जैसे परम तृषित जो पांथ त्या सन्नदाचे ॥

वैद्याचे गेह रुग्णा सु-मति कथि तसे य द्विजा शंभु लावी ॥

वैकुंठाच्या पथी की पुनरपि न असी बुद्धि त्याची भुलावी ॥४६॥

दुःख-घ्नी ओषधी जी असि कथि भगवल्लोक-पद्मा पिनाकी ॥

श्रद्धेने सेविती हो पिउनि अ-मृतही जीस अद्यापि नाकी ॥

पावे तीते वरूनि द्विज, अ-मित पिता दैत्य-चक्रायु धाला ॥

नाही काहीच ज्याचा भुज-भुज-ग तया दिव्य चक्रायुधाला ॥४७॥

अनुष्टुप

पाहिला प्राशिता दैत्य-चक्रायु धरणी-तळी ॥

भरिता रक्त-पूरे जो चक्रायुध रणी तळी ॥४८॥

गेला शरण वैकुंठी हरिते परि ते तया ॥

चक्र दे वक्र देवाच्या भक्ती म्हणुनिया भया ॥४९॥

विप्र तो क्षिप्र तोयासी मीनसा प्रभुच्या पदा ॥

कवळी जवळी प्रेमे ज्याच्या श्री मधु-पी सदा ॥५०॥

म्हणे करूनि स्वभक्ती अप-राध परा-भवा ॥

पावलो मज या ऐशा अ-क्षमा रक्ष मा-धवा ॥५१॥

अ-मळा कमळा-केलि-भवना भव-नाशना ॥

पावना पाव नाशी या व्यसनास सनातना ॥५२॥

शा०वि०

दुष्टाही शरणागता अ-भय दे पाहे न तोटा कवी ॥

स्वत्पादाब्ज-पराग दुर्गुण असे जो सर्व तो टाकवी ॥

तीर्थांची कुळ-देवता त्रि-भुवन ख्याताहि गंगा सती ॥

जी धिक्कार करील काय शिवता रथ्यांबु अंगास ती ॥५३॥

शिखरिणी

जरी साधु-द्वेष्टा द्वि-ज सकळ-लोकी अधम हा ॥

तरी सत्कीर्तीचा क्षय-करचि याचा वद महा ॥

क्षमा-शीला देवा वद न कवणा मोह चुकवी ॥

असे जो जाणोनि प्रभु करि कृपा तोचि सु-कवी ॥५४॥

अनुष्ठुप

येती शरण जे त्यांचे करिती संत रक्षण ॥

जाणते न पडो देती या व्रती अंतर क्षण ॥५५॥

शा०वि०

वारावे निज-चक्र हे बहु मला देवा पहा भाजिते ॥

जे ब्रह्मण्य शरण्य हे यश तुझे रक्षी प्रभो आजि ते ॥

चित्ती आणुनि दोष रोष न धरी विप्रास या वांचवी ॥

भीताला अ-भय-प्र-दान करुनी सत्कीर्तिला सांचवी ॥५६॥

शिखरिणी

जयाच्याठायीच स्थिर करुनिया संतत रती ॥

अ-सारा संसाराप्रति बहु-सुखे संत तरती ॥

मुकुंदाचे तो ते सुर-तरु-गुरू-पाय नमुनी ॥

असे चक्र-त्रासे करुनि वदला काय न मुनी ॥५७॥

अनुष्टुप

भक्ताभिमानी भगवान्‍ वदला तेचि आयका ॥

करूनि नमन प्रेमे त्याचि लोकैक-नायका ॥५८॥

स्त्रग्धरा

मी भक्ताधीन, भक्त प्रिय मज न तसे आवडे अन्य, काय ॥

श्री, जेथे सान वाटे तदधिक मजला आपुला धन्य काय ॥

माझी सेवाचि मोक्षाहुनिहि बहु-मता ज्यांसि जे अंतराय ॥

ध्यानी होऊ न देती क्षणहि बहु मला मान्य ते संत-राय ॥५९॥

मालिनी

त्यजुनि धन-सुत-स्त्री-देह-गेहादि काम ॥

स्मरति मजचि गाती नित्य माझेचि नाम ॥

भजति भजन-कामे जे मला त्यांसमान ॥

प्रिय इतर न, देऊ मी न का त्यास मान ॥६०॥

शा०वि०

भक्तीने वश सत्पतीस करिती साध्वी, मला मज्जन ॥

प्रेमांभो-निधि संत त्यांत करितो मी मीनसा मज्जन ॥

त्याला मीच मलाहि तेच रुचले ते हंस मी मानस ॥

श्री त्याहीच मला मदीय-भजने त्यांचे सुखी मानस ॥६१॥

अनुष्टप

सर्व-स्व मी सज्जनांचे माझे सर्व-स्व सज्जन ॥

पावेन मी न पावेल कष्टी मज्जन मज्जन ॥६२॥

सु-दासी न उदासीन प्राकृत-प्रभुही मनी ॥

कसा दास प्रसादास माझा पात्र नव्हे जनी ॥६३॥

शा०वि०

लोकी नि-स्पृह मी सदा अ-जित मी चित्ती उदासीन मी ॥

स्वाधीन प्रभु हे खरेचि परि या भावे सु-दासी नमी ॥

बापा प्रेमळ-सज्जनाशय-महा-गंभीर आवर्त तो ॥

जैसे वर्तवितो तसेचि पडला त्यामाजि हा वर्ततो ॥६४॥

स्त्रग्धरा

साधूंचा त्याग अर्ध-क्षणहि न करवे आमुचे देव संत ॥

श्री दे सत्संग आम्हां जसि करुनि कृपा कानना दे वसंत ॥

संतांसी वक्र जो तो खल मल-जल-धी पावतो आपदेते ॥

त्याला त्याचेचि पाप प्रळय-शत-शत ब्राह्मणा ताप देते॥६५॥

घनाक्षरी

ते न जाणती मदन्य ॥

मीही न जाणे तदन्य ॥

वर्णू किती तैसे धन्य ॥

तेचि एक पाहिले ॥१॥

त्यांच्या गुणा नसे अंत ॥

भक्ति-ज्ञान-भाग्यवंत ॥

दया-क्षमा-निधी संत ॥

माझ्या मनी राहिले ॥२॥

मीही नव्हे त्यांचे मोल ॥

संत-सिंधु बहु खोल ॥

त्यांही निंदकाचे बोल ॥

तैसे म्या न साहिले ॥३॥

साधु बाप साधु माय ॥

साधु मंद-रांचे राय ॥

साधूंचे पवित्र पाय ॥

आम्ही माथा वाहिले ॥४॥६६॥

पृथ्वी

तुला विकळ पाहता मम मन श्रमे घाबरे ॥

गमेल निज-चातक-व्यसन काय मेघा बरे ॥

उपाय कथितो करी नमन त्याचि संता, पहा ॥

चमत्कृति, हरील तो नृपचि सर्व सं-ताप हा ॥६७॥

पुष्पिताग्रा

हरि-जनचि खरे सखे दरा हे ॥

नुरविति या नमिता न खेद राहे ॥

न निवविति? जरी पदी नमीना ॥

खळ म्हणुनि त्यजिती नदी न मीना ॥६८॥

हरिणी

चरण धरिले ज्याही ते तो कधीहि न तापले ॥

कळकळविले सत्पादांनी न आ-श्रित आपले ॥

अमृतहि पितां न स्वास्थ्याला वरील गदी क्षण ॥

त्रुटि न भरता नाशी सारेहि ताप सदीक्षण ॥६९॥

शा०वि०

त्वां केला अभि-चार साधु-पुरुषी जो तो तुला बाधला ॥

कोणालाहि निजेष्ट-लाभ न सदुच्छेदोद्यमे साधला ॥

पाषाण स्व-शिरी पडेचि गगनी मित्रासि जो हाणिला ॥

की पाय ज्वलनी जळेचि ह्रदयी हा भाव का नाणिला ॥७०॥

अनुष्टप

साधूच्या लंघनी होतो नीचाचा घात रोकडा ॥

बोकडा मारक नव्हे मेरूचा काय हो कडा ॥७१॥

स्त्रग्धरा

होतोचि प्राप्त मृत्यु स्व-भुज-बळ-मदे लंघितां अर्णवाते ॥

पावे गर्वे पडे तो पतन उडविले ज्या परी पर्ण वाते ॥

ज्या दुष्टे सज्जनाचा अ-करूण-ह्रदये चिंतिला घात, लागा ॥

पाठी त्या खा न साधू म्हणति परि अधी तो मुखी घातला गा ॥७२॥

अनुष्टुप

विद्या तपस्या ज्या याहि भले ते विप्र तारिले ॥

खोटे सुधा-मोहिनीही दैत्य तेवि प्र-तारिले ॥७३॥

शा०वि०

दुर्वासा मुनि हो, सदुक्ति स-रसा साक्षात सुधेच्या नद्या ॥

सेवा लेशहि पाप ताप न उरो देवा तुम्ही मान द्या ॥

प्रार्था त्या नृप-सत्तमासि चुकलो रक्षी म्हणा जा जगा ॥

तो रक्षीलचि साधु लक्षिति निजापत्यापरी ह्या जगा ॥७४॥

पृथ्वी

असे प्रभु वदे न दे अ-भय, अंबरीषाकडे ॥

मुनि त्वरित जाय त्या नृ-पतिच्याचि पायी पडे ॥

द्विजे- स्व-पद वंदिता सु-मति भूप तो लाजला ॥

तयाहुनि तदद्भुत-व्यसन-पावके भाजला ॥७५॥

व०ति०

पाहोनि ताप बहुतांपरि तापसाचा ॥

पावे तयापरिस तो परि-ताप साचा ॥

दे चक्र ताप पळ-मात्र तपोनिधीते ॥

ज्यच्या तसा सु-कठिना न तपोनिधीते ॥७६॥

द्रु०वि०

वरि दिसे मृदु मौक्तिक पोवळे ॥

परि न लेश तदंतर कोवळे ॥

न तुळवे विधु अंकित तो मळे ॥

स-रस साधु-मनेशुचि कोमळे ॥७७॥

स्त्रग्धरा

मित्राप्ता म्लानि देतो जरि अमृत-रसालागि हा चांद वीतो ॥

साधू तैसा कसा, जो सुखवुनि सकळ प्राणियां नांदवितो ॥

साधूंच्या दर्शनाने अ-शिव तिथि अशी सर्वथा आढळेना ॥

साधूंचे तेज रात्रि-दिव समचि न ते सोडुनी त्या ढळेना ॥७८॥

राजा पाहोनि चक्रे करुनि अति-शये ब्राह्मणा तापल्याला ॥

सर्वांगी तप्त झाला उतरुनि मुनिचा काय तो ताप ल्याला ॥

वैकुंठास्त्रासि जोडी कर बहु विनवी, कोपता फार भारी ॥

दासी स्वामी तयाला स्व-पदर पसरी हा जसा कारभारी ॥७९॥

शा०वि०

चक्रा तू भगवत्प्र-ताप स-सुरा शक्रा तुवा रक्षिले ॥

नक्राचेपरि भक्त-पीडन-परा वक्रा जना भक्षिले ॥

पीडा लेश नसोचि या श्रुति-शुकी-नीडा मुनीला पहा ॥

व्रीडा-कारक विप्र-गंजन तुज क्रीडारि-दर्पाप-हा ॥८०॥

तू गो-ब्राह्मण-धर्म-पाळक जगन्नाथ-प्रिय ख्यात की ॥

हे काय द्वि-ज-वर्य-पीडन बरे दुष्कीर्ति या पातकी ॥

हो अन्वर्थ सु-दर्शना मुनि-वरी दासी दया दाखवी ॥

अत्यच्छ स्व-यशः सुधा-रस रस-ज्ञात्या जना चाखवी ॥८१॥

पृथ्वी

कुळोचित तप-क्रतु-व्रत-जप द्विजोपासना ॥

असेल घडली मनी जरि असेल सद्वासना ॥

तरि त्वरित वि-ज्वर द्विज असो, दया लोभ या ॥

नती करि, हरी प्रभु-प्र-हरणा दयालो भया ॥८२॥

बुभुक्षित जना जसे रुचि-करेष्ट जे अन्न ते ॥

असेल जरि अर्पिले स-बहु-मान स्यां सन्नते ॥

तरि तरित वि-ज्वर द्विज असो, दया लोभ या ॥

नती करि, हरी प्रभु-प्र-हरणा दयालो भया ॥८३॥

कुळांत कुळ-देवता जरि नसेल विप्राधिका ॥

असेल गुरु-सत्क्रिया घडलि शुद्धिची साधिका ॥

तरि त्वरित वि-ज्वर द्विज असो, दया लोभ या ॥

नती करि, हरी प्रभु-प्र-हरणा दयालो भया ॥८४॥

असेल जरि ईश्वर स्थिर-चरी बरा पाहिला ॥

नसेल अणुमात्रहि क्षणहि भेद म्या साहिला ॥

तरि त्वरित वि-ज्वर द्विज असो, दया लोभ या ॥

नती करि, हरी प्रभु-प्रहरणा दयालो भया ॥८५॥

व०ति०

गो-विप्र-दीन-शरणागत-याचका मी ॥

झालो असेन वश तत्पर याच कामी ॥

तैसाचि लुब्ध जरि सत्परि-शीलनाते ॥

तू दीन-बांधव खरे करिशील नाते ॥८६॥

स्त्रग्धरा

रक्षाया ब्राह्मणाते सु-कृत सकळही अर्पिता भू-प-शक्रे ॥

पावोनी क्षिप्र शांती-प्रति अ-भय दिले त्या द्विजा विष्णु-चक्रे ॥

जे क्षीरांभोधि-फेनामृत-शुचि दिधले अंबरीषा नृपाते ॥

श्रोत्या वक्त्या जनाही सु-यश निवविते दावुनी सत्कृपा ते ॥८७॥

शिखरिणी

छळी अ-न्यायेचि प्रणति करितांही तदपि त्या ॥

भजे विप्रा जैसा सुत धरुनि माथ पद पित्या ॥

पडे स्पर्शी भेदास्तव जरि बळाने घण, मणी ॥

करी स्वर्ण स्पर्शे किमपि न महात्मा घणमणी ॥८८॥

मंदाक्रांता

श्री-रामाचा सु-गुण निववी जेवि गाता शिवाला ॥

श्री-दुर्वासा मुनि बहु तसा साधु-संगे निवाला ॥

भेटे भूपाप्रति अति-शये तो करी प्रेम हर्षे ॥

पाद-प्रक्षालन नृप म्हणे तै करू दे महर्षे ॥८९॥

शा०वि०

त्या भूपासि म्हणे मुनीश्वर सुधा सेवुनि का जीभली ॥

ज्ञात्याची रसिकी म्हणेल पुसता गोडीस कांजी भली ॥

साधूंची तसि कीर्ति तत्सम दुजी नाहीच जीवा चवी ॥

श्रोत्री दावुनि, दुःसही गव-दवी दग्धांसि जी वाचवी ॥९०॥

लोकी संत तुम्हीच धन्य तुमचे न स्तोत्र हे सत्य या ॥

विप्राच्या तुमचा अ-गाध महिमा आला नृपा प्रत्यया ॥

एकी साधु-जनीच शांति करुणा मैत्री क्षमा सन्मती ॥

मुक्तांचे इतर-त्र राशि न जसे रत्नाकरी जन्मती ॥९१॥

स्त्रग्धरा

साधूवाचूनि अन्य त्रि-भुवनि भुज-गा घातका जीव-दाना ॥

कोणी देईल काय क्षण तरि पुसतो सत्य का जी वदाना ॥

देऊनी प्राण-दान छळक सुखविला धन्य बापा, मराया ॥

होता योग्य स्व-पापे तरिहि जिवविले त्वांचि बा पामरा या ॥९२॥

शा०वि०

लागो देति विधीश-विष्णु करिता नम्री न भद्र क्षण ॥

त्यांचे म्यां पद वंदिले परि तिही केले न मद्रक्षण ॥

साधो त्वां शरणागता मज महा-तापातुरा रक्षिले ॥

नाही मत्कृत-पाप बा पर-हितोद्यक्ता तुवा लक्षिले ॥९३॥

तू ब्रह्मण्य, शरण्य तू, स-दय तू, सत्कीर्तिचा चांदवा ॥

लोकी साधु तुम्ही असाचि उभवा प्राणी सुखे नांदवा ॥

आयुर्वृद्धि असो, वसो मनि सदा भूतानुकंपा, दिले ॥

माते ते इतरांहि द्या यश भले जन्मोनि सं-पादिले ॥९४॥

शालिनी

ऐशी आशीर्वाद-पीयूष-वृष्टी ॥

केली विप्रे त्या नृपी प्रेम-दृष्टी ॥

राजा लाजे, शंभुला जेवि नंदी ॥

वारंवार श्री-मुनींदासि वंदी ॥९५॥

शा०वि०

राजा त्या मुनिला म्हणे मज जडा देता तुम्ही थोरवी ॥

पादे आपुलिया जसा विधुसि की रत्नासि देतो रवी ॥

केला हा निज-दास वासव-नुता सत्कीर्तिला भाजन ॥

स्वामी युष्मदुपासनेच्छु कवणा पावे न लाभा जन ॥९६॥

पृथ्वी

तुम्ही प्रभु जगद्गुरु स्व-पद-दास-मंदार हा ॥

जन स्तविल काय या श्रुति म्हणेल मंदा रहा ॥

म्हणोनि तुमचा मला सु-महिमा न वाखाणवे ॥

प्र-कूप खनका कसा जल निधी नवा खाणवे ॥९७॥

शा०वि०

केला प्रार्थुनि तृप्त तो मुनि नृपे अत्यादरे जे मनी ॥

होते सिद्ध पदार्थ विप्र-पतिच्या आले मुखी जेमनी ॥

आज्ञा दे गुरु-राज त्या नृ-पतिला जेवावया तो मग ॥

ब्रह्म्याच्या सदनासि जाय भगवान्‍ भास्वान जसा व्योम-ग ॥९८॥

वर्षानंतर तापसेश्वर पुन्हा येता गृहा पाहिला ॥

तावत्काल उपोषित प्रभु-जल प्राशूनिया राहिला ॥

आज्ञा घेउनि जेविला मग सुह्रद्वर्गासवे तो भला ॥

ऐसा सन्नत अंबरीष सु-यशे लोक-त्रयी शोभला ॥९९॥

आर्या (गीति)

हा ग्रंथ भक्त-भूषण कंठी जे साधु यासि धरितील ॥

ते आत्म-दर्शनी अति स-स्पृह निः स्पृहजनासि करितील ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP