मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
वालीताराख्यान

कीर्तन आख्यान - वालीताराख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


भूमिका -

श्रीरामराय वनवासात असता पंपासरोवरावर गेले. तेथे ऋष्यमुख पर्वतावर वानर या जातीचा राजा सुग्रीव आपल्या मंत्र्यांसह तेथे राहात होता. त्याचा भाऊ वाली व त्याचे वैर वाढले. वालीच्या भयाने तो त्या ठिकाणी होता. परंतु वालीला काही शापामुळे त्या पर्वतावर जाता येत नसे.

सुग्रीवाने रामलक्ष्मणास पहाताच ते कोण आहेत याचा तपास करण्यासाठी आपला मंत्री मारुती यास पाठविले. मारुतीने श्रीरामाचा अधिकार व तेज पाहून त्याच्या पायांवर मस्तक नमविले व सीतेला सोडवून आणू असे सुग्रीवाने रामाला वचन दिले. नंतर सुग्रीवाने वालीवर स्वारी केली. वाली त्याच्या प्रतिकारार्थ निघाला. वालीची पत्‍नी तारा हिने आज युद्धास जाऊ नका असे सांगितले; कारण आपल्यापेक्षा बलवान असा कोणी भेटल्यावाचून त्याने लढाईचे धाडस केले नाही.

लढाई करीत असताना रामांनी एका वृक्षाचे आड उभे राहून वालीस बाण मारला. त्यामुळे वालीचे शरीर जमीनीवर कोसळून पडले. तारेस पतिनिधनाची वार्तां समजताच अत्यंत दुःख झाले व ती मोठया वेगाने चवताळून रामाजवळ येऊन बोलली की, तूं सत्यप्रतिज्ञ म्हणवितोस. माझ्या पतीने तुझा काही एक अपराध न करता तू त्याचा वध केलास. हे केवढे भयंकर कृत्य केले आहेस याचा जबाब दे. त्यावर रामाने उत्तर दिले, ’राम म्हणे अविनाश वालीचा आत्मा शाश्‍वत आहे । देह वालीस्तव म्हणसी तव तो तुजपुढे पडला आहे ।’ ज्या देहाचा तू उपभोग घेतलास तो तुझ्यापुढे प्रत्यक्ष पडलेला दिसतो आहे. तो तू घेऊन चल. तेव्हा तारा म्हणाली; हा माझा पती नव्हे; तर मग तुझा कोणता पती आहे ? असे रामाने विचारताच यातून तो गेला तो माझा पती आहे; परंतु तो अविनाश आहे, ही रामाची विचारसरणी तिला अत्यंत पटली व तिने रामाच्या पायांवर मस्तक ठेवले. नंतर रामांनी वालीपुत्र अंगद यास युवराज्याभिषेक करुन सुग्रीवाच्या ताब्यात त्याचे राज्य दिले.

१.

ओवी

किष्कींद राज माहाबळी । बंधू सुग्रीव आणी वाली ॥

दोघेजणे सभास्थळीं ॥ एके काळीं पातले ॥

२.

पद

सिद्धांत सिद्ध होणार म्हणून हा योग असा घडला ॥

पहा त्या सुग्रीव आणी वाली मध्यें वैर कसा पडला ॥ध्रु.॥

परमप्रतापी सुग्रीव वाली बंधु सहोदर ते ॥

येकत्रचि समवर्तत होते पाहा अगोदर ते ॥

पुढें आपणांमधें आपणचि झाले वैरी दुर्धर ते ॥

असें न घडावें परंतु घडलें वाईट हरहर ते ॥

कोण कसा येईल कळेना कालमान पुढला ॥पहा. ॥१॥

वैर पडाया कारण ऐसें जाहलें दैवयोगें ॥

दुष्ट दुंदुभी दैत्य वधाया धावले ते दोघे ॥

होवुनी युद्धामध्ये पराजय दैत्य पळू लागे ॥

अतीव क्रोधें सुग्रीव वाली धावती त्या मागें ॥

तो दानव मग प्राणभयानें विवरामधें दडला ॥पहा.॥२॥

तो कपिनायक प्रतापि शिरला विवरामधें वाली ॥

राहून बाहेर उभा विवर मुख सुग्रीव सांभाळी ॥

आतुन आला पूर रक्‍ताचा वाहत त्या काळीं ॥

ऐसें पाहून दुःखें सुग्रीव नेत्राश्रू ढाळी ॥

वालीच विवरीं मरण पावला हा संशय पडला ॥पहा ॥३॥

ठेवुनि त्या मग प्रचंड पर्वत विवरद्वारांत॥

बंधुवियोगें अति आक्रंदत आला नगरांत ॥

म्हणे पातला मरण महाबळी वाली समरांत ॥

वृत्तांत ऐकुनि आकांत झाला थोर वानरांत ॥

वाली दारा तारा पाहून मग फारचि रडला ॥पहा.॥४॥

त्या विवरामधें इकडे वाली दैत्याला मारी ॥

विवरद्वारीं पर्वत पाहून मग कोपे भारी ॥

क्रोधें फोडुन शिळा बळानें ये नगरद्वारीं ॥

अति सक्रोधें वाली सुग्रीवाप्रती हाका मारी ॥

कदा न ऐके व्यर्थ विकल्पें बहु कोपा चढला ॥पहा॥५॥

करुन समर्पण राज्य वालीचें धरी सुग्रीव चरण ॥

जोडुन पाणी म्हणे दिनवाणी आलों मी शरण ॥

अविचारानें कलह करोनी करी रुमा हरण ॥

विष्णुदास म्हणे यापरि वैरानळ मंदिरीं उठला ॥पहा.॥६॥

३.

पद

घोर सुग्रीवा प्रति लागला ॥

थोर वालीला कोप आला ॥ध्रु.॥

वाली म्हणे आज घातचि माझा केला होता भावानें ॥

मरतचि होतो परी वाचलों, त्या विवरामधें दैवानें ॥

असें न करावें परंतु केलें यानें कर्म हें गर्वानें ॥

पाहा अयत अन्याय कुणाचा, खरें बोलावें सर्वानें ॥

यापरि वदला क्रोध आला ॥थोर.॥१॥

म्हणुन ऐसें पाप जोडलें सोडुन वडिलांचा धारा ॥

स्वतः स्वतंत्रें राज्य करावें अभिलाषावी मम दारा ॥

यास्तव याचा मी वध करितो प्रसंग आला अवधारीं ॥

आतां रुमा स्त्री याची हरितो हेचि प्रतिज्ञा अवधारा ॥

बोलुन ऐसे वेगें धावला ॥ थोर वालीला कोप आला ॥२॥

रुमा म्हणे आहो तुम्ही भावोजी पापवासना न धरावी ॥

मी बंधूची अबला छलना माझी न करावी ॥

भली नव्हे तरी तुम्ही संगती परनारीची न धरावी ॥

जाण आतां तरी शुद्ध बुद्धिहि निच कर्मामधे घसरावी ॥

कदा न ऐके मदांध झाला ॥ थोर वालीला ॥३॥

चिंतुनि चित्तामधें रुमा स्त्री दुःखें सुग्रीव करी रुदन ॥

म्हणे पाहूं दे प्राणवल्लभे, दावि एकदां तुझें वदन ॥

वैर वाढलें गैरचि झालें तुझें अंतरलें सुखसदन ॥

विष्णुदास म्हणे निजभक्‍तासी कौतुक दावी मधुसुदन ॥

षण्मासाचा निश्‍चय झाला ॥ थोर वालीला कोप आला ॥४॥

४.

कटाव

आंब लिंब वट पोफळी जांभळी ॥ रातांजनअंजीर कर्दळी ।

उतें नारिंगे पेरु पोफळी ॥ चुंबित नक्षत्रांगण नारळी ॥

बदाम खर्जुर राय आवळी ॥ निष्कंटक शमि देव बाभळी ॥

ताडवृक्ष फणसाच्या पाळी फळें झोंबती डाहाळीं डाहाळीं ॥

निबर पिकली कितिक कोवळी मोह करवंदी बिल्वबकूळी ॥

स्थळोस्थळीं द्रुमलता शोभती ॥ सरोवराचे पाट वाहाती ॥

जिकडें तिकडे भ्रमर धावती नव्या फुलांचा गंध सेविती ॥

अनेक पुष्पांच्या वनजाति ॥ जाईजुई चंपक मालती ॥

गुलाब गुलछबु टोप शेवंती ॥ परिमळ दवणा पाच केतकी ॥

रक्‍तवर्ण पितशुभ्र कन्हेरी ॥ धत्तुर फुलांचे कोंब दुहेरी ॥

तर्‍हेतर्‍हेचे बहुत मोगर ॥ तळीं पसरले ज्यांचे पसारे ॥

त्यांवर सुटतां मंजुळ वारे ॥ सुगंध सेविती जन परभारें ॥

चित्रविचित्र रंगीत पाखरें ॥ वनी क्रीडती सह परिवारें ॥

राजहंस द्विज मयूर रावे ॥ चक्रवाक निळ चाशहि हिरवे ॥

कपोत भारद्वाज पारवे ॥ बहिरससाणे टिव टिव पिंगळे ॥

पानकोंबडे चातक बगळे ॥ आकस्मात मिन गिळती सगळे ॥

कृष्ण कोकिळा चिमणें पिवळें ॥ निळे जांभळे पक्षी ढवळे ॥

यापरि गौरीसह शिवशंकर ॥ दानवअंतक रुप भयंकर ॥

विष्णुदासावर करुणाकर । पाहे निज रम्य वनाला ॥ कौतुक दे भक्‍तजनाला ॥१॥

५.

श्‍लोक

रे रे लक्ष्मणा निशार्ध उदया कैसा आला हा रवी ॥

तापातें मज देवुनि शशि कसा माझी मति हारवी ॥

पूर्वी जानकीच्या मुखासी तुलिता या मानिलें तुच्छ की ॥

आतां काय करुं सुचंद्रवदने हा हा प्रिये जानकी ॥१॥

पक्षी लाजविती हसून म्हणती कैसी सति गमवली ॥

जन्मोनि मम वंशिका रवि म्हणे कीर्ति न त्वा मिळविली ॥

आधोमूख जरी करुं तरि तुझी पृथ्वी असे माय की ॥

आता काय करुं ॥२॥

पंपेच्या वन वैभवासी बघता दुःखाब्धि हेलावला ॥

केला शोक असा परि तया वासरमणि उगवला ॥

नेत्रद्वार नद्या आटोनी तनु ही झाली असे शुष्क की ॥

आतां काय करुं सुचंद्रवदने हा हा प्रिये जानकी ॥३॥

६.

साकी

यत्‍नचि हरला अंतचि पुरला उरला कंठीं प्राण ॥

सर्व सुखाचा पुर ओसरला प्राणसखे तुझी आण ॥१॥

तळमळतो जिवहीन मिनापरि पळभरी चैनचि नाहीं ॥

विरहानळ दशरथकुळ जाळिल कळली ही सुचनाही ॥२॥

७.

पद

लक्ष्मणाचे अंकीं ठेवुनी शिर रघुविर निजला ॥

विरहतप्‍त अति नेत्रजळानें प्रभुचा उर भिजला ॥

किष्किंदेच्या निकट सरोवरीं पंपा पुण्य जळा ॥

आसमंतामधें वसति ऋषींचे आश्रम रम्य स्थळा ॥

राम म्हणे बा मज चकोरासि जानकी चंद्रकळा ॥

मावळली वनीं मनीं आठवितां दाटुन येत गळा ॥

मूर्च्छित पाहुनि प्रभु बंधु म्हणे वाटतसे मजला ॥

रुदनाश्रुजळ बिंदु टपकता विरहाग्नी विझला ॥ लक्ष्मणाचे अंकीं ॥१॥

वालीभयास्तव पर्वती होता सुग्रीव कपिभूप ॥

त्या दोघासीं पाहाता मानसीं संशय ये कोप ॥

तापसी असतां कां केलें म्हणे धारण शरचाप ॥

तपधर्मा वंचुनि कशाला अधर्म हा व्याप ॥

काय कारणें वनांत यानें दूर पंथ क्रमिला ॥

दूत धाडिले त्या वालीनें माराया मजला ॥लक्ष्मणाचे अंकी ॥२॥

८.

साकी

त्वा यांचा विश्‍वास परंतु सहसा मनिं न धरावा ।

परजन या स्थळीं आले कशास्तव जाऊनी शोध करावा ॥

लक्ष्मणाप्रति जानकीजीवन म्हणे हा वानर पाहे ॥

जन्मापासुनी याचि स्वयंभू कटिकौपिनची आहे ॥

९.

दिंडी

आनंदानें देवोनि भुभुःकार ॥ कपी घाली साष्टांग नमस्कार ॥

म्हणे गेला अज्ञान अंधकार ॥ कृपादृष्टीचा थोर चमत्कार ॥१॥

सितामाई लावण्यरत्‍नखाणी ॥ वनामाजीं चोरुन नेली कोणी ॥

रडुं लागे अनाथ दीनवाणी ॥ अनाथाचा जो बाप चापपाणी ॥२॥

१०.

साकी

वालीभयास्तव कपि सुग्रीव तो ऋषीमुख पर्वतीं राहे ॥

काय करावें म्हणे संग्रामीं पळणें मरण शुरा हे ॥

११.

पद

राज्यपदा टाकून वनाश्रय रामा आदरिला ॥

अन्यायावाचून वालीनें वैर मसि केला ॥ध्रु.॥

अविनय करुनी शत्रु दुंदुभी शिरला विवरांत ॥

मारायास्तव त्यासी गेला वीर वाली आंत ॥

त्या मी विवराद्वारीं होतों वालीमार्ग पाहात ॥

तो बहु दिवसा आला आतून रक्‍तपूर वाहात ॥

तेव्हा मज गमलें की वाली परलोका गेला ॥

भयें ठेवुनि शिळा भयानें शोक बहु केला ॥१॥

अति दुःखीत मी वालिवियोगें मी नगराला गेलों ॥

श्रेष्ठपदीं तारेसी मानुनी आज्ञेत अनुसरलो ॥

दुंदुभी दानव मारुन वाली रणिं विजयी झाला ॥

क्रोधें फोडून शिळा बळानें नगराला आला ॥

राज्यपदासनिं पाहुन मजला बहुकोपा चढला ॥

करुन समर्पण राज्य वालिचें मस्तक पदि धरला ॥

कदा न ऐके अविचाराने भलतें मज वदला ॥२॥

१२.

पद (चाल-इस तन धनकी)

प्राणनाथ प्रार्थितें आजि आपणांला ॥

जाऊं नका तुम्ही समरंगणाला ॥ध्रु॥

शूरासी अक्षयीं रणि जय न मिळे ॥

पुढील शुभाशुभ होणार न कळे ॥

दैव निरंतर साहाय्य कुणाला ॥जाऊं ॥१॥

वैर तयासवें तुम्ही न करावा, हनुमंत सुग्रीव स्नेह धरावा ॥

आभय द्या वर मम कंकणाला ॥जाऊं॥२॥

षण्मासि युद्धासी येतो सहोदर ॥

घातकी तरी का आला अगोदर ॥

वाटतें पुरविल आपुले पणाला जाऊं ॥३॥

पतिप्रति सति वदे स्वहितचि साचें ॥

विष्णुदास म्हणे अहित कशाचें ॥

मानीती तृणवत शूर मरणाला ॥जाऊं॥४॥

१३.

साकी

आटक नको करुं प्राणप्रिये तूं मज भय काय तयाचें ॥

शतवेळा म्यां केले पराभव समरीं हात जयाचे ॥१॥

पुनरपि जाणे न लगे समरीं सुग्रिव मारुन येतो ॥

पराजयाचा विकल्प हृदयीं सहसा आणुं नये तो ॥

ऐसें बोलुनी वेगे धावला समर कराया वाली ।

त्या दोघांचे तेव्हां झालें थोर युद्ध त्या काळीं ॥

१४.

आर्या

आक्षयि माला देतो करिं घे धारण आताचि सुग्रीवा ॥

पाहता वाटतसे या योग्यच की तुझीच सुग्रीवा॥१॥

१५

श्‍लोक

एक रुप एक रंग एक देह आकृती ॥

एक जाति एक शक्‍ति परंतु भिन्न प्रकृति ॥१॥

१६.

पद (चाल-असा धरी छंद)

पडला वाली रणधरणिवर त्या काळीं ॥

महा अनिवार लागला बाण ॥

श्रमानें कंठीं दाटला प्राण ॥

हरहर म्हणोनियां निर्वाण । देत आरोळी ॥रण॥१॥

म्हणे तूं पूर्ण ब्रह्म श्रीराम ॥

दयाघन सकल लोक आराम ॥

असोनि असाच का संग्राम ॥

करिसी या काळीं ॥२॥

दयाळा आतां रघूनायका ॥

विनंती माझी आतां आयका ॥

म्हणे विष्णुदास पादुका, जडाव्या भाळीं ॥४॥

जाणुनी वेदशास्त्र सिद्धांत ॥

जोडली आपण ही पद्धत ॥

सत्कीर्ति नाम धादांत लाविली काळी ॥रण॥३॥

१७

साकी

समागमें मी येईन तुमच्या दुश्‍चित कोठें बसावें ॥

कोण तुम्हांविण समजाविल मज कोणावर मी रुसावें ॥१॥

किंवा जातां रणांगणीं म्यां अटक तुम्हांला केली ॥

त्या रागें एकाकी मजविण निश्‍चल निद्रा आली ॥२॥

किंवा कांहीं असेन चुकलें तरी तें मनिं न आणावें ॥

उठा अतां मंदिरीं चलावें याला काय म्हणावें ॥३॥

मी रुसतां मग तुम्ही शतवेळां दाटुन मसि बोलावें ॥

चुकलें आतां मी तुमची आज्ञा ऐकेन सदनीं चलावें ॥४॥

परलोकाप्रति जाणें अगोदर नाहीं योग्य तुम्हांला ॥

आंगद मूल अज्ञानी जगीं मग आश्रय कोण अम्हांला ॥५॥

तुम्ही बळसागर असता येक्या बाणें काय मरावें ॥

अपघातातें वधिलें तरी मग तुम्ही काय करावें ॥६॥

१८

पद

तो वीर वाली कसा रणिं मेला ॥

प्रिय वधुवपुसून टाकुनि गेला ॥ध्रु॥

सुत इंद्राचा पति तारेचा बळनिधीं वंद्य कपीला ॥१॥

आंगद म्हणे मम तात सदा प्रिय श्रीविरुपाक्ष शिवाला ॥२॥

रिपु सुगळानें आजि कपटानें वैरची शेवट केला ।

विष्णुदास म्हणे दीनदयाळा अवतार भाव कळाला ॥४॥

१९.

पद

प्रभुसन्मुख करुन वंदन रुदन करी तारा ॥

म्हणे वैर कसा साधिला अहा रघुवीरा ॥

या काय वालीनें तुझा केला अन्याय ॥

जगन्याय जाणसी सर्व साक्षी तव पाय ॥

हा धर्म नव्हे आधर्म वर्तला न्याय ॥

चाल-पडला दोघांमजी वैर । पुरतेपणें जाहला स्वैर ।

परी त्वा पक्षपातें गैर ॥ केलें भरतारा ॥प्रभु० ॥१॥

अवतारकृत्य हें नव्हे योग्य कारण ॥

अपघातें मारिला बाण घेतला प्राण ॥

आज सत्य कळलें मजला तुझें प्रभुपण ॥

आतां जावे कुणाला पुढें दिनानें शरण ॥

चाल-म्हणती एक बाण रघुवीर ।

समरीं एकठाण रणधीर ॥

अपघातें लाविला तीर ॥ वालीचे शरीरा० ॥२॥

सुगळाची न कळली-आधी कपट आरोळी ॥

अति चपळ धावला समीर कराया वाली ॥

म्यां परोपरी प्रार्थिता माझी ते काळी ॥

अमान्य करुनिया वचन तें वदन कुरवाळी ॥

चाल-हंसुनी बोले वीर श्रीकांत ॥

राहे प्राणप्रिये निवांत ॥

येतों करुन शत्रूचा अंत । परत माघारा ॥प्रभु॥३॥

प्राणनाथ सोडिला कसा वचन अभिमान ॥

देहदान करुनिया प्रभूस दिधला मान ॥

परि आहा कसें जाहलें मसी बैमान ॥

चाल-आरी कपटाचा आला राग ॥

यास्तव केला माझा त्याग ॥

जळो हा देह आतां या आग ॥लागो संसारा ॥४॥

२०.

साकी

राम म्हणे अविनाश वालीचा आत्मा शाश्‍वत आहे ॥

देह वालिस्तव रडसी तरि तो तुजपुढें पडला आहे ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP