श्री एकनाथ चरित्र
कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.
(अधिक भाद्रपद वद्य ११ स केलेल्या कीर्तनप्रसंगी तयार केलेले)
गेल्या मंगळवारी येथील प्रार्थना मंदिरांत रा. रा. वामनराव मोडक यांनी खालीं दिलेल्या पदाच्या आधारे कीर्तन केले. कीर्तनकारांनी
या पदांतील विषयाचें निरनिराळ्या साधुवचनांच्या आधारें प्रतिपादन केल्यानंतर श्री एकनाथ स्वामींचे चरित्र लाविले होते. हे चरित्र नवीनच तयार केलेलें असल्यामुळे तें आम्ही आमच्या वाचकांकरिता येथे देतो. "सुबोध पत्रिका "
पद - ( जिल्हाकाफी)
तारिं तारिं दीन नाथा । गेला गेला जन्म वृथा ॥धृ.॥
दृश्य संगी गुंग झालों । क्षणिक सुखें नाही धालों ।
वैराग्याच्या वाटे भ्यालो । वारिं वारी मोहव्यथा ॥१॥
नाहीं केली शुद्ध मति । कैशी घडे तव भक्ति ।
मार्ग चुकलो झाली भ्रांति । धरुनि हाती नेइ पंथा ॥ तारि ॥२॥
आतां मजला अन्य त्राता । न दिसे तुजविणें अनंता ।
धाव वेगें कृपावंता । रंक पायी ठेवि माथा ॥ तारि ॥३॥
आर्या --- एक तया म्हणति जनी की दवडूनि स्वरिपुवर्ग बाहेर ।
शांति क्षमा दया यां तो एकचि होय नित्य माहेर ॥१॥
दीनावरि करुनि दया तारी भवाब्धींत देउनी हात ।
आर्तत्राण जयांचे शील तया म्हणति कां न जननाथ ॥२॥
भाविक सात्विक मतिपरि वाक्कौशल्यें विहीन नच संत ।
ऐसें निज पांडित्यें दावी त्या म्हणति जन न कां पंत ॥३॥
यास्तव यथार्थ त्यातें नावे जनीं एकनाथ पंत असे ।
ह्यन्मंदिरीं जयाचे सुक्षेत्रीं मुनि तसा अनंत वसे ॥४॥
श्लोक ---प्रेम त्यावरि बहू वडिलांचें । रंजवी निज गुणें मन त्यांचें ॥
शील पाहुनि तयावरि चित्त । होतसे सहजची अनुरक्त ॥१॥
दिंडी -- परी बाल्यांतचि होय मति उदास ॥ साधुसंगी आवडी बहु मनास ॥
म्हणे सार्थकता तरिच जीवनाची ॥ जरी जोडे संगती सज्जनांची ॥१॥
सहज वार्ता ऐकिली निज ग्रामी । वसे बेदरिं श्री जनार्दन स्वामी ॥
यवन रायाचा मंत्रि चतुज ज्ञानी । साधुवृत्ति हरिभक्त समाधानी ॥२॥
असुनि लक्ष्मी तच्चित्त अनासक्त । थोर सत्ता असुनि जो सदयचित्त ॥
राजकार्यी बहु दक्ष परि विरागी । सतत मोक्षपंथी ज्ञानदृष्टि जागी ॥३॥
साकी - ऐकुनी ऐसे वृत्त मनिं म्हणे एकनाथ शुचिभावे ॥
स्वामि जनार्दन संगति जोडुनि जन्म कृतार्थ करावें ॥१॥
त्यजुनि सदन मग सत्वर दृढमति जाय वेदरि प्रेमे ॥
वदुनि भावें श्रेय: साधन गुरुसेवा करि नेमें ॥२॥
श्लोक ---श्रवण करि गुरुचा बोध तो शुद्ध भावे । मनि धरि दृढ इच्छा ज्ञान चित्तिं ठसावे ।
निरखुनि शुचि वृत्त स्वामिचें स्वक्रियेला ॥ वळवि सतत यत्ने जोडुनी तत्कृपेला ॥१॥
पृथ्वी - शुचिव्रत विलोकुनी गुरु म्हणे न मी जा गृहा । सुखें वस सदाश्रमीं त्यजुनि क्षुद्र वित्तसृहा ॥
भजे प्रभुसि अंतरि करि दया समस्तांवरि । नसे भय तयासि जो सुजन दिष्ट मार्गा घरी ॥१॥
ओव्या --- शिरसा वंद्य गुर्वाज्ञितें । करोनि जाय निज गृहातं ।
सेवोनि मातां पितरातें । सुखे स्वधर्म आचरी ॥१॥
पित्राज्ञेनें गृहस्थाश्रम । करोनि पाळी नित्य नेम ।
सर्वां भूतीं भाव सम । ज्याच्या चित्तीं वसतसे ॥२॥
या परी कांही काळ लोटतां । स्वर्गस्थ होती मातापिता ॥
प्रेम त्यांचे कृतज्ञ चित्ता । नित्य आठवे मानसीं ॥३॥
स्नानादि सर्व विहित कर्मे । आचरोनि वर्ते नेमे ॥
श्राद्ध कर्म पुत्रधर्मे । प्रति वत्सरीं करीतसे ॥४॥
एके समयी श्राद्धदिन । येतां द्विजासि निमंत्रण ॥
करोनि निर्मिले षड्रसान्न सुटला परिमळ सर्व गृही ॥५॥
तो एक अंत्यज स्वस्त्रीसहित । नित्य क्रमे मार्ग झाडित ॥
एकनाथ गृहापाशी येत । अन्न परिमळ वैधी तया ॥६॥
दिंडी --- म्हणे कांता गर्भिणी भ्रतारातें । जरी सुमधुर होईन हे अन्न मिळे मातें ॥
तरी भक्षुनि होईन परम तृप्त । बहुत झालें श्रम करुनि मी क्षुधार्त ॥१॥
म्हणे हौनि मनिं कष्टि निज स्त्रीतें । कसा धरिला हा हेतु तुझ्या चित्तें ॥
असे दुर्लभ अन्न हें आपणाला । व्यर्थ मोह तुझ्या होय कां मनाला ॥२॥
साकी --- भोजन सारुनि टाकिती द्विजवर मार्गी उच्छिष्टाते ।
तोचि आपुला भाग अन्न हे न मिळे दैवहतातें ॥
न धरी व्यर्थ अशी । आशा तूं भलतीशी ॥१॥
श्लोक -- करुण वचनें ऐशी नाथें गृहातुनि ऐकिली । सदय हृदयें कातेला तीं सवेंचि निवेदलीं ॥
सुमती क्षुधितां या दीनां दे यथेप्सित भोजन । तरिच प्रभु तो श्राद्धे तोषे पिता जगजीवन ॥१॥
साकी ---ऐकुनि साध्वी म्हणे अन्न बहु न सरे या दोघांते ॥
तरि बोलावुनि अंत्यज सारे भोजन द्यावें त्यांते ॥१॥
अवश्य म्हणुनि नाथ त्या म्हणे बोलावा निज ज्ञाति ॥
देउनि भोजन सिद्धान्नें या करुं सकळांची तृप्ति ॥२॥
श्लोक -- असें ऐकतां दीन तीं तुष्ट झालीं । निज ज्ञातिला घेउनि शिघ्र आलीं ॥
तया वाढिले अन्न प्रेमें सतीने । बहु पुण्य ते भाविले तन्मतीनें ॥१॥
दिंडी --- असो जेऊनि सर्व ही तृप्त होती ॥ बहुत मानुनि उपकार गृहा जाती ॥
दंपतीचें मनी प्रेम फार दाटे ॥ दीन संतोषे सज्जना तोष वाटे ॥१॥
पुन्हां होतां नि:शेष सदन शुद्ध ॥ बहु प्रयत्ने करविला पाक सिद्ध ॥
प्रेमपूर्वक कळविले द्विजगणातें ॥ त्वरित यावें न करितां विलंबातें ॥२॥
आर्या --- कोपुनि ब्राम्हण म्हणती दिधलें श्राद्धान्न अंत्यजासि कसे ॥
अवमानुनी द्विजांते कां केले अति निषिद्ध कर्म असें ॥१॥
श्लोक --- न येऊं कधीं आम्हि नाथगृहातें । जरी लागला येउनिया पदाते ॥
उपेक्षूनि जो शिष्टमार्गासि वागे । जनीं भ्रष्टता त्यासि तत्काळ लागे ॥१॥
ओव्या --- पंच क्रोशींचे द्विजवर । नसूनि मेळवावे सत्वर ॥
ते करीतील जो विचार । तोच माने सर्वांसी ॥१॥
ते प्रायश्चित्त ठरवीती । तें आचरावे अनन्य गती ॥
तेचि पापाची निष्कृति । मार्ग दुसरा असेना ॥२॥
श्लोक --- ऐकोनि निश्चय असा सकळ द्विजांचा । चिंता करी निजमनीं पितृभक्त साचा ॥
श्राद्धाविणें पितृतिथी जरि आज गेली । जन्मोनि व्यर्थ जननी बहु कष्टविली ॥१॥
दीनांवरी करि दया न तया उपेक्षी । तो दीननाथ सकलेश्वर सर्वसाक्षी ॥
ऐसा धरोनि मनिं भाव दयार्द्र चित्तें । म्यां तर्पिले करुनि आदर अंत्यजातें ॥२॥
तें मान्य होय प्रभुला तरि दोष मातें । कैसा शिवेल अणुमात्रहि भाविकांते ॥
निर्दोष मी जरि असें तरि का द्विजा ही । केली अशी अवकृपा न कळेचि कांही ॥३॥
साकी --- होउनी चिंताग्रस्त या परी आठवि प्रभुरायाते ॥ म्हणे प्रभु या संकटि तारिल कोण तुझ्याविण माते ॥१॥
दिंडी ---- शुद्ध भावें प्रगटूनी देव चित्तीं । म्हणे व्यर्थचि कां करिशि मनी खंती ॥
करुनि दीनांवरि त्या दया तुष्ट मातें । आजि केलें तैसेंचि पितृगणातें ॥१॥
श्लोक --- मी तृप्त होतांचि पिता जगाचा । संतुष्ट झाला पितृवर्ग साचा ॥
केलें तुवां श्राद्ध विशुद्ध भावें । बा कां न तें त्वप्तितरांसि पावे ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 06, 2017
TOP