मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
उषाख्यान

कीर्तन आख्यान - उषाख्यान

आख्यान,कीर्तन,akhyan,kirtan,विष्णुदास,vishnudas


भूमिका -

श्रीशंकराने प्रसन्न होऊन आपल्या मुलासारखा बाणासूर यास समजून त्यास हजार हात दिले होते. त्यामुळे तो देवासुरांना अजिंक्य झाला होता. पण शंकराची भक्‍ती अतिशय प्रेमाने तो करीत असे. एकदा प्रदोषकाळी कैलासास शंकराच्या पूजेस निघाला असताना बरोबर त्याची मुलगी उषा उर्फ उखा व तिची मैत्रीण चित्ररेखा याही गेल्या. तेथे शंकर व पार्वती सारीपाट खेळत होते. ते पाहून उषेस असे वाटले की, मी आपल्या पतीबरोबर एकांतस्थळी असा सारिपाट कधी खेळेन बरं ? अशी उषेस तळमळ लागली व तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. पार्वतीने तिची समजूत घातली व तुला मी सुंदर नवरा देते; त्या़ची खूण अशी की, वैशाख शुद्ध द्वादशीला स्वप्‍नात येईल तो तुझा नवरा आहे.

त्याप्रमाणे वैशाख शुद्ध द्वादशीस रात्री तिला स्वप्‍नात अनिरुद्धाचे दर्शन झाले. जागी झाल्यावर चित्ररेखेस तिने आपली हकीगत सांगितली. परंतु त्याचे नावगाव वगैरे तिला माहीत नव्हते. म्हणून चित्ररेखेने सर्व ब्रह्मांडातील सर्व पुरुषांची चित्रे काढली. शेवती द्वारकेतील चित्रे घेताना अनिरुद्धाचे चित्र काढताच तिला समाधान वाटले.

"चित्ररेखे, जाऊनी अनिरुद्ध आण" याप्रमाणे तिने चित्ररेखेची प्रार्थना केली. हे पद करुणस्वरात गाताच प्रत्येकाचे डोळ्यांतून पाणी उतरते.

उखेच्या सांगण्याप्रमाणे ताबडतोब योगसाधनाने चित्ररेखा द्वारकेस गेली व अनिरुद्ध निजला होता त्याला पलंगासह उचलून परत शोणीतपुरास उखेच्या मंदिरात आणून ठेवला. नंतर गांधर्वविधीने अनिरुद्धाने तिचे पाणीग्रहण केले.

या आख्यानात सर्व ब्रह्मांडातील चित्रे घेण्याचे सामर्थ्य व मंचक उचलून आणण्याचे सामर्थ्य ज्या एका स्त्रीस आहे, तिला अबला कसे म्हणावे असा प्रश्‍न विष्णुदासांनी केला आहे. यापुढे हरिहरांची भेट होणे वगैरे बाणासुराख्यान आहे. ते विष्णुदासांनी लिहिले असावे अशी खात्री आहे; पण आम्हांस उपलब्ध झाले नाही.

१.

ओवी

शोणितपुरिंचा बाणासुर ॥ शिववरदानें सहस्त्रकर ॥

प्राप्‍त होवोनि महीवर ॥ अजिंक्य झाला सुरगणा ॥

२.

साकी

शोणितपुरिंचा नरेश ज्याचें बाणासुर अभिधान ॥

निर्भय चित्तें राज्य करितो ज्याला शिववरदान ॥१॥

शिववरदानें न गणी कोणा समरीं असुर सुराला ॥

अजिंक्य झालों म्हणे मी गर्वे लावुनी हात उराला ॥२॥

म्हणे कुंभ का आता वेळ ही झाली शिवपुजनाची ॥

यास्तव कैलासा मी जातों मनीं आवडी भजनाची ॥३॥

३.

दिंडी

पार्वतीचे पूजेसि चला जाऊं ॥

आनंदानें कैलासगिरी पाहूं ॥

नमन करुनि आशीर्वाद घेऊं ॥

पुन्हा माघारे परतोनि शीघ्र येऊं ॥१॥

४.

पद

येकदा शंकर आणि पार्वती सारिपाट खेळती ॥

आलि बहू रंगावर वेळ ती ॥धृ॥

जसा पाहिजे तसा शिवेचा डाव पटावर पडे ॥

मनामधें गंगाही तरफडे ।

आदिशक्‍तिकडे सकळ दैवतें पडू न देति साकडें ।

भुतें वेताळ शंकराकडे ॥

चाल-याची येक बसेना पटावरती सोंकटी ॥

पहा नीट ठरेना भुजंग बळकट कटी ।

वाजे खटखट रुद्राक्षाची माळ मनगटीं ॥

चाल - म्हणती आवेशे उलटुनि फासे ॥

फाशावर चालती ॥आली॥१॥

ऋद्धी सिद्धी आवघे जाहले पार्वतीचे किंकर,

म्हणति हो भोळा शिवशंकर ॥

भांग घोटितो, विष भक्षितो, दिसतो भयंकर ॥

देंतो भलत्यासी आभयंकर ॥

चाल-आजि कसा सदाशिव पार्वतिनें जिंकिला ॥

कांहीं थोरपणाचा मान नाहीं राखिला ॥

हा निराकार निर्गुण नाहीं ओळखिला ॥

स्मशानिं वसतो ब्रम्हांडाची फिरवितसे माळ ती आली ॥२॥

शिवगौरीची क्रिडा पाहुनि उखा मनी तळमळी ॥

जशी कां जीवनाविण मासुळी ॥

म्हणे मी ऐसी बैसेन कधी पतिसह येकांत स्थळीं ।

घेवुनी आक्षय पाश करतळी ॥

चाल-म्हणे चित्ररेखेप्रति खेदयुत ती उखा ॥

जसे चकोर पाहती रजनिपतीच्या मुखा ॥

तसी पाहीन कधी मी येकांतींच्या सुखा ॥

विष्णुदास म्हणे असे बोलुनी प्रेमाश्रू ढाळिती ॥

आली बहुरंगावर वेळ ती ॥३॥

५.

घनाक्षरी

उखे पाहुन हें सदन । सांग केलेस कां रुदन ॥

आलें रक्‍ताला आधण । तुझें वदन सुकलें ॥१॥

काय इच्छित तें सांग । देतें दुर्लभ वर माग ॥

परी सोडुनि वैताग । पडे भाग बोलणें ॥२॥

मनीं झाला विकार । परी नाहीं अधिकार ॥

कळुन आला आकार । चमत्कार वाटतो ॥३॥

६.

पद

हे भवानी माय तुसी - उघड बोलुं मी कशी ॥धृ॥

मी कुमारिका लहान ॥

धरिली कामना महान-नव्हेचि-आज उचित काज ।

लाज वाटते मसी ॥

उघड बोलुं मी कशी ॥१॥

किती जिवाशी सावरुं ॥

किती मनासी आवरुं ॥

बळेंच रडावें उगिच उडवी ॥

गगनीं वावडी जशी ॥२॥

पाहावयासि नोवरा, जिवचि होतो घाबरा ॥

चैन कांहीं पडत नाहिं ॥

बाई जाहलें पिशी ॥३॥

विष्णुदास म्हणे शिवे तूं ॥

सर्व जाणतीस हें तूं ॥

शरण आलियास साची ॥

सत्य लाज राखसी ॥४॥

७.

पद

तुला देते मी सुंदर नवरा ॥

उगा जीव नको करुं हावरा ॥धृ॥

कल्पतरुच्या वृक्षातळीं का ॥

बैसुनि चिंतिशी हिवरा ॥ उगा ॥१॥

मी असतां शिरीं काय उणे तरी ॥

दैवाचा फिरविन भवरा ॥उगा ॥२॥

केवळ मदनाचा मदनचि दुसरा ॥

धीर विर रणरंगडवरा ॥उगा॥३॥

विष्णुदास म्हणे हे वर वरणें ॥

चिंतावें कर्पूरगौरा ॥४॥

८.

आर्या

वैशाखे शुद्ध द्वादशीशीं स्वप्‍नीं येईल तोचि समज वर ॥

कन्ये उखे पाहा गे दिधली तुजला मि हेचि समज वर॥१॥

९.

पद

तोचि दिवस आजचा सखे जो पार्वतीनें नेमिला ॥

रात्रंदिन त्या नाहीं विसरलें आठवण आहे मला ॥

चैन पडेना पाहा जळों हा विरहानळ साहिना ॥

तळमळतें मन चंचल झालें पळभर निज येइना ॥

मंद मंद चालतो रवी-रथ दिवस वेगें जाईना ॥

चाल- पहा सखे वामनेत्राचि पापणी कशी लपलपती ॥

कंचुकीं घडी घडी सुटती, तट तटति कटी,

पिंगळे वृक्षीं किलकिलती ॥

मंदिरीं पाल चुपचुपति, वैशाख शुद्ध द्वादशी ॥

सुखाचा पर्वकाळ आला, रात्रंदिन त्या ॥१॥

१०.

कामदा

चढत चालली रात्र सुंदरी ॥

चैन तूं करी शीघ्र मंदिरीं ॥

क्रीडसि तूं पतीच्या सुखें उखे ॥

बहुत काय मी बोलूं या मुखें ॥१॥

११.

पद

रतलि स्वप्‍नींच्या सुखा उखा मग म्हणे पतिस पाहून ॥

लंपट जाहलें तुम्हांसी पाहतां गेलें मन मोहून ॥

हेतु सर्व पुरविले केले मज धन्य सदनीं येऊन ॥

टाकुन जाऊं नका आतां तुम्ही मज अंतर देऊन ॥

चाल- तुम्ही महाराज खरे मसि बोला परतोनि तरी येता ॥

विष्णुदास म्हणै दैवें ढगाआड चंद्र दिपला ॥१॥

१२.

दिंडी

उखेलागीं कवळोनि दोन्ही बाहें ॥

चित्ररेखा म्हणे सखे स्वस्थ राहे ।

मला सप्‍तलोकीचें ज्ञान आहे ॥

चित्रें लिहून दावितें तुला पाहे ॥

१३.

कामदा

प्रथम गणपति श्रीसरस्वति । नमुनि श्रीगुरुअमरावती ॥

पुरुष रेखिले यामधें निके ॥ पति तुझा पाहा राजकन्यके ॥१॥

परम धन्यचि सत्यलोक हा ॥ वसति या स्थळीं सन्मुनि महा ॥

पुरुष रेखिले यामधें निके ॥ पति तुझा पहा ॥२॥

जगतिं श्रेष्ठ वैकुंठभुवन ॥ आढळ स्थान कैलास पावन ॥पुरु॥३॥

वरुण वारिधी सप्‍त ताळही ॥ विविध देशिचे लोकपाल ही ॥४॥

गिरी गुहा वनीं चंद्रतारका ॥ उरलि ऐकचि बाई द्वारका ॥पु.ति.५॥

वळखि हे बळी राम श्रीहरी ॥ प्रमुख यादवांच्या सभा हरी ॥ पुरुष० ६॥

मदनपुत्र हा फार साजरा ॥ समज यापुढें चंद्र लाजरा ॥पुरुष० ७॥

१४.

ओवी

बळी राम उद्धव अक्रुर सिद्ध ॥

श्रीकृष्णपुत्र मदन प्रसिद्ध ॥

त्याचा पुत्र हा आनिरुद्ध ॥

राजतनये वोळखी ॥१॥

१५.

पद

चित्ररेखे जावुनि आनिरुद्ध आण॥धृ.॥

विरहशरांच्या तापानें होती व्याकूळ पंचहि प्राण ॥१॥

या समयीं तरी उठ लवलाही ॥

पाहुं नको निर्वाण ॥२॥

त्याविण क्षणभर करमत नाहीं ॥

जाण सखे तुझी आण ॥३॥

विष्णुदास म्हणे टोचुनि गेला ॥

आंतरिं मदनाचा बाण ॥४॥

१६.

साकी

तव कार्याच्या साठीं जाइन चपल मी पवनापेक्षा ॥

आनिरुद्धासी आणुन या स्थळीं पुरविन सत्य अपेक्षा ॥

१७.

पद

वंदुन भावें कमलोद्‌भवसुत, बोले मुनिवर्या ॥

आगमनकारण कथिते ऐका नारद मुनिवर्या ॥धृ॥

शोणितपुरिंचा भूपति बाणासुर त्याची दुहिता ॥

माझी सखी ती उखा तिच्या वरप्राप्‍तीच्या स्वहिता ॥

पार्वतिच्या वरप्रसादे लाभली ती सद्‌गुणसरिता ॥

द्वारकेसि अनिरुद्ध आणाया जाते तिच्याकरिता ॥

विष्णुदास म्हणे सहाय्य असावें आपण या कार्या ॥१॥

१८.

दिंडी

द्वारकेच्या बाहेर लवलाहे ॥

सुदर्शन भवतालं फीरताहे ॥

नेत्रपापणीने त्रास लागताहे ॥

तव एकविंशती वेळ जाये ॥१॥

चित्ररेखे निभ्रांत तया ठायीं ॥

अणुरेणु वायूस गती नाही ॥

आसुरकन्ये तूं तर जडदेही ॥

कठिण कार्य वाटतें मला बाई ॥२॥

१९.

साकी

श्रीहरिचें ते सत्य सुदर्शन आज्ञा माझि न भंगे ॥

शपथ माझि घालिता तुला तो देईल मार्ग शुभांगे ॥१॥

आनिरुद्धासह मंचक स्कंधीं घेवुनि धावे चपला ॥

बुध हो ऐशा प्रबल स्त्रियाला काय म्हणावे अबला ॥२॥

उखें मंचकासहित आणिला हा अनिरुद्ध विलोकी ॥

यासवे क्रीडा करी आनंदें मिळवुनि कीर्ति भुलोकीं ॥३॥

२०.

दिंडी

अकस्मात अनिरुद्ध होय जागा ॥

म्हणे नोहे ही द्वारकेचि जागा ॥

काय माजी अवदशा आली भागा ॥

तुम्ही कोण नारितो मला सांगा ॥१॥

२१.

पद (चाल - इस तन धनकी )

युदुकुलभूषणा तुमची मी जाया ।

सून मदनाची शिवसुत तनया ॥१॥

मदनकुमारा अति सकुमारा ।

म्यांचि तुम्हांसी आणिलें या ठायां॥

स्वसदनांतरी गंधर्वविधीनें ॥

पूर्वीच केली अर्पण काया ॥यदु॥२॥

पार्वतीच्या शुभ वरप्रसादें ॥

लागून गेलें लक्ष या ठायां ॥३॥

यास्तव अंगीकार करावा ॥

किमपी धरुं नये संशय वाया ॥४॥

मी दासी चरणांकित तुमची ॥

निःशंकित पर्यंकीं बसा या ॥५॥

विष्णुदास म्हणे या लग्नाला ।

सावधान शुभमंगल गाया ॥६॥

२२.

साकी

श्रीशंकरपार्वतीप्रति चिंतुनि बाणासुरबाळा ॥

शुभमंगल घडि अनिरुद्धाच्या कंठिं घाली माळा ॥१॥

२३.

कामदा

हरिहाराचि हो भेट यापुढें ।

झडती ऐकतां दोष बापुडे ॥

सुजन घालिती यावरी सही ।

म्हणून प्रार्थितो विष्णुदासही ॥१॥

N/A

References :

आख्यानकार - श्री.विष्णुदास

Last Updated : September 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP