धर्माख्यान
कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.
ओव्या - द्वेतवनी अद्वैत चित्त । धर्मराजा वधु रहित । सवें द्रोपदी धौम्य पुरोहित । आश्रम करुनि राहिले ॥१॥
कोणाचाही द्वेष न करी । दयादृष्टी सर्वावरी । अजात शत्रु नाम निर्धारी । म्हणोने लोकीं पावला ॥२॥
सहा धर्मी त्याची रती । संकटीही न चळे मती । धनें पाळी प्रजेप्रती । म्हणोनि धर्मराज म्हणती तया ॥३॥
साधुसंगे समाधानें । वर्ते सत्कर्मे अनुष्ठाने ॥ भ्रष्ट पद ही क्लेश नेणे । वैराग्य भाग्यें संतुष्ट
दिंड्या -- असें ऐकुनि संतप्त होय चित्तीं । म्हणे दुर्योधन जाऊं वना प्रती कळी काढूनि पांडवा रणीं मारूं ।
दूर संकट जो तोचि त्या निवारुं ॥१॥
सवें दु:शासन आणि इतर वीर । निघे घेउनि चतुरंग सैन्यभार । शीघ्र वेगें चालता पथीं घोर ।
विघ्न उद्भवले त्यांसि दुर्निवार ॥२॥
आर्या --- विपिन द्वारा रोधी गंधर्वाधीश चित्रसेन दळ । या जिंकोनि रिघाया न शके कुरुसैन्य होय जरि प्रबळ ॥१॥
गाठूंनि चित्रसेना दुर्योधन त्यासिं उग्र समर करीं । परि दुष्कर्म विपाकें जो जित त्या विजयभाग्य केविं वरी ॥२॥
छिन्नास्त्र भग्नरथ कुरुपति होता शत्रु साधके विकळ । धरिली अरिनीं वेगें जिंकुनि तद्वंधुवर्गही सकळ ॥३॥
ते वृत्त धर्मराया कळविति कुरुमंत्रि भीत पद नमुनी । म्हणती बाधा सोडवि भ्रात्या गंधर्वराज बळ दमुनी ॥४॥
साक्या --- ऐकुनि भीम म्हणे खळ आम्हां छळावयासीं आला । भक्तसखा हरिभक्त वैरिया दंडिल कां न तयाला ।
झाले हें बरवें । कौरव धरिले गंधर्वे ॥१॥
मिळवुनि दळ चतुरंग प्रयासें जे आम्हीं टाळावें । अरिष्ट तें परयत्नें टळतां आड कसें त्या यावें ॥ झालें हे बरवें ।
कौरव धरिले गंधर्वे ॥१॥
अन्यायें जे वर्तति विपरित फळ तें पावती अंती । कपट द्युंति कुमति सुयोधन कां आतां करि खंती ॥
झाले हे बरवे । कौरव धरिले गंधर्वे ॥३॥
वसतां येथ सुखांत आमुचा जेणे हरिला भार । चित्रसेन तो मित्र तयाचे कां न स्मरु उपकार ॥ झाले हे बरवे ।
कौरव धरिले गंधर्वें ॥४॥
शीत वात आतपा सोसुनी तापसि कष्टे काळ । कंठिति बंधु तया भेटाया येतो कीं कुरुपाळ । झाले हें बरवे ।
कौरव धरिले गंधर्वे ॥५॥
श्लोक --- भीमवाक्य अति निष्ठुर यापरी । ऐकुनी सदय भूपति अंतरी ॥
दु:ख पाहुनि म्हणे अनुजा तुला । कां गमे कुळहित कुलक्षय आपुला ॥१॥
आम्हांसवें जरि सुयोधन वैर भावें । वर्ते तरी तदरि अस्मदरि स्वभावे ॥
ज्ञाते न आठविति संकटकालि त्याशी ॥२॥
बापा नव्हे समय हा परुषोत्तराचा । दीना निवारणचि क्षत्रिय धर्म साचा ।
देवोनिया अभयदान स्वबांधवाते । जा सोडवा अरिशिं साम करुनि त्यांते ॥३॥
ओव्या --- भयार्त होवोनि शरण । आप्तां प्रती आले जाण ॥ संकट समयी कुरुनंदन । वदति ऐसे त्यासि कसे ॥१॥
तरी शरणागत रक्षणा । तैसेचि निज कुळत्राणा ॥ होवोनि सिद्ध रणांगणा । जातां विलंब न करावा ॥२॥
हो कां कुळवैरी आपुला । धांव म्हणोनि शरण आला । हस्त जोडोनि तो तयाला । आर्यजन न उपेक्षी ॥३॥
वर लाभ राज्य प्राप्ती । अपुत्रासी पुत्रोत्पत्ती । येवढे सुख लाभे तयाप्रती । जो शत्रुक्लेश निवारी ॥४॥
याहुनि श्रेय काय तुजला । आजि सुयोधन शरण आला । बळखोनि तव बाहुबळाला । जीवदान तुज मागे ॥५॥
गुंतलो नसतों यज्ञानुष्ठानीं । तरी जातों मीच धांवोनी । कौरव सोडवावया लागोनी । निश्चयेसी भीमसेना ॥६॥
श्लोक ---सामोपचारेंचि सुयोधनातें । गंधर्व सोडी तरिं इष्ट मातें ॥
शत्रु न ऐके जरि माम युक्ती । योजा तरी सौम्यचि दंड युक्ती ॥१॥
मृदुपणे उमजे नच तो जरी । तरि धरोनि तया प्रति संगरीं ॥
सकल बांधव सत्वर सोडवा । परि वृथा कळ हा नच वाढवा ॥२॥
दिंड्या --- करिति शिरसावंद्य ती सकळ आज्ञा । कोण ऐशा बंधुची करि अवज्ञा । निघति पांडव कौरवां सोडवाया ।
आर्तत्राणां जन्मली साधुकाया ॥१॥
असो जिंकुनि गंधर्व कौरवातें । मुक्त करुनी आणिती आश्रमातें । त्यांसि पाहुनि कळवळे धर्म चित्तीं ।
साधु परम दु:खे परम कष्टि होती ॥२॥
साक्या --- शांतवुनी त्यां म्हणे युधिष्ठिर बारे साहस ऐंसे । नका करूं कधिं पुन्हा साहसे होय तुम्हा सुख कैसें ॥१॥
सुखें बंधुसह सुयोधना बा जाय स्वगृही आतां । न करिं वैर कुणाशी त्रातो होय हरि दयावंता ॥२॥
यापरि सांत्वन करुनि बांधवा देत अनुज्ञा जाया । बंदुनि सकळां खिन्नवदन खळ जाती आपुल्या ठायां ॥३॥
श्लोक --- साधूतें छळिती सदा खळ परी क्षोभे न त्यांची मती ।
मात्सर्या विषमस्थ हीन धरिती तैसेचि लोभाप्रती ।
जे प्रेमें सुकृती हरिसी भजती तो एक ज्यांची गती ।
त्यां रक्षी हरि तोचि नित्य अशुभीं त्यांचे नसे कीं रती ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 06, 2017
TOP