स्वायंभू मनूचा पुत्र उत्तानपाद राजा ह्यास दोन बायका होत्या. थोरलीचे नाव सुनीति व धाकटीचे नाव सुरूचि. सुरुचि ही राजास
फार प्रिय होती. थोरलीचा मुलगा ध्रुव एकदा बापाच्या मांडीवर जाऊन बसला, ते धाकटीस न साहून तिने त्यास पायाने मांडीवरून
खाली लोटले. तेव्हा ध्रुवास फार वाईट वाटून तो परमेश्वरास शरण गेला; तेव्हा त्याने प्रसन्न होऊन ध्रुवास अचल पद दिले. ही
कथा ह्या आख्यानात आहे.
सूर्य-वंशी उत्तानपाद राजा ॥
रूपवंती तयास दोन भाजा ॥
कनिष्ठेशी अत्यंत प्रीत-माया ॥
पट्टराणीची पडो न दे छाया ॥१॥
वरिष्ठेसी जाहला एक पुत्र ॥
भक्त-राज वैकुंठ-पाळ-मित्र ॥
सु-कुमार आ-कर्णे-पद्म-नेत्र ॥
ठाण माण रेखिले जेवि चित्र ॥२॥
पांच वर्षे लोटली ध्रुवा आंगी ॥
पिता ठाऊका नाही तयालागी ॥
पुसे मातेसी भक्त-राज योगी ॥
तात कोठे तो सांग मला वेगी ॥३॥
म्हणे माता तान्हया तोचि तूझा ॥
धराधीश बोलती ज्यास प्रजा ॥
येरु बोले पाहीन पिता माझा ॥
नको जाऊ मारील राज-भाजा ॥४॥
पूर्व-पुण्ये शुभ दिवस ऊगवला ॥
मुलांसंगे तो राज-गृहा गेला ॥
राज-दृष्टी सन्मूख उभा ठेला ॥
पिता पाहे तो मोह झळंबला ॥५॥
अ-नीवार मोहास पूर आला ॥
ऊचलोनी मांडिये बैसवीला ॥
बाळ-शब्दे खेळवी तनू-जाला ॥
न साहे ते राणीस कोप आला ॥६॥
उचंबळे क्रोधाग्नि शिखा टाकी ॥
कवण बोले बैसला राज-अंकी ॥
राव कैसा खेळवी कवतूकी ॥
ध्रुव राजा होईल धरा-लोकी ॥७॥
धरोनीया सापत्न-भाव चित्ती ॥
पदे लोटोनी पाडियला क्षीती ॥
रडत गेला माउली जेथ होती ॥
अश्रु-पाते हालवी नेत्र-पाती ॥८॥
म्हणे माता तान्हया काय झाले ॥
कोण पापीये तूज गांजियेले ॥
मला राये मांडिये बैसवीले ॥
राज-भाजेने पदे लोटियेले ॥९॥
बुझावीता माउली काय बोले ॥
अम्ही देवासी नाहि पूजियेले ॥
येरु बोले तो देव कसा आहे ॥
वसे कोठे तो सांग लवलाहे ॥१०॥
माय बोले सर्वत्र देव आहे ॥
चराचर ही व्यापूनि विश्व राहे ॥
तयालागी धुंडिती महा-योगी ॥
पूर्ण पुन्ये दरूषण तयांलागी ॥११॥
तुझी बुद्धी काय बा वय सान ॥
तुला कैसे देईल दरूषण ॥
ध्रुव बोले त्यागीन तरी प्राण ॥
हरी देईना जरी दरूषण ॥१२॥
उभा जैसा तैसाचि निघे वेगे ॥
रडत पाठी लागली माय मागे ॥
पुत्र गेला रायासि दूत सांगे ॥
राय झाला घाबरा मोह-संगे ॥१३॥
सर्व सौख्याचे मूळ बाळ माझे ॥
ध्रुव गेला घेणार राज्य-ओझे ॥
वनी प्राण त्यागीन लोक-लाजे ॥
काय जीणे मारिले दुष्ट भाजे ॥१४॥
लवलाही लागला ध्रुवा-पाठी ॥
म्हणे बाळा ऐक बा एक गोष्टी ॥
बुझावीतो तुज धरुनि हनूवटी ॥
तुजवीणे दाटला प्राण कंठी ॥१५॥
फीर मागे देईन एक गाव ॥
ध्रुव बोले मागेन जगन्नाथा ॥१६॥
राय बोले देईन एक देश ॥
ध्रुव बोले देईल जगदीश ॥
अर्ध राज्य दीधले आण तूझी ॥
ध्रुव बोले देवासि लाज माझी ॥१७॥
सर्व राज्य दीधले फीर मागे ॥
ध्रुव बोले देइजे रमा-रंगे ॥
स्नेह का रे सांडिला ध्रुवा आजी ॥
काळ-तोंडा जाहलो जगामाजी ॥१८॥
ध्रुव बोले पितयास तात देवा ॥
आता येतो मी लोभ असो द्यावा ॥
हरी-भक्तीचा लोभ कसा देही ॥
अनू-तापे कोंदल्या दिशा दाही ॥१९॥
सर्व भावे उभवूनि दोन बाही ॥
म्हणे देवा भेट दे लवलाही ॥
निरंजनी जावोनि उभा राहे ॥
शोक आ-क्रोशे करूनिया बाहे ॥२०॥
दुरूनीया अष्टाक्ष-सुता पाहे ॥
तया दृष्टी सायुज्य-पदा लाहे ॥
जवळ येऊनी पुसे बाळका जी ॥
सान वय तू कोण ह्या वनामाजी ॥२१॥
पूर्व वृत्तांत सांगे नारदासी ॥
आयकोनी तोषला देव-ऋषी ॥
गुरू-मंत्रावाचोनि देव कैचा ॥
श्रुती सार्या बोलती अशी वाचा ॥२२॥
सकल मंत्रामाझारि मुख्य साचा ॥
मंत्र-राज द्वादशा अक्षरांचा ॥
ध्रुवा कानी सांगूनि मुनी गेला ॥
जपतांची तो ह्रदयि प्रगटला ॥२३॥
चतुर्भूज सायूध घन-नीला ॥
तया दृष्टी सन्मूख उभा ठेला ॥
दिव्य रूपा त्या ध्रुवे देखियेले ॥
नमस्कारोनी मनी पूजियेले ॥२४॥
देव बोले तू काय इच्छितोसी ॥
धराधीश की स्वर्ग-भोग-वासी ॥
ध्रुव बोले मज भक्ति सदा देई ॥
पद न दीजे ऊठवी दुजी आई ॥२५॥
ध्रुव यानी तो वाहुनिया नेला ॥
ध्रुव-स्थानी तो अढळ बसविला ॥
चंद्र सूर्य नक्षत्र ग्रह तारा ॥
सप्त-ऋषिही घालिती ज्यास फेरा ॥२६॥
ध्रुवाख्यान ऐकती गाति वाचे ॥
ध्रुवासनींही अ-ढळ वास त्यांचे ॥
चिंतामणी गावोनि गुण साचे ॥
सौख्य पावोनी हरी-पदी नाचे ॥