मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
दामाजीपंताचें आख्यान

कीर्तन आख्यान - दामाजीपंताचें आख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


पूर्वरंग

श्रीमन्महागणांधिपतये नमः, श्रीसरस्वत्यै नमः, श्रीगुरवे नमः

मंगलाचरण

श्लोक -

स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् ।

वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानाम् ॥

अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानीकसेवितकपोलम् ।

अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे ॥

या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता ।

या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्र्वेतपद्मासना ।

या ब्रह्माच्युतशङकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता ।

सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाडयापहा ॥

मूकं करोति वाचालं पङंगु लङघयते गिरिम् ।

यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

किंवा कित्येक हरिदास खालील पद्धतीनेंहि मंगलाचरण करितात. तें असें---

पद-

जयजयरामकृष्ण हरी, जयजयरामकृष्ण हरी, जयजयरामकृष्ण हरी ॥

गोवर्धनधर गोपालनरत गोकुलसंकटहारी, जयजयरामकृष्ण हरी ॥

नवनीरदसम नवनीतप्रिय नवलविनोदविहारी, जयजयरामकृष्ण हरी

दुर्वासोनुत दुःखविमोचक दुर्जनसंगमहारी, जयजयरामकृष्ण हरी ॥

शरणागत दीनां चरणीं नेंई, करुणादृष्टिं निहारीं, जयजयरामकृष्ण हरी

पद-

बालकृष्णचरणीं लक्ष लागो रे, कीर्तनसंगें रंगांत देह वागो रे ॥

स्वरुपीं मन हें लावितां सौख्य आम्हां, कामक्रोधादिक जाती निजधामा ॥

सारासार वदविता सद्गुरुराय, मंगलधाम जीवन नरहरिपाय ॥

सद्रूप चिन्मय नारायणरुप ध्याऊं, तन्मय होउनी बलवंत प्रेमें गाऊं ॥

भजन-

विठाबाई माउली दया कर, विठाबाई माउली ॥

याप्रमाणें मंगलाचरण झाल्यावर देवाला साष्टांग नमस्कार घालून ध्रुवपद म्हणावें-

मूळ अभंग-

पडतां जड भारी, दासीं आठवावा हरी ॥१॥

मग तो होऊं नेदी शीण, आड घाली सुदर्शन ॥२॥

हरिनामाच्या चिंतनें, बारा वाटा पळती विघ्नें ॥३॥

तुका म्हणे प्राण, करा देवासी अर्पण ॥४॥

कीर्तनारंभीं परम भगवद्भक्त तुकारामबुवा भवदावानलदग्ध अज्ञ आणि दुःखी जीवांना सर्व दुःखें आणि संकटें यांतून मुक्त कसें व्हावें, अशाविषयीं उपदेश करितात----

पडतां जड भारी, दासीं आठवावा हरी ॥

कोणत्याहि जड भारी (संकटांत) मनुष्य पडला असतां त्यानें अनन्यपणें सर्व दुःखें हरण करणार्‍या त्या परमात्म्या प्रभूचेंच स्मरण करावें, म्हणजे तो --

होऊं नेदी शीण, आड घालि सुदशन ॥

हरि आपलें सुदर्शन चक्र आड घालून आपल्या भक्तांस अगदीं शीण होऊं देत नाहीं, सर्व दुःखें व संकटें तत्काळ नाहींशीं करितो. याविषयीं भागवतांत द्वादशस्कंधीं शुकदेव सांगतात----

श्लोक-

अविस्मृतिः कृष्णपदारविंदयोः क्षिणोत्यभद्राणि च शं तनोति ।

सत्त्वस्य शुद्धिं परमात्मभक्तिं ज्ञानं च विज्ञानविरागयुक्तम् ॥

’श्रीकृष्णाच्या चरणकमलांची नित्य स्मृति, ही सर्व अभद्रें म्हणजे संकटें दूर करिते आणि सुखाचा विस्तार करिते. अंतःकरणास शुद्धता देते आणि परमात्मा जो सर्वातर्यामी ईश्वर त्याचे ठायीं भक्ति उत्पन्न करिते; तसेंच अनुभव आणि वैराग्य यांसहित ज्ञान देते. अनन्य शरणागत भक्तांवर भगवान् कृपा करण्यास कधींहि चुकत नाहीं. जे त्या परमेश्वराचीच कास धरुन त्याच्या भजनीं लागतात, त्यांस तो वश होऊन त्यांचे सर्व मनोरथ परिपूर्ण करितो.’ याविषयीं कवि सांगतात---

श्लोक-

नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ ।

मद्भक्ता यत्र गायन्ति, तर तिष्ठामि नारद ॥

’मी वैकुठांत वास करीत नाहीं, योग्यांच्या हृदयांत किंवा सूर्यलोकींहि रहात नाहीं; तर हे नारदा, माझे भक्त जेथें गानपूर्वक एकाग्रतेनें माझें भजन करितात, तेथेंच मी सर्वकाल वास करितों.’ त्याचप्रमाणें भगवान् श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात, ’अर्जुना’----

मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ।

ज्यानें आपलें मन आणि बुद्धि हीं मला अर्पण केलीं आहेत, तोच माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे.’ भक्तांची परमेश्वर किती काळजी वाहतो ह्याचीं उदाहरणें-

ओंवी-

भक्तांची अणुमात्र व्यथा, क्षण एक न साहवे भगवंता ।

प्रल्हादाची अतिदुःखिता, होय निवारिता निजांगें ॥

आपल्या भक्तांची अणुमात्र व्यथा भगवंताला क्षणभरहि सोसवत नाहीं. प्रल्हादावर आलेल्या मोठया संकटांतून त्यानें स्वतः नृसिंहरुप घेऊन त्याला सोडविलें. तसेंच----

ओंवी-

दावाग्नि गिळूनि अंतरीं, गोपाळ राखिले वनांतरीं ।

पांडव जळतां जोहरीं, काढिले बाहेरी विवरद्वारें ॥

करुनि सर्वांगाचा वोढा, नित्य निवारी भक्तांची पीडा ।

जो कां भक्तांचिया भिडा, रणरंगीं फुडां वागवीत रथ ॥

ज्यानें प्रत्यक्ष दावानलाला गिळून वनामध्यें गोपाळांचें रक्षण केलें, तसेंच लाक्षागृहामध्यें पांडव जळत असतां त्यांना विवरद्वारें बाहेर काढलें ! तसेंच ज्या देवानें सर्वांगांच्या योगेंकरुन भक्तांची पीडा दूर केली; भक्तांच्या भिडेस्तव ज्यानें रणांगणावर सर्वांच्या पुढें अर्जुनाचा रथ घेतला; अशी ज्याची कीर्ति आहे, त्याच्यासारखा भक्तांचा कनवाळू दुसरा कोण आहे ? केकावलींत पंत देवाला म्हणतात----

केकावलि-

अनन्यगतिका जना निरखितांचि सोपद्रवा,

तुझेंचि करुणार्णवा, मन धरी उमोप द्रवा ॥

’हे करुणासागरा, तुझ्याशिवाय ज्यांस दुसरा कोणी त्राता नाहीं, अशा पीडित जनांस पाहतांच तुझ्याच मनाला तत्काळ पाझर फुटतो.’ असा परमेश्वर आहे, म्हणून तुकारामबुवा म्हणतात, ’लोक हो, संकटांत तुम्ही पडलां असतां त्याचाच धांवा करा, तो तुमचा रक्षक आहे.’

पडतां जड भारी, दासीं आठवावा हरी ।

मग तो होऊं नेदी शीण, आड घाली सुदर्शन ॥

भक्तावर केवढेंहि मोठें संकट येवो, तो ईश आपल्या सुदर्शन चक्राच्या योगानें त्या संकटाचा परिहार करितो आणि भक्ताचा शीण दूर करितो. म्हणून त्या हरीच्याच नामाचें सर्वदा चिंतन करीत रहावें. हरीच्या नामाचें चिंतन केलें असतां सर्व विघ्नें बारा वाटा पळतात, म्हणजे निःशेष नाहींशीं होतात. याविषयीं पुराणोक्त प्रसिद्ध आहे---

श्लोक-

सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममंगलम् ।

येषां हृदिस्थो भगवान् मंगलायतनं हरिः ॥

ज्यांच्या हृदयांत सर्व मंगलाचें स्थान असा षड्‌गुणैश्वर्यसंपन्न भगवान्‌ हरि आहे, त्यांस सर्वकाळ कोणत्याहि कार्यांत विघ्नादिकांच्या योगानें अमंगल (अकल्याण) होत नाहीं. तस्मात्‌ सर्व अधिकारी जीवांनीं संसारसंबंधीं सर्व संकटें निवारण होण्याकरितां एक प्रभु जो सर्वांतर्यामी कृष्ण परमात्मा त्याचेंच स्मरण करावें. म्हणजे परमात्मा त्यांचीं संकटें दूर करुन त्यांस अनुपम सुख देतो.

अभंग-

युक्ताहार न लगे आणिक साधनें, अल्प नारायणें दाखविलें ॥१॥

कलियुगामाजी करावें कीर्तन, तेणें नारायण देईल भेटी ॥२॥

नलगे लौकिक सांडावा वेव्हार, घ्यावें वनांतर भस्मदंड ॥३॥

तुका म्हणे मज आणिक उपाव, दिसती ते वाव नामेंविण ॥४॥

कलियुगामध्यें एका भक्तिपूर्वक कीर्तनानेंच परमेश्वराची प्राप्ति होते. नियमित आहार किंवा इतर कोणत्याहि साधनांची परमेश्वराच्या प्राप्तीकरितां आवश्यकता नाहीं. इतकें अल्प साधन त्या नारायणानें दाखविलें असतां आपण जर त्याचा उपयोग करुन घेणार नाहीं, तर आमच्यासारखे अधम आम्हीच असें म्हटलें पाहिजे. परमेश्वरप्राप्‍त्यर्थ लौकिक व्यवहार सांडून वनांतराला जाण्याची किंवा अंगाला भस्म फांसण्याची अथवा संन्यासदंड घेण्याची जरुरी नाहीं. तुकाराम महाराज म्हणतात, ’एका नामाव्यतिरिक्त इतर सर्व उपाय व्यर्थ होत, असें मला वाटतें.’ मयूरपंत हरिनामकीर्तनाविषयीं म्हणतात---

आर्या-

मोठा कलिचा गुण हा कीं केशवकीर्तनेंचि सर्व तरे ।

राया, हरिचरिताचें गाणें हें वज्र पाप पर्वत रे ॥

गर्व कृतादि युगांचा हरिला बा, याची सद्गुणें कलिनें ।

कर्पूरचंदनांचा स्वसुवासें जेंवि मृगमदें मलिनें ॥

कलियुगाचा हा मोठा गुण आहे कीं जन केवळ हरिकीर्तनानेंच तरुन जातात. हे राया, हरिचरिताचें गान हें वज्रासारखें असून त्यापुढें पाप पर्वताप्रमाणें होय. ज्याप्रमाणें मलिन कस्तूरीनें कर्पूरचंदनांचा गंध आपल्या सुंदर सुवासानें हरण करावा, त्याचप्रमाणें या नामस्मरणाच्या योगेंकरुन कलियुगानें कृतादियुगांचा गर्व हरण केला आहे. ब्रह्मसंहितेंत सांगितलें आहे कीं---

श्लोक-

रामेति वर्णद्वयमादरेण सदा स्मरन्‌ मुक्तिमुपैति जंतुः ।

कलौ युगे कल्मषमानसानामन्यत्र धर्मे खलु नाधिकारः ॥

’राम’ ह्या दोन अक्षरांचें आदरपूर्वक स्मरण केल्यानें कलियुगामध्यें कोणाहि पापी प्राण्याला मुक्ति मिळते. हा अधिकार त्या हरिस्मरणाशिवाय दुसर्‍या कशालाहि नाहीं. म्हणून तुकारामबुवा म्हणतात----

हरिनामाच्या चिंतनें, बारा वाटा पळती विघ्नें ॥

जन हो, त्या एका हरिनामाच्या चिंतनावांचून दुसरें कांहीं करुं नका. नामचिंतनाच्या योगानें सर्व विघ्नें पळून जातात. एकनाथस्वामी म्हणतात----

अभंग--

कलीमाजि सोपें घेतां रामनाम, नाहीं कांहीं श्रम जप तप ॥१॥

न लगे साधन पंच अग्नि धूम्रपान, नामेंचि पावन युगायुगीं ॥२॥

योग याग यज्ञ नलगे येरझारा, नाममंत्र पुरा जप आधीं ॥३॥

एका जनार्दनीं निश्चयो नामाचा, तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥४॥

या कलियुगामध्यें रामनामासारखें दुसरें साधन नाहीं. याला श्रम, जप, तप यांची कांहीं आवश्यकता नाहीं. पंचाग्निसाधन किंवा धूम्रपानादि कडक उपायांचीहि याला जरुरी नाहीं. योग, याग, यज्ञादि येरझारा नकोत. एक रामनाममंत्र झाला म्हणजे पुरे आहे, एकनाथ महाराज म्हणतात, ’एका नामाच्या ठिकाणीं निश्चय ठेवल्यामुळें तुम्हांला कलिकाळाची भीति बाळगण्याचें कारण नाहीं.’ हाच आशय मनांत आणून तुकारामबुवा म्हणतात---

तुका म्हणे प्राण, करा देवासी अर्पण ॥

बाप हो, तुमचे प्रत्यक्श प्राण देवाला अर्पण करा. तुमची सर्व चिंता वाहणारा तो आहे. समर्थ म्हणतात---

श्लोक-

बहूतां परी संकटें साधनांचीं, व्रतें दान उद्यापनें तीं धनाचीं ।

दिनांचा दयाळू मनीं आठवावा, प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥

’हठयोगादिक साधनें अनेक प्रकारचीं आहेत, परंतु तीं करतांना त्यांत अनेक विघ्नें व संकटें येतात. व्रतें, दानें व उद्यापनें यांना द्रव्य पाहिजे. यासाठीं दीन जनांवर कृपा करणारा श्रीराम आठवावा व नित्यशः प्रातःकाळीं त्याचें स्मरण करीत जावें.’ एकंदरींत मानवांनीं सर्वदा हरिनामाचें स्मरण करीत रहावें, म्हणजे त्यांना कोणत्याहि संकटाची बाधा होणार नाहीं. आतां कोणावर महासंकट पडलें आणि त्यांतून केवळ हरिस्मरणानें त्याची मुक्तता कशी झाली याविषयीं कवि दामाजीपंतांचें आख्यान वर्णन करितात.

उत्तररंग

साकी-

भक्तराज तो ब्राह्मण होता धर्मात्मा दामाजी ।

बेदरभूपतिसेवा करके विठ्ठलपदसों राजी ॥

पद-

वारी संकट हरि दामाजीचें, कौतुक देवाचें ॥ध्रु०॥

यवन बेदरचा अधिकारी, त्याचे दरबारीं ॥

दामाजीपंत कारभारी, बहु खबरदारी ॥

जाणुनि मंगळवेढियाचें, ठाणें दिधलें पूर्ण कृपेचें ॥

दामाजीपंत नांवाचा एक सदाचरणशील देशस्थ ब्राह्मण होता. तो उत्तम प्रकारचा हरिभक्त असून दीनजनांवर त्याचें अत्यंत प्रेम असे. तो बेदरच्या नबाबाची सेवा करुन विठ्ठलपूजनांत सर्वदा निमग्न असे. बेदर येथें जो यवन नवाब होता, त्याचे दरबारांत दामाजीपंत कारभारी होता. तो अत्यंत हुशार असून, त्याचा स्वभावहि शांत व मनमिळाऊ असल्यामुळें त्या यवनानें त्याला मंगळवेढयाचे महत्त्वाचे ठाण्यावर नेमलें. दामाजी स्वधर्मनिष्ठहि तसाच होता. हरिभक्तीच्या योगानेंच तो महासंकटें आलीं असतांहि त्यांतून पार पडला, ही मोठया कौतुकाचि गोष्ट होय, ती ऐका.

ओंवी-

झाला क्षुधेचा कडाड, लोक मरती तडातड ।

तेव्हां दुष्काळाची धाड, पंतांकडे चालली ॥

पृथ्वीवर दुष्काळ पडून लोकांची अन्नान्नदशा झाली. क्षुधेचा कडकडाट होऊन लोक तडातड मरुं लागले. तेव्हां ते सर्व दुष्काळग्रस्त लोक दामाजीपंतांकडे आले.

साकी-

पंढरपुरके द्विजवर सब मिल दामाजीदरवाजे ।

यामिक बोलती खडे रहो तब विचार मनमों पाये ॥

हात जोरकर ठांडे विप्र सब दामाजीदरवाजे ।

धनदौलत नहिं मागत दाता अन्न अनाथकुं दीजे ॥

पंढरपुरामधील सर्व ब्राह्मणवर्ग मिळून दामाजीपंतांच्या दरवाजावर येऊन उभा राहिला. तेव्हां पाहरेकर्‍यांनीं त्यांना ’खडे रहो’ म्हणून थांबविलें. तेव्हां त्या ब्राह्मणांना मोठा विचार पडला. त्यांनीं हात जोडले आणि पंतांच्या दरवाजावर उभे राहून म्हटलें, ’हे दात्या, आम्ही धनदौलत तुम्हांकडे मागत नाहीं. आम्ही अनाथ आहों, आम्हांला खायाला अन्न द्या.’

पद-

पडला दुष्काळ पृथ्वीवरता । ही ईश्वरसत्ता ।

विप्र पंढरीचे म्हणती ताता, दामाजीपंता ॥

धान्य देउनि तारीं आतां, प्राण वांचवीं ब्राह्मणांचे ॥

छंद-

द्वारापुढें कोल्हेहुक, लोक म्हणती भूकभूक ।

पंतांकडे टूकटूक, दीनवदनें पाहती ॥

ईश्वरी सत्तेनें पृथ्वीवर दुष्काळ पडला, तेव्हां पंढरपुरवासी ब्राह्मण मिळून दामाजीपंतांना म्हणाले, ’ताता, आतां धान्य द्या आणि या ब्राह्मणांचे प्राण वांचवा.’ लोकांनीं दामाजीपंतांच्या द्वारापुढें मोठयानें ’भूक भूक’ म्हणून आक्रोश केला आणि त्यांच्या मुखाकडे आशापूर्ण दृष्टीनें दीनवदन करुन पाहूं लागले.

साकी-

इतना सुनकर दामाजी तब विकल होत अति मनमों ।

हात जोडकर कहे सामि अब चलियो मेरे गृहमों ॥

हें ऐकून दामाजीपंत मनामध्यें अत्यंत व्याकुळ झाले आणि हात जोडून म्हणाले, ’महाराज, आतां तुम्ही सर्व माझ्या घरीं चला.’

ओंवी-

बोले सुंदरा अहो पती, माझे अलंकार ब्राह्मणांप्रती ।

द्यावे परी प्रभुधान्याप्रती, शिवूं नये सर्वथा ॥

हें यवनासी कळतां जाण, तत्काळ घेईल तुमचे प्राण ।

संकटीं तुम्हां रक्षील कोण, म्हणुनी चरणां विनवीतसें ॥

त्या वेळीं दामाजींची स्त्री त्यांना म्हणाली, ’प्राणनाथ, माझे अलंकार घ्या आणि या ब्राह्मणांना द्या; परंतु यवन बादशहानें आपल्या ताब्यांत ठेवलेल्या धान्याला मात्र स्पर्श करुं नका. आपण धान्यास स्पर्श केल्याचें त्या यवनास कळतांक्षणीं तो आपले प्राण घेण्यास कमी करणार नाहीं. संकटकालीं आपलें रक्षण करील असा कोण बरें आहे ? म्हणून मी आपल्या पायांपाशीं एवढी विनंति करीत आहें. ’

साकी-

हाथन पांव बधावे नहि तो तीखे सूल धरावे ।

उडा दियो तोफनके मुखसें और बात नहिं भावे ॥

’प्राणनाथ, हातापायांत बेडया पडतील, तीक्ष्ण सुळावर चढवतील, एखाद्या वेळीं तोफेच्याहि तोंडीं देतील, काय करतील आणि काय नाहीं, हें सांगणेंहि कठीण आहे.’

ओंवी-

पांच सहस्त्र ब्राह्मण, धान्यें वांचतील त्यांचे प्राण ।

हें न होतां जाण, काय वांचुनी जगीं या ॥

छंद-

तुम्ही आम्ही वेचूं तनू, सकळ होतील जतनू ।

विठूचरणीं वेतनू, प्राणां उदक सोडिलें ॥

दामाजीपंत म्हणाले, ’प्रिये, हे पांच हजार ब्राह्मण भुकेनें तडफडत आहेत, त्यांस धान्य दिल्यानें त्यांचे प्राण वांचतीलं. इतकी गोष्ट आमच्या हातून होणार नाहीं, तर जगांत वांचून तरी आमचा काय उपयोग आहे ? तुमचे आमचे प्राण जातील; परंतु, या सर्व ब्राह्मणांचें रक्षण होईल. आमचें वेतन ह्या विठ्ठलाचे चरणांवरच आहे, असें समजूनच मीं या प्राणांवर उदक सोडलें आहे.’

साकी -

हात जीरकर नम्र वचनसें भयो भगतजी ठारा ।

पूर्ण करोजी साईं इच्छा लुटिये धान्यकुठारा ।

ब्राह्मणांनीं हात जोडून अत्यंत नम्रपणें प्रार्थना केली असतां त्या परम भक्त दामाजीचें अंतःकरण व्यथित झालें आणि ते म्हणाले, ’महाराज, हें धान्याचें कोठार लुटा आणि आपली इच्छा तृप्त करुन घ्या.’

छंद-

गोण्या गाडया अपार, धान्य लुटिताती फार ।

सर्व करिती जयजयकार, पुंडलीक वरदा ॥

त्या ब्राह्मणांनीं कोठारांत असलेल्या धान्याच्या अनंतावधि गोण्या गाडयांवर घालून लुटून नेल्या व तोंडानें ’पुंडलीक वरदा’ असा मोठयानें जयजयकार केला.

अभंग-

तेथें मुजुमदार कानडा ब्राह्मण, फिर्याद लिहून पाठविली ॥

अशा रीतीनें दामाजीपंतांनीं धान्यकोठार लुटण्याची परवानगी त्या ब्राह्मणांस देतांच मुजुमदार म्हणून तेथें एक कानडी ब्राह्मण होता, त्याच्यानें तें पाहवलें नाहीं. त्यानें तत्काळ फिर्याद लिहून बेदरच्या यवन बादशाहाकडे पाठविली. त्यांत असें लिहिलें होतें कीं--

छंद-

भया पंत जबरदस्त, सब दुनियामों मस्त ।

सबही धान्य किया फस्त, विप्रहस्त लुटाया ॥

’हा दामाजीपंत फार जबरदस्त झाला आहे, सर्व दुनियेंत हा आपणाला बलिष्ठ समजून वाटेल तसें वागत असतो. ह्यानें सर्व धान्यकोठारें ब्राह्मणांकडून लुटवून फस्त केलीं आहेत. ’ अशी त्या मुजुमदारानें बेदरला फिर्याद नेतांच बादशाहानें हुकूम केला कीं--

साकी-

ले आवो वह दामाजीकूं हातिन पाव बधावो ।

उडा देव तोफके मुखसे माथे सूल धरावो ॥

’ह्या दामाजीला हात पाय बांधून इकडे बेदरला घेऊन या, त्याला तोफेच्या तोंडीं द्या किंवा त्याच्या मस्तकावर शूल द्या.’

याप्रमाणें बादशाहाची आज्ञा होतांच जमादारसाहेब चार पठाण लोकांस बरोबर घेऊन तत्काळ मंगळवेढयास येऊन पोंचले. ते येऊन पाहतात तों दामाजीपंतांच्या गृहांत ब्राह्मणमंडळी भोजनास बसली आहे व दामाजीपंत त्यांस आग्रहपूर्वक वाढीत आहेत असें त्यांच्या दृष्टीस पडलें. इतक्यांत पंतांची स्त्री कांहीं कामाकरितां बाहेर आली तों दरवाजावर चार पांच मुसलमान शिपाई तिनें पाहिले. तेव्हां पाहरेकर्‍यानें तिला सांगितलें, ’आईसाहेब, बेदरहून चार पांच शिपाई बादशाहाचें हुकूमपत्र घेऊन आले आहेत व यजमानसाहेबांस बाहेर बोलवीत आहेत. ’ तें ऐकून ती साध्वी भयभीत झाली; तरी धैर्य धरुन तिनें या शिपायांकडे चौकशी केली, तेव्हां ते म्हणाले, ’हम बेदरसे आये हैं, दामाजीपंत किदर है ? बादशाहने उनकूं बेदरकू बुलाया है. अबी देर मत करना. उनकूं लेकर आवो ऐसा हम लोककू हुकूम है.’ बाई म्हणाली, ’सुभेदारसाहेब भोजनास बसले आहेत, भोजन होतांच ते येतील. तुम्हीहि उन्हांतून आल्यामुळें अगदीं थकून गेलां आहां, तरी थोडेंसें अन्न खा.’ असें म्हणून तिनें तत्काल पानें वाढून आणविलीं. पंतांच्या स्त्रीचें तें गोड व प्रेमळ भाषण ऐकतांच त्या शिपायांस आनंद झाला. गोड भाषणाच्या योगानें शत्रुहि मित्र होत असतात. तशाच त्या माउलीच्या हातचें तें सुग्रास अन्न पोटभर मिळतांच ते प्रसन्न चित्तानें म्हणाले, ’बाईसाब, आप तो हमारे मातासमान हो, और आपने यजमान दामाजीपंत हमारे पिता है. यह लिफाफा सुभेदारसाहेबकू दे देना, और हमकूं जलदी मिला, ये बात उनसे कहना !’

ओंवी-

कांता बोले दामाजीसी, स्वामी ऐका वचनासी ।

मारुनियां जीवें मजसी, बेदरपुरा जावें ॥

यवन नव्हे तो जाणा काळ, दूत पाठविले तत्काळ ।

तुम्हां नेऊन उतावेळ, हरील प्राणां ॥

तुमचे संगें ज सुख झालें, तें मज आतां स्वप्नीं न मिळे ।

जीव माझा तळमळे, करुं गत कैशी ॥

यास्तव विनवितें पायांसी, शरण जावें विठ्ठलासी ।

तोचि वारील संकटासी, निश्चयें जाणा ॥

आतां स्वामी तुम्हांवांचून, सदन दिसतें घोर वन ।

यालागीं मजला मारुन, बेदरासी तुम्हीं जावें ॥

दामाजींची स्त्री त्यांना म्हणाली, ’हे नाथ, माझें बोलणें ऐका ! आधीं तुम्हीं माझा जीव घ्यावा आणि मग बेदरपुराला जावें. महाराज, तो यवन नव्हे, तर प्रत्यक्ष काळ आहे. त्यानें ताबडतोब जे दूत पाठविले आहेत त्यांजकडून तो तुम्हांला बेदराला नेऊन तुमचे प्राण तत्काळ हरण करील ! तुमच्या समागमांत जें सुख झालें, तें यापुढें स्वप्नांतदेखील कधीं मला मिळणार नाहीं. माझा जीव सारखा तळमळत आहे. मी आतां करुं तरी काय ? मी आपल्या पायांकडे एवढीच विनंति करितें कीं, त्या विठ्ठलालाच आपण शरण जावें, तोच आपल्या संकटाचें निवारण करील, हें निश्चयपूर्वक समजा ! हे नाथ, आतां तुम्हांवांचून हें घर घोर अरण्यासारखें मला भासेल ! म्हणून सांगतें कीं आधीं मला मारावें आणि मग बेदराला जावें !

आर्या -

विनवी पतिव्रता ती मृदु मंजुल रम्यनीतिवचनांहीं ।

त्या विठ्ठलासि ध्याउनि जातां भय किमपि तें तुम्हां नाहीं ॥

दामाजींची स्त्री परम पतिव्रता असून पतीप्रमाणें तीहि अत्यंत देवनिष्ठ होती. तिनें त्या संकटकालीं भर्त्याला मृदु, मंजुळ आणि गोड अशा नीतिवचनांनीं विनविलें कीं, ’नाथ हो, त्या श्रीविठ्ठलाचें ध्यान करुन तुम्हीं बेदरच्या बादशाहाकडे खुशाल जावें. तुम्हांला भय बाळगण्याचें कारण नाहीं. असें पत्‍नीचें भाषण ऐकून दामाजीपंत---

अभंग--

सवें दूत घेऊनि आला राउळासी, नमन देवासी तेणें केलें ॥

बरोबर दूत घेऊन देवळांत आले आणि त्यांनीं भक्तिपूर्वक देवाला नमन केलें.

आर्या-

जाउनि देवालयिं तो ठेवुनि चरणांवरी भुजा भाळ ।

यवनापराधकृत मी सदया निज बिरुद आजि संभाळ ॥

देवळांत गेल्यावर दामाजीपंतांनीं आपले हात आणि मस्तक देवाच्या चरणांवर ठेवून म्हटलें कीं, ’देवा, मीं यवनाचा अपराध केला आहे. तो कशासाठीं केला, हें तूं जाणतच आहेस. देवा, तूं सदय आहेस, आज तूं आपलें ब्रीद संभाळ, एवढीच माझी विनंति आहे.’

पद-

स्थिरचरव्यापका ब्रह्मानंदा, संकटकाळीं रक्षिसी दासां सदा ॥ध्रु०॥

तुजविण कवणा शरण मी जाऊं रे, दुजा देव तुजविणें कोण पाहूं रे ॥१॥

ऐसा आशय सांगुनी अंतरींचा, मार्ग धरी वंदुनी बेदरींचा ॥२॥

’हे स्थिरचरव्यापका ब्रह्मानंदा, आम्हां दासजनांला संकटकालीं तूंच रक्षणकर्ता आहेस. तुझ्यावांचून दुसर्‍या कोणाला मीं शरण जावें ? तुझ्यावांचून दुसरा कोणता देव माझें रक्षण करण्यास समर्थ आहे ?’ असा आपल्या मनांतील आशय सांगून दामाजीपंतांनीं बेदराचा मार्ग धरिला. जातांना त्यांनीं श्रीहरीची प्रार्थना केली कीं---

अभंग--

आतां येतों आम्ही लोभ असों द्यावा, पुन्हां मी केशवा न यें येथें ।

’केशवा, मी आतां येतों, आपला लोभ मजवर असावा. हे देवा, पुन्हां माझें येथें येणें होणार नाहीं.’ असें म्हणून दामाजीपंत पुढें निघाले. वाटेंत त्या पठाण शिपायांनीं दामाजीपंतांना बिलकुल त्रास दिला नाहीं. ’अन्नदानासारखें दुसरें दान नाहीं’ असें म्हणतात, तें खोटें नाहीं. त्या मुसलमानांना पंतांच्या घरच्या सुग्रास अन्नानें इतके मिंधें केलें होतें कीं, वाटेंत कांहीं कमी पडूं न देतां दामाजीपंतांची प्रत्येक इच्छा त्यांनीं पुरविली. मार्गामध्यें पंढरीचा देखावा दृष्टीपुढें येतांच पंतांचे अंतःकरणास गहिंवर आला. मंगळवेढयाहून गोपाळपुर्‍यास येतांच चंद्रभागा दृष्टीस पडली. पुंडलीकाच्या देवळाचा कळस पाहतांक्षणीं दामाजींच्या नयनांतून अश्रुबिंदु पडले. ते पाहून यवन शिपाई म्हणाले, ’महाराज, आपकी मर्जी हो, तो विठ्ठलजीके दर्शन लेकर आवो, हमारी मनाई नहीं.’

पद-

मार्गीं पंढरीचा झळके कळस, गहिंवरला दास ।

म्हणे हुजर्‍यांस, आजिचा दिवस, करुं पंढरीवास ॥

एकदां विठ्ठल पाहिन नयनीं, जें होइल तें हो या देहाचें ।

वारी संकट हरि दामाजीचें, कौतुक देवाचें ॥

तें ऐकून दामाजीपंतांस आनंद झाला आणि ते म्हणाले, ’आजचा दिवस या पंढरपुरांत रहावें आणि एकदां त्या विठ्ठलाएं पोटभर दर्शन घ्यावें, मग या देहाचें जें होणार असेल, तें होवो.’ हें दामाजीपंतांचें म्हणणें त्या शिपायांनीं मान्य केलें.

कडवें-

हृदयीं गुज कळलें श्रीरंगाला, सांगे रुक्मिणीला,

नेती धरुनी ते दामाजीला, ही लज्जा मजला, ॥

हिशोब घेउनि जातों वहिला,

नग हे द्यावे अवघे तुमचे ॥वारी०॥

ही गुप्त गोष्ट प्रभु श्रीरंगाला कळतांच तो रुक्मिणीला म्हणाला, ’हे पहा यवनदूत दामाजीला कैद करुन नेत आहेत. त्याची मला लज्जा वाटते. मी आतांच त्याचा हिशोब घेऊन बेदरला जातों. तुमच्या अंगावरील सर्व दागिने द्या पाहूं !’

छंद-

सवाईनें अधिल मोल, पंतअक्षराचा डौल,

कृत्रिमाचें पत्र फोल, लिहुनियां घेतलें ॥

दामाजीपंतांच्या देण्याच्या सवाईनें द्रव्य बरोबर घेतलें आणि पंतांच्या अक्षरासारखें लिहून पत्रहि घेतलें. त्या दिवशीं श्रीकृष्णाची सचिंत मूर्ति अवलोकन करुन रुक्मिणी त्याला म्हणाली, ’महाराज, आज आपला चेहरा एवढा संचित दिसत आहे त्याचें काय बरें कारण ? आपल्या मनांत काय विचार चालले आहेत, तें कांहींच समजत नसल्यामुळें माझेंहि मन अगदीं उदास झालें आहे. तर याचें कारण काय, तें गुप्त नसेल तर सांगावें. ’ त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, ’रुक्मिणि, माझ्या भक्तांवरील संकट तें मजवरील संकटच होय, असें मी समजतों. फार काय सांगूं ?’

आर्या-

ऐकें रुक्मिणि भक्तां संकट पडतांच जीव कळवळतो ।

तुज काय फार सांगूं ? जिवनाविण जेंवि मीन तळमळतो ॥

हे रुक्मिणि, ऐक. माझ्या भक्तावर संकट येतांच माझ्या जीवाला अत्यंत कळवळा वाटतो. तुला विशेष तें काय सांगूं ? उदकावांचून मासा जसा तळमळतो, तशी माझी स्थिति होऊन गेली आहे.तुला ठाऊकच आहे कीं मंगळवेढयाचा सुभेदार दामाजीपंत हा माझा मोठा भक्त आहे दुष्काळांत पीडलेल्या अनेक लोकांस अन्नदान करुन त्यानें त्यांचे प्राण वांचविले. याबद्दल बक्षीस म्हणून त्यास तोफेच्या तोंडीं देण्याचें ठरवून बादशाहानें तसे हुकूम आपल्या सेवकांस सोडले आहेत, आणि त्याप्रमाणें यवनदूत त्याला घेऊन बेदरला जात आहेत. त्याला संकटमुक्त करण्याला मला गेलेंच पाहिजे.

अभंग-

होउनी अंत्यज, करीन दामाजीचें काज ॥

प्रसंग आल्यास माझ्या भक्तांसाठीं मी महारहि होईन आणि त्यांचें काम करीन.

कडवें-

अनंत ब्रह्मांडें ज्याच्या पोटीं, सांवळा जगजेठी ।

काळी घोंगडी काळी काठी, काळा दोरा कंठीं ॥

बोली महाराची थेट मराठी, गांडिस लंगोटी ।

पायीं वाहणा मोठा शहाणा, पतीतपावन नाम जयाचें ॥वारी०॥

ज्याच्या पोटांत अनंत ब्रह्मांडें वास करितात, ज्याचें पतितपावन नाम सर्वत्र गाजत आहे, तो सांवळा जगजेठी काळी घोंगडी व काळी काठी घेऊन आणि कंठांत काळा दोरा बांधून बेदरास निघाला. त्याची बोली थेट महारासारखी मराठी होती; कुल्याला त्यानें लंगोटी लावली होती. पायांत त्यानें वाहणा घातल्या होत्या. त्याजकडे पाहतांच तो मोठा शाहाणा असल्याचें दिसून येत होतें. त्याचें नांव म्हणाल तर ’पतितपावन होतें.’ हा नीच पेहराव त्या प्रभूनें कोणाकरितां म्हणून धारण केला, तर----

साकी-

त्रिभुवनके पति भक्तनखातर नीच भेख है लीनो ।

हीन दीनसे दोनो करसे प्रथम जोहरा कीनो ॥

त्या त्रिभुवनपतीनें हा असला नीच वेष केवळ आपल्या अनन्य भक्ताकरितां घेतला होता. त्या यवनाधिपतीला त्यानें हीन-दीनपणें दोनी हात जोडून प्रथम वंदन केलें.

कडवें-

प्रथम यवनासी करुनी जोहार, मी विठया महार,

मंगळवेढयाचा बडिवार, ऐकावी खबर,

हिशेब घेउनि मायबापा, उत्तर द्यावें लखोटयाचें ॥वारी०॥

प्रथमतः त्या बादशहाला जोहार करुन श्रीरंग म्हणाला, ’मी विठया महार आहें. मंगळवेढयाची भरभराट किती म्हणून सांगूं ? मी तुम्हांला तेथील खबर सांगतों. हे मायबाप, दामाजीपंतांकडून हिशेब घेऊन मी आलों आहें. त्याच्या पत्राचें उत्तर द्यावें.’

ओंवी-

स्वमुखें राव देत उत्तर, कोण्या गांवींचा तूं महार ।

येरु म्हणे मायबापा जोहार, मंगळवेढयाचा मी असें ॥

म्हणे दामाजीपंत केवळ, विश्वासाचा मुकुटमणि ॥

पहा कानडा कपटी चावटी, लोक म्हणती तो दुष्टदृष्टी ।

यालागीं त्यासी देउनी सोडचिठी, दूर करावें सवेंच ॥

बादशाहा म्हणाला, ’अरे विठया, तूं कोणत्या गांवचा महार आहेस ?’ त्यावर विठू बोलला, ’मायबाप, तुम्हांला जोहार करितों; मी मंगळवेढयाचा आहें. नंतर पत्र फोडून बादशाहा पाहतो तों पैशाचा सर्व हिशोब बरोबर आहे, असें त्यास आढळून आलें आणि दामाजीपंतांविषयीं आपण विनाकरण संशय घेतला, म्हणून त्याचें मन त्याला खाऊं लागलें. त्याचें मुख प्रसन्न झालें आणि तो मनांत म्हणाला, ’दामाजीपंत हा मूर्तिमंत विश्वासच होय. तो कानडा मोठा कपटी आणि चावट असून लोक तो दुष्टदुष्टीचा आहे, असें म्हणतात. म्हणून त्याला आतां सोडचिठी देऊन दूर करितों.’

ओंवी-

पावतीपत्र लिहून त्वरित, श्रीहरीच्या करीं देत ।

म्हणे जाय पावलें समस्त, संशयातें सोडुनि ॥

बादशाहानें ताबडतोब पावती लिहून श्रीहरीच्या हातांत दिली आणि म्हटलें, ’अरे विठू, तूं आतां निर्धास्त जा ! दामाजीपंताकडील सर्व हिशोब पोंचला आहे.’

कडवें-

म्हणे मी पंतांचा बहु कामाचा, विश्वासू घरचा,

बंदा शिरमिंधा आहें त्यांचा, जन्मोजन्मींचा ॥

नाजूक जरुर अडलें भिडलें, कामचि तेथें मज नफराचें ॥वारी०॥

श्रीहरि म्हणाले, ’ह्या दामाजीपंतांच्या घरचा मी कामकरी आहें, तसाच मी त्यांचा अत्यंत विश्वासू व जन्मोजन्मींचा मिंधा नोकर आहें. कोणतेंहि जरुरीचें नाजूक काम ठेपलें असतां तें ह्याच दासाच्या हातून होत असतें.’ तें भाषण ऐकून बादशाहा म्हणाला---

पद-

धेड तेरी सुरतकी छब न्यारी ॥धेड०॥

वैसो धेड कबू नहि देखे, इतनी उमर हमारी ॥धेड०॥१॥

मेरे मनमों येहि खुदा है त्रिभुवनकी अखत्यारी ॥

दामाजीको बडो भाग है, चाकर कुंजविहारी ॥धेड०॥२॥

’अरे महारा, हें तुझें स्वरुप पाहून मला मोठें आश्चर्य वाटत आहे. माझ्या वयाला इतकी वर्षें होऊन गेलीं, परंतु असा महार माझ्या नजरेला कधीं पडला नाहीं. माझ्या मनाला असें वाटतें कीं त्रिभुवनपति खुदा तोच हा आहे. दामाजीपंताचें भाग्य खरोखरच मोठें आहे कीं प्रत्यक्ष कुंजविहारी श्रीरंग त्याचा घरचा चाकर आहे.’ असें बादशाहा बोलत आहे, तों विठू महार तेथून निघून गेला.

साकी-

निकले धुंडत दूत भूपके बन बन धोहि पुकारे ।

कांहीं नजर न आवे तबहि रोवत यह जन सारे ॥

बादशाहाला विठूचा वियोग सहन होईना. त्यानें विठूच्या शोधाकरितां सर्वत्र दूत पाठविले. ते वनावनामध्यें ’विठू विठू’ म्हणून शोध करीत फिरले, परंतु त्यांच्या नजरेला कांहीं विठू पडला नाहीं. तेव्हां ते सारे दूत तेथें रडत बसले.

ओंवी-

गहिंवरुनि बोले साचार, जो दाखवी विठया महार ।

त्यास देईन राज्यभार, सर्व संपत्तीसमवेत ॥

बादशाहाला गहिंवर आला आणि तो म्हणाला, ’जो कोणी मला विठया महाराला दाखवील, त्याला माझ्या सर्व संपत्तीसह माझें सगळें राज्य मी देईन.’ त्यावर दरबारांतलीं वृद्ध माणसें म्हणालीं---

ओंवी-

वृद्ध म्हणती भूपासी, शरण जावें दामाजीसी ।

तोच दाखवील विठया महारासी, निश्चय हाचि जाणावा ॥

’महाराज, आतां त्या दामाजीलाच शरण जावें. विठया महाराला तोच दाखवील, हें निश्चयपूर्वक समजा.’

अभंग-

दामाजीपंतास बेदरास नेलें, राजा म्हणे झालें कवतुक ॥१॥

काल गेला विठया रसीद भरुनी, हिशोब घेउनी जाब दिला ॥२॥

कैंचा विठया कोठें पाठविला कधीं, काढूनियां कधीं जाब दिला ॥३॥

पाहतांचि जाब हृदय फुटलें, आश्चर्य वाटलें मनामध्यें ॥४॥

इकडे बादशाहाच्या आज्ञेप्रमाणें दामाजीपंताला बेदराला आ णलें तेव्हां बादशहा त्याला म्हणाला, ’दामाजी, काल मोठें कौतुक घडलें, तें ऐक ! विठू महार रसीद भरुन गेला. त्यानें सर्व हिशेब पुरा दिल्यावर त्याला आम्हीं पावती दिली.’ हें बादशहाचें भाषण ऐकल्यावर दामाजीपंत म्हणाले, ’काय चमत्कार ! कोण विठू, कोठें आणि कधीं कोणीं पाठविला आणि जाब तरी कधीं दिला ?’ हिशोबाचे कागद पाहतांच दामाजीचे हृदयाला कळवळा आला आणि मनामध्यें थोर आश्चर्य वाटलें. मग बादशाहा दामाजीला म्हणाला---

साकी-

सुन दामाजी नही सुझत कछु जुगत विचारहि धंदा ।

विठू धेड है कहां बतावो मैं हूं तुमका बंदा ॥

’दामाजी, ऐक. मला कांहीं युक्ति, विचार किंवा धंदा सुचत नाहीं. विठू महार कुठें आहे, तो आधीं मला दाखीव ! मी तुझा दास आहें ! त्याला आधीं मला दाखीव !’

अभंग-

नव्हे नव्हे तो महार, देवी रखुमाईचा वर ॥१॥

ज्याचा नकळे वेदां पार, झाला मजसाठीं महार ॥२॥

कैसा जन्मलों चांडाल, शिणविला तो दयाळ ॥३॥

काय वांचुनियां आतां, दुःख दिलें पंढरीनाथा ॥४॥

किती वर्णूं पुरुषोत्तमा, जनी म्हणे झाली सीमा ॥५॥

दामाजी म्हणाला, ’महाराज, तो महार नव्हे, तर तो रुक्मिणीचा पति भगवान्‌ श्रीकृष्ण होय. ज्याचा वेदालांहि थांग लागत नाहीं, त्यानें मजसाठीं महाराचें रुप घेतलें ! हाय हाय ! त्या दयाळू परमेश्वराला शिणविलें, असा मी चांडाळ जन्माला तरी कशाला आलों ! मी त्या पंढरीनाथाला दुःख दिलें; आतां वांचून तरी काय उपयोग ? ’ जनाबाई म्हणते, ’ त्या पुरुषोत्तमाला किती म्हणून वर्णावें ? वर्णनाची आतां सीमा झाली !’

साकी-

सब तरुवर कूं पूछत है कहुं देखा अंत्यज बनमों ।

निशिदिनिं पल चैन नही बहु बरखत जल चिर नयनमों ॥

इकडे तो बादशाहा सर्व वृक्षांना विचारीत सुटला, ’तुम्ही या रानांत कोणा महाराला पाहिलें काय ?’ त्याला रात्रंदिवस एक पळहि चैन पडेना; त्याचे डोळ्यांतून सारखे दुःखाश्रु वाहूं लागले. तो दामाजीला म्हणाला, ’वह धेड बताता है क्या नहीं ? तो यहीं मैं अपना शिर फोड देऊं.’ त्यावर पंत म्हणाले, ’ठीक आहे. आपण त्या देवाला शरण जाऊं, म्हणजे तो देवच विठू महाराचें दर्शन करवील.’ मग----

अभंग--

राउळांत जातां सन्मुख देखिला, विठूनें धरिला हृदयकमळीं ।

देवळांत जातांच विठ्ठलानें आपल्या सन्मुख दामाजीला पाहिलें आणि त्याला आपल्या हृदयकमळीं धरिलें.

कडवें-

देवें दामाजी हृदयीं धरिला, समजावी त्याला ।

बा रे श्रम बहुत झाले तुजला, श्रुत नाहीं मजला ॥

अघटित करणी करुनि लपवी, कार्य साधूनि हरि भक्ताचें ॥वारी०॥

दामाजीपंतांनीं हात जोडून प्रार्थना केली कीं,

साकी-

मै पतीतका राजा तुमहि पावनके शिरताजा ।

गणिका अजामिळ तारे कीर्तनीं वाजत नौबतबाजा ॥

’विठ्ठला, मी पतितांचा राजा आहें आणि तूं पावनांचें शिरोभूषण आहेस. गणिका, अजामिळ यांसारख्या पापी जनांनाहि तूं तारलें आहेस, असा कीर्तनांत तुझ्या नांवाचा जयघोष होत असतो.’

चौपाई -

मेरे पापिनका काज, आप आये महाराज ।

मैं हूं दुष्ट दगलबाज, मेरी लाज राखिये ॥

’मज पाप्याकरितां, हे महाराजा , तूं धांवून आलास ! मी तर दुष्ट दगलबाज आहें. माझी लाज राखणारा तूंच एकटा आहेस ! माझी लाज राखणारा तूंच एकटा आहेस ! माझी एक विनंति आपणांकडे आहे. ती---

 

ओंवी-

आपलासा गमे यवन, कैसा येऊं त्यासी सोडून ।

जन्मापासून खादलें अन्न, त्याचें उणें न साहे ॥

कैसा तरी अन्नदाता, लोक म्हणती तत्त्वतां ।

यालागीं यासी उद्धरुनि पंढरीनाथा, लाज राखिली पाहिजे ॥

यापुढें देवा, तुझ्या पायांशिवाय दुसर्‍या कोणाची नोकरी करणार नाहीं, तसेंच हा यवन बादशाहा मला स्वतःसारखा वाटत आहे, तरी त्याला सोडून मी कसा येऊं ? जन्मापासून मी त्याच्या घरचें अन्न खाल्लें आहे. त्याचे उपकार फेडल्यावांचून मी येऊं शकत नाहीं ! कसें झालें तरी तो माझा अन्नदाता आहे, असेंच सर्व लोक म्हणणार. म्हणून हे पंढरीनाथा, याचाहि उद्धार करुन माझी लाज राखावी !’ अशी प्रार्थना करितांच----

काळी घोंगडी, काळी काठी, काळा दोरा कंठीं ।

बोली महाराची थेट मराठी, गांडीस लंगोटी ॥

पायीं वाहणा, मोठा शाहणा ।

पतीतपावन नाम जयाचें ॥वारी०॥

असें रुप त्या दामाजीला व बादशाहाला दिसलें.

 

कडवें-

यवन पंताच्या योगें तरला, तो मुक्तिस गेला ।

होता पुण्याचा दोर पहिला, तो कामा आला ॥

यापरि चरित्र दामाजीचें, श्रवण करितां भवभय कैंचें ।

वारी संकट हरि दामाजीचें, कौतुक देवाचें ॥

तो यवन भूपति दामाजीच्या योगानें तरुन मुक्तीला गेला. पूर्वजन्मीचें पुण्य होतें, तें या लोकीं त्याच्या उपयोगीं आलें. असें हें दामाजीचें चरित्र आहे. याचें श्रवण केल्यानें प्राण्याला भवभय कोठून होणार ? श्रीहरीनें दामाजीचें संकट हरिलें, यांत देवाचें भक्तांविषयीं प्रेम दिसून येतें आणि मोठें कौतुक वाटतें. असो. याप्रमाणें दामाजीपंत महासंकटांत पडले असतां त्यांनीं दृढनिश्चयपूर्वक प्रभूचें स्मरण केलें. त्यामुळें प्रभूनें धांवत येऊन त्यांना संकटमुक्त केलें. तस्मात्‌ स्मरण करणारांचें संकट प्रभु दूर करितोच, असा आशय मनांत आणून तुकारामबुवा म्हणतात----

 

पडतां जडभारी, दासीं आठवावा हरी ॥इत्यादि॥

हेंचि दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

नलगे मुक्ति धनसंपदा, संतसग दे गा सदा ॥३॥

तुका म्हणे गर्भवासीं, सुखें घालावें आम्हांसी ॥४॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्धयात्मना वानुसृतस्वभावात् ।

करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पये तत्‌ ॥

अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥

भजन -

हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥

पुंडलीकवरदा हरिविठ्ठल, पार्वतीपते हरहर महादेव,

सीताकांतस्मरण जयजय राम, श्रीगुरुदेव दत्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP