जन्मभूमीचे गीत

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


जन्मभूमीचे गीत
जन्मभूमीचे गीत
प्रसिद्ध पंडिता रमाबाई यांच्या विनंतीवरुन हे गीत मुंबईस "शारदासदन" स्थापन समारंभाच्या वेळी (१८९८ साली) गाण्यासाठी आयत्या वेळी तयार करुन दिले.
ना.वा.मो.
आहा मम देश भूमि ।
प्रिय पितृ जन्म भूमि ।
तुझें गीत गाईन मी ।
आवडीनें माते ॥१॥
नभस्पृष्ट गिरिकूटें ।
रम्य महा नदी तटें ।
आम्हां तव शोभा वाटे ।
अनुपम माते ॥२॥
तव वनें उपवनें ।
सदा सुगंधि सुमने ।
सुस्वरित पक्षी गानें ।
उल्हासती माते ॥३॥
मधुर संस्कृत वाणी ।
काव्य रत्नें कविगणीं ।
मंडित पाहूनि मनीं ।
तोष होय माते ॥४॥
ऋषि ज्ञान विलसित ।
धर्मवृक्ष कुसुमित ।
नाना दिव्य फलयुक्त ।
शोभताती माते ॥५॥
सुलभा गार्गी मैत्रेयी ।
भैमी सावित्री वैदेही ।
धन्या तारा मिराबाई ।
कन्या तव माते ॥६॥
धीरोदार महाशूर ।
तव पुत्र धुरंदर ।
राम भीष्म पार्थवीर ।
वीरसू तूं माते ॥७॥
काळचक्रें तयांप्रति ।
लागे भोगणें विपत्ति ।
तैशीच ही तव स्थिती ।
कांही काळ माते ॥८॥
तुझ्या ऐश्वर्याची कीर्ति ।
ऐकूनि जे वाखाणिती ।
तेच आज कठोरोक्ति ।
बोलती तुज माते ॥९॥
भाग्यसूर्य मावळला ।
येईलचि उदयाला ।
ऐसा निश्चय चित्ताला ।
धीर देतो माते ॥१०॥
आम्हीं तुझीं बाळें सर्व ।
हरुं तव शत्रुगर्व ।
ऐसें येऊ महापर्व ।
प्रार्थू देवा माते ॥११॥
तुझ्या सेवेलागीं जाण ।
अर्पूनियां धन प्राण ।
सिद्ध असों थोर सान ।
सकळहीं माते ॥१२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-06T19:23:26.7500000