प्रल्हाद चरित्र

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


प्रल्हाद चरित्र
अभंग -- तुंम्ही आम्हीं करु देवाचा निश्वय ॥ जया नाही लय तोची देव ॥१॥
देव हा अमर नित्य निरंतर ॥ व्यापूनि अंतर देव राहे ॥२॥
देव राहे सदा सबाह्य अंतरी ॥ जिवा क्षणभरी विसंबेना ॥३॥
विसंबेना परी जिवासी नेणावे ॥ म्हणोनिया धावे नाना मती ॥४॥
नानामती देव पाहता दिसेना ॥ जंव ते वसेना ज्ञान देही ॥५॥
ज्ञान देहीं वसे । तया देव अंतरी प्रकाशे ॥६॥
ज्ञानदृष्टी पावीजे अनंता । हा शब्द तत्वतां दास म्हणे ॥७॥
श्लोक -- चतुर्विधा भजंते मां जना: सुकृतिनोऽर्जुन ॥ आर्तो जिज्ञासुरर्थाथीं ज्ञानी च भरतर्षभ ॥१॥
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ॥ प्रियोहि ज्ञानिनोत्यर्थं अहं सच मम प्रिय: ॥२॥
ओंव्या -- तेथ आर्त तो आर्तीचेनि व्याजे । जिज्ञासू तो जाणावयालागीं भजे ॥ तिजेनि तेणें इच्छिजे । अर्थसिद्धि ॥१॥
मग चौथियाच्याठायीं । काहींच करणें नाही ॥ म्हणोनि भक्त एक पाहीं । ज्ञानिया जो ॥२॥
पाहेपां दुभतेचिया आशा । जगधेनूसीं करीतसे फांसा । परि दोरेंविण कैसा । वत्साचा बळी ॥३॥
का जे तनुमनप्रमाणे । तें आणीक कांहीच नेणें ॥ देखतसां ते म्हणे। हे माय माझी ॥४॥
आर्या -- मोहति भक्त अकामा त्यांहि अकामांसि मिहि मग मोहें ॥ आम्हीं समशील सख्या म्हणुनि महा सख्य चित्र न गमो हें ॥१॥
आतिथ्यधर्मनिरुपण
गायन --- (केदरा - धृपद ) - सत्यरुप अनादि अनंतरुप अमृत आनंदरुप अद्वितीय प्रभु तूं ॥धृ.॥ भवाभोधिपार हेतु एक तूंचि मात्र सेतु अभयमंगलकेतु शांतिरुप प्रभू तूं ॥१॥
श्लोक --- नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायोह्यकर्मण: ॥ शरीरयात्रापि च ते न प्रसिध्येदकर्मण: ॥१॥
तस्मादसक्त: सततं कार्यं कर्म समाचर ॥ असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पुरुष: ॥२॥
ओव्या : -- तरी जाणां नेणा सकळा । हा कर्मयोग करि प्रांजळा जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणीं ॥१॥
म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरें करुनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥२॥
श्लोक --- यो दद्यादपरिक्लिष्टमन्नमध्वनिवर्तते । श्रांतायादृष्ट्पूर्वाय तस्य पुण्यफलं महत्‍ ॥१॥
चक्षुर्दद्यान्मनो दद्याद्वाचं दद्याच्च सूनृतां । अनुव्रजेदुपासीत स यज्ञ: पंचदक्षिण: ॥२॥
पृच्छते ह्यन्नदातारं गृहमायाति चाशया । तं पूजयाथ यत्नेन सोऽतिथिर्ब्राम्हणश्च स: ॥३॥
जेविं जीव परमप्रिय आपणा । तेच रीति प्रिय तो इतरां जनां  ॥ सारिखेंचि सकळां सुखदु:खही । योगि जाणुनि असें विचरे मही ॥४॥
तृणानि भूमिरुदकंवाक्चतुर्थी च सूनृता ॥ सतां ह्येतानि हर्म्येषु न हीयते कदाचन ॥५॥

नामस्मरणनिरुपण.
गायन -- (मालकंस) --- तोवरि तळमळ रे तळमळ रे । नाहीं भक्तीबळ रे ॥ धृ.॥ विवेक जागा करि ना । जोंवरि शांति जिवीं दृढ धरिना ॥ तोंवरि. ॥१॥
उदंड करितां कर्म । चुकला परब्रम्हीचें वर्म ॥ तोवरि. ॥२॥
दास म्हणे प्रभुपायीं । जोंवरि मन हें भ्ररले नाहीं ॥ तोवरि. ॥३॥
श्लोक --- सकळहि अघबीजें नासती अंतरीची । अघहर शुचि नामें यास्तव श्रीहरीचीं ॥ हरिविषय मतीचा कीर्तने होय जेव्हां । करतलगत त्याला चारही मोक्ष तेव्हां ॥१॥
एतावानेव लोकेरिमन्पुंसां धर्म: पर: स्मृत: ॥ भक्तियोगो भगवति तन्नामग्रहणादिभि: ॥२॥
तरमात्संकीर्तनं विष्णोर्जगन्मंगलमंहसाम्‍ ॥ महतामपि कारैव्य विद्धयैकांतिकनिश्वयम्‍ ॥३॥

सनिष्ठानिरुपण.
पद --- (कालंगडा) --- अहा हें काय बरे मानवा ॥ संतचरणी अभिमान वा ॥धृ.॥ अस्थिशिरारक्तमांसपिंड रे ॥ महादुरितांचे कुंड रे ॥ काळभक्ष्य तनू मांसखंड रे ॥ अवघें दो दिसांचे बंड रे ॥ अहा. ॥१॥
आनंदतनय विभु माउली ॥ साधुसंतांची साउली ॥ निरखुनिया लाज कशी लाविली ॥ तुझी मति कोणें झांकिली ॥२॥ अहा.
श्लोक ---मम प्रतिज्ञांच निबोध सत्यां वृणे धर्मममृताज्जीविताच । राज्यं च पुत्राश्च यशोधनेच सर्वं न सत्यस्य कुलामुषैति ॥१॥
मृषावादं परिहरं कुर्यात्प्रिमयाचित: । न च कामान्न संरभान्न द्वेषाद्वर्ममुत्सृजेत्‍ ॥२॥
यत्कल्याणमभिध्यायेत्तत्रात्मनं नियोजयेत्‍ । न पापे प्रतिपाप स्यात्साधुरेव सदा भवेत्‍ ॥३॥
अभंग --- न मिळे खावय न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१॥
ऐशी माझी वाणी मज उपदेशी । आणीक लोकांशी हेंची सांगे ॥२॥
विटंबो शरीर होत कां विपत्ती । परी राहे चित्तीं नारायण ॥३॥

आख्यान.
गायन --- (देस-तराणा) --- प्रभो भवमथना । मम रसना तव भजना । सादर करी ही ॥ प्रभो. ॥धृ.॥ मज न कोणी तुजवांचुनी अभयदानी दुरितनिवारण दीनबंधु तारिं आतां अढळपदानें ॥१॥
प्रभो. ॥
आर्या --- असुरकुळी आसुरधी कनककशिपुनाम उग्रबळ नृपति ॥ नास्तिकशिरोमणीं छळि हरिभक्तां जे परात्परा जपती ॥१॥
तज्जाया श्रद्धेची केवळ मूर्तीच जी कयादु सती ॥ ती प्रल्हादा प्रसवे यन्मति हरिकीर्तनी करी वसतीं ॥२॥
श्लोक --- कचिद्‍रुदति वैकुंठचिंताशबलचेतन: । कचिद्‍सति तच्चिंताऽऽ ल्हाद उद्रायति कचित्‍ ॥१॥
आर्या --- नयकोविदा तयातें शंडामर्काख्य शुक्रसुत दोघे । पढविती म्हणति सुबुद्धे दंड नपाद्यखिल जनकसा हो घे ॥१॥
श्लोक --- एके दिनी घे सुत दैत्य अंकीं ॥ तो स्नेह त्याचा गणवे न अंकी ॥ पुसे तया भागवतोत्तमाते । कीं आवडे जें तुज सांग मातें ॥१॥
प्रल्हाद बोले सदन त्यजावें । तपोवनालागिं अगत्य जावें ॥ तेथें भजावे हरिच्या पदातें । जो आपदाते हरि दे पदातें ॥२॥ दु:खार्णवि जो कास धरी त्याची । चिंता तयाला मग कासयाची । ना विरमरावेचि कदापि त्याला । प्रल्हाद इत्यादि वदे पित्याला ॥३॥
ओवी --- ऐकोनि पुत्रवाणी ऐसी । नृप दचकला निज मानसी ॥ म्हणे कोणे शिकविली यासी । विपरित बुद्धी गुरुवर्या ॥१॥
यत्नें शिकवावें कुमारा । हा भ्रम याचा निरसोनि सारा ॥ वेगे योग्य राज्यभारा । होय तैसे करावें ॥२॥
आर्या --- ते गुरु पुसती त्यातें वद वत्सा सत्यधर्म या वेद ॥ स्मृति साधु म्हणति परकृत कीं हा तव स्वकृत बुद्धिचा भेद ॥१॥

दिंडी - लोहचुंबकमणि आलिया समीप । जडे तेथे ते अचल अपोआप ॥ हरिस्मरणें मम चित्त तसे होतें । स्वभावेचि वळे प्रभुपदी अहो तें ॥१॥
आर्या --- यद्यपि तें सूक्त अमृत तरि त्यांच्या मानिले विष मनांही । गुरुसुत कडकडुनि म्हणति चवथाचि उपाय या विषम नाही ॥१॥
साकी --- भय दाविती ताडिती तयातें । छळिती विविध प्रकारे ॥ परि नच सोडि हरिरति तन्मति । पिशाच जैसे वारें ॥१॥
दिंडी --- पुन्हां एके दिनी घेत पुत्र अंकी । म्हणे बाळा सांगतो तुज विलोकीं ॥ बहु विद्या गुरुगृही शीकलासी ॥ श्रेष्ठ वाटे तुज काय सांग मासीं ॥१॥
श्लोक --- श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनं । अर्चनं वंदनं दास्यं सख्यात्मनिवेदनमऽ ॥१॥
इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेत्रवलक्षणा । क्रियते भगवत्यद्धा तन्मन्येऽधीतमुत्तमम्‍ ॥२॥
असा वर्णिता वर्णिता श्रीअजाला । पित्याच्याच अंकी समाधिस्थ झाला । अहो तो निजांकावरुनी अभाग्ये । दिला लोटूनि लभ्य जो प्रूर्वभाग्यें ॥३॥
म्हणे माता बाळा नृप खवळला बा तुजवरी । गमे मातें घाता करिल न दिसे त्वद्गति बरी ॥ तरी लोकवृत्ती निरखुनि करी तुष्ट जनका । मनी ध्याईं ईशा परि भजन सोडीन म्हण कां ॥४॥
कुपितो जनकस्तथापि मे न विरामो जगदीशकीर्तने ॥ मशकोपनिपातभीतित: सदनं मुच्चति किं निजं जन: ॥५॥

आर्या --- बाळाचे प्रेम म्हणुनि हरिचिंतनपरहि तो दयालु बरा ॥ त्या दे निजबोध झटे हरिजनचि न परहितोदया लुबरा ॥१॥
पद : ---- (धनाश्री) गड्यांनो घ्या हरिच्या नामा ॥ लिहिता कशास ओनामा ॥धृ.॥ सांगतो ऐका एक वर्म । पहावे भागवतीं धर्म ।
दु:खसें प्राप्त होय शर्म ॥ यत्न तो कशास रे परम ॥ न पावे हरिवाचुनि क्षेमा ॥ लिहिता. ॥१॥
गृहवचन जन यांची ममता ॥ धरुनि व्यर्थचि कां श्रमतां ॥ हृदयीं वागवुनि समता । हरिचे चरणांबुज नमितां । नेइल  हरि तो निजधामा ॥लिहिता. ॥२॥
आर्या --- नष्ठधृति त्रस्त गुरु प्रभुला कळतांचि वृत्त ते कळवी ॥ तो असुरेश्वर परम क्रोधे वदना यशास मळवी ॥१॥
श्लोक --- मीं क्रुद्ध होतां मज लोक सारे । भीती मिशी एक न तूं कसारे ॥ या शासना लंघिशि दुर्गमातें । कोण्या बळें सत्वर सांग मातें ॥१॥
प्रल्हाद बोले जग गांजितोसि । ज्याच्या बळें आत्मपणे जितोसी ॥ रक्षी अनाथा मजला हरी तो । ज्याला असा बापचि संहरीतो ॥२॥
या गोष्टिनें फारचि तप्त झाला । घे खड्‍ग बोले मग आत्मजाला ॥ कीं तूं मरू इच्छिसे तो निपात । स्वये असे बोलवि सन्निपात ॥३॥
त्रिभुवनेश्वर जो मज वेगळा । तुज गमे सकळांहुनि आगळा ॥ जरि दिसेल अरे मज ईक्षणीं । वधिन त्याचिपुढे तुज ये क्षणीं ॥४॥
जरि समर्थ असेल तुझा धणी । तरि तुझी पुरवीलचि तो धणी ॥ परि वदे स्थळ कोण तया असे । म्हणुनि गर्जत शब्द करीतसे ॥५॥
आर्या --- भूजल तेज समीरख रवि शशी काष्ठादिकी असे भरला ॥ स्थिर चर व्यापुनि अवघें तो जगदात्मा दशांगुळे उरला ॥१॥
घनाक्षरी --- दैत्य म्हणे अरे थांब । गोष्टि ठेवि लांब लांब । मज समोर हा खांब । एथें कैसा असतो । तरी दिसेना कां मज । म्हणे भजोनि समज । प्रत्यक्षहि अधोक्षज । दिसेना तो दिसतो ॥१॥
स्तंभी दिसतसे जाण ।ऐसें बोलता सुजाण । दैत्ये घेतले उड्डाण सिंहासनावरुनी । खवळला उच्छृंखळ । दांत दांत खाय खळ ।हाणी खांबास निखळ । खड्‍ग मुष्टि धरुनी ॥ तेचि समयी कठोर । बहु भयंकर थोर ध्वनी उठे महाघोर । मोठ्या बळें करुनी ॥ म्हणे असुर विकळ ॥ कोण गर्जतो प्रबळ । पाहे चहुंकडे चळ ॥ लोचनासी पसरूनी ॥२॥
सत्यं विधातुं निजभृत्यभाषितं व्याप्तिचं भूतेष्वखिलेषु चात्मन: ॥
अदृश्यतान्यद्‍भुतरुपमुद्वहन्‍ स्तंभे सभायां न मृगं न मानुषे ॥१॥

ओव्या --- अदृश्य आपणा परी सुतास । दिसे सर्वत्र जगन्निवास ॥ ज्याच्याबळे निर्भयमानस । होवोनि नगणी अन्य कोणा ॥१॥
तेणे भये मनीं असुर । होय परम चिंतातुर ॥ म्हणे कोणी सत्व भ्यासुर । प्राण माझे हरील कीं ॥२॥
न देखें मी कोणी नरात । ज्याचेनि घडे माझा घात ॥ सिंहादि उग्र पशू समस्त ।वनी दडती मजपुढें ॥३॥
परी ऐसे कोणी असावें । जेथ दोहींचे बळ वसावें । जे मजपुढे सरसावे । प्राण माझे हरावया ॥४॥
ऐसें अत्यंत भयें मना । नित्यभावी तेच नयनां ॥ देखतां स्तंभी सभोंगणीं । प्राण व्याकुळ होय त्याचा ॥५॥
तैसाचि तो खड्‍गपाणी । लगबग स्तंभालागी हाणी । तेणे प्रत्याघाते होउनी । गतासु पडे भूतळी ॥६॥

आर्या --- वात्सल्य प्रल्हादीं प्रभूनें केले अनंत विश्वास ॥ स्वपदी अचळ बसविला दासांचा तारिलेचि विश्वास ॥१॥

उपसंहार
अभंग --- पतित पावना । दीनानाथा नारायण ॥१॥
आरती --- जयदेव जयदेव जय मंगलधामा ।

मुंबई प्रार्थना समाज
सन १८८७Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-06T19:28:59.0970000