मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
चंद्रहासाख्यान

कीर्तन आख्यान - चंद्रहासाख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


पूर्वरंग

श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्रीसरस्वत्यै नमः, श्रीगुरवे नमः

मंगलाचरण

श्लोक-

स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङकजस्मरणम्‌ ।

वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानाम्‌ ॥

अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानीकसेवितकपोलम्‌ ।

अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे ॥

या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता ।

या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना ।

या ब्रह्माच्युतशङकरप्रभूतिभिर्देवैः सदा वन्दिता ।

सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाडयापहा ॥

मूकं करोति वाचालं पङंगु लङघयते गिरिम्‌ ।

यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्‌ ॥

गुरुर्ब्र्ह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

किंवा कित्येक हरिदास खालील पद्धतीनेंहि मंगलाचरण करितात. तें असें----

पद-

जयजयरामकृष्ण हरी, जयजयरामकृष्ण हरी, जयजयरामकृष्ण हरी ॥

गोवर्धनधर गोपालनरत गोकुलसंकटहारी, जयजयरामकृष्ण हरी ॥

नवनीरदसम दुःखविमोचक दुर्जनसंगमहारी, जयजयरामकृष्ण हरी ॥

शरणागत दीनां चरणीं नेंई, करुणादृष्टिं निहारीं, जयजयरामकृष्ण हरी

पद-

बालकृष्णचरणीं लक्ष लागो रे, कीर्तनसंगें रंगांत देह वागो रे ॥

स्वरुपीं मन हें लावितां सौख्य आम्हां, कामक्रोधादिक जाती निजधामा ॥

सारासार वदविता सद्गुरुराय, मंगलधाम जीवन नरहरिपाय ॥

सद्रूप चिन्मय नारायणरुप ध्याऊं, तन्मय होउनी बलवंत प्रेमें गाऊं ॥

भजन-

विठाबाई माउली दया कर, विठाबाई माउली ॥

याप्रमाणें मंगलाचरण झाल्यावर देवाला साष्टांग नमस्कार घालून ध्रुवपद म्हणावें.

मूळ अभंग-

सांठविला हरि, जेणें हृदयमंदिरीं ॥१॥

त्याची सरली येरझार, झाला सफळ व्यापार ॥२॥

हरि आला हाता, मग कैंची भयचिंता ॥३॥

तुका म्हणे हरि, कांहीं उरुं नेदी उरी ॥४॥

आदौ कीर्तनारंभीं तुकारामबुवा साधकाला सन्मार्ग कोणता तें दाखवितात. ते म्हणतात, चौर्‍यायशीं लक्ष योनी भ्रमण करीत करीत अवचित दुर्लभ नरदेह प्राप्त झाला असतां, चौर्‍यायशींची येरझार कोणीं चुकविली आणि नरदेहास आल्याचा व्यापार कोणाचा सफल झाला म्हणून विचाराल, तर सांगतों. ज्या मनुष्यानें परमात्मा हरि हृदयमंदिरीं सांठविला, त्याचीच येरझार संपून त्याचाच व्यापार सफळ झाला. श्रोतेजन आशंका घेऊन म्हणतील कीं तुकाराम जातीचा शूद्र, त्यास पूर्ण ज्ञान नसल्यामुळें ’सांठविला हरि’ असें पद घातलें. कारण हरीवांचून रितें स्थळच नाहीं. मग सांठविणें कोठून होणार ? कारण भगवद्गीतेंत भगवान् अर्जुनास सांगतात---

श्लोक-

मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय ।

मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥

’मी सर्व जगताचे ठायीं ओतप्रोत भरलों आहें; मजहून अन्य किंचित्‌हि स्थान रितें नाहीं; सुतामध्यें मणि ओंवावे, त्याप्रमाणें ब्रह्मांडाच्या माळा माझे ठायीं आहेत.

श्लोक-

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ॥

सर्व भूतांचे हृदयांत ईश्वर राहतो आणि सर्व भूतांचे ठायीं त्याची व्याप्ति आहे.’ मोरोपंत म्हणतात----

आर्या-

भूजलतेजसमीरख रविशशिकाष्ठादिकीं असे भरला ।

स्थिरचर व्यापुनि अवघें तो जगदात्मा दशांगुलें उरला ॥

’पृथ्वी, आप्, तेज, वायु आणि आकाश या पंचभूतांचे ठायीं, तसाच सूर्य, चंद्र, काष्ठादि सर्व वस्तु आणि स्थावर जंगम सर्व विश्व व्यापून तो जगदात्मा दहा अंगुलें शेष राहिला आहे.’ श्रुतिवाक्यहि अशाच प्रकारचें आहे. तें ’अत्यतिष्ठद्दशांगुलम्’ हें होय. असा हरि सर्वव्यापक असतां सांठवावयास स्थळ कोठें बरें राहिलें ? तुकारामबुवा म्हणतात, ’जेणें हृदयमंदिरीं’ अर्थात्‌ कोणीं एका पुरुषानें हृदयाचे ठिकाणीं परमेश्वराला सांठविलें; याजवरुन सर्वांचे हृदयांत तो सांठविलेला नाहीं. असें असल्यामुलें श्रुतिवाक्य सोडून तुकारामाचें म्हणणें ग्रहण करण्यास आम्ही सिद्ध नाहीं, अशी शंका कोणीं घेतली तर वामन पंडित म्हणतात---

श्लोक-

जयाची वदे पूर्ण वेदांतवाणी, म्हणावें कसें हो तयालागिं वाणी ॥

परब्रह्मरुपीं न कैसा तुकावा, तयाचे तुकीं कोण ऐसा तुकाचा ॥

’ज्याची वाणी पूर्णपणें वेदांताचें विवेचन करण्यास समर्थ आहे, त्यास वाणी कसें म्हणावें ? ह्या तुकारामाची परब्रह्मस्वरुपाशीं तुलना करणें योग्य आहे. त्याच्याशीं दुसर्‍या कोणाची तुलना करतां येण्यासारखी आहे ? अर्थांत्‌ कोणाशींच नाहीं. ’ मोरोपंत म्हणतात---

आर्या-

मुकुटमणी संतांचा शिवशिव तुकया म्हणूं नये वाणी ।

नेले जड वैकुंठीं विठ्ठल विठ्ठल म्हणोनियां वाणी ॥

’तुकाराम हा सर्व संतांचा मुकुटमणि होय. त्या तुकारामाला लोकांनीं ’वाणी’ म्हणून हिणवावें, हें अधमपण होय ! हाय हाय ! अहो, त्याच तुकारामानें मुखानें ’विठ्ठल, विठ्ठल’ असा सारखा नामघोष चालवून अनेक जड प्राण्यांला वैकुंठाला नेलें ! अशी ज्या तुकारामाची योग्यता, त्याचे शब्दास दूषण देणें योग्य नाहीं. प्रभूंनीं अर्जुनाला सांगितलें कीं, माझी सर्वत्र व्याप्ति आहे. तेंच ते पुनः व्यवस्थापूर्वक सांगतात---

श्लोक-

मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ।

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ॥

माझे ठिकाणीं सर्व भूतें राहतात, परंतु मी त्यांचे ठिकाणीं राहत नाहीं, तसेंच सर्व भूतें माझे ठायीं वसत नाहींत, हा माझा ईश्वरी योग पहा. मोरोपंत म्हणतात----

आर्या-

मी भक्तांचे हृदयीं माझे हृदयीं सदैव भक्त वसे ।

भक्तांवांचुन जे जन मातें सप्राण भासती शवसे ॥

मी भक्तांचे हृदयांत सर्वदा वास करितों आणि भक्तहि माझे हृदयांत वस्ती करितात, भक्तांवांचून इतर ते जीवंतपणीं प्रेतेंच होत असें मला वाटतें. त्यांचे ठिकाणीं माझी व्याप्ति नाहीं, असें नाहीं, परंतुअ शवाचे ठिकाणीं जशी माझी व्याप्ति आहे, तशीच त्यांच्याहि ठिकाणीं आहे. हा प्रभूचा भक्तवत्सलपणाचा साहजिक योग आहे.

आर्या-

यद्यपि सर्वत्र समस्तथापि स च हृर्षितः श्रिते पुरुषे ।

ममताभिमानमुच्चैर्वहति विवस्वान् यथोत्पले जगति ॥

प्रभु सर्वत्र ठिकाणीं सम आहे, ही गोष्ट खरी आहे; परंतुअ आश्रित जनांचे ठायीं तो जितका आनंदित असतो, तितका अन्य पुरुषांचे ठिकाणीं नसतो. सूर्य सर्वत्र समान आहे, तथापि सूर्योत्पलाचे ठिकाणीं त्याची स्वाभाविक विशेष प्रीति असते. सूर्याप्रमाणें अनन्यतेच्या योगानें प्रभूचें वास्तव्य भक्ताचे ठिकाणीं विशेष आहे. चराचराचे ठिकाणींहि आहे, परंतु ती व्याप्ति कशी ? तर ज्याप्रमाणें काष्ठाचे ठायीं अग्नि, तिळांचे ठायीं तेल, इक्षुदंडाचे ठायीं शर्करा, त्याप्रमाणें, परंतु क्रियेवांचून प्राप्ति नाहीं. कोणी एक गृहस्थ मार्गानें जात होता. त्यानें ऐकिलें होतें कीं काष्ठाचे ठायीं अग्नि आहे. तदनंतर माध्याह्नसमय झाला असतां तो एका सरोवरावर उतरला आणि स्नान करुन त्यानें दगडांची चूल केली. त्यांत काष्ठें घालून त्यांवर स्थाली ठेविली. उपरांत दोन घटिका झाल्या तरी उदकहि ऊन झालें नाहीं. एक प्रहर झाला तरी तसेंच. तेव्हां आश्चर्य करुन चिंतातुर बसला, तों मार्गांनें दुसरा गृहस्थ आला. त्यानें चिंतातुर बसण्याचें कारण विचारलें. तेव्हां तो म्हणाला कीं ’काष्ठांत अग्नि आहे म्हणून शास्त्री, पंडित यांनीं सांगितलें, म्हणून चुलींत काष्ठें पुष्कळ भरुन, भात शिजविण्याकरितां तपेलींत तांदूळपानी घालून तें चुलीवर ठेविलें आणि भात शिजण्याची वाट पाहत बसलों आहें. एक प्रहर झाला, तरी तपेलींतील पाणी ऊनहि झालें नाहीं !’ तें ऐकून तो दुसरा गृहस्थ म्हणाला कीं, ’बापा, तूं वेडा आहेस काय ? काष्ठांत अग्नि आहे खरा, पण त्याची क्रिया झाल्यावांचून कार्य होत नसतें. अग्निहोत्र्याकडून मंथा, रवि, दोर आणून काष्ठमंथन करावें, तेव्हाम्च अग्नि प्राप्त होत असतो. क्रियेवांचून तिळांतलें तेलहि प्राप्त होत नसतें. तेल्यानें घाण्यांत तीळ घालून मळावे, तेव्हांच तेल प्राप्त होतें. तशीच उंसापासून साखर. चरकांत ऊंस घालून व रस काढून त्याचा रांधा करावा, तेव्हां शर्करा प्राप्त होणार.’ तसा ईश्वर सर्वत्र व्यापक खरा, परंतु सद्गुरुस शरण जाऊन त्याचे उपदेशानुरुप क्रिया केली म्हणजे हृदयांत श्रीहरि अखंड प्रगट राहतो. ’यः क्रियावान् स पंडितः’, जो क्रियायुक्त वागतो, तोच पंडित होय. यास्तव तुकोबा म्हणतात----

सांठविला हरि, जेणें हृदयमंदिरीं ॥

एकदां हस्तिनापुरीं नारद प्राप्त झाले असतां धर्मराजानें त्यांचें आगतस्वागत उत्तम प्रकारें केलें आणि बद्धांजलियुक्त होऊन त्यांना म्हटलें, ’महाराज, आपण परमात्म्या हरीहूनहि श्रेष्ठ आहांत. कारण---

श्लोक-

पृथ्वी तावदियं महत्सु महती तद्वेष्टनं वारिधिः,

पीतोऽसौ कलशोद्भवेन मुनिना स व्योम्नि खद्योतवत् ।

तद्विष्णोर्दनुजाधिनाथदमने पूर्णं पदं नाभवत्,

देवोऽसौ वसति त्वदीयहृदये त्वत्तोऽधिकः कः परः ॥

सर्वांत पृथ्वीएवढा मोठा पदार्थ दुसरा नाहीं. पृथ्वी मोठी म्हणावी, तर तिच्या सभोंवतीं समुद्राचें वेष्टन आहे. एवढा मोठा समुद्र, तो अगस्ति मुनीनें प्राशन केला. तो अगस्ति आकाशाचे ठिकाणीं काजव्यासारखा लहान दिसतो. म्हणून आकाश मोठें म्हणावें, तर तें बलिदैत्यदमनकालीं हरीनें वामनरुप धरिलें, त्या वेळीं कसें झालें पहा ? वामन पंडित म्हणतात---

श्लोक-

एका पदें भूमि भरुन थोडी, दुज्या पदें अंडकटाह फोडी ।

दे तीसरा पाय म्हणे बळीला, म्हणोन पाशीं दृढ आकळीला ॥

वामनानें बळीकडे त्रिपादभूमि मागितली असतां ती बळीनें दिली. वामनानें एकाच पदानें सर्व भूमि व्यापिली, दुसर्‍या पदानें समस्त आकाश व्याप्त झालें. तेव्हां वामनानें तिसरा पाय कोठें ठेवूं म्हणून बळीला विचारिलें. तिसर्‍या पदाला जागा नाहीं, असें पाहतांच वामनानें बळीला पाशांनीं आकळून पाताळांत टाकिलें. म्हणून त्य आकाशाहूनहि विष्णु श्रेष्ठ आणि हे मुनीश्वरा नारदा, तो श्रीविष्णु सर्वदा तुझ्या हृदयांत वास करितो. म्हणून तूं सर्वांपेक्षांहि श्रेष्ठ आहेस. तुझ्याहून दुसरा अधिक असा कोण आहे ? म्हणून तुकोबा म्हणतात कीं, ज्यानें आपल्या हृदयसंपुटांत हरि सांठविला त्याच्या जन्ममृत्यूंची येरझार संपत आली.----

सांठविला हरि, जेणें हृदयमंदिरीं ।

त्याची सरली येरझार, झाला सफळ व्यापार ॥

प्रभूची सर्वत्र व्याप्ति आहे. प्रत्येक प्राण्याच्या हृदयांत जीव आणि शिव हे राहत असतात. शिव ब्रह्मरुप साक्षिभूत आहे आणि जीव हा त्याची छाया (प्रतिबिंब) आहे. एतदर्थीं गुरुगीतेंत म्हटलें आहे.

 

ओंवी-

जळ जळीं मिळालें, घटीं मठीं नभ संचलें ।

तैसे जीवशिव एक झाले, भेदरहित ॥

ज्याप्रमाणें जल जलांत मिसळून जातें, आकाश घटांत व मठांत व्यापून राहतें, त्याप्रमाणें जीव आणि शिव हे भेदरहित एकत्र राहतात. शरीरांत जो परमात्मा आहे, त्याचा अंश तद्रूप असून पृथक्‌पणानें जीव हा त्याजवर आरोप केला आहे. तो दूर करुन ज्या पुरुषानें आपले हृदयांत परमात्म्याला सांठविलें, तोच धन्य होय. त्याला मग कशाचेंहि भय किंवा चिंता राहत नाहीं. श्रीहरि त्याला कसलीहि उणीव पडूं देत नाहीं. म्हणून तुकारामबुवा म्हणतात----

त्याची सरली येरझार, झाला सफळ व्यापार ।

हरि आला हाता, मग कैंची भयचिंता ॥

तुका म्हणे हरि, कांहीं उरुं नेदी उरी ॥

बुधजनांचें वचन याच प्रकारचें आहे. ते म्हणतात कीं----

श्लोक-

लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः ।

येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः ॥

’ज्यांच्या हृदयांत इंदीवराप्रमाणें श्यामवर्ण जनार्दन वसत आहे, त्याच लोकांना सर्वत्र लाभाची तशीच जयाचीहि प्राप्ति होत असते. त्यांचा पराजय कोठून होणार ?’ ह्याविषयीं कवि चंद्रहासकथा निरुपण करितात.

उत्तररंग

साकी-

वंदुनि गणपतिचरणां नमिलें सद्गरु कृष्णपदासी ।

श्रोत्यांतें कर जोडुनि कथोतों प्रेमळ सच्चरितासी ॥

कुरुवंशोत्तम भूप युधिष्ठिर तेणें हयमेधातें ।

आरंभुनियां अश्व सोडिला पृथ्वी जिंकायातें ॥

श्रोते परिसावी, भक्तलीला हे बरवी ॥ध्रुव०॥

श्रीगणपति आणि सद्गरु कृष्ण यांच्या चरणांस वंदन करुन आणि श्रोतृवर्गाला हात जोडून प्रेमळ असें एक सच्चरित कथन करितों. कुरुवंशांतील राजश्रेष्ठ युधिष्ठिर यानें अश्वमेध करण्याचा निश्चय करुन पृथ्वी जिंकण्याकरितां म्हणून अश्व सोडला. ह्या कथेंत अद्भुत अशी भक्तलीला आढळून येणारी आहे, म्हणून ही कथा श्रोत्यांनीं अवश्य परिसावी.

दिंडी-

तयाचीया रक्षणा वीर पार्थ, निघे सेना घेऊन असंख्यात ।

श्यामकर्ण भ्रमत तो मही आला, कुंतलाख्यापुरिनिकट नष्ट झाला ॥

त्या अश्वाच्या रक्षणार्थ असंख्यात सेना घेऊन पार्थ वीर निघाला. तो श्यामकर्ण (अश्व) भ्रमत पृथ्वीवर आला आणि कुंतलाख्यपुरीजवळ नाहींसा झाला.

दिंडी-

भूप तेथींचा चंद्रहास राणा, कुमरिं त्याच्या क्रीडतां तया जाणा ।

धरुनि नेला वाजतां त्रुटि न पाहीं, पार्थसैनिक शोधिती दिशा दाही ॥

त्या कुंतलपुरीचा राजा चंद्रहास नांवाचा होता. त्याच्या मुलांनीं खेळत असतां त्या अश्वाला पाहिलें आणि तत्काल धरुन नेलें. त्या पार्थसैनिकांनीं दाही दिशांना त्या अश्वाचा शोध केला, परंतु थांग लागला नाहीं.

ओंवी-

तंव नारद पातला अकस्मात, तो पार्थासी कथी वृत्तांत ।

चंद्रहास नृप येथें वसत, परिसें मूळ कथा तयाची ॥

इतक्यांत नारदमुनींची स्वारी तेथें आली. त्यांनीं अर्जुनाला वृत्तांत सांगितला कीं चंद्रहास राजा येथें वसत असतो; त्याची मूळ कथा सांगतों, ती ऐक.

साकी -

प्रसोमनामें नृपवर होता केरलदेशाधिपती ।

समरीं त्यातें वधितां रिपुंनीं गेल्या सति त्या युवती ॥

चंद्रहास या नामें त्यासी बालक दो महिन्यांचें ।

असतां रक्षण करितें कोणी उरलें नाहिं तयाचें ॥

प्रसोम नांवाचा केरल देशाचा राजा होता. त्याचा शत्रूंनीं समरांगणावर वध केला असतां त्याच्या स्त्रिया सती गेल्या. त्या वेळीं चंद्रहास नांवाचा त्याचा दोन महिन्यांचा एक मुलगा होता. पितृवध झाला असतां त्याचें रक्षण करण्यास कोणीच उरलें नव्हतें.

साकी-

अनाथ उघडें दीन होउनी पडलें रुदन करी तें ।

उपमाता मग घेउनि त्यातें कुंतलपुरास ये ते ॥

भिक्षा मागुन असतां तेथें पावे मृत्युस माता ।

नगरामाजी बालक हिंडे दीन क्षुधित न पाता ॥

सुंदर बालक देखुनि जन त्या उचलुनि कडिये घेती ।

लालनपालन करिती अवघे अन्नवस्त्र त्या देती ॥

चंद्रहास अनाथ, दीन होऊन अगदीं उघडा पडला, त्यामुळें तो सारखें रुदन करुं लागला. मग त्याची दाई त्याला घेऊन कुंतलपुराला आली. तेथें ती भिक्षा मागून त्या बालकाचा व आपला चरितार्थ चालवीत असे. अशा स्थितींत ती मरण पावली असतां तें बालक दीन, क्षुधित आणि उदास होऊन नगरांत फिरत असे. तें सुंदर बालक पाहून लोक त्याला कडेवर घेत आणि त्याला अन्नवस्त्र देऊन त्याचें लालनपालन करीत असत.

दिंडी-

बिदींमाजी क्रीडतां जाण त्याला, शालिग्राम नरसिंह प्राप्त झाला ।

त्यासि भावें अर्चुनी नित्य काळीं, मुखामाजी आदरें प्रतीपाळी ॥

रस्त्यामध्यें क्रीडा करीत असतां त्याला एकदां शालिग्राम (नरसिंह) सांपडला. चंद्रहास त्याची नित्य मोठया भावानें पूजा करीत असे आणि पूजेनंतर त्याला सादर मुखामध्यें ठेवीत असे.

ओंवी-

कुंतलेश्वर नृप तेथींचा, दुष्टबुद्धि प्रधान त्याचा ।

तेणें समुदाय द्विजांचा, मेळविला भोजनासी ॥

बिदींत चंद्रहास खेळतां, प्रधानें देखिला अवचितां ॥

दयायुक्त कडियेअ घेऊन तत्त्वतां, भोजना आणिला तत्काळ ॥

तेथील राजा कुंतलेश्वर म्हणून प्रसिद्ध असून त्याचा प्रधान दुष्टबुद्धि नांवाचा होता. त्यानें भोजनाकरितां एकदां ब्राह्मणसमुदाय जमविला. त्या वेळीं रस्त्यावर चंद्रहास खेळत असतां प्रधानानें त्याला पाहिलें. त्या बालकाची त्याला दया आली आणि त्यानें त्याला कडेवर घेऊन तत्काळ भोजनाला आणिलें.

ओंवी-

येऊनि बैसला पात्रीं, मुखींची काढून शालिग्राममूर्ति ।

त्यातें नैवेद्य समर्पितां प्रीतीं, आश्चर्य करिती लोक सर्व ॥

चंद्रहास येऊन पात्रावर बसला. त्यानें मुखांतून शालिग्राममूर्ति काढली आणि त्या नरसिंहाला नैवेद्य दाखविला, तेव्हां सर्व लोक आश्चर्यचकित झाले.

साकी-

भोजन होकर उठकर बछरा प्रधानअंकीं बैठा ।

द्विजमनमों वैसा आया की ये है उनका बेटा ॥

भोजन झाल्यावर तो बालक उठून प्रधानाच्या मांडीवर बसला. ब्राह्मणांना वाटलें कीं हा प्रधानाचा मुलगा आहे.

छंद-

विप्र ओपिती मंत्रअक्षता, करिल राज्य हा पुत्र तत्त्वतां ।

वाक्य ऐकतां मंत्रि यापरी, क्षोभुनि द्विजां घालि तो दुरी ॥

ब्राह्मणांनीं मंत्राक्षता टाकून आशीर्वाद दिला कीं ’हें राज्य हा पुत्र उत्तम रीतीनें चालवील.’ प्रधान, ब्राह्मणमुखींचें हें वाक्य ऐकून अत्यंत क्षुब्ध झाला आणि त्यानें त्या ब्राह्मणांस दूर घालविलें.

श्लोक-

नव्हे अन्यथा वाक्य तें ब्राह्मणांचें, म्हणूनी मनीं वाढलें वैर साचें ।

तदा आणुनी अंत्यजां प्राणघाती, तयांसी म्हणे मारिजे बाळ युक्तीं ।

पदीं अंगुली बाळकाच्या सहावी, खुणा आणुनी ते मला दाखवावी ।

असें ऐकतांची निघे दुष्टमेळा, तिहीं बाळ तो काननामाजि नेला ॥

ब्राह्मणांचें भाषण कधींहि अन्यथा होणार नाहीं, म्हणून प्रधानाचें त्या बालकाशीं वैर वाढत गेलें. तेव्हां त्यानें प्राणघातकीं अंत्यजांना बोलावून आणिलें आणि त्यांना सांगितलें कीं, ’ह्या बाळाला कांहीं युक्ति करुन ठार मारावें; ह्या बालकाच्या पायाला सहा बोतें आहेत, तरी खूण म्हणून ती सहावी अंगुलि आणून मला दाखवावी.’ हें त्याचें भाषण ऐकूण ते दुष्ट लोक निघाले आणि त्यांनीं त्या बालकाला रानामध्यें नेलें.

छंद-

शस्त्र काढितां बाळ घाबरे, देखुनी म्हणे ना दिसे बरें ।

कंप सूटला पाहि चौंकडे, कंठ दाटुनी फार तो रडे ॥

त्या अंत्यजांनीं शस्त्र उपसतांच चंद्रहास घाबरुन गेला आणि म्हणाला, ’हें कांहीं बरें लक्षण दिसत नाहीं.’ त्याला कंप सुटला, तो चहूंकडे पाहूं लागला, त्याचा कंठ दाटून आला आणि तो रडूं लागला.

ओंवी-

भंवता विलोकुनि पाहे आस, कोण सोडविल ऐशा समयास ।

मग केलें मनीं निश्चयास, त्राता न आतां नृहरीविणें ॥

आतां ह्या समयास मला सोडवील असा कोण आहे. म्हणून त्यानें सभोंवतीं न्याहाळून पाहिलें. त्याला कोणाचीहि आशा दिसेनाशी झाली. तेव्हां श्रीनरहरी- वांचून आपणाला दुसरा त्राता कोणी नाहीं, असा त्यानें मनांत निश्चय केला.

दिंडी-

दुर्जनांनीं वेष्टितां तया बाळा, मुखांतिल तइं काढूनि पुजी शीळा ।

घाबरोनी झांकीत भयें दृष्टी, नृसिंहातें सप्रेम घालि मीठी ॥

त्या बाळकाला दुर्जनांनीं वेढिलें, तेव्हां त्यानें मुखांतील आपला ’शाळिग्राम’ (नरहरि) बाहेर काढला आणि त्याची पूजा केली. तो अगदीं घाबरुन जाऊन त्यानें प्रेमपूर्वक त्या मूर्तीला मिठी मारली व त्या संकटांतून सोडविण्याबद्दल शुद्ध भावानें देवाची प्रार्थना केली---

पद-

बा धांव सख्या नरहरि रे, पाहतोसि अंत काई रे ॥बा०॥ध्रु०॥

जननीचे जठरीं त्वांचि मजलागिं पोषियेलें ॥

बाळपणापासुनियां त्वां सर्वस्वें रक्षियेलें ॥

सांप्रत या दुःखप्रवाहीं दीनाप्रति लोटियेलें ॥

चाल-

निष्ठुरता धरुनी आजी, उबगतोसि कां देवाजी ॥

टाकुनियां चिंतेमाजी, गुंतलासि कवणे ठायीं ॥बा धांव०॥१॥

देइनाचि सागर पोटीं जरि थारा सरितेलागीं ॥

बाळातें माय उपेक्षा करुनियां काननीं त्यागी ॥

अंडजास पक्षिण विसरे सोडुनियां भलते जागीं ॥

चाल-

हे गोष्टी भासत तैसी, तरि यातें गत करुं कैशी ॥

तेव्हां करुणा परिसुनि ऐशी ये दासजनांची आई ॥बा० ॥२॥

’बा नरहरि सख्या, आतां धांवून ये ! माझा अंत तूं किती म्हणून पाहणार आहेस ? आईच्या उदरांत असतांना तूंच माझें पोषण केलेंस, बालपणापासून तूंच माझें सर्वस्वीं तारण केलेंस आणि सांप्रत या दीनाला दुःखप्रवाहांत कसें बरें लोटलेंस ? हे देवाजी, आज निष्ठुर होऊन माझा कंटाळा तूं कसा बरें करितोस ? मला असा चिंतेंत टाकून तूं कोणत्या कामांत गुंतला आहेस ? ही तुझी कृति म्हणजे सागरानें सरितेला आपल्या पोटांत थारा देऊं नये, बाळाची आईनें उपेक्षा करुन त्याला अरण्यांत टाकून द्यावें किंवा पिलाला पक्षिणीनें विसरुन भलत्याच ठिकाणीं सोडून द्यावें, त्याप्रमाणें मला भासत आहे. आतां याला मी करुं तरी काय ?’ अशा प्रकारची करुणवाणी ऐकून दास (भक्त) जनांची आई (श्रीनरहरि) आपल्या भक्ताच्या रक्षणार्थ तेथें धांवून आली. मारेकर्‍यांनीं चंद्रहासाला मारण्याकरितां तरवार वर उपसली होती आणि ते त्याला आतां मारणार, इतक्यांत त्या नृसिंहमूर्तींतून प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या अक्राळविक्राळ स्वरुपांत मोठी गर्जना करुन प्रकट झाला.

साकी-

पंचाननरुप प्रकटुनि नरहरि रक्षितसे बाळा ।

ऐसें पाहुनि सर्वहि भ्याले कंप सुटे चांडाळां ॥

नरहरि सिंहरुप धारण करुन त्या बालकाच्या रक्षणार्थ धांवून आला, तें त्याचें अक्राळविक्राळ स्वरुप पाहून सर्वांना भीति वाटली आणि त्या चांडाळांना थरथर कंप सुटला. त्यांनीं प्रसंग जाणून त्यांतल्यात्यांत चंद्रहासाच्या पायाचें सहावें बोट कापून घेतलें आणि पलायन केलें. देवानें चंद्रहासाला मोठया प्रेमानें पोटाशीं धरिलें आणि म्हटलें, ’बाळा चंद्रहासा, आतां तूं भिऊं नकोस, तुझें कल्याण होईल. तूं सर्व पृथ्वीचें राज्य करशील. हें तुझ्या पायाचें सहावें बोट तुटलें हीहि उत्तम गोष्ट झाली. तें बोट मोठें अनिष्टसूचक होतें. तें जोंपर्यंत होतें, तोंपर्यंतच तुझा संकटकाल होता. आतां तुला सुखाचे दिवस येतील. तूं सर्व पृथ्वीवर राज्य करशील.’ असें म्हणून नरहरि अदृश्य झाला. इकडे मारेकर्‍यांनीं चंद्रहासाचें सहावें बोट दुष्टबुद्धि प्रधानाला दाखविलें आणि म्हटलें, ’महाराज, आम्हीं चंद्रहासाला ठार मारिलें, हें पहा त्याचें सहावें बोट.’ तें पाहून दुष्टबुद्धीचें समाधान झालें व त्यानें त्या मारेकर्‍यांस मोठें बक्षीस दिलें. परमेश्वरसान्निध्याच्या आनंदांत चंद्रहास त्या अरण्यांत कंदमूळें वगैरे खाऊन राहिला. त्या निर्जन व भयाण अरण्यांत ईश्वराच्या कृपाप्रसादामुळें त्याला व्याघ्रसर्पादि हिंस्त्र प्राण्यांची मुळींच भीति वाटली नाहीं. इतकें झालें तरी तें लहान मूल बालस्वभावाला अनुसरुन आपणाला संरक्षणकर्ता जवळपास कोणी नाहीं, असें पाहून रडूं लागलें.

साकी-

तेव्हां बालक हिंडे रानीं दुःखें करि रुदनाला ।

कुलिंदराजा मृगये आला होता त्याच वनाला ॥

धरुनी हरिनें मृगरुपा त्या आणी बाळापाशीं ।

रोदनशब्दा परिसुनि ममता आली जाण नृपासी ॥

त्या समयीं तो चंद्रहास बाळ रडत रडत रानांत फिरत असतां कुलिंददेशाचा राजा शिकारीकरितां म्हणून त्याच वनांत आला होता. श्रीहरीनें हरिणरुप धारण करुन त्या राजाला जेथें तो चंद्रहास हिंडत राहिला होता, त्याच ठिकाणीं आणलें. तेथें त्या बालकाचें रडें ऐकून राजाला मोठी दया उत्पन्न झाली. मुलाच्या तोंडून मधून मधून प्रभुनामाचा जप चाललेला पाहून तर त्या राजाला परम कौतुक वाटलें.

साकी-

देखुनि सुंदर बाळक राजा उचलुनि कडिये घे तें ।

उदकें त्याचे लोचन पुशितां निर्जरवाणी वदते ॥

राया तुजला पुत्र दिला हा घेउन जाय घरासी ।

ऐसें ऐकुनि राय तोषला आणी निजनगरासी ॥

तें सुंदर बालक पाहून त्यानें त्याला तत्काल उचलून कडेवर घेतलें आणि त्याचे डोळे तो पाण्यानें पुसून काढूं लागला; इतक्यांत आकाशवाणी झाली कीं, ’हे राजा, तुला हा पुत्र मीं दिला आहे. ह्याला घेऊन घरीं जा.’ हें ऐकून राजानें हर्षपूर्वक त्या बालकाला आपल्या नगराला आणिलें. चंद्रहासास घरीं आणून राजानें त्याला आपल्या मेधावती राणीच्या स्वाधीन केलें आणि आकाशवाणी सांगितली. ती ऐकून तिला मोठा हर्ष झाला आणि त्या बालकाविषयीं तिच्या मनांत पुत्रप्रेम उत्पन्न झालें. त्या दोघांनीं चंद्रहासाचें उत्तम प्रकारें पालनपोषण केलें. त्याला राजपुत्राचे सर्व सुखोपभोग मिळूं लागले. क्षत्रियाला उचित असें शिक्षण देऊन त्याला शस्त्रविद्या, धनुर्विद्या, व्यवहारधर्म इत्यादि सर्व गोष्टींत निष्णात केलें.

दिंडी-

वेदशास्त्रीं त्याजला श्रम न कांहीं,

धनुर्वेदीं शस्त्रास्त्रनिपुण पाहीं ।

षोडशाब्दें होतांचि मही सर्व,

जिंकुनीयां झाडिले वीरगर्व ॥

वेदशास्त्राध्ययनांत त्याला कांहीं श्रम पडले नाहींत; तसेंच धनुर्वेद शिकून तो लवकरच शस्त्रास्त्रनिपुण झाला. सोळा वर्षांचा तो झाला नाहीं, तोंच त्यानें स्वपराक्रमानें सर्व पृथ्वी जिंकून निखिअ वीरांचे गर्व जिरवून टाकिले. त्याचे सद्गुण, हुशारी व पराक्रम पाहून राजा त्याच्याच तंत्रानें राज्यकारभार पाहूं लागला.

ओंवी-

रायें जाणून पराक्रम थोर, दिधला त्यातें राज्यकारभार ।

म्हणे आपुला स्वामी कुंतलेश्वर, करभार दीजे त्यासी ॥

आपल्या पुत्राचें थोर सामर्थ्य लक्षांत आणून राजानें सर्व राज्यकारभार त्याच्या स्वाधीन केला आणि तो त्याला म्हणाला,’कुंतलाधिपतीला दरसाल आम्ही खंडणी देत असतों, ती या वर्षीं तूं स्वतःच घेऊन जावी.’ त्यावर चंद्रहास म्हणाला, ’बाबा, त्याला आम्हीं खंडनी काय म्हणून द्यावयाची ? ती देण्याचें कांहीं कारण आहे असें मला वाटत नाहीं. पाहिजे असल्यास तोच आमच्यावर चालून येऊं द्या, म्हणजे मीच त्याची चांगली खोड मोडतों, इतकेंच नव्हे, तर आपल्या पायांपाशीं त्याला बांधून आणतों.’ कुलिंदनृपतीला पुत्राचें तें भाषण आवडलें नाहीं. तो म्हणाला, ’बाळा, स्वामिद्रोह कधीं करुं नये. युद्ध करुन विनाकारण प्राणहानि करण्यांत कांहीं फायदा आहे, असें मला वाटत नाहीं. तरी माझें म्हणणें तूं ऐकावें, हें बरें.’ चंद्रहास म्हणाला, ’मी सर्व देश जिंकितों व नंतर कुंतलेश्वराची खंडणी स्वतःच घेऊन कुंतलपुरास जाईन.’ पुढें चंद्रहासानें आपल्या अद्भुत पराक्रमानें आसपासचे सर्व देश जिंकिले आणि त्यांजकडून खंडणी घेतली. नंतर तो कुलिंदपुराला आला. चंद्रहासाचा पराक्रम पाहून राजाराणींस अत्यंत संतोष झाला. प्रजाजनांनीं चंद्रहासाचा मोठा गौरव केला. नंतर तो कुंतलेश्वराची खंडणी घेऊन गेला.

छंद-

चंद्रहास तो द्रव्य सत्वरा, घेउनी निघे कुंतलेश्वरा ।

दुष्टबुद्धि त्या ठेवुनी धना, त्याजला म्हणे चाल भोजना ॥

बापाच्या इच्छेनुसार खंडणीचें द्रव्य घेऊन चंद्रहास निघाला आणि कुंतलेश्वराकडे आला. तें द्रव्य दुष्टबुद्धि प्रधानानें जामदारखान्यांत नेऊन ठेविलें. चंद्रहासाला पाहतांच दुष्टबुद्धीला पूर्वींची आठवण झाली आणि तो त्याला निरखून पाहूं लागला, तों त्याची दृष्टि त्याच्या डाव्या पायाच्या तुटलेल्या बोटाकडे गेली. त्याबरोबर ज्याला मारण्याकरितां आपण मारेकरी घातले होते, तोच हा चंद्रहास होय, अशी त्याची खात्री झाली. मारेकरी चांडाळांनीं आपणाला खास फसविलें, नाहीं तर ’हा मुलगा जगला कसा ?’ अशा विचारानें तो दुःखी झाला. तथापि फिरुन एकदां यत्‍न करुन पहावा, असा विचार करुन त्यानें चंद्रहासाला आपल्या घरीं भोजनास बोलाविलें.

छंद-

येरु बोलतो या हरी-दिनीं, अन्न भक्षितां पाप हो जनीं ।

शासना करी तो अम्हां पिता, क्षुब्ध दुर्मती होय ऐकतां ॥

चंद्रहास म्हणाला, ’आज हरि-दिन आहे. या दिवशीं जो भोजन करील, त्याला मोठें पाप लागत असतें. शिवाय माझा पिताहि मला शासन केल्यावांचून राहणार नाहीं. ’ हें चंद्रहासाचें उत्तर ऐकतांच तो दुष्टबुद्धि क्षुब्ध झाला. मग----

श्लोक-

निरोप देऊनि नृपात्मजाला, येऊनि वंदी मग राजयाला ।

बोले कुलिंदात्मज माजला हो, दंडूनि येतों तरि त्याजला हो ॥

त्या कुलिंदात्मजाला-चंद्रहासाला निरोप देऊन तो दुष्टबुद्धि राजाकडे आला आणि म्हणाला, ’ हा कुलिंदपुत्र अति माजून गेला आहे, महाराजांनीं परवानगी दिल्यास मी त्याजवर स्वारी करतों आणि त्याचें योग्य तें शासन करुन येतों.’ राजानें तसें करण्यास अनुज्ञा दिली व राजकन्या चंपकमालती उपवर झाली आहे तिला योग्य पति पाहून यावें म्हणूनहि सांगितलें. दुष्टबुद्धीला विषया नांवाची मुलगी होती. तीहि लग्नाला योग्य झाली होती. तेव्हां मुलींना वर पाहण्याच्या निमित्तानें बाहेर निघून चंद्रहासाचा नाश करावा, असा निश्चय दुष्टबुद्धीनें केला.

आर्या-

दाखवितां न क्रोधा युक्तिनेंचि स्वकार्यभागा या ।

साधीन मग न लागे स्वांगें युद्धांत लेश भागाया ॥

क्रोधाचें चिह्न किमपिहि वर न दाखवितां युक्तीनेंच आपला हा कार्यभाग मी साधीन. मग मला युद्धांतील श्रम सोसण्याचें कारण पडणार नाहीं. अशा विचारानें तो दुष्टबुद्धि कुलिंदाच्या चंदनावती नगरींत तत्काल आला आणि राजास भेटून म्हणाला, ’राजनू, आपला चिरंजीव अत्यंत सुंदर, विद्यावान् आणि शूर आहे. त्याला भेटण्याची आमच्या महाराजांना फार इच्छा झाली आहे. कदाचित् जमल्यास त्याला ते आपला जांवईहि करतील. तरी त्याला पाठवा. मी दुसरें काम असल्यामुळें त्याजबरोबर जाऊं शकत नाहीं. तरी मी माझ्या मदननामक पुत्रास पत्र देतों. चंद्रहासाची सर्व व्यवस्था तो करील.’ असें म्हणून दुष्टबुद्धीनें पत्र लिहिलें, त्यांतील मजकूर असा होता---

ओंवी-

सहस्त्रायु चिरंजीव मदना, माझी तुजला हेचि आज्ञा ।

चंद्रहासा पाठविलें सदना, विष यासी देइजे ॥

चिरंजीव मदन यास----

आशीर्वाद विशेष. इकडील मजकूर, आपल्या भेटीस कुलिंदपुत्र चंद्रहास येत आहे. त्यास विष देण्यास विलंब लावूं नये. याबद्दल कोणाची सल्लामसलतहि घेण्याची जरुर नाहीं. वर लिहिल्याप्रमाणें करण्यास चुकूं नये. कळावें, हे आशीर्वाद.

दिंडी-

कुलिंदातें वंदुनी चंद्रहास, हयीं होउन आरुढ कुंतलास ।

जाय मार्गीं घ्यावया विसाव्यांसी, त्वरें उतरे आरामिं पुरापाशीं ॥

चंद्रहासानें आपल्या मातापितरांचा निरोप घेतला आणि तो हयारुढ होऊन कुंतलपुरास जाण्यास निघाला. कुंतलपुरास आल्यावर जवळच दुष्टबुद्धीच्या रम्य उपवनांत कांहीं काळ विश्रांतीस्तव उतरला. त्या बागेंत चंद्रहासानें आपला घोडा एका झाडास बांधला आणि बिछाना टाकून विश्रांती घेण्याकरितां त्यावर पडला असतां थोडयाच वेळांत त्याला गाढ झोंप लागली. इतक्यांत---

आर्या-

तेथें आली होती मंत्रिसुता तैंच वनविहारातें ।

पाहे नृपात्मजा ती खुडितां कुसुमांसि सुतनुहारातें ॥

ये एकटि त्यानिकटीं अन्यस्थळिं धाडुनी सख्या सुमनां ।

शफरिध्वजसमरुपा पावुनि आल्हाद पावली सुमना ॥

त्याच स्थळीं प्रधानकन्या विषय ही वनक्रीडा करण्याकरितां आली होती. सुंदर हार करण्यासाठीं फुलें खुडीत असतां तिनें त्या राजकुमार चंद्रहासाला पाहिलें. आपल्या मैत्रिणींना पुष्पांकरितां दुसर्‍या ठिकाणीं पाठवून ती त्या राजपुत्राच्या अगदीं जवळ येऊन ठेपली. राजपुत्राचें मदनासारखें तेज पाहून तिच्या मनाला थोर आनंद झाला.

छंद-

रुप देखतां रम्य तें अती, होउ प्राप्त हा म्हणतसे पती ।
सुप्त देखुनि निकट पातली, वस्त्रग्रंथिका नयनिं देखिली ॥

चंद्रहासाचें तें रम्य रुप पाहतांच ’हाच आपणाला पति प्राप्त व्हावा’ अशी तिला आशा उत्पन्न झाली. त्याला गाढ झोंप लागली आहे, असें पाहून ती त्याच्या अगदीं जवळ आली, इतक्यांत धोतराच्या गांठींत असलेलें पत्र तिच्या दृष्टीस पडलें आणि तिला आपल्या पित्याच्या अक्षरासारखें त्यांतील अक्षरांचें वळण दिसलें. म्हणून----

साकी-

सोडुन ग्रंथी पत्र देखतां पाहे निज जनकाचें ।

वाचुनि विप्रिय म्हणे तांतडी चुकलें अक्षर साचें ॥

नेत्रींचें मग कज्जल काढुनि अक्षर तेथें लिहिते ।

विषया दीजे ऐसें करुनी बांधि पुन्हां ग्रंथीतें ॥

विषयेनें गांठ सोडून पत्र पाहिलें, तों तें आपल्याच पित्याचें आहे, असें तिला कळून आलें. वाचून पाहते तों आंतील अप्रिय मजकूर पाहून तिला वाटलें कीं घाईनें पत्र लिहिल्यामुळें ’विष’ या अक्षरापुढील ’या’ हें अक्षर राहून गेलें असावें. माझे वडील मदनासारख्या या सुंदर राजपुत्राचा वध करण्याविषयीं आपल्या पुत्रास कसें बरें लिहितील ? ईश्वरी प्रेरणेनें हें पत्र माझ्या हातांत पडलें, हें मोठें सुदैवच होय. असें म्हणून तिनें डोळ्यांतील काजळ काढलें आणि ’विष’ या शब्दापुढें ’या’ हें अक्षर जोडून ’विषया’ शब्द केला. नंतर तें पत्र होतें तसें ठेवून ती प्रधानकन्या आपल्या घरीं निघून गेली.

साकी-

ऐसें साधन करुनी गेली जागृत नृपसुत झाला ।

होउनि अश्वारुढ सत्वरी सचीवसदनीं आला ॥

असें साधन करुन ती प्रधानकन्या गेल्यावर राजपुत्र जागा झाला आणि पुनः घोडयावर बसून तो सचिवाच्या मंदिरीं आला.

साकी-

भेटुनि मदना पत्र दीधलें वाचुनियां तो पाहे ।

जननीलागीं कळवुनि करितो साहित्या लवलाहें ॥

प्रधानपुत्र मदनाची भेट घेऊन चंद्रहासानें तें पत्र त्याला दिलें. मदनानें तें वाचून पाहिलें. त्याला मोठा आनंद झाला. त्यानें तत्काल ती गोष्ट आईला कळविली आणि तिच्या मतानें विषया व चंद्रहास यांच्या लग्नाचें सर्व साहित्य ताबडतोब सिद्ध केलें.

ओंवी-

ब्राह्मण पाचारिले बहुत, वर्‍हाडी मिळाले असंख्यात ।

मदनस्त्रिया करवल्या होत, चंद्रहास नृपाच्या ॥

यथासांग जाहलें लग्न, विप्रां दिधलें अपार धन ।

इकडे प्रधानें नगर लुटून, कुलिंद बंदीं घातला ॥

अनेक ब्राह्मणांना निमंत्रण करुन बोलाविलें, वर्‍हाडीहि असंख्यात गोळा झाले आणि मदनस्त्रिया चंद्रहास राजाच्या करवल्या झाल्या. अशा रीतीनें विषया व चंद्राहास यांचें लग्न यथासांग होऊन ब्राह्मणांनाहि अपार धन वांटलें गेलें. इकडे दुष्टबुद्धि प्रधानानें कुलिंदनगर लुटून राजाला बंदींत घातलें.

आर्या-

येतां गृहासि पंथीं भेटुनि कथि वृत्त भोगि निज वदनें ।

मी तों यद्धनरक्षक जातों हरिलेंचि सर्व या मदनें ॥

नंतर प्रधान आपल्या गृहाला येण्याकरितां निघाला असतां मार्गांतच त्याला ग्रामाधिकार्‍याकडून विषया व चंद्रहास यांच्या लग्नाचें वृत्त समजलें. तो चरफडत म्हणाला, ’हायहाय, आजपर्यंत ह्याच्या धनाचा जणुं काय मी रक्षकच होतों; काय करणार ? आतां मी जातों ! या मदनानें सर्व संपत्ति उधळून टाकिली. ही विपरीत गोष्ट यानें केली तरी कशी ?’

दिंडी-

पुढें येतां विप्र ते भेटताती, धन्य तुमचा हो पुत्र बोलताती ।

चंद्रहासा विषयेसि अर्पियेलें, ऐकतां हें क्षोभला तये वेळे ॥

त्याहूनहि जरा पुढें जातो, तों ब्राह्मणांचे थवेच्या थवे येतांना त्याला आढळले. ते म्हणाले, ’प्रधानजी, तुमचा पुत्र धन्य आहे. त्यानें चंद्रहासाशीं विषयेचें लग्न लाविलें. ही पहा केवढी केवढी ब्राह्मणदक्षिणा प्रत्येकाला दिली ती !’ हें ऐकतांच त्या प्रधानाला अत्यंत क्षोभ उत्पन्न झाला.

श्लोक-

ताडूनि ते द्विज बळें धन घे हिरोनी,

धांवूनि ये अहि तसा सदना निघूनी ।

क्रोधें तदा निज सुताप्रति शब्द लावी,

आणूनि येरु मग पत्र पित्यास दावी ॥

त्या ब्राह्मणांना दुष्टमतीनें तारण करुन त्यांजकडील द्रव्य हिरावून घेतलें. नंतर संतप्त सर्पाप्रमाणें तो आपल्या गृहीं त्वरेनें आला आणि आपल्या पुत्राला संतापानें शब्द लावून बोलला कीं ’तूं असें कसें केलेंस ?’ मग मदनानें त्याचें पत्र आणलें आणि दाखविलें. पत्र वाचून पाहतो तों ’विष’ या शब्दापुढें ’या’ हें अक्षर चुकून पडल्याचें त्याला आढळलें. मग---

आर्या-

निज पत्र देखतांची राहुन उगला म्हणे कशी भूल ।

पडली मम नेत्रांसी कीं प्राक्तन जाहलेंचि प्रतिकूल ॥

आपलें पत्र दृष्टीस पडतांच दुष्टबुद्धि उगा राहिला आणि म्हणाला, ’असा मोह माझ्या नेत्रांस कसा पडला ? माझें दैवच प्रतिकूल, तेथें करणार तरी काय ? इलाज नाहीं ? ’

श्लोक-

पुत्रातें मग शब्द लावुनि म्हणे हें तूं न केलें बरें,

रायातेम तरि जाउनी कळविजे आतां अती सत्वरें ।

सांगे तो मग वृत्त भूमिपतितेम क्षोभे प्रभू ऐकतां,

वर्जूनी मम कन्यकेसि सचिवें केलें स्वकीया हिता ॥

नंतर आपल्या पुत्राला-मदनाला-दोष लावून दुष्टबुद्धि बोलला, ’मदना, ही गोष्ट तूं ठीक केली नाहींस. आतां तरी त्वरा करुन जा आणि राजाला सर्व वृत्त सांगून ये.’ नंतर मदन राजाकडे गेला आणि त्याला त्यानें सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून कुंतलेश्वर क्षुब्ध झाला आणि म्हणाला, ’या सचिवानें माझ्या कन्येकडे दुर्लक्ष करुन आपलेंच हित साधलें ! या दुष्टानें मला फसविलें, तरी आतां त्याच चंद्रहासाला या राजवाडयांत पाचारण करुन त्याला चंपकमालती द्यावी, म्हणजे झालें, ’ असें त्यानें ठरविलें.

साकी-

कोणी म्हणती त्याच वरासी चंपकमालति द्यावी ।

मदनासंगें गज-रथ-शिबिका देउन वर तो अणवी ॥

कोणीं राजाला सल्ला दिला, ’महाराज, विचार कसला करतां ? त्याच वराला चंपकमालती द्यावी, हें योग्य आहे.’ नंतर राजानें त्याच दुष्टबुद्धीच्या मदन पुत्राबरोबर गज, रथ, पालख्या वगैरे पाठवून त्या चंद्रहास वराला आणविलें आणि मोठया थाटामाटांत चंद्रहास-चंपकमालतींचें लग्न लाविलें. इतका प्रकार झाला, तरी त्या दुष्ट प्रधानाचे डोळे उघडले नाहींत. दुष्ट तो दुष्टच होय, तो कधींहि सुष्ठ होत नाहीं. त्यानें चंद्रहासाच्या नाशाचा नवीन डाव योजिला.

साकी-

दुष्टबुद्धिनें इकडे तेव्हां केली पातककरणी ।

प्राणघातकी अंत्यज आणुनि सांगे त्यांचे कर्णीं ॥

नगराबाहिर जगदंबेच्या आलयिं प्रथमचि जाणा ।

घेउनि पूजा येइल त्याच्या हरणें सत्वर प्राणां ॥

त्यानें पापकर्मं असें केलें कीं, मारेकरी अंत्यजांना बोलावून त्यांना गुप्त रीतीनें सांगितलें कीं, ’जो कोणी नगराबाहेरील जगदंबेच्या देवालयांत पूजासाहित्य घेऊन प्रथम येईल, त्याचा वध करा !’ नंतर चंद्रहासास बोलावून त्याला प्रधान म्हणाला, ’बा चंद्रहासा, लग्न झाल्यावर रात्रीं जांवयानें एकटेंच देवीच्या पूजनास जावें, असा राजेसाहेबांचा कुलधर्म आहे. तरी आज रात्रीं तुम्हीं पूजासाहित्य घेऊन देवीच्या पूजनास जावें.’ चंद्रहासानें ती गोष्ट मान्य केली.

साकी-

कलिंदपुत्रा मग तो दुर्जन पाठवि शक्तिपुजेसी ।

पथिं येतां त्या मदन भेटुनी सांगे प्रभुवचनासी ॥

कुलिंदपुत्राला असें सांगून दुष्टबुद्धीनें त्याला देवीपूजेला पाठविलें. परंतु ईश्वरी योजना वेगळीच होती. चंद्रहास पूजासाहित्य घेऊन देवळाकडे निघाला, तों वाटेंतच त्याला मदन भेटला आणि त्यानें कुंतलेश्वराचें म्हणणें त्याला सांगितलें. तो म्हणाला, ’आपणाला महाराजांनीं बोलाविलें आहे, तरी आपण तिकडे जावें. मी हें पूजासाहित्य घेऊन देवळांत जातों. आपण आल्यावर पूजन करावें.’ असें सांगून मदन देवीच्या देवालयाकडे व चंद्रहास राजवाडयांत जावयास निघाला.

ओंवी-

मदन म्हणे मी जाईन, येतों पूजनसाहित्य ठेवून ।

पापकर्माची गति गहन, ब्रह्मादिकां नेणवे ॥

पापकर्माची गति एवढी गहन आहे कीं ती ब्रह्मादिकांनाहि समजत नाहीं. नाहींतर ’मी पूजासाहित्य घेऊन देवळांत जातों, तुम्ही राजवाडयांत जा.’ असें म्हणण्याची बुद्धि मदनाला सुचलीच नसती ! त्या रात्रीं राजानें मोठी मिरवणूक काढून चंद्रहासाला नगरांतून मिरविलें. मिरवणूक दुष्टबुद्धीच्या वाडयाकडे आलेली पाहतांच त्याच्या मनांत धस्स झालें. चंद्रहास देवीच्या देवळांत गेला नाहीं, हें कसें झालें, म्हणून दुष्टबुद्धि स्वतः जाऊन पाहतो, तों आपला पुत्र मदनच तेथें मृत होऊन पडलेला त्याच्या दृष्टीस पडला. आपली दुर्दशा व दैवाची प्रतिकूलता पाहून आतां मात्र त्याचे डोळे उघडले.

आर्या -

देखुनि मृत पुत्रातें मूर्च्छित तो होउनी पडे धरणीं ।

दुःखें प्राणांसि त्यजी ज्याची त्यासचि फळासि ये करणी ॥

आपल्या मरुन पडलेल्या पुत्राला पाहतांच दुष्टबुद्धि मूर्च्छित होऊन भूमीवर पडला. सावध झाल्यावर दुःखानें वेडा होऊन तेथेंच खांबावर डोकें आपटून त्यानें प्राण दिला. यासंबंधीं एक गोष्ट अशी आहे कीं, कोणी बैरागी भजनांत ’ज्याची त्यासचि फळासि ये करणी’ असें म्हणत असे. तें एका जारिणी स्त्रीनें ऐकून ती मनांत म्हणाली कीं माझें कर्म जाणून हा माझी निंदा करीत घरोघर फिरतो; म्हणून यासच जिवें मारावें. असा विचार करुन तिनें अन्नांत विष घालून तें त्या बैराग्यास दिलें. बैराग्यास त्या दिवशीं भूक नसल्यामुळें त्यानें आपली झोळी खुंटीस लावली. त्याच रात्रीं त्या स्त्रीचे बंधु व पुत्र गांवास गेले होते, ते घरीं येत असतां रात्र झाली व वेशी लागल्या. तेव्हां त्या बैराग्याचेच घरीं ते उतरले. बैराग्यानें झोळींतील अन्न त्या पाहुण्यांस भक्षावयास दिलें. तें सेवन करुन ते निजले असतां जागचे जागींच मृत झाले. प्रातःकाळीं ते मेल्याचें वर्तमान गांवांत कळल्यावर त्या बाईच्या नवर्‍यानें त्यांस उचलून घरीं नेलें. रोजच्याप्रमाणें तो बैरागी गांवांत भिक्षा मागत व ’ज्याची त्यासचि फळासि ये करणी’ म्हणत फिरतांना तिनें पाहिला. त्यावरुन विस्मय पावून बैरागी कसा वांचला, ह्याचें तिला मोठें आश्चर्य वाटलें. इतक्यांत मृत बंधु व पुत्र यांस घेऊन आपला पतिच येत आहे, असें पाहून बैराग्याचें म्हणणें खरें आहे, असें तिला वाटलें व तिला मोठा पश्चात्ताप झाला. मग ती त्या बैराग्यास अनन्य शरण गेली व आपलें सर्व कपट तिनें त्याला सांगितलें आणि क्षमा मागितली. साधुपुरुष म्हणजे दयासागरच होत. तिची प्रार्थना ऐकून त्या सत्पुरुषास दया आली आणि त्यानें तत्काळ तिचा बंधु व पुत्र यांस जिवंत केलें. तात्पर्य हेंच कीं ज्यानें जसें कर्म करावें, तसेंच त्यास भोगावें लागतें. जामात चंद्रहासाचा घात दुष्टबुद्धीनें योजिला, त्यामुळें अंतीं त्याचाच पुत्र मृत झाला. तें पाहून त्यानेंहि आपला प्राणत्याग केला. म्हणून कवि म्हणतात--’ज्याची त्यासचि फळास ये करणी.’ पुढें---

साकी-

चंद्राहास मग दोन्ही कांता घेउनि नृपगृहिं आला ।

वाद्यगजरिं बहु आनंदानें सिंहासनस्थ झाला ॥

चंद्रहास आपल्या दोन्ही स्त्रियांस बरोबर घेऊन मोठया गजरानें राजमंदिरीं आला आणि मोठया आनंदानें सिंहासनावर बसला.

दिंडी-

अन्य दिवशीं गुरव ते येउनीयां, चंद्रहासा सांगती वंदुनीयां ।

दुष्टबुद्धीसहित तो मदन जाण, शक्तिभुवनीं पडियाल गतप्राण ॥

चंद्रहासें यापरी भाषणासी, ऐकुनीयां पातला देउळासी ।

प्रार्थि पूजुनियां भावयुक्त चंडी, अनुष्ठाना करितसे सुशतचंडी ॥

दुसर्‍या दिवशीं गुरव आले आणि चंद्रहासाच्या पदांला वंदन करुन म्हणाले, ’महाराज जगदंबेच्या देवळांत दुष्टबुद्धीसहित मदन मृत होऊन पडला आहे.’ गुरवाचें भाषण ऐकल्यावर चंद्रहास त्या देवळांत आला, त्यानें भक्तिपूर्वक चंडीचें आराधन केलें आणि शतचंडीचें उत्तम प्रकारचें अनुष्ठान करण्यास प्रारंभ केला.

पद-

आदिमाये शंभुप्रिये पाव त्वरें आतां,

तुजवीण दीन जना नाहिं कोणि त्राता ॥आदि०॥ध्रु०॥

हरुनियां दुःखभया देसि सौख्य भक्तां,

म्हणुनियां शरण आलों वारिं शीघ्र चिंता ॥आदि०॥१॥

गातां तुझे गुण मुखें वेद मौनावले

चरणांसी लागतांचि फार सुखावले ॥आदि०॥२॥

धांवुनीयां वेगें आतां माये तूं न येसी,

दास म्हणे प्राण तरी जाईल निश्चयेंसीं ॥आदि०॥३॥

’हे आदिमाये, हे शंभुप्रिये, आतां त्वरित मला पाव ! दीनांना तुझ्यावांचून दुसरा त्राता कोण बरें आहे ? भक्तांचें दुःखभय हरुन तूं त्यांना सौख्य देतेस. म्हणूनच तुला मी शरण आलों आहें. माझी चिंता हरण करणारी तूंच आहेस ! तुझे गुण गातां गातां वेदहि मौनावले ! तुझ्या चरणीं शरण येऊन अनेकांना सौख्य झालें आहे ! हे माये, तूं आतां सत्वर धांवून आली नाहींस, तर माझा प्राण निश्चयपूर्वक जाईल !’

साकी-

प्रसन्न होउन वरद अंबिका उठवी प्रधान-मदनां ।

जयजयकारें सर्व गर्जती वर्षति सुरगण सुमनां ॥

कथिती येउनि दूत चंदनावतिच्या वृत्तांतासी ।

दुष्टबुद्धिनें बंदिं घातलें कुलिंदनृपती यासी ॥

अंबिका देवीनें प्रसन्न होऊन प्रधान दुष्टबुद्धि आणि त्याचा पुत्र मदन यांस पुनः जीवंत केलें. त्यामुळें सर्वांनीं जयजयकार केला आणि देवांनीं पुष्पवृष्टि केली. इकडे चंदनावतीहून दूत येऊन त्यांनीं कुलिंदराजाला दुष्टबुद्धीनें कैदखान्यांत घातल्याचें वृत्त सांगितलें.

ओंवी-

ऐसी पडतां वार्ता कानीं, सद्गद झाला अंतःकरणीं ।

सेवक धाडून गजरें आणी, सपरिवार पितयातें ॥

चंद्रहासाला अत्यंत दुःख झालें. त्यानें सेवक पाठवून आपल्या पित्यास मोठया थाटानें नगरांत सपरिवार आणविलें आणि दुष्टबुद्धीला घरीं बसवून प्रधानकीचीं वस्त्रें मदनाला दिलीं. असें केल्यानें सर्व प्रजा सुखांत नांदूं लागल्या आणि त्यांचें दैन्य निघून गेलें.

साकी-

हयमेधीं हें चरित्र पावन नारद पार्था सांगे ।

कृष्णदास म्हणे गातां प्रीतीं अगणित पुण्यहि लागे ॥

श्रोते परिसावी, भक्तलीला हे बरवी ॥

अश्वमेध यज्ञाचे वेळीं हें पवित्र चंद्रहासाचें चरित्र नारदमुनींनीं अर्जुनाला सांगितलें. कृष्णदास कवि म्हणतात हें गाइल्यानें अगणित पुण्य लागतें अशी याची योग्यता आहे. ही श्रेष्ठ प्रकारची भक्तलीला श्रोत्यांनीं ऐकण्यासारखी आहे. सारांश, ज्यांनीं भगवंताला हृदयस्थ केलें, त्यांस जय आणि लाभ यांची प्राप्ति अनायासेंच होत असते. यास्तव तुकोबा म्हणतात----

सांठविला हरि, जींहीं हृदयमंदिरीं ॥

त्यांची सरली येरझार, झाला सफळ व्यापार ॥

अशा रीतीनें वागणार्‍यांचें चौर्‍यांशीं लक्ष योनींतील जन्ममरण नाहींसे होतें व त्यांचे सर्व मनोरथ परिपूर्ण होतात. यासाठीं साधूंच्या वचनावर भरंवसा ठेवून तदनुसार वर्तावें आणि प्रभूजवळ हेंच मागणें मागावें कीं----

अभंग-

हेंचि दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

नलगे मुक्ति धनसंपदा, संतसंग देंई सदा ॥३॥

तुका म्हणे गर्भवासीं, सुखें घालावें आम्हांसी ॥४॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्धयात्मना वानुसृतस्वभावात् ।

करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पये तत्‌ ॥

अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥

पुंडलीकवरदा हरिविठ्ठल, पार्वतीपते हरहर महादेव,

सीताकांतस्मरण जयजय राम, श्रीगुरुदेव दत्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP