निवडक अभंग संग्रह १३
निवडक अभंग संग्रह १३
*
लागोनियां पाया विनवितो तुम्हांला । कर टाळीं बोला मुखें नाम ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा । हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं ॥२॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥३॥
सकळांसी येथें आहे अधिकार । कलियुगीं उद्धार हरिनामें ॥४॥
तुका म्हणे नामापासीं चारी मुक्ति । ऎसें बहु ग्रंथीं बोलियेलें ॥५॥
*
कामामध्ये काम । कांही म्हणा राम राम । जाईल भवश्रम । सुख होईल दु :खाचें ॥१॥
कळो येईल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळी । रांडापोरें सकळ ॥२॥
जीतां जिसी जैसा तैसा । पुढें आहे रे वोळसा । उगवुनी फ़ांसा । काय करणें तें करीं ॥३॥
केलें होतें याचि जन्मे । अवघें विठोबाच्या नामें । तुका म्हणॆ कर्मे । जाळोनिया तरसी ॥४॥
*
काय नव्हे केलें । एक चिंतितां विठ्ठले ॥१॥
सर्व साधनांचे सार । भवसिंधु उतरी पार ॥२॥
योग याग तपें । केली तयानें अमुपें ॥३॥
तुका म्हणॆ जपा । मंत्र त्रिअक्षरी सोपा ॥४॥
*
फ़ळकट तों संसार । येथें सार भगवंत ॥१॥
ऎसें जागवितों मना । सरसें जनसहित ॥२॥
अवघें निरसुनि काम । घ्यावे नाम विठोबाचें ॥३॥
तुका म्हणॆ देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥४॥
*
हांकेसरिसी उडी । घालुनियां स्तंभ फ़ोडी ॥१॥
ऎसें कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥२॥
करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥३॥
तुका म्हणॆ गीतीं गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥४॥
*
मुखी नाम हातीं मोक्ष । ऎसी साक्ष बहुतांची ॥१॥
वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूंसी ॥२॥
भस्म दंड न लगे काठी । तीर्थ आटी भ्रमण ॥३॥
तुका म्हणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥४॥
*
पवित्र तें अन्न । हरिचिंतनी भोजन ॥१॥
येर वेठ्या पोट भरी । चाम मशकाच्या परी ॥
जेऊनि तो धाला । हरिचिंतनी केला काला ॥३॥
तुका म्हणॆ चवीं आलें । जें कां मिश्रित विठ्ठलें ॥४॥
*
पंढरीसी जा रे आल्यांनो संसारा । दीनाचा सोयरा पांडूरंग ॥१॥
वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळु तांतडी उतावीळ ॥२॥
मागील परिहार पुढें नाही सीण । झालियां दर्शन एक वेळां ॥३॥
तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्तीं निवडेना ॥४॥
*
होय होय वारकरी । पाहें पाहें रे पंढरी ॥१॥
काय करावी साधनें । फ़ळ अवघेंचि तेणॆं ॥२॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥३॥
तुका म्हणॆ डोळां । विठो बैसला सांवळा ॥४॥
*
पंढरीची वारी आहे माझें घरीं । आणिक न करीं तीर्थव्रत ॥१॥
व्रत एकादशी करीन उपवासी । गाईन अहर्निशीं मुखीं नाम ॥२॥
नाम विठोबाचें घेईन मी वाचे । बीज कल्पांतींचे तुका म्हणॆ ॥३॥
*
जोडोनिया धन उत्तम विव्हारें । उदास विचारें वेंचि करी ॥१॥
उत्तमचि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥२॥
परउपकारी नेणॆं परनिंदा । परिस्त्रिया सदा बहिणी माय ॥३॥
भुतदया गाई पशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनमाजी ॥४॥
शांतिरुपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्व वडिलांचे ॥५॥
तुका म्हणे हेंचि आश्रमाचें फ़ळ । परमपद बळ वैराग्याचें ॥६॥
*
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडूरंगा ॥१॥
देह हे काळाचे धन कुबेराचे । येथें मनुष्याचे काय आहे ॥२॥
देता देवविता नेता नेवविता । तेथे याची सत्ता काय आहे ॥३॥
निमित्ताचा धणी केला असे प्राणा । माझे माझें म्हणॊनि व्यर्थ गेला ॥४॥
तुका म्हणे कां रे नाशिवंतासाठीं । देवासवें आटी पाडितोसी ॥५॥
*
आतां उघडी डोळे । जरि अद्यापि न कळे । तरी मातेचिया खोळे । दगड आला पोटासी ॥१॥
मनुष्य देहा ऎसा निध । साधील ते साधा सिद्ध । करुनि प्रबोध । संत पार उतरले ॥२॥
नाव चंद्रभागेतीरीं । उभी पुंडलीकाचें द्वारीं । कट धरुनियां करीं । उभाउभी पालवी ॥३॥
तुका म्हणे फ़ुकासाठी । पायीं घातलीया मिठी । होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥४॥
*
कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥१॥
बाळा दुधा कोण करिते उप्तत्ति । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥२॥
फ़ुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥३॥
तेणॆ तुझी काय नाहीं केली चिंता । राहो त्या अनंता आठवूनि ॥४॥
तुका म्हणे ज्याचे नांव विश्वंभर । त्याचे निरंतर ध्यान करीं ॥५॥
*
हरि हरि तुम्ही म्हणा रे सकळ । तेणॆं मायाजाळ तुटतील ॥१॥
आणिक नका पडूं गाबाळाचे भरी । आहे तिथे थोरी नागवण ॥२॥
भावें तुळसीदळ पाणी जोडा हात । म्हणावें पतित वेळोवेळा ॥३॥
तुका म्हणे हा तंव कृपेचा सागर । नामासाठीं पार पाववील ॥४॥
*
सकळिकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवितसें ॥१॥
अहो श्रोते वक्ते सकळही जन । बरें पारखुन बांधा गाठीं ॥२॥
फ़ोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भार वाही ॥३॥
तुका म्हणे चाली झाली चहूं देशीं । उतरला कसीं खरा माल ॥४॥
*
आतां तरी पुढे हाचि उपदेश । नका करुं नाश आयुष्याचा ॥१॥
सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥२॥
हित तें करावें देवाचे चिंत्तन । करुनियां मन शुद्ध भावें ॥३॥
तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फ़ार शिकवावें ॥४॥
*
निर्वाहापुरतें अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोंपी गुहा ॥१॥
कोठेंही चित्तासीं नसावें बंधन । ह्रुदयी नारायण सांठवावा ॥२॥
नये बोलों फ़ार बैसोंजनामधीं । त्रिगुणांची गोवी उगवूनि ॥४॥
*
नम्र झाला भुतां । तेणें कोंडिलें अनंता ॥१॥
हेंचि शुरत्वाचे अंग । हारि आणिला श्रीरंग ॥२॥
अवघा हा झाला पण । लवण सकळां कारण ॥३॥
तुका म्हणे पाणी । पातळपणें तळा खणी ॥४॥
*
ऎका गाए अवघे जन । शुद्ध मन तें हित ॥१॥
अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावें ॥२॥
नाही कोणी सवें येता । संचिता या वेगळा ॥३॥
बरवा अवकाश आहे । करा साहे इंद्रियें ॥४॥
कर्मभूमी ऎसा ठाव । वेवसाव जाणावा ॥५॥
तुका म्हणे उत्तम जोडी । जातीघडी नरदेह ॥६॥
*
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणिक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥
सत्य तोचि धर्म असत्य तें कर्म । आणिक हें वर्म नाहीं दुजें ॥२॥
गति तेचि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखता ॥३॥
संतांचा संग तोचि स्वर्गवास । नरक तो उदास अनर्गळ ॥४॥
तुका म्हणे उघडे आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥५॥
N/A
N/A
Last Updated : January 23, 2008
TOP