निवडक अभंग संग्रह ८
निवडक अभंग संग्रह ८
*
ज्ञानदेवें उपदेश करुनिया पाही । सोपान मुक्ताई बोधियेली ॥१॥
मुक्ताईनें बोध खेचरासीं केला । तेणें नामियास बोधियलें ॥२॥
नाम्याचें कुटुंब चांगा वटेश्वर । एका जनार्दनीं विस्तार मुक्ताईचा ॥३॥
*
जो निर्गुण निराभास । जेथुनि उद्भव शबल ब्रह्मास । आदिनारायण म्हणती ज्यास ।
तो सर्वास आदिगुरु ॥१॥
तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत । ब्रह्मा अत्रीस उपदेशीत । अत्री पाद प्रसादीत । श्री अवधूत दत्तात्रय ॥२॥
दत्तत्रय परंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा । जनार्दन शिष्य तिसरा परंपरा । केला खरा कलियुगीं ॥३॥
जनार्दन कृपेस्तव जाण । समूळ निरसलें भवबंधन । एका जनार्दनीं शरण । झाली संपूर्ण परंपरा ॥४॥
*
अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचें आतां । चरणीं जगन्नाथा चित्त ठेलें ॥१॥
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ॥२॥
एका जनार्दनीं एकपणें उभा । चैतन्याची शोभा शोभतसे ॥३॥
*
ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथें आनु नाहीं विषम । एसें जाणती ते अती दुर्गम । तयांचि भेटी जालिया भाग्य परम ॥१॥
ऎसें कैसियानें भेटती ते साधू । ज्याचा अतर्क्य तर्कवेना बोध । ज्यांसी निजानंदी आनंदु । ज्याचा परमानंदी उद्वोधु ॥२॥
पवना घालवेल पालाण । पायीं चढवेल गगन । भुत भविष्य कळो येईल वर्तमान । परी त्या साधूचें न कळे महिमान ॥३॥
चंद्रामृत सुखें सेववेल । रवि अस्ता जाता धरवेल । बाह्या हेळा सागर तरवेल । परी त्या साधूची भेटी न होईल ॥४॥
जप तप करवेल अनुष्ठान । ध्येय ध्याता धरवेल निजध्यान । ज्ञेय ज्ञाता विवर्जित ज्ञान । ज्ञाना ध्यानाचे मूळ हे साधुजन ॥५॥
निजवृत्तीचा करवेल निरोधु । जीवाशिवाचा भोगवेल आनंदु । एका जनार्दनी निजसाधु । त्याच्या दर्शनें तुटे भवबंधु ॥६॥
*
सर्वांगी सुवास परि तो उगला न राहे । सभोंवतें तरुवर चंदन करीतचि जाये ॥१॥
धणी धाय परी त्याची भुक्ति न धाये । सागर भरिता परी त्या सरिता समाये ॥२॥
वैरागर मणी पूर्ण तेजाचा होय । सभोंवतें हारळ हिरे करीतचि जाय ॥३॥
एका जनार्दनीं पूर्ण जालासे निज । आपणासारिखें परी करीतसे दुजें ॥४॥
*
अजानवृक्षांची पानें जाण । जो भक्षून करील अनुष्ठान । त्यासी साध्य होईल ज्ञान । जेथें संशय नाही ॥१॥
ज्ञानेश्र्वरी तीन सप्तकें । जो श्रवण करील विवेकें । तो होय ज्ञानी अधिकें । येथे संशय नाहीं ॥२॥
मणिकर्णिका भागीरथी । इंद्रायणीचें स्नान करिती । ते मोक्षपदासी जाती । येथें संशय नाही ॥३॥
अश्वत्थ सिद्धेश्वर । समाधीसी करी नमस्कार । तो पावे मोक्ष पै सार । येथें संशय नाहीं ॥४॥
येथींचें वृक्षपाषाण । ते अवघे देव जाण । म्हणे एका जनार्दन । येथें संशय नाही ॥५॥
*
तीन अक्षरें निवृत्ति । जो जप करी अहोरात्रीं । तया सायुज्यता मुक्त्ती । ब्रह्मास्थिति सर्वकाळ ॥१॥
चार अक्षरें ज्ञानदेव । जो जप करी धरील भाव । तया ब्रह्मापदीं ठाव । ऎसें शिवादिदेव बोलिले ॥२॥
सोपान हीं तीन अक्षरें । जो जप करी निर्धारें । तयास ब्रह्म साक्षात्कारें । होय सत्त्वर जाणिजे ॥३॥
मुक्ताबाई चतुर्विधा । जो जप करील सदा । तो जाईल मोक्षपदा । सायुज्य संपदा पावेल ॥४॥
ऎसी हीं चौदा अक्षरें । जो ऎके कर्ण विवरें । कीं उच्चारी मुखद्वारे । तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे ॥५॥
एका जनार्दनीं प्रेम । जो जप करील धरील नेम । तयास पुन :नाही जन्म । ऎसें पुरुषोत्तम बोलिले ॥६॥
*
नित्य नवा कीर्तनीं कैसा वोढवला रंग । श्रोता आणि वक्ता स्वयें जाला श्रीरंग ॥१॥
आल्हादें वैष्णव करिती नामाचा घोष । हरिनाम गर्जतां गगनीं न माये हरुष ॥२॥
पदोपदीं कीर्तनीं निवताहे जन मन । आवडी भुकेली तिनें गिळिलें गगन ॥३॥
एका जनार्दनीं गातां हरीचें नाम निमालीं इंद्रियें विषय विसरली काम ॥४॥
*
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥
न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकार ज्ञानाबाई ॥२॥
भलतिया भावें शरण जातां भेटी । पाडितसे तुटी जन्माव्याधी ॥३॥
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥४॥
*
धणी न पुरे गुण गातां । रुप दृष्टीं न्याहाळितां ॥१॥
बरवा बरवा पांडुरंग । कांती सांवळी सुरंग ॥२॥
सर्व मंगळाचे सार । मुख सिद्धींचें भांडार ॥३॥
तुका म्हणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥४॥
*
गुणा आला विटेवरी । पितांबरधारी सुंदरजो ॥१॥
डोळे कान त्याचे ठायीं । मन पायीं राहो हे ॥२॥
निवारोनी जाय माया । ऎसी छाया जयाची ॥३॥
तुका म्हणे समध्यान । ते हे चरण सुकुमार ॥४॥
*
देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥१॥
मी तों सांगतसें भावें । असो ठावे सकळां ॥२॥
निराकारी ओस दिशा । येथें इच्छा पुरतसे ॥३॥
तुका म्हणे रोकडे केणे । सिवितां येणें पोट धाय ॥४॥
*
पतिव्रता नेणें आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥१॥
तैसें माझें मन एकविध झालें । नावडे विठ्ठलेविणॆ दुजे ॥२॥
सूर्यविकारिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळां वसंतेसी ॥३॥
तुका म्हणे बाळ मातेपुढे नाचे । बोले आणिकांचे नावडती ॥४॥
*
आणिकांची स्तुति आम्हां ब्रह्माहत्या । एकावांचुनि त्या पांडुरंगा ॥१॥
आम्हां विष्णुदासा एकविध भाव । न म्हणों या देव आणिकांसी ॥२॥
शतखंड माझी होईल रसन । जरी या वचना पालटेन ॥३॥
तुका म्हणे मज आणिका संकल्पें । अवघीच पापें घडतील ॥४॥
N/A
N/A
Last Updated : January 23, 2008
TOP