शरण शरण एकनाथा । पायां माथा ठेविला ॥१॥
नका पाहुं गुण दोष । झालों दास पायांचा ॥२॥
आतां उपेक्षितां मज । तरि ते लाज कवणासी ॥३॥
तुका म्हणे भागवत । केलें श्रुत सकळां ॥४॥
*
सन्त जाती हरिकीर्तना । त्यांच्या वाहीन मोचे वाहाणा ॥१॥
हेंचि भवसिंधूचें तारुं । तेणें उतरुं पैलपारु ॥२॥
जन्मोजन्मींचे भेषज । ते हे सन्तचरणरज॥३॥
सन्तचरणींच्या पादुका । झाला जनार्दन एका ॥४॥
*
गातों एका ध्यातों एका । अंतरबाहीं पाहतों एका ॥१॥
अगुणी एका सगुणी एका । गुणातीत पाहातों एका ॥२॥
जनीं एका वनीं एका । निरंजनीं देखों एका ॥३॥
सन्तजना पढीये एका । जनार्दना कडिये एका ॥४॥
*
करुनी आइती सत्यभामा मंदिरीं । वाट पाहे तों टळोनी गेली रात्रीं । न येतां देव येती काम लहरी । पडिली दुश्र्चिती तंव तो कवाड टिमकारी वो ॥१॥
सर परता कळला तुझा भाव । कार्यापुरतें दाविसी लाघव । बोलतोसी ते अवघी तुझी माव । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥२॥
मीच वेडी तुजलागीं बोल नाहीं । दानावेळें विटंबना झाली काई । मागुती रुद्रासी भेटी दिली तई । विश्वास तो तुझ्या बोला अझुनि तरी नाहीं रे ॥३॥
भ्रम होता तो अवघा कळों आला । मानवत होतें मी भला भला । नष्ट क्रिया नाहीं मा तुझिया बोला । तुकयाबंधुस्वामी कानड्या कौसल्या ॥४॥
*
उंच नीच काही नेणॆं भगवंत । तिष्ठे भाव भक्त देखोनियां ॥१॥
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्याघरीं रक्षी प्रल्हादासी ॥२॥
चर्म रगूं लागे रोहिदासा संगे । कबीराचे मागें शेले विणी ॥३॥
सजन कसाया विंकू लागे मांस । माळ्या सांवत्यास । खुरपूं लागे ॥४॥
नरहरी सोनारा घडूं फ़ूंकु लागे । चोखामेळ्यासंगे ढोरें ओढी ॥५॥
नामयाचे जनीसवें वेची शेणी । धर्माघरी पाणी वाहें झाडी ॥६॥
नाम्यासवें जेवीं नव्हे संकोचित । ज्ञानियाची भिंत अंगे ओढी ॥७॥
गौळियांचे घरी अंगे गाई वळी । द्वारपाळ बळीव्दारीं झाला ॥८॥
अर्जुनाचे रथीं होय हा सारथी । भक्षी पोंहे प्रीतीं सुदाम्याचें ॥९॥
येंकोबाचें ऋण फ़ेडी ह्रषीकेशी । अंबऋषीचें सोशी गर्भवास ॥१०॥
मीराबाईसाठीं घेतो विष प्याला । दामाजीचा झाला पाडेवार ॥११॥
घडी माती वाहे गोर्या कुंभाराची । हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी ॥१२॥
पुंडलीकासाठी अझुनी तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची ॥१३॥
*
श्रवणें कीर्तनें झाले ते पावन । सनकादिक जाण परमभक्त ॥१॥
झाली ते विश्रांती याचकां सकळां । जीवी जीवनकळा श्रीमूर्ति रया ॥२॥
पादसेवनें अक्रूर झाला ब्रह्मरुप । प्रत्यक्ष स्वरुप गोविंदाचें ॥३॥
स्वरुपणें अर्जुन नरनारायण । सृष्टी जनार्दनी एकरुप ॥४॥
दास्यत्व निकट हनुमंतें पै केलें । म्हणोनी देखिले रामचरण ॥५॥
बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद । बिभीषण वरद चंद्रार्क ॥६॥
व्यास आणि वसिष्ठ वाल्मिकादिक । आणिक पुंडलिका शिरोमणी ॥७॥
शुकादिक योगी रंगले श्रीरंगीं । परिक्षितीच्या अंगी ठसावलें ॥८॥
उद्धव यादव आणि ते गोपाळ । गोपिकांचा मेळ ब्रम्हरुप ॥९॥
अनंत भक्तराशी तरले वानर । ज्ञानदेवा घर चिदानंदी ॥१०॥
*
अंगीकार ज्यांचा केला नारायणॆं । निंद्य तेही तेणें वंद्य केले ॥१॥
अजामेळ भिल्ली तारिली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य केली ॥२॥
ब्रह्महत्या राशी पातकें अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥३॥
तुका म्हणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ॥४॥
*
स्मरतां निवृत्ति पावलों विश्रांती । संसाराची शांती झाली माझ्या ॥१॥
नमिता ज्ञानदेवा पावलों विसावा । अंतरीचा हेवा विसरलों ॥२॥
सुखाचा निधाण तो माझा सोपान । विश्रांतीचें स्थान मुक्ताबाई ॥३॥
चांगदेव माझा आनंदाचा तारुं । सुखाचा सागरु वटेश्वर ॥४॥
सुखाचा सागर विसोबा खेचर । नरहरि सोनार प्राण माझा ॥५॥
आठवितां नामा पावलों विश्रामा । मोक्षमार्गी आम्हां वाटा झाली ॥६॥
परिसा भागवत जीवा आवडता । गोरा आणिअ सावंत सखे माझें ॥७॥
जन जसवंत सुरदास सन्त । नित्य प्रणिपात वैष्णवासी ॥८॥
वंदू भानुदास वैष्णवांचें कुळीं । ज्यासी वनमाळी मागें पुढें ॥९॥
बाळपणीं जेणें भानु आरधिला । वंश निरविल देवराया ॥१०॥
धन्य त्याचा वंश धन्य त्याचें कुळ । परब्रम्ह केवळ त्याचे वंशी ॥११॥
एका जनार्दनीं सन्ताचें स्तवन । जनीं जनार्दन नमियेला ॥१२॥
*
पंढरीये माझें माहेर साजणी । ओविया कांडणी गाऊं गीती ॥१॥
राही रखुमाई सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥२॥
उद्धव अक्रूर व्यास अंबऋषि। भाई नारदासी गौरवीन ॥३॥
गरुड बंधु लडीवाळ पुंडलिक । यांचे कवतुक वाटे मज ॥४॥
मज बहु गोत सन्त आणि महंत । नित्य आठवित ओवियेसी ॥५॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥६॥
नागो जगमित्रा नरहरि सोनारा । रोहिदास कबीरा सोईरीया ॥७॥
परिसा भागवत सूरदास सांवता । गाईन नेणता सकळीकासीं ॥८॥
चोखा मेळा सन्त जिवाचे सोईरे । न पडे विसर यांचा घडी ॥९॥
जीवींच्या जीवना एका जनार्दना । पाठक हा कान्हा मीराबाई ॥१०॥
आणिकही सन्त महानुभव मुनी । सकळां चरणीं जीव माझा ॥११॥
आनंदें ओविया गाईन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥१२॥
तुका म्हणे माझा बळिया मायबाप । हर्षे नांदे सये घराचारी ॥१३॥
*
निवृत्ति शोभे मुगुटाकार । ज्ञान सोपान वटेश्वर ॥१॥
विठू पंढरीचे राणे । ल्याले भक्तांचीं भूषणें ॥२॥
खचेर विसा जगमित्र नागा । कुंडलें जोडा विठोबा जोगा ॥३॥
बहु शोभे बाहुवट । गोरा सांवता दिकपाट ॥४॥
कंठी जाणा एक विंद । तो हा जोगा परमानंद ॥५॥
गळां शोभे वैजयंती । तिसी मुक्ताई म्हणती ॥६॥
अखंड शोभे माझ्या बापा । पदकीं शोभे नामा शिंपा ॥७॥
कटीसूत्र कटावरी । तो हा सोनार नरहरि ॥८॥
कांसे कसिला पीतांबर । तो हा जाणावा कबीर ॥९॥
जानू जघन सरळ । ते हे कन्होपात्रा विशाळ ॥१०॥
दंतपंक्ति झळाळ । तो हा कान्हया रसाळ ॥११॥
चरणींच्या क्षुद्र घंटा । नामयाचा नारा विठा ॥१२॥
वामचरणींचा तोडर । परिसा रुळतो किंकर ॥१३॥
चरणी वीट निर्मळ । तो हा झाला चोखामेळ ॥१४॥
चरणातळीत ऊर्ध्वरेखा । झाला जनार्दन एका ॥१५॥
*
पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥
नेघे माझी वाचा तुटी । महालाभ फ़ुकासाठीं ॥२॥
विश्रांतिचा ठाव । पायीं सन्ताचिया भाव ॥३॥
तुका म्हणे पापें । जातीं सन्ताचिया जपें ॥४॥
*
रन्तजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥१॥
कुंचे ढळती दोन्हीं बाहीं । जवळीं रखुमाई राही ॥२॥
नाना उपचारी । सिद्धि वोळगती कामारी ॥३॥
हातीं घेऊनि पादुका । उभा बंदीजन तुका ॥४॥
*
झाले ज्ञानेश्र्वर वाणी । आले सामुग्री घेऊनी ॥१॥
पर्वकाळ व्दादशी । दिली सामुग्री आम्हासी ॥२॥
ज्ञानदेवाचे चरणीं । शरण एका जनर्दनीं ॥३॥
*
उठोनि प्रात:काळीं ओढितां कांचोळी । जातो वेळोवेळीं महाव्दारीं ॥१॥
अहो जी दातारा विनंती अवधार । तुम्ही यावें घरा भोजनासी ॥२॥
रखुमाईमातें तुम्हीं यावें तेथें । सामुग्री सांगातें चालवावी ॥३॥
सडा संमार्जन हें माझें करणें । उदक भरीन सुगंधेसीं ॥४॥
शेष पत्रावळी काढीन उष्टावळीं । नित्य वेळोवेळीं हेंचि कामा ॥५॥
नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा । प्रसाद तो ठेवा सेवकासी ॥६॥