निवडक अभंग संग्रह १८
निवडक अभंग संग्रह १८
*
उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाडा ॥१॥
बोलविले बोलें बोल । धनी विठ्ठल सन्निध ॥२॥
तरी मनीं नाही शंका । बळें एका स्वामीच्या ॥३॥
तुका म्हणॆ नये आम्हां । पुढें कामा गाबाळ ॥४॥
*
साधावया भक्तिकाज । नाहीं लाज धरीत ॥१॥
ऎसियशी शरण जावें । शक्तीजीवें न वंची ॥२॥
भीष्म प्रण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ॥३॥
तुका म्हणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥४॥
*
करा करा लागपाठ । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ॥१॥
दुजा ऎसा नाहीं कोणी । जो या काढी भयांतूनि । करा म्हणऊनि । हा विचार ठायींचा ॥२॥
होतीं गात्रें बेंबळीं । दिवस अस्तमान काळीं । होतें वाहें टाळी । जवं मोकळीं आहेती ॥३॥
कां रे घेतलासी सोस । तुज वाटताहे कैसें । तुका म्हणे ऎंसे पुढें कै लाहासी ॥४॥
*
एवढा प्रभू भावें । तेणें संपुष्टीं रहावें ॥१॥
होय भक्ती केला तैसा । परवी धरावी ते इच्छा ॥२॥
एवढा जगदानी । मगी तुळसीदळ पाणी ॥३॥
आला नांवारुपा । तुका म्हणॆ झाला सोपा ॥४॥
*
आम्हीं हरिचे संवगडे । जुने ठायीं चे वेडे बागडे । हातीं धरुनि कडे । पाठीसवें वागविलो ॥१॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हां एक देहीं । नाहीं झालों कई । एका एक वेगळे ॥२॥
निद्रा करितां होतों पायीं । सवेंचि लंका घेतली तई । वानर गोवळ गाई । सवें चारित फ़िरतसों ॥३॥
आम्हां नामाचें चिंतन । रामकृष्ण नारायण । तुका म्हणॆ क्षण । खातां जेवितां न विसंबो ॥४॥
*
ऎसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥१॥
संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥२॥
आचार करितां म्हणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥३॥
संतसंग करितां म्हणती हा उपदेशी । येरा आभाग्यासी ज्ञान नाहीं ॥४॥
धन नाहीं त्यासी ठायींचा करंटा । समर्थासि ताठा करिताती ॥५॥
बहु बोलो जातां म्हणती हा वाचाळ । न बोलातां सकळ म्हणती गर्वी ॥६॥
भेटिसी नवजातां म्हणती हा निष्ठुर । येतां जातां घर बुडविलें ॥७॥
लग्न करुं जातां म्हणती हा मातला । न करितां झाला नपुंसक ॥८॥
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकाचें मूळ पोरवडा ॥९॥
लोक जैसा ऒक धरितां धरवेना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥१०॥
तुका म्हणॆ आतां आइका वचन । त्यजुनियां जन भक्ति करा ॥११॥
*
अरे गिळिले हो संसारें । कांहीं तरी राखा खरें । दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग ॥१॥
येथें न घलीं न घलीं आड । संचितसा शब्द नाड । उठाउठीं गोड । बीजें बीज वाढवी ॥२॥
केलें तें क्रियमाण । झालें तें संचित म्हण। प्रारब्ध जाण । उरउरित उरलें तें ॥३॥
चित्तं खोटें चालीवरी । रोग भोगाचे अंतरी । रसना अनावरी । तुका म्हणे ढुंग वाहे ॥४॥
*
ऎका रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥१॥
मग कैंचें रे बंधन वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण येचि तीरी सरेल ॥२॥
दास्य करील कळिकाळ बंध तुटेल मायाजाळ । होतील सकळ रिद्धिसिद्धि म्हणियार्या ॥३॥
सकळ शास्त्रांचें सार हें वेदांचे गव्हर । पाहातां विचार हाचि करिती पुराणें ॥४॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य -शूद्र चांडाळाही अधिकार । बाळें नारीनर आंदिकरोनि वेश्याही ॥५॥
तुका म्हणॆ अनुभवें आम्ही पाडियलें ठावें । आणीकही दैवें सुख घेती भाविकें ॥६॥
*
अवघ्या वाटा झाल्या क्षीण । कली न घडे साधन । उचित विधी विधान । न कळे न घडे सर्वथा ॥१॥
भक्तिपंथ बहु सोपा । पुण्य नागवे या पापा । येणॆं जाणॆं खेपा । येणेचि एके खंडती ॥२॥
उभारोनि बाहे । विठो पालवीत आहे । दासां मीचि साहे । मुखें बोले आपुल्या ॥३॥
भाविक विश्वासी । पार उतारिलें त्यासी । तुका म्हणे नासी । कुतर्क्याचे कपाळीं ॥४॥
N/A
N/A
Last Updated : January 23, 2008
TOP