वैशाख वद्य १४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
खंडेराव दाभाडे यांचा मृत्यु !
शके १६५१ च्या वैशाख व. १४ रोजीं मराठेशाहीच्या आपत् प्रसंगीं पराक्रम गाजविनारे खंडेराव दाभाडे यांचें निधन झालें.
दाभाडे घराण्याचा मूळ पुरुष येसाजी. याचा खंडेराव हा थोरला मुलगा. छत्रपति राजाराममहाराज जिंजीस गेले तेव्हां तो त्यांचेबरोबर होता, तेथून परत आल्यावर छत्रपतींनीं त्यांना सेनाधुरंधर हें पद देऊन खंडेरावास गुजराथकडे व बागलाणाकडे मुलुखगिरीवर पाठविलें. आणि वस्त्रें व पोशाख देऊन निशाण व जरिपटका हवालीं केला. पुढें शाहूनें त्याला सेनापतिपद दिलें. त्याच वेळीं दिल्लीच्या बादशहानें दख्खनचा सुभेदार सय्यदबंधूंपैकीं हुसेन अल्ली याच्याविरुध्द उठविण्यास शाहूस कळविलें असतां शाहूनें ते काम खंडेरावावर सोंपविलें. यानें खानदेश - गुजराथवर स्वार्या करुन हुसेनचा रस्ता अडवून त्याची फौज कापून काढली. यानंतर शाहूनें त्याला कळवलें कीं, “आपण गुजराथ व काठेवाडाकडे मराठयांचा अमल बसवावा. दरमहा हुजूरखर्चास ऐवज देत जावा. फौज बाळगावी, थोरले महाराज धान्य व नक्त श्रावणमासीं धर्मादाय देत असत. तो सेनापति यांनीं आपल्या तालुक्यांपैकीं दोनचार लाख रुपये खर्च करुन कोटि लिंगें ब्राह्मणांकडून करीत जावीं.”
बाळापूरच्या लढाईत तो हजर असून फत्तेसिंग भोंसल्याच्या आधिपत्याखालीं कर्नाटकांत झालेल्या स्वारींतहि त्याची कामगिरी मोठी होती. वसई ते सुरतपर्यंतचें कोंकण काबीज केल्यामुळें शाहूनें त्याच्याबद्दल पुढील उद्गार काढले, “बडे सरदार मातबर, कामकरी, हुषार होते,” इतिहासप्रसिध्द उमाबाई दाभाडे ही त्यांचीच पत्नीइ. त्यांचा मुलगा त्रिंबकराव हाहि बापासारखा शूर होता. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत, शंकराची नारायण, इत्यादि लोकांपेक्षां राजाराममहाराजांनीं खंडेरावास जास्त उत्पन्न दिलें होतें. जवळजवळ सातशें गांवांची देशमुखी त्याला मिळाली असल्यानें तो वतनदाराचा मुकुटमणि ठरतो. त्यांचा पराक्रम विशेष दर्जाचा होता. अनेक प्रसंगीं त्यांनीं आपल्या शौर्यानें मराठेशाहीचें नांव राखलें आहे.
- १५ मे १७२९
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP