वैशाख वद्य ३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
‘बल्लवां’ कडून कीचकवध !
वैशाख व. ३ या दिवशीं पांडवांपैकीं महापराक्रमी भीमसेन यानें विराटनगरीच्या सुदेष्णा राणीचा मानलेला भाऊ कीचक याचा वध केला.
बारा वर्षाचा वनवास पांडवांनीं संपविला आणि एक वर्षाच्या अज्ञातवासासाठीं ते विराटाच्या नगरांत येऊन राहिले. दहा महिन्यांचा काळ लोटल्यावर विराटाचा सेनापति कीचक याची पापी दृष्टि रुपसंपन्न सैरंध्रीवर गेली. ‘तूं माझी भार्या होऊन ऐश्चर्य व सुख यांचा उपभोग घे’ अशी निर्लज्जपणाची मागणी त्यानें केली. द्रौपदीनें प्रत्येक वेळीं निषेध केला. तेव्हां कीचकानें सुदेष्णेकडून संधान बांधलें. सुदेष्णेच्या आज्ञेनुसार दासी सैरंध्री कीचकाकडे गेली. त्या कामांधानें तिचा हात धरल्याबरोबर मानिनी द्रौपदीचा अभिमान उफाळून आला. त्वेषानें तिनें कीचकाला जमिनीवर ढकललें; आणि ती तडक विराटाच्या राजसभेंत आली. कीचकहि तिच्यापाठोपाठ आला. त्यानें तिला खालीं ओढली आणि लाथ मारली ! भरसभेंत एवढी विटंबना झाली असतां कांहींहि होत नाहींसें पाहून तिनें राजाचीही निंदा केली. कीचकासारख्या दुष्ट माणसाच्या हातांतील बाहुलें बनलेला राजा कांहींहि करुं शकला नाहीं. भीमसेनावांचून आपणांस त्राता नाहीं, हें द्रौपदीनें ओळखलें.स्वयंपाकघरांत घोरत पडलेल्या ‘बल्लवा’ ला द्रौपदी म्हणाली, “माझ्या पातिव्रत्यावर आग पाखडणारा नीच किचक उद्या जिवंत राहिला तर मी प्राण देईन !” दोघांचाहि कांहीं विचार ठरला. दुसरे दिवशीं सैरंध्री कीचकास वश झाली. ठरल्याप्रमाणें रात्रीं कीचक नृत्यशाळेमध्यें आला. तेथें त्याचा द्रौपदीशीं आचरटपणानें प्रेमालाप सुरु झाल्यावर वेषांतर केलेल्या भीमानें कीचकाशीं बाहुयुध्द करुन त्यास ठार केलें. हें समजतांच कीचकाचे सर्व बांधव सैरंध्रीवर खवळून गेले. त्यांनीं कीचकाबरोबर तिलाहि बांधून जाळण्यासाठीं स्मशानांत नेलें. वेष पालटून भीमहि स्मशानांत आला. स्मशानांतील एक वृक्ष उपटून त्यानें कीचकाच्या एकशें पांच बंधूंना यमसदनास पाठविलें व द्रौपदीची मुक्तता केली. आपला सेनापति सर्व बांधवांसह ठार झालेला पाहून विराट राजाच्या मनांतहि भय उत्पन्न झालें.
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP