वैशाख वद्य ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
खंडेराव दाभाडयांचा पराक्रम !
शके १६३९ च्या वैशाख व. ९ रोजीं प्रसिध्द वीर खंडेराव दाभाडे यांनीं अहमदनगर येथें मोंगलांचा पराभव केला.
दोन वर्षापूर्वी दक्षिणच्या सुभ्यावर ‘देखरेख करण्यासाठीं म्हणून सय्यद हुसेन याची नेमणूक दिल्लीहून झाली होती. सन १७१५ च्या ५ एप्रिल रोजीं तो दिल्ली सोडून दक्षिणेंत येण्यास निघाला. परंतु, बादशहाचा डाव वेगळाच होता. सय्यदास कारभार न देतां त्यास मारुन टाकावें म्हणून बादशहानें अगोदरच दाऊदखान पन्नीस हुकूम दिला होता. नर्मदा नदीतीरीं सय्यद आल्यावर त्याला समजून आलें कीं, दाऊदखान पन्नी हा बर्हाणपूरपर्यंत आपणावर चाल करुन येत आहे. दोघांच्यांत सलोखा होणें अर्थातच शक्य नव्हतें. याच वेळीं शाहू महाराजांचे सेनापति नेमाजी शिंदे हे मोठया फौजेस बरोबर होऊन बर्हाणपूर येथें राहिले होते. दाऊदखान व सय्यद हुसेन यांचा बनाव कसा काय होतो याकडे त्यांचें लक्ष होतें.
थोडयाच दिवसांत बर्हाणपूर येथें लालबागच्या मैदानांत हुसेन अल्ली व पन्नी यांजमध्यें लढाई होऊन तींत दाऊदखान मरण पावला. अशा रीतीनें बादशहाचा हेतु पूर्णपणें फसला. तरी बादशहानें हुसेनचा पाडाव करण्यासाठीं मराठयांना चेतविलें होतेंच. त्याला अनुसरुन मराठयांनीं मोंगलांच्या मुलखांवर हल्ले करण्यास सुरुवातहि केली. खंडेराव दाभाडे यांनीं खानदेश व गुजरात या देशांवर स्वार्या करुन त्या दोन प्रांतांमधील दळणवळणाचा मार्ग आपल्या स्वाधीन आणला. तेव्हां हुसेन अल्लीकडून झुल्फिकारबेग नांवाचा सरदार खंडेरावाचें पारिपत्य करण्यास आला. खंडेराव यांनीं मोठया युक्तीनें सर्व सैन्याचा पाडाव करुन झुल्फिकारबेग यासहि ठार केलें. त्यानंतर मनसूरखान, ऐवजखान, करीमबेग वगैरे सरदार मराठयांचा पराभव करण्यास तयार झाले. अहमदनगरशेजारीं दोनहि सैन्यांची गांठ पडून निकराची लढाई झाली व वैशाख व. ९ रोजीं दाभाडे व सुलतानजी निंबालकर यानीं मोंगलांचा पुरा मोड केला.
- २४ एप्रिल १७१७
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP