मराठी भाषेचा शिवाजी !
शके १७७२ च्या वैशाख शु. ९ रोजीं अर्वाचीन मराठी वाड्गमयांतील निबंधप्रवर्तक विष्णुशास्त्री चिपळुणकर यांचा जन्म झाला.
देशाभिमान, निस्पृहता, विव्दत्ता व ग्रंथकर्तृत्व हे शास्त्रीबुवांचे गुण सर्वमान्य झालेले आहेत. न्यू.इं, स्कूल, केसरी, मराठा, चित्रशाळा व किताबखाना, यांवरुन त्यांचा कर्ता देशाभिमान व्यक्त होतो. स्वधर्म, स्वदेश, स्वत:चा इतिहास, स्वभाषा- वाड्गमय यांच्याबद्दल आपल्याच सुधारकांत मनस्वी तिटकारा वसत असलेला पाहून शास्त्रीबुवांना वाईट वाटे. समाजातील दोष त्यांनीं कधीच लपविले नाहींत. ‘संपत्तीचा उपयोग,’ ‘लोकभ्रम’ या निबंधांतून त्यांनीं समाजाचें दोषाविष्करण केलें आहे. आपल्या लोकांना - विशेषत: पंडितांना - स्वाभिमानशून्यतेनें घेरलें आहे ही गोष्ट चिपळुणकरांनीं ओळखली. स्वाभिमानशून्यता ही राष्ट्रविध्वंसक राक्षसी आहे असें त्यांचें ठाम मत होतें. हा स्वाभिमान निर्माण करण्यासाठींच त्यांचे सद्गुण व त्यांच्या सत्कृति उपयोगी पडल्या आहेत. त्यांची निबंधमाला सहाच वर्षे चाललीं, परंतु तिनें सार्या महाराष्ट्रास मोहिनी घातली. ह. ना. आपटॆ, शि. म. परांजपे, वि.का. राजवाडे, श्री. कृ. कोल्हटकर, ल.रा. पांगारकर, न. चिं. केळकर यांना देशसेवेची व वाड्गमयसेवेची स्फूर्ति निबंधमालेपासून झाली आहे ! अवघ्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यांत येवढें श्रेय चिपळुणकरांना मिळालें होतें !
याच आठवडयांत शिवजयंतीचा उत्सव चालू असतो आणि चिपळूणकर ‘ I am the Shivaji of Marathi language'' असें म्हणत असत. या उक्तीचें समर्थन आणि स्पष्टीकरण नागपूरचे डाँ. वि.भि. कोलते असें करतात:
होता शिवाजी न, जाती तरी मातृभूमि अविंधांचिया बंधनीं
शेंडी शिरीं राहती ना मुळीं भ्रष्ट होत्या सदा हिंदुच्या नंदिनी !
विष्णूविना पूज्यभाषा मराठी, तशी हाय ! ही कां न आंग्लाळती ?
सौभाग्य होतें न कां नष्ट तीचें, तिची काव्यगंगा न कां भ्रष्टती ?
- २० मे १८५०