वैशाख वद्य ४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
‘पण अपमान सहन करणार नाहीं’ !
शके १५८८ च्या वैशाख व. ४ रोजीं आग्रा येथें शिवाजीराजे व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.
फाल्गुन शुध्द ९ रोजीं सर्वाचा निरोप घेऊन शिवाजीराजे रायगडहून आग्र्यास जाण्यास निघाले. प्रवासांतच बादशहाचें पत्र मिळालें कीं, “तुम्ही बेकिलाफ आमचे वचनावर विश्वास ठेवून हुजूर तख्त मुकामीं यावें. तुमचे मुद्दे असतील ते उलगडून देऊं. कोणेविशीं दक्कत न धरावी. बादशाही कृपा संपादून तुम्हांस स्वदेशीं परत करण्यांत येईल.” आग्रा येथें शिवाजीच्या तैनातीस जयसिंहाचा मुलगा रामसिंह व मुखलिसखान हे दोघे होते. वैशाख व. ४ रोजीं भेट ठरली. ‘दिवाण - इ - आम’ च्या शृंगारलेल्या सभागृहांत मोठा दरबार भरला. रामसिंहाबरोबर शिवाजीराजे व युवराज संभाजी आले व त्यांनीं १५०० मोहोरांचा नजराणा व सहा हजार रुपयांचें उपायन बादशहापुढें ठेवलें ‘या शिवाजीराजे !’ असें औरंगजेबानें म्हणतांच शिवाजीनें प्रणाम केला. बादशहानें खूण करतांच चोपदारांनीं शिवाजीला तिसर्या प्रतीच्या सरदारांत नेऊन उभें केलें ! राजांना या अपमानाचा तीव्र संताप आला. आधींच कोणाहि मुसलमानांपुढें मान वांकविण्याचा शिवाजीस अत्यंत तिरस्कार, त्यांतून हा असा अममानकारक प्रसंग ! उव्देगानें शिवाजीनें रामसिंहास विचारलें “पंचहजारीच्या रांगेंत उभें राहण्यासाठीं का मी येथें आलों ? माझा सेनानायक नेताजी सुध्दां पंचहजारी आहे... आमच्या सैनिकांना पाठ दाखवून पळणारे जसवंतसिंहसुध्दां माझ्या पुढील रांगेंत आहेत ... मी येथें प्राण देईन, पण अपमान सहन करणार नाहीं !” त्यावर रामसिंह बादशहास म्हणाला, ‘जंगलांत वावरणारा वाघ या अपरिचित ठिकाणीं येऊन बेहोष झाला आहे.’ बादशहा त्यावर बोलला “राजास बाजूस नेऊन त्यांचे डोक्यावर गुलाबपाणी शिंपडा; व शुध्दीवर आल्यावर मुक्कामास घेऊन जा.”
आणि मुक्कामास गेल्यावर महाराजांना उघडपणें बंदीवान् करण्यांत आलें. बादशहानें अधिकार्यांना बजाविलें, “शिवाजीस दरबारची मनाई आहे. तुम्ही शिवाजीवर सक्त नजर ठेवावी. तो निघून गेला तर तुम्हांस जबाबदार धरण्यांत येईल”.
- १२ मे १६६६
------------------
वैशाख व. ४
रघुनाथपंत हणमंते यांचें निधन !
शके १६०५ च्या वैशाख वद्य ४ रोजीं, शिवकालांतील स्वामिनिष्ठ मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते याचें निधन झालें.
रघुनाथ हणमंते हे कर्नाटकांत शिवाजीमहाराजांचे बंधु व्यंकोजी यांचे कारभारी होते. अत्यंत महत्त्वाकांक्षी व तडफदार म्हणून यांचा लौकिक असे. एके समयीं रघुनाथ हणमंते व्यंकोजीस टोंचून बोलले; तें सहन न होऊन व्यंकोजी बोलले, “तुम्ही चाकर; सांगूं तितकें काम करीत असावें” यानंतर कारभार्यांनीं उत्तर दिले “तुमच्या मांडीस मांडी लावून बसेन तरच नांवाचा रघुनाथ” आणि रघुनाथपंत शिवाजीकडे येण्यास निघाले; कांहीं तरी मोठें कार्य करुन शिवरायांकडे जावें, असा मनाशीं निश्चय करुन ते हैदराबादेस आले; आणि गोवळकोंडयाच्या कुतुबशहाचा दिवाण मादण्णापंत यांची त्यांनीं भेट घेतली. मादण्णांनीं रघुनाथपंताचा सत्कार करुन शिवाजीस देण्यास कांहीं पत्रें दिलीं. पंत शिवरायांकडे आले. दक्षिणदिग्विजय करण्याची इच्छा महाराजांची होतीच, हणमंते यांनीं तिला चालना दिली. दक्षिणेंतील जिंकलेल्या प्रांतांचा कारभार शिवरायांनीं रघुनाथपंतांकडेच सोंपविला आणि त्यांनींहि ती व्यवस्था अत्यंत चोख अशीच ठेविली “आधींच पंडित, त्यांत कारभारी, विषेश विव्दज्जनांचा समागम; न्यायनीतिपरनिष्ठ होते. एकोजी राजाचें काम करुन महाराजांचे मुलखाचें व फौजेचें काम बोभाट न पडे असें चालविलें” असा अभिप्राय त्यांजविषयीं तत्कालीन पत्रांतून सांपडतो. शिवरायानंतर संभाजीराजाचें दुराचरण पाहून कष्टी होणारे रघुनाथ हणमंते हे होते. “तुम्हीं राज्यांतील कर्ती माणसें ठार मारलीं, आतां औरंगजेब उत्तरेकडून स्वारी करुन येत आहे, त्याचा प्रतिकार करण्याची तयारी तुम्हीं काय केली आहे?” अर्थातच संभाजीस हें बोलणें रुचलें नाहीं. रघुनाथ पंडितांची मोठी कामगिरी म्हणजे त्यांनीं शिवरायांच्या सांगण्यावरुन ‘राज्यव्यवहारकोश’ तयार केला. त्यायोगें उर्दू फारसी शब्दांबद्दल भारतीय संस्कृत परिभाषा वापरणें सुलभ झालें.
- २ मे १६८३
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP