रामानुजाचार्याची समाधि !
शके १०५९ च्या वैशाख शु. ६ रोजीं विविष्टाव्दैत या मताचे प्रमुख आचार्य श्रीरामानुजाचार्य यांनीं समाधि घेतली.
त्यांचा जन्म तिरुपति येथें असुरी केशव भट्टर यांच्या घरीं झाला. रामानुजांनीं कांजीवरम् येथील यादवप्रकाशांपाशीं अध्ययन केलें; परंतु पुढें त्यांचें गुरुशीं पटलें नाहीं. प्रथमपासूनच यांचा कल यामुनाचार्याच्या विशिष्टव्दैताकडे असल्यामुळें त्यांनीं अलवारांच्या प्रबंधांचें अध्ययन सुरु करुन चिचेच्या झाडाखालीं रामाची भक्ति करण्यास सुरुवात केली. कावेरी तीरावर यामुनाचार्याच्या अंत्यविधीचा समारंभ हजारों वैष्णव करीत असलेले पाहून त्यांना खेद झाला. यामुनाचार्याची शेवटची इच्छा ब्रह्मसूत्रावर भाष्य करावें ही होती. ती पूर्ण करण्याची प्रतिज्ञा रामानुजांनीं केली, त्यानंतर त्यांनीं कांचीपूर्ण व महापूर्ण या दोन थोर पुरुषांजवळ अध्ययन केलें. रामानुज मनानें मोठे उदार, श्रध्दावान् असून अतिशय बुध्दिमान होते. स्त्रीनें दोनतीन वेळां मनाविरुध्द वर्तन केल्यामुळें यांनीं संन्यास घेतला ! त्यांच्याभोंवतीं कुरेश, दशरथी, गोविंदयाति, गोविंदभट्ट, यज्ञमूर्ति, इत्यादि शिष्य गोळा झाले. रामानुजांनीं आपलें तत्त्वज्ञान ‘वेदार्थसंग्रह’ या ग्रंथांत सांगितलें आहे. उपनिषदांतील तत्त्वज्ञान व्दैतपर आहे असें प्रतिपादन करतांना त्यांनीं शंकराचार्यावर खूप टीका केली आहे. वेदांतसूत्रांवरील ‘भाष्य’ हा यांचा प्रमुख ग्रंथ. याशिवाय ‘वेदांतसार’, ‘वेदांतदीप’, ‘गीताभाष्य’ वगैरे ग्रंथ रामानुजांनीं लिहिलेले आहेत. रामानुजंनीं श्रीरंगम्, कुंभकोण, तिरुमंगाई, मलबार, त्रावणकोर, गिरनार, व्दारका, मथुरा, ब्रद्रिनारायण आदि सर्व भरतखंडांतील पवित्र क्षेत्रीं भ्रमण करुन आपल्या तत्त्वांचा प्रसार केला. रामानुज श्रेष्ठ प्रकारचे पुरुष होते. “सर्व दर्जाच्या व जातींच्या लोकांना त्यांनीं भक्तिमार्गास लाविलें. अत्यंजांवर सुध्दां त्यांची दयादृष्टि होती. वादी कडक पण मनुष्य प्रेमळ व लोकसंग्रहकर्ता. त्यांची कृष्णभक्ति अनुपम होती.” रामानुजांचें तत्त्वज्ञान ‘अव्दैतामोद:’ या ग्रंथांत म. म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांनीं दिलें आहे.
- २८ एप्रिल ११३७
-------------------
वैशाख शु. ६
‘सुश्लोक’ - कर्त्याची समाधि !
शके १६१७ च्या वैशाख शु. ६ रोजीं प्रसिध्द पंडितकवि वामनपंडित यांनीं भोगांव येथें समाधि घेतली.
वामनपंडित हे ॠग्वेदी, ‘वसिष्ठ’ गोत्री ब्राह्मण असून विजापूरचे राहणारे. विजापूरचा बादशहा आपणांस बाटविणार ही बातमी कळतांच त्यांनीं विजापूर सोडलें व काशी येथें संस्कृत भाषेचा व तत्कालीन शास्त्रांचा अभ्यास केला. विव्दत्ता मिळाली तरी चित्तास समाधान लाभलें नाहीं म्हणून त्यांनीं ‘मलयाचला’ वर तपश्चर्या केली. तेथें ध्यानमग्न असतां कोणा उतीनें जो उपदेश दिला तो वामनपंडितांनीं ‘निगमसार’ ग्रंथांत सांठविला आहे. यानंतरहि ‘कर्मतत्त्व’, ‘समश्लोकी’, ‘सिध्दांतविजय’, ‘अनुभूतिलेश’, इत्यादि लहान लहान अध्यात्मप्रकरणें पंडितांनीं लिहिलीं.परंतु, वामनपंडितांचें सर्व बुध्दिवैभव त्यांच्या ‘यथार्थदीपिकें’ त दिसून येते. सामान्य जनांना वामनपंडित प्रिय वाटतात ते त्यांच्या आख्यानक कवितेमुळें. ‘सुश्लोक वामनाचा’ म्हणून यांची प्रसिध्दि आहे.‘गजेन्द्रमोक्ष’, ‘सीतास्वयंवर’, ‘कात्यायनी व्रत’, ‘वनसुधा’, ‘वेणुसुधा’, इत्यादि सुंदर प्रकरणें रसिकांना आजहि रिझवितात. कित्येक ठिकाणीं बीभत्स व शृंगार रस हे आपली पायरी ओलांडून जातात हेंहि खरेंच आहे. जगन्नाथ पंडितांची ‘गंगालहरी’ व भर्तृहरीचीं ‘नीतिशतकें’ यांचा उत्कृष्ट मराठी अनुवाद वामनांनीं केला आहे. वामनपंडित हे कोरेगांव (शिगांव) येथून कृष्णाकांठानें तीर्थक्षेत्र पाहत पाहत महाबळेश्वर येथें जात असतांना मार्गात गुर्हेघर येथें समाधिस्थ झाले. पण भोगांवच्या हद्दींत कृष्णेच्या कांठीं यांचें दहन झालें. बरोबर असलेल्या शिष्यानें - महादेवानें - तेथें त्यांची समाधि बांधली. “वामनपंडिताप्रमाणें भक्तीनें ईश्वरपदीं लीन होऊन अव्दैतविचारावर मोठमोठाले ग्रंथ लिहिणारा, अक्षरगणांच्या वृत्तांनीं सोपी, मधुर व पुष्कळ कविता रचणारा आणि नि:स्पृहतेनें केवळ ईश्वरपर वर्णन करणारा ग्रंथकार, कवि आणि साधु त्याच्यामागें आजपर्यंत झाला नाहीं. वामनपंडितानें महाराष्ट्र भाषेवर व लोकांवर फार उपकार केले आहेत.” असा अभिप्राय कै. बा. म. हंस यांनीं दिला आहे.
- ९ एप्रिल १६९५