वैशाख शुद्ध ८
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
मोंगली सत्ता स्थिर झाली !
शके १४४८ च्या वैशाख शु. ८ रोजीं मोंगल साम्राज्याचा संस्थापक जहीरुद्दीन महंमद बाबर यानें दिल्लीच्या इब्राहीमखान लोदीचा पराभव करुन मोंगल राजसत्तेचा पाया घातला !
सात आठ वर्षापूर्वीच बाबरानें हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली होती. त्यानंतर शके १४४६ मध्यें पंजाबचा सुभेदार दौलतखान यानें दिल्लीच्या सुलतानाविरुध्द बाबराजवळ मदत मागितली. बाबर संधीची वाटच पाहत होता. तो तत्काळ हिंदुस्थानांत आला आणि पंजाब प्रांत त्यानें ताब्यांत घेतला. हिंदुस्थानांतील गैरव्यवस्था पाहून त्याला साम्राज्य स्थापन करण्याची मनीषा झाली. त्याचें सामर्थ्य मोठें असल्यामुळें दिल्लीचा इब्राहीमखान लोदी त्याच्याशीं लढण्यास असमर्थ होता. दिल्ली दरबारांत अनेक घोटाळे झालेले पाहून बाबरानें दिल्लीवर स्वारी केली. इब्राहीम लोदीजवळ एक लक्ष फौज होती तर बाबराचें सैन्य सारें वीस हजार ! तरी त्याचा प्रत्येक शिपाफ़ी क्सलेला असून ‘मरेन वा मारीन’ या बाण्याचा होता. बाबराचा मुलगा हुमायून हाहि मोठया त्वेषानें सिध्द झाला. आपल्या तोफांचे सातशे गाडे कातडयाच्या दोरखंडांनीं जखडून, त्या ओळी पाठीमागें त्यानें फौज उभी केली. इब्राहीमच्या फौजेस बाबरानें वेढलें. त्याच्या तोफखान्यानें शत्रुसैन्याची दाणादाण उडवली. दोन प्रहरपर्यंत घोर संग्राम होऊन लोदीचे पंधरा हजार शिपाई कामास आले. स्वत:लोदीहि ठार झाला. येणेंप्रमाणें दिल्ली काबीज केल्यावर हुमायूननें लागलीच आग्रा शहरहि जिंकलें. दिल्लीच्या मशिदींत बाबरच्या नांवानें खुत्बा वाचण्यांत आला. त्याच्या लोकांनी अगणित लूट मिळविली. एकटया हुमायुनास तीन लक्ष रुपये रोख व न मोजलेले पुष्कळसें जवाहीर प्राप्त झालें. बाबरानेंहि आपल्या विजयार्थ सर्वाना धन वाटून टाकलें. त्यावरुन त्याला ‘कलंदर’ म्हणजे ‘उधळ्या फकीर’ हें नांव प्राप्त झालें. बाबराचा पाय दिल्लींत रोवला गेला तरी अनेक संकटे त्याच्यापुढें उभीं होतीं. अनेकांशीं त्याला झगडा करावा लागला.
- १९ एप्रिल १५२६
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP