वैशाख वद्य १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


मलिक अंबराचा मृत्यु !

शके १५४८ च्या वैशाख व. १० रोजीं अहमदनगरच्या निजामशाहींतील प्रसिध्द दिवाण मलिक अंबर याचा मृत्यु झाला.
मलिक अंबर लहानपणीं एक गुलाम होता. बगदाद येथील एका व्यापार्‍यानें त्याला हिंदुस्थानांत आणलें आणि अहमदनगरच्या चंगीजखान नांवाच्या वजिरास विकलें. आपल्या बुध्दिबळानें त्यानें निजामशाहीचें बहुतेक राज्य परत मिळविलें. दक्षिण देश जिंकणासाठीं जहांगीरनें पंधरा - वीस वर्षे अतोनात प्रयत्न केले; पण मलिकांबरानें ते सर्व हाणून पाडले. अहमदनगर राजधानी मोंगलांच्या हातीं असल्यामुळें कांहीं थोडा वेळ जुन्नर येथें व नंतर दौलताबादेस निजामशाहीची सोय केली; आणि याच हेतूनें खडकीं येथें नवीन शहर वसविलें. त्यासच पुढें औरंगाबाद हें नांव प्राप्त झालें.
मलिक अंबराचा उद्योग सर्वगामी असे. “रयतेस दिलदिलासा देऊन ताब्यांतील प्रदेशाची आबादानी ठेवली. त्यामुळें वसुलाची उपज होऊन पदरीं लढाऊ फौज बाळगण्याचें सामर्थ्य त्यास आलें. त्याच्या लष्करांत मराठे व मुसलमान सारखेच खुष असत. मोंगलाशीं लढण्यांत त्यानें डोंगराळ प्रदेशाच्या आश्रयानें गनिमी काव्याचा उपयोग केला आणि मोंगलाशीं टक्कर देण्यासाठीं आदिलशाही व कुतुबशाही यांच्याशीं सख्य ठेवलें. या रीतीनें पंचवीस वर्षेपावेतों या चतुर नुत्सद्यानें जो प्रयत्न निजामशाही तारण्यासाठीं केला त्याची वाखाणणी सर्वत्र होऊं लागली.”
भातवडी येथें शहाजीच्या मदतीनें मोंगल सैन्याचा यानें जो पराभव केला यामुळें त्याची सर्वत्र वाहवा झाली. जवळजवळ वर्षभर ह सामना बनून येत होता. “दोहोंकडून चालून येणार्‍या फौजांच्या चिमटयांत सांपडलेला हा गृहस्थ निश्चित अपयशाऐवजीं प्रचंड विजय संपादूं शकला हें केवळ त्याच्या बुध्दीचें सामर्थ्य होय... नाना प्रकारच्या युक्त्यांनीं त्यानें प्रतिपक्षास हैराण करुन मोंगल, आदिलशहा व कुतुबशहा या तीन राज्यांच्या संघावर मात केली.” कोणत्याहि विरोधाला न जुमानतां पराक्रम गाजवीत असतांना शके १५४८ मध्यें त्याचें निधन झालें.
- १० मे १६२६

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP