वैशाख शुद्ध १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“रामाला दुसरा धर्म नाहीं !”
वैशाख शु. १ रोजीं पित्याचें वचन पूर्ण करण्यासाठीं प्रभु रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगण्यासाठीं निघाले.
रामचंद्रांच्या विवाहाला बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांस राज्याभिषेक करण्याची तयारी दशरथ राजानें केली. या ‘अनर्था’ची बातमी मंथरा दासीकडून कैकयीस मिळाली. कैकयीची वृत्ति पालटून गेली. दशरथाकडून पूर्वी मिळविलेल्या दोन वरांची तिला स्मृति झाली. मत्सरानें भारावून गेलेल्या कैकेयीनें दशरथास सांगितलें: “माझ्या भरताला आजोळाहून आणून राज्यावर बसवा; आणि रामाला चौदा वर्षे वनवासास पाठवा”. दु:खाच्या आवेगानें दशरथ राजास मूर्च्छा आली.कैकेयानें आपला हट्ट सोडला नाहीं. रामाला ही सर्व हकीगत समजली. त्या वेळीं रामानें कैकेयीस सांगितलें, “मी आनंदानें राजाची प्रतिज्ञा पूर्ण करितों आणि आतांच वल्कलें धारण करुन वनवासास जातों. मातापितरांची सेवा करणें व त्यांचें वचन पाळणें यांखेरीज रामाला दुसरा धर्म नाहीं.” त्यानंतर रामानें आपल्या कौसल्या मातेचें सांत्वन करुन तिचा आशीर्वाद घेतला. तिनें रामाला सागितलें.“जो धर्मं तूं एवढया निश्चयानें पाळीत आहेस तोच तुझें वनांत रक्षण करो.” रामाची हकीगत सीतेला समजली. तिनें हट्ट धरला, “आपल्या वनवासाची वांटेकरीण मी आहें. भार्या ही एकटी आपल्या पतीचें भाग्य भोगणारी आहे. मी तुमच्याबरोबर येणार. पुढच्या रस्त्यांतील कांटेकुटे मी आपल्या पायांनीं दाबून तुमचा रस्ता साफ करीन. तुमच्या सहवासांत मला सारें सुख आहे.” शेवटीं रामानें होकार दिला, तेव्हां सीतेला अत्यंत आनंद झाला. यत्किंचितहि दु:खी न होतां सीतेनें आपली सर्व संपत्ति सख्यांना, ब्राह्मणांना व नोकरांना दान करुन टाकली. रामाबरोबर येण्यास लक्ष्मणहि सिध्द झाला. रामानेंहि आपली संपत्ति परिजनादिकांना दिली आणि हीं तिघें वल्कलें नेसून वाडयाबाहेर पडलीं. सर्व अयोध्यानगरी शोकसागरांत बुडून गेली ! रामाच्या वनवासांत भविष्य काळाच्या केवढाल्या घटना सांठविल्या होत्या !
----------------
वैशाख शु. १
रायगडचें स्वातंत्र्य हरपलें !
शके १७४० च्या वैशाख शु. १ रोजीं शेवटच्या बाजीरावाची पत्नी राजधानी रायगड लढवीत असतांना पराभूत झाली.
अठराव्या शतकात बाजीराव - इंग्रज यांच्या अनेक झटापटी होऊन बाजीरावाचा पूर्ण पराभव झाल्यावर बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई रायगड किल्ल्यावर राहिली होती. या किल्ल्याकडे इंग्रजांचा मोर्चा निघाला. कर्नल प्राँथरने ही कामगिरी हातीं घॆतली. रायगड किल्ला उंचीला जास्त व चढण्यास अवघड म्हणून तोफा चढविण्यास इंग्रजांना त्रास पडलाच. किल्ल्याचा अधिकारी शेख नांवाचा अरब असून त्याच्या हाताखालीं अरबी, सिंधी, मराठे इत्यादि एक हजार शिपाई होते. त्या सर्वानीं कसून विरोध केला. “हें स्वातंत्र्यदेवतेचें माहेरघर आहे, हा सगळया किल्ल्यांचा राजा आहे, हा शिवाजीमहाराजांचा किल्लां आहे, रामदासांच्या भगव्या झेंडायाचा आधारस्तंभ आहे,” या भावनेने सर्व जण लढत होते. कर्नल प्राँथरनें शेवटचा मारा करण्यापूर्वी वाराणशीबाईना निरोप पाठविला, “तुम्ही किल्ल्यांतून बाहेर पडून जात असाल तर आम्ही सुरक्षितपणें जाऊं देतों.” तें ऐकून बाई किल्लेदाराला म्हणाल्या, “येथें माझ्या सहवासानें माझ्या पोटच्या मुलांप्रमाणें या तुमच्या सगळया शिपायांवर माझें मातृप्रेम जडलें आहे. या माझ्या मुलाबाळांना टाकून जाऊं ?” बाईचें हें बोलणें ऐकल्यावर सर्व जण मोठया जोमानें लढले. पण उपयोग झाला नाहीं. शेवटीं वैशाख शु. १ रोजीं दक्षिणेकडील गुयरीच्या डोंगरावरुन मारगिरी करणार्या तोफेंतून आट इंची गोळा रायगडावरील दारुच्या कोठींत पडून सर्वत्र भडका उडाला. भूकंप व्हावा तसा रायगड हादरला. “मशिदी आणि महादेवाचीं देवळें यांतून धुराचे लोट निघूं लागले. बुरुजाच्या भिंती धडाधड कोसळूं लागल्या. शिवाजीमहाराजांच्या वेळच्या जुन्या इमारतीचें दगड कोसळून पडूं लागले. फार काय, खुद्द शिवाजीमहाराजांची जी समाधि होती तीहि कोसळून पडणार्या दगडांच्या आणि विटांच्या ढिगाखालीं दिसेनाशी झाली.” आणि याच दिवशी सायंकाळीं वाराणशीबाईच्या सल्ल्यानें किल्ला खाली करुन देण्याचें किल्लेदारानें कबूल केलें.
- ६ मे १८१८
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP