वैशाख वद्य ६
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
स्वातंत्र्यवीरांचा जन्मदिवस !
शके १८०५ च्या वैशाख व. ६ रोजीं सुप्रसिध्द क्रांतिकारक, प्रभावी वक्ते आणि विख्यात साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म झाला.
नाशिकजवळील भगूर हें त्यांचें जन्मस्थान. इंग्लंडमध्यें कायद्याचा अभ्यास करीत असतांनाच सत्तावनच्या स्वातंत्र्ययुध्दाचें संशोधन, शिवाजी उत्सव, मदनलाला धिंग्रांच्या निषेधाला विरोध, इत्यादि कारणांमुळें सावरकर क्रांतिकारक म्हणून प्रसिध्द झाले. क्रांतिकारकांवर सरकारचा विलक्षण रोष होता. सन १९१० मध्यें लंडनहून हिंदुस्थानांत सरकारी बंदोबस्तांत त्यांना आणलें जात असतां त्यांनीं मार्सेलिस बंदरशेजारीं बोटींतून समुद्रांत उडी टाकली, आणि पोहत पोहत जाऊन फ्रान्साचा किनारा गांठला. परंतु, दुदैवानें फ्रेंच पोलिसांनीं त्यांना गांठून हिदी पोलिसांच्या स्वाधीन केलें. त्यांच्याविरुध्द खटला सुरु होऊन त्यांना दोन जन्मठेपीच्या शिक्षा झाल्या. यावर सावरकरांनीं उद्गार काढिले, “तुमच्या नियम - निर्बधानुसार तुम्हीं जी परमावधीची शिक्षा मला सांगितली आहे, ती मिमूटपणें सोसण्यास मी सिध्द आहें. आमची प्रिय मातृभूमि तत्कालीन नसली तरी शाश्वतीच्या विजयाप्रत पोंचावयाची ती हालापेष्टा व स्वार्थत्याग या मार्गानीच पोंचेल अशी माझी श्रध्दा आहे.” त्यानंतर, त्यांना डोंगरी, भायखळा, ठाणें व मद्रास या क्रमानें अंदमानला नेण्यांत आलें. तेथील १४ वर्षाची रोमांचकारी हकीकत त्यांनीं आपल्या “माझी जन्मठेपी” मध्यें सविस्तरपणें वर्णन केली आहे. सन १९२४ मध्यें त्यांची मुक्तता झाली. १९३७ मध्यें त्यांची मुक्तता झाली. १९३७ मध्यें त्यांच्यावरील निर्बध काढण्यांत आल्यावर त्यांनीं हिंदुसभेच्या कार्याला वाहून घेऊन सर्व भरतखंडांत हिदुत्वाचा तुफानी प्रचार केला. गांधी - खून - खटल्याच्या निर्णयामध्यें सावरकर निष्कलंकपणें मुक्त झाले. धगधगणार्या अग्रींतून सोने शुध्द होऊन निघालें.
कवित्व आणि स्वातंत्र्यवादी देशभक्ति यांचा मधुर संगम सावरकरांमध्यें स्पष्टपणें दिसून येतो. त्यांच्या देशभक्तीला चटकन् काव्याचें स्वरुप येतें. ब्रिस्टलच्या तुरुंगांतून आपल्या स्नेह्यांना पाठविलेल्या “शेवटचा राम राम” या गद्यकाव्यांत खरे सावरकर चमकतांना दिसतात. उच्च प्रकारचे साहित्यिक म्हणूनहि त्यांची योग्यता फार मोठी आहे.
- २८ मे १८८३
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP