वैशाख शुद्ध ११
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
मल्हारराव होळकरांचें निधन !
शके १६८८ च्या वैशाख शु. ११ रोजीं इंदूरच्या राज्याचे प्रसिध्द संस्थापक मल्हारराव होळकर यांचें निधन झालें.
तो धनगर असून नीरा नदीच्या कांठच्या होळ गांवचा राहणारा. बाजीराव पेशवे यांजकडे प्रथम साधारण शिपाई म्हणून हा कामास लागला. आणि पुढें आपल्या कर्तबगारीच्या जोरावर माळव्यांतील चौथाई व सरदेशमुखी गोळा करण्याचें काम यानें आपल्याकडे घेतलें. तिकडे त्यानें चांगलाच पराक्रम केला. बहादुरखाअ रोहिला व महमदखान बंगश यांचा पराभव केल्यानंतर मल्हाररावाचें वजन उत्तरेंत चांगलेंच वाढलें. रोहिल्यांचा पुरता मोड करण्याचा विचार मल्हाररावाचा होता. कुंभेरीच्या वेढयांत त्याचा पुत्र खंडेराव मारला गेला. त्या वेळीं इरेस पेटून यानें प्रतिज्ञा केली कीं, ‘सुरजमल्लाचा शिरच्छेद करीन व कुंभेरीची माती यमुनेंत टाकीन, नाहीं तर प्राणत्याग करीन.’ उत्तर भारतांतील सर्व राजकारण याच्याच सल्ल्यानें चालत असे. पेशव्यांनीं उत्तरेच्या कारभारात ढवळाढवळ करणें त्याला खपत नसे. पानपतच्या युध्दांत पेशवे, शिंदे यांच्याशीं त्याचें फारसें जमलें नाहीं. शेवटीं जाटांचें पारिपत्य करण्यासाठीं अलमपुरास आला असतां तो मरण पावला. “दादा व सुभेदार यांच्या भेटी झाल्यानंतर मल्हारजीच्या व श्रीमंतांच्या भेटी करुन दिल्या. असें असतां सुभेदाराचे शरीरीं दोन - अडीच मास समाधान नव्हतें. जाठांचे पारिपत्याकरितां श्रीमंत सहवर्तमान झांशी प्रातांत अलमपुरास आल्यावर कायम झाले. दैवी, मानवी उपाय अनुष्ठान व दानधर्म बहुत कांहीं केले. आयुमर्यादेकरुन गुणास न येतां वैशाख श. ११ मंगळवारीं पावणेदोन प्रहर दिवसा देवाज्ञा पावले. व्दारकाबाई व बजाबाई यांनीं सहगमन केलें.” मल्हाररावांचें वय मृत्युसमयीं ७३ वर्षाचें होतें. “पेशवाईच्या अव्वलीपासून मराठेशाहींतील सर्व घडामोडी व स्थित्यंतरें पाहून त्यांत प्रत्यक्ष भाग घेतलेला अनुभविक जुना सरदार या वेळीं हा एकच होता. मल्हारराव होळकर केवळ शिपाईगिरींतच तरबेज होते असें नव्हे तर त्यांचे अंगी मसलत, दूरदृष्टि व सावधपणा हे गुणविशेष होते.”
- २० मे १७६६
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP