शिवदिननाथांचा जन्म !
शके १६२० च्या वैशाख व. ७ रोजीं नाथपरंपरेंतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष शिवदिननाथ यांचा जन्म झाला.
श्रीआदिनाथ, मत्स्येंन्द्रनाथ, गोरखनाथ, गैनीनाथ, निवृत्तिनाथ, ज्ञाननाथ, सत्यामलनाथ, गैबीनाथ, गुप्तनाथ, उद्बोधनाथ, केसरीनाथ आणि शिवदिननाथ अशी यांची परंपरा आहे. शिवदिननाथ हे यजुर्वेदी कौशिक गोत्री ब्राह्मण असून यांच्या वडिलांचें नांव कृष्णाजीपंत असें होतें. ते पैठण येथील रहिवासी असून त्यांची वृत्ति ज्योतिषपणाची होती. यांचे चिरंजीव शिवदिननाथ अति खोडकर निघाले म्हणून त्यांच्या आईनें त्यांना प्रसिध्द केसरीनाथांच्या स्वाधीन केलें. केसरीनाथांनीं, स्नान झाल्यानंतर पुढें खडावा आणून ठेवण्याची कामगिरी शिवदिनाथांच्यावर सोंपविली होती. एके दिवशीं त्यांच्या हातून या सेवेंत अंतर पडलें; म्हणून केसरीनाथांनीं, ‘खडाव मारिली त्या मुलाला । खोंच पडली कपाळाला । रक्त भळभळां वाहतसे’, अशुध्द रक्ताबरोबर शिष्याच्या मनांतील सर्व अशुध्दता निघून गेली. शिवदिननाथांचें आचरण निर्मळ झाल्यानंतर केसरीनाथांनीं त्यांना शके १६२८ मध्यें गुरुमंत्र दिला. शिवदिननाथांनीं मराठेशाहीचें वैभव पाहिलें होतें; आणि पानिपतचा जबर धक्काहि त्यांच्या डोळयांसमोर होता. त्यानंतर झालेली राष्ट्राची अवस्था त्यांनीं वर्णन केली आहे, ‘सोळाशतें चौर्यांशित झाली धुळधानी । व्दैतराज्य दुष्टबुध्दि नासिले प्रधानी ॥” या पदांत महाराष्ट्रांतील हाहाकार त्यांनीं चित्रित केला आहे. त्यांची इतर फुटकळ पद्यरचना असून ‘विवेकदर्पण’; ‘ज्ञान्प्रदीप’, इत्यादि ग्रंथरचनाहि त्यांनीं केली आहे. ‘भाव धरारे, अपुलासा देव करारे’; ‘तोवरि हळहळरे, नाहीं भक्तिबळ रें’; ‘माझी देवपुजा देवपुजा, पाय तुझे गुरुराजा, इत्यादि त्यांचीं पदें महाराष्ट्रांत प्रसिध्द आहेत.
मोरोपंत त्यांच्यासंबंधीं म्हणतात -
“गावें नतपद्मातें जो दे नि:सीम शिव, दिनकर या !
पटु हित उपासकाचें, श्रीशिवदिन तवि शिवदिन कराया”
- २२ एप्रिल १६९८
---------
वैशाख व. ७
छत्रपति शाहू यांचा जन्म !
शके १६०४ च्या वैशाख व. ७ रोजीं छत्रपति संभाजी व येसूबाई यांचे चिरंजीव शाहू छत्रपति यांचा जन्म झाला.
त्याचें मूळचें नांव शिवाजी. संभाजीच्या वधानंतर सूर्याची पिसाळ याच्या फितुरीमुळें रायगड औरंगजेबाच्या ताब्यांत आला. त्या वेळीं तो व राजमाता येसूबाई असे मोंगलाच्या हातीं सांपडले. बादशहानें शाहूची कैदेंतील व्यवस्था उत्तम ठेविली होती. प्रत्येकाच्या खर्चास नेमणुका देऊन नोकराचाकरांचीहि व्यवस्था चांगली करण्यात आली होती. शाहूला राजा ही पदवी देऊन सात हजारांची मनसबहि दिली. शाहू, येसूबाई वगैरेंचा परामर्श घेण्यांत औरंगजेबाची मुलगी झीन्नतुन्निसा ही तत्पर होती. ती स्वत: शाहूस कांहीं कमी पडूं देत नसे. दागदागिने, कपडालत्ता, मेवामिठाई, जें जें कांहीं हवें असेल तें तें तिनें त्यांना पुरविलें. असें असलें तरी शाहूवरील पहारा मात्र सक्त असे. पुढें औरंगजेबाच्यव समाप्तीनंतर अजमशहानें मराठयांत दुफळी निर्माण व्हावी या हेतुनें त्यांना सोडून दिलें. वयाची सतरा वर्षे कैदेंत घालविल्यामुळें त्याच्यामध्यें थोडी विलासप्रियता शिरली असली तरी राज्य चालवण्याचें ज्ञान प्राप्त झालें होतें. शाहूची सुटका झाल्यानंतर खंडो बल्लाळ व धनाजी जाधव हे त्यास येऊन मिळाले, तेव्हां शाहूनें सातारा येथें आपणांस राज्याभिषेक करवून घेतला. येथपासून शाहू व ताराबाई असे दोन पक्ष मराठयांमध्यें निर्माण झाले. प्रथमपासूनच मदत करणारा म्हणून बाळाजी विश्वनाथ यास शाहूनें पेशवाई दिली. बाजीराव व बाळाजी बाजीराव यांना हाताशीं धरुन त्यांनीं मराठी राज्याचा फारच विस्तार केला. कोल्हापूरच्या संभाजीवर चाल करुन त्याला जहागिरी देऊन वारणेचा प्रख्यात रह करविला.
जंजिर्याच्या सिद्दीविरुध्द मोहीम उभारुन तेथील हिंदूंना निर्भय करण्यासाठीं त्यांनीं फारच प्रयत्न केले. शाहूचें वजन महाराष्ट्रांत बरेंच वाढलें. शंकराजी मल्हार नगगुंदकर यानें शाहू व मोंगल यांच्यांत एक तह घडवून आणला. या तहामुळें शिवाजीच्या राज्याशिवाय खानदेश, गोंडवन, वर्हाड, हैदराबाद व कर्नाटक हे प्रांत त्यांना मिळाले; आणि दक्षिणेंतील मोंगलाईत चौथाई व सरदेशमुखी प्राप्त झाली.
- १८ मे १२६८