वैशाख शुद्ध ५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
इंग्रजी बावटा रायगडावर !
शके १७४० च्या वैशाख शु. ५ रोजीं इंग्रज - मराठे यांच्यामध्यें तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या हातीं जाऊन त्यावर युनियन जँक झळकलें.
वैशाख शु. १ रोजीं बाजीरावपत्नी वाराणशीबाई पराभूत झाल्याच होत्या. दुसर्या दिवसापासून तहाची वाटाघाट सुरु झाली. मराठे अद्याप आपला बाणेदारपणा सोडण्यास तयार नव्हते. कोठून तरी मदत येईल, अजून इंग्रजांचा पराभव करुं अशी आशा त्यांना होती. तों पुन्हा इंग्रजांकडून तोफांचा भडिमार सुरु झाला. तेव्हा किल्लेदार शेख अब्दुल्ल हा स्वत: तहाच्या वाटाघाटी करण्यास गडाखालीं आला. निरुपाय होऊन तह ठरला. ‘शंभर अरब व ऐशी मराठे सैनिक यांनीं आपल्या कुटुंबासह रायगड सोडून जावें. आपल्या पांच अनुयायांसह किल्लेदारानें पुण्यास असावें. वाराणशीबाई यांचेबरोबर किल्लेदाराच्या मंडळीपैकीं कोणी नसावा’; इत्यादि कलमें ठरुन वैशाख शु. ५ रोजीं कर्नल प्राँथर वर गेला. किल्ल्याचा दरवाजा ताब्यांत घेऊन त्यानें आंत पाऊल टाकलें तों सर्व किल्ला बेचिराख झालेला त्याच्या दृष्टीस पडला. कित्येक इमारती अजूनहि पेटत होत्या. प्राँथरनें प्रथम वाराणशीबाईची भेट घेतली. ती बिचारी दु:खानें व निराशेनें चूर होऊन गेली होती. खाजगी मालमत्तेसह तिला पुण्यास जाण्यास परवानगी मिळाली; आणि शेवटीं ‘या बाईच्या पावसांबरोबर रायगडाला आणि अखिल महाराष्ट्राला स्वातंत्र्यलक्ष्मी सोडून गेली.’ इंग्रजांनीं आपला बावटा किल्ल्यावर रोवला. किल्ल्यांतील पांच लक्ष रोकड नाण्यांच्या रुपानें इंग्रजांच्या हातीं आली; आणि यानंतर रायगडची झालेली दैना काय विचारावी ? शके १७४० च्या वेढयांत इंग्रजी तोफांनीं सर्व इमारती जळून, मोडून, तोडून टाकल्या होत्या. फक्त कांहीं भिंताडे व एकदोन इमारती उभ्या होत्या. “कित्येक तळीं, हौद जलशून्य झाल्यामुळें अतिशोकानें पाणी आटलेल्या डोळयांसारखीं दिसूं लागलीं. नयनमनोहर गंगासागर चिखलानें ओहळून व तळाशीं फुटून भकास दिसत होता. अशा प्रकारें शिवरायांची ही राजधानी इंग्रजांच्या ताब्यांत गेली. महाराष्ट्राच्या या पुण्यक्षेत्रावर परकीय अमल सुरु झाला.
- १० मे १८१८
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP