वैशाख वद्य १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
स्वातंत्र्य - युध्दाची पहिली ठिणगी !
शके १७७९ च्या वैशाख व. १ रोजीं विख्यात अशा ‘सत्तावनच्या स्वातंत्र्ययुध्दा’ला सुरुवात झाली.
इंग्रज इतिहासकार याला केवळ ‘शिपायांच्या बंडा’ चें स्वरुप देतात व या क्रांतियुध्दाची भूमिकाच विकृत करुं पाहतात. चरबी लावलेलीं काडतुसें, शास्त्रीय सुधारणांचा विपरीत परिणाम, इत्यादि क्षुल्लक गोष्टींना नसतें महत्त्व आजवर देण्यांत येऊन या स्वातंत्र्यसंग्रामाची किमत शक्य तेवढी कमी करण्याचा उपद्व्याप इंग्रजांकडून झाला. परंतु, या रणकुंडांत नानासाहेब पेशवे, झांशीची लक्ष्मीबाई, रोहिलखंडाचा खान बहादुरखान, दिल्लीचा बादशहा, इत्यादि अनेक वीराग्रणींनीं केलेल्या पराक्रमांचें संशोधन करुन ‘स्वधर्म व स्वराज्य’ हींच महान् तत्त्वें या युध्दाच्या बुडाशीं आहेत’ असा निर्णय स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीं आपल्या विख्यात ‘सत्तावनचें स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकांत दिला आहे. एकामागून एक अशीं अनेक संस्थानें डलहौसीनें खालसा केल्यामुळें सर्वत्र अग्नि धुमसत होता. दिल्लीच्या आसपास सशस्त्र उठावाची गुप्त मसलत चालू होती; आणि या धुमसणार्या अग्नीची पहिली ठिणगी वैशाख व. १ रोजीं मीरत येथें उडाली. येथील शिपायांनीं या दिवशीं सायंकाळीं एकदम धामधुमीस सुरुवात केली. तुरुंगावर हल्ला करुन कैदी असलेले शिपाई मुक्त केले. आणि जे गोरे दिसतील त्यांना ठार मारण्यास सुरुवात केली. चर्चमध्यें घंटांचे नाद ऐकूं येऊं लागल्याबरोबर मीरत व आसपासच्या खेडयांतील लोक मोडकींतोडकीं शस्त्रें घेऊन गोर्या लोकांच्यावर धांवून गेले. “पायदळ काय, तोफखाना काय, हिंदु काय नि मुसलमा काय, सारे इंग्लिशांच्या रक्ताला तहानेलेले होते. बाजारांत एकच हलकल्लोळ उडाला. इंग्लिशांचे बंगले, त्यांच्या कचेर्या, त्यांच्या खानावळी यांना पेटवून देण्यांत आलें. मीरतचें आकाश भेसूर दिसूं लागलें. धुराचे लोट नि ज्वालांचे भयंकर लोळ यांनीं वातावरण व्याप्त होऊन सहस्रावधि कंठांतील आरोळयांनीं, विशेषत: ‘मारो फिरंगीको’ या घोषणांनीं सर्व दिशा दणाणून गेल्या.”
- १० मे १८५७
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP