वैशाख शुद्ध १५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
भगवान् कूर्मदेवांचा अवतार !
वैशाख शु. १५ या दिवशीं देवदानवांचें समुद्रमंथन यशस्वी व्हावें म्हणून भगवान् विष्णूंनीं कूर्मावतार धारण केला !
“कूर्म (कांसव ) हा विष्णूचा दुसरा अवतार. या अवताराचें मूळ शतपथ ब्राह्मणांत सांपडतें. प्रजापतीनें कूर्माचें रुप धारण करुन प्रजोत्पत्ति केल्याची कथा त्यांत आहे. “त्यानंतर सत्ययुगांत विष्णूंनीं प्रलयकालीं हरवलेल्या कांहीं अमोलिक वस्तु परत मिळविण्यासाठीं कूम्राचा अवतार घेतला. व मंदराचलाखालीं क्षीरसमुद्रांत तो अढळ राहिला. त्यानंतर दैत्यांनीं वासुकीचा दोर करुन समुद्रमंथन केलें व चौदा रत्नें बाहेर काढलीं, अशी माहिती ‘ज्ञानकोश’ कार देतात. मत्स्यभगवानानंतर परमेश्वरानें कूर्मावतार धारण केला. अत्यंत उंच असणार्या व सुवर्णशृंगांनीं वेढलेल्या मेरु पर्वतावर देव राहत असतां त्यांना अमृतप्राशनाची इच्छा झाली; त्यासाठीं सर्व देव तपश्चर्या करुं लागले. शेवटीं नारायणानें उपाय सुचविला कीं, ‘देव आणि असुर यांनीं समुद्राचें मंथन करावें म्हणजे अमृताचा लाभ होईल.’ त्याप्रमाणें समुद्रमंथनास सुरुवात झाली. समुद्रमंथनाचें कारण इतरत्र दुसरेंहि सांगितलें आहे. दैत्य - सुरांच्या युध्दांत दैत्यांनीं देवांची सर्व संपत्ति समुद्रांत टाकली. ती बाहेर काढण्यास समुद्रमंथन सुरु झालें. एवढा मोठा सागर घुसळण्यास रवी कोणती ? मदंर पर्वताची रवी करुन वासुकी सर्पास दोर करणांत आलें. आणि मंथनास सुरुवात झाली, तों मंदर पर्वत समुद्राच्या तळाशीं जाऊं लागला. सर्व देवांनीं पुन्हा नारायणाची प्रार्थना केली. तेव्हां भगवान् विष्णूंनीं कूर्माचें रुप धारण करुन तो मंदर पर्वत आपल्या पाठीवर धारण केला. त्यानंतर समुद्रमंथन यशस्वी झालें. वासुकीच्या शेपटीस देवांनीं धरिलें; आणि तोंडाकडॆ असुरांची योजना झाली. सर्व देवांना विष्णूंनीं आपलें बल दिलें, तेव्हां मंथनांतून सूर्य, चंद्र, लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, अमृत, इत्यादि चौदा रत्नें बाहेर आलीं. ‘अमृत आम्ही घेणार’ म्हणून दैत्य - सुरांत झगडा लागला; तो थांबविण्यासाठीं पुन्हा विष्णूला मोहिनीरुप धारण करावें लागलें. असें सांगतांत कीं, मत्स्यानंतर भगवंतांनीं कूर्माचा अवतार धारण केला, यांत उत्क्रांतितत्त्व आहे.
---------------
वैशाख शु. १५
बिपिनचंद्र पाल यांचें निधन !
शके १८५४ च्या वैशाख शु. १५ रोजीं बंगालमधील सुप्रसिध्द राजकारणी पुरुष व प्रक्षोभक वक्ते बिपिनचंद्र पाल यांचें निधन झालें.
बंगालमधील सिल्हट गांवीं त्यांचा जन्म झाला. मँट्रिक झाल्यावर बिपिनचंद्र कलकत्ता येथें शिक्षणास आले. तेथें त्यांना केशवचंद्र सेन यांचा सहवास घडून त्यांनीं ब्राह्म समाजाचां स्वीकार केला. त्यांच्या वडिलांना आपल्या चिरजीवांनीं केलेलें हें ‘अब्रह्मण्य’ खपलें नाहीं. आपल्या इस्टेटीपैकीं एक पैहि बिपिनचंद्रांना न मिळण्याची व्यवस्था त्यांनीं केली होतीओ, पण शेवटीं त्यांचें मन पालटलें. पहिली पत्नी निवर्तल्यावर बिपिनचंद्रांनीं सुरेंद्रनाथ बानर्जीच्या विधवा पुतणीशीं लग्न करुन आपलें नांव कर्त्या सुधारकांत दाखल केलें. विद्यार्जन झाल्यावर कटकच्या शाळेंत ते तीन वर्षे हेडमास्तर होते. त्यानंतर पाच - सहा वर्षे आपल्याच सिल्हट गांवीं त्यांनीं एक विद्यालय चालविलें. पुढें बंगलोरच्या शाळेचे मुख्याध्यापक व कलकत्त्याच्या ग्रंथालयाचे व्यवस्थापक अशींहि यांनीं कामें केली. यानंतर त्यांनीं राजकारणांत प्रवेशा केला. त्यांचें पहिलें सुप्रसिध्द भाषण मद्रास येथील राष्ट्रसभेंत हत्यारांच्या कायद्यावर झालें. त्यांच्या आवेशयुक्त व क्षोभकारक वक्तृत्वकलेची सर्वत्र प्रशंसा होऊं लागली. १९०० सालांत ते तत्त्वज्ञानाच्या तोलनिक अभ्यासासाठीं इंग्लंडला गेले. तेथें ते ‘स्वराज्य’ नांवाचें मासिक चालवीत. भारतांत त्यांचें ‘न्यू इंडिया’ नांवाचें साप्ताहिक असून अरविंदबाबूंच्या ‘वंदे मातरम्’ शींहि त्यांचा निकटचा संबंध होता. १९११ सालीं राजद्रोहाच्या आरोपाखालीं त्यांना पुन्हा शिक्षा झाली. तथापि नंतरच्या होमरुलच्या चळवळींत सामील होऊन शिष्टमंडळाबरोबर ते विलायतलाहि गेले. त्याच्या आयुष्यांतील मध्यान्हकाल म्हणजे लाल, पाल, बाल, या त्रयीनें वंगभंग व स्वदेशी - बहिष्काराच्या प्रचंड आंदोलनाच्या वेळीं केलेल्या अव्दितीय कामगिरीचा होय. ‘पहाडी आवाजाचे दणदणीत वक्ते’ अशी त्यांची कीर्ति या काळांत सर्व भारतांत झाली होती. ‘Indian Nationalism' हा यांचा ग्रंथ प्रसिध्द आहे.
- २० मे १९३२
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP