वैशाख शुद्ध २

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


प्रतापी वीर परशुराम !

वैशाख शु. २ या दिवशीं महापराक्रमी वीर परशुराम याचा जन्म झाला. दशावतारांतील हा सहावा अवतार होय.
भृगुकुळांतील जमदग्नीचा मुलगा परशुराम. परशुरामानें केलेल्या अव्दितीय पराक्रमामुळें त्याचें नांव विख्यात होऊन राहिलें आहे. तो अत्यंत तेजस्वी असून धनुर्विद्येवर त्याची अलोट भक्ति होती. शंकराच्या कृपेमुळें त्याला कधींहि कुंठित न होणारा परशु मिळाला होता. वर्तिकावत्‍ देशाचा राजा चित्ररथ याकडे पाहून रेणुकेचें मन बिथरल्याचा संशय जमद्‍ग्नीस आला, तेव्हां तिचा वध करण्यास त्यानें आपल्या चार मुलांना सांगितलें. त्यांपैकीं परशुरामानें आपल्या मातेचा वध केला. त्यानंतर पित्याची कृपा संपादन करुन रेणुकेस पूर्वीप्रमाणें जिवंतहि केलें. नर्मदेच्या उत्तर तीरावर कार्तवीर्य ऊर्फ सहस्रार्जुन ना नांवाचा पराक्रमी पुरुष दिग्विजय करीत होता. त्यानें ब्रह्मनिष्ठ वसिष्ठ ऋषींचा आश्रम जाळून टाकल्यावर त्यांनीं ‘तुझ्या सहस्र बाहूचें वन परशुराम तोडून टाकील’ असा शाप कार्तवीर्यास दिला आणि ही शापवाणी लौकरच खरी ठरली. सहस्रार्जुनानें जमदग्नीच्या आश्रमांतील कामधेनु पळवून नेली. इतकेंच नव्हे तर पुढें त्यानें परशुराम घरीं नसतां वृध्द जमदग्नीचा एकवीस वेळां वार करुन वध केला. परशुरामाच्या संतापानें सीमा ओलांडली.
त्यानें प्रतिज्ञा केली: “क्षत्रियांचा समूळ नाश करीन”; आणि चित्तांत सूड व हातांत परशु घेऊन परशुराम घराबाहेर पडला. त्यानें कार्तवीर्याच्या सैन्याची धुळधाण उडविली.परशुरामानें आपल्या कुर्‍हाडीनें त्याचे हजार बाहु खडाखड तोडून टाकले आणि त्याच्या मुलांचाहि पराभव केला. त्यानंतर परशुरामानें एकवीस वेळा क्षत्रियांचा पराभव केला. त्यानें आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.  ब्रह्मविद्‍ ब्राह्मणांना कधीं आपत्काळ प्राप्त झाला तरच मी शस्त्र धारण करीन, असा त्याचा निश्चय होता. सर्व पृथ्वी हस्तगत केली तरी त्याला राज्य करावयाचें नव्हतें. त्यानें एक मोठा यज्ञ केला आणि सर्व संपत्ति ब्राह्मणांना दान देऊन परशुराम तापासाप्रमाणें महेंद्र पर्वतावर आश्रम स्थापन करुन राहिला.

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP