वैशाख वद्य २
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“टोपीकर म्लानत्व पावले !”
शके १६६१ च्या वैशाख व. २ रोजीं चिमाजीआप्पा यांनीं अव्दितीय पराक्रम करुन वसईचा किल्ला जिंकून तह केला.
हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्यावर पोर्तुगीझांचा धर्म - च्छल वाढूं लागला. तेव्हां या प्रकरणीं लक्ष घालण्यासाठीं चिमाजीआप्पा निघाले. वसईचा किल्ला मोठा बळकट होता. पश्चिमेस व दक्षिणेस खाडी आणि पूर्वेकडे चिखल, अशी स्थिति असल्यामुळें वसईवर हल्ला करण्यास कठीण होतें. मराठयांनीं उत्तरेकडून मोर्चे लाविले: पण पोर्तुगीझांच्या बंदुकीपुढें कांहीं उपाय चालत नव्हता. परंतु, मराठयांचा निश्चय मोठा होता. वसई घेतल्याखेरीज परत फिरणार नाहीं, या निश्चयानें चिमाजीआप्पा बोलले, “माझें मस्तक तरी किल्ल्यांत जाऊन पडूं द्या” या निर्वाणीच्या शब्दामुळें सैनिकांना हुरुप चढला. दहा सुरुंग तयार करवून त्यांना बत्ती दिली. त्याबरोबर लोकांची दाणादाण उडाली. बुरुज धडाधड कोसळूं लागल्यावर मराठे वर चढले; व त्यांनीं निकराचा हल्ला करुन वैशाख व. ८ ला वसई सर केली. ‘ज्या प्रकारें वानरांकरवीं लंका घेवविली, त्या प्रकारें ही गोष्ट जाली. दक्षिणी फौजेस उपाय करुन व छातीचा कोट करुन झुंजावे, हे हिंमत पूर्वी कोणी ऐकिलीहि नव्हती” या लढयांत मराठयांनीं जो पराक्रम केला त्यास इतरत्र तोड नाहीं. चिमाजीआप्पा ब्रह्मेंद्रस्वामींस लिहितात, “इकडील लोकांनीं भारती युध्दाप्रमाणें युध्द केलें. यामागें युध्दें बहुत जालीं. परंतु, या लढाईस जोडाच नाहीं. ... वसई स्वामीचे आशीर्वादें फत्ते झाली. श्रीचें सुदर्शन धर्मव्देष्टयाचे मस्तकीं वज्रप्रहार होऊन टोपीकर म्लानत्व पावले. स्वामीचे कर्तृत्वास पार नाहीं.”
याप्रमाणें किल्ला सर झाल्यावर पोर्तुगीझांचे वकील तह करण्यासाठीं आले. तहाच्या शर्ती ठरुन वैशाख व. २ रोजीं पोर्तुगीझांनीं किल्ला खाली केला. तेव्हां मराठयांनीं आंत प्रवेश केला. या तहांत एकूण बारा कलमें असून तो ‘प्राचीन युध्दनीतीचा स्मरणीय मासला होय’ असा निर्वाळा इतिहासकार देतात. वसईंच्या अपूर्व व्दिग्विजयामुळें चिमाजीआप्पाचें नांव इतिहासांत अमर झालें आहे.
- १२ मे १७३९
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP