वैशाख वद्य ८
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
‘यांनींच कौरवांचा पराभव होईल !’
वैशाख व. ८ या दिवशीं पांडवांपैकीं अर्जुनानें अज्ञातवासांत शमीच्या वृक्षावर ठेवलेलीं शस्त्रें धारण करुन कौरवांचा पराभव केला.
वनवासाचीं बारा वर्षें संपल्यावर अज्ञातवासांतील एक वर्ष काढण्यासाठीं पांडव विराट राजाकडे राहिले. बरोबरचीं शस्त्रें, धनुष्यबाण, इत्यादि नगरांत नेल्यास लोक ओळखतील म्हणून तीं शस्त्रें, कवचें, धनुष्यें, बाण व त्यांचे भाते नगराबाहेरील स्मशानांतील एका मोठया शमीच्या वृक्षावर ढोलींत ठेवण्यांत आलीं. मध्यंतरीं कीचकाचा वध झाला तेव्हां त्रिगर्त देशाचा राजा सुशर्मा व कौरव यांनीं विराटाच्या मत्स्य देशावर स्वारी करुन सूड उगविण्याचें ठरविलें. दक्षिणेकडून सुशर्म्यानें स्वारी करुन विराटाच्या हजारों गाई हरण केल्या. विराट राजाची व सुशर्म्याची लढाई होऊन विराटाचा पराभव झाला. परंतु भीम, नकुल व सहदेव या पांडवांच्या साहाय्यानें विराटाची सुटका झाली. याच वेळीं कौरवांनीं नगराच्या उत्तरेकडून हल्ला करुन विराटाच्या साठ हजार गाई लांबविल्या. कौरवांचा फडशा पाडण्यासाठीं विराटपुत्र उत्तर निघाला. अर्जुंन - बृहन्नडा - त्याचा सारथी झाला. भीष्म, द्रोण, अश्वत्थामा, दुर्योधन, इत्यादि धनुर्धराशीं युध्द करण्याचा प्रसंग पाहून उत्तराचें धैर्य खचून गेलें. “बृहन्नडे ! माझा प्राण वांचीव. गाई नेल्यात तर नेऊं देत” अशी गयावया राजपुत्र उत्तर करूं लागला. ‘युध्दाकरतां उभें राहिल्यावर परत फिरणें क्षत्रियाचें ब्रीद नव्हे.’ असा अर्जुनानें धीर दिला आणि आपला रथ शमीवृक्षाकडे वळविला. उत्तराकरवी त्यांवरील शस्त्रें काढलीं. अर्जुन बोलला, “या झाडावर पांडवांचीं शस्त्रें आहेत. त्यायोगेंच कौरवांचा पराभव होणें शक्य आहे.” उत्तरानें त्यावर पुसलें, “पांडव कोठें आहेत ?’ त्या वेळीं अर्जुनानें सर्व रहस्य प्रकट केलें. आपला स्त्रीवेष उतरुन शुभ्र पुरुषवेष धारण केला. आपल्या दिव्य अस्त्रांचें स्मरण केलें. साडेबत्तीस वर्षें हातांत वागाविलेलें व एक वर्ष स्वस्थ पडून राहिलेलें गांडीव धनुष्य हातीं घेऊन अर्जुनानें मोठया तेजस्वितेनें टणत्कार केला ! आणि कर्ण, कृप, द्रोण, अश्वत्थामा, भीष्म, विकर्ण, दुर्योधन या सर्वाशीं युध्द करुन विराटाच्या गाई सोडविल्या.
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP