“कुंसवाखालीं भक्ति गडप झाली !”
शके १२६० च्या वैशाख व. ५ रोजीं प्रसिध्द भगवद्भक्त चोखामेळा, हा मंगळवेढें येथील गांवकुसूं बांधीत असतां कोसळणार्या कुसवाखालीं सांपडला.
तेराव्या शतकात सर्व जमातींत साधु - संत निर्माण झाले होते. त्यांपैकीं चोखामेळा हा मंगळवेढयाचा महार. सर्व काळ कामधंदा करीत असतांना सारखें भगवन्नाम त्याच्या तोंडांत असे. नामदेवाप्रमाणें त्याचें सर्व कुटुंब कविता करीत होतें. चोखोबाचे अभंग भक्तिरसानें भरलेले आहेत.
चोखोबांच्या जीवितांतील अद्भुत घटना प्रा. श्री. म. माटे यांनीं आपल्या “मंगळवेढयाचें कुसूं” या लेखांत अमर केली आहे. कुसवाचें काम चालू असतां चोखा मनाशीं म्हणे “देवा, मी रात्रंदिवस कुसवाची माती येथें उकरतों ... येथें दुसरें कांही नाही, तुझें रुप विसरलों, तुझें ध्यान विसरलों, मला परदेशी कां केलेंसे ? मला पंढरी आठवते, मला तुझे मुख आठवतें ... मला पुढचा जन्म पंढरींत दे ... आतां मला घेऊन चल तुझ्याकडे, जन्मोजन्मीं तुझी सेवा दे मला माझ्या नाम्याच्या शेजारीं वस्ती करुं दे. देवा, आज मला उदास वाटत आहे, घडीघडी तुझ्याशीं मिळून जाण्याची आस बळावत आहे, मला घेऊन चल,” इतकें चोखा म्हणत आहे तों कुसूं एकदम धडाडून खालीं आलें. चोख्याच्या अंगावर मातीचा ढिगारा झाला. अजूनहि ‘विठ्ल विठ्ल’ शब्द ऐकूं येत आहे. विठ्ठलानें चोखामहाराला, या भगवद्भक्ताला, या नामपावनाला, ध्येयानें वेडया झालेल्या या प्रापंचिकाला, आपल्या पायाशीं नेलें. ज्ञानाला समाधींत बसवून नेलें, तुकाला इंद्रायणीच्या पाण्यांतून नेलें, चोख्याला कुसवाच्या भाराखालीं दडपून नेलें ! परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे !” त्यांतच चोखोबांचा अंत झाला. त्यांच्या अस्थि नामदेवानें पंढरपुरास नेऊन आपल्या हातांनीं त्या महाव्दारांत पुरल्या. आणि त्यावर समाधि बांधली.
“चोखामेळा अनामिक । भक्तराज तोचि एक
परब्रह्म त्याचे घरीं । न सांगतां काम करी”
अशी प्रशंसा जनाबाईनें चोखोबांची केली आहे.
- ९ मे १३३८
---------------
वैशाख व. ५
“मूळ कंदच उपटला !”
शके १६५८७ च्या वैशाख व. ५ रोजीं चिमाजीआप्पा यांनीं अव्दितीय पराक्रम करुन जंजिर्याच्या सिद्दीसाताचा पाडाव केला.
जंजिर्याच्या सिद्दीचा उपद्रव मराठी राज्यास फारच होऊं लागला. धार्मिक छ्ळ जारी होऊन चिपळूणजवळील परशुरामक्षेत्रासहि अपाय झाला. या सर्वाचा बंदोबस्त करण्यासाठीं शाहूमहाराजानें चिमाजीआप्पास कोंकणांत पाठविलें. मराठे व सिद्दी यांची मोठी लढाई झाली. सिद्दीसात मरेन वा मारीन या पणानें लढत होता. दोनहि पक्षांनीं अव्दितीय पराक्रम केला. स्वत:सिद्दीसातास सत्तावीस जखमा झाल्या. शेवटीं, नानाजीराव सुर्वे या सरदानें सिद्दीसातास ठार केलें. त्याच्या सैन्याचा नंतर पुरा मोड झाला. “तेराशें माणूस यांचें कंदन करुन भूमंडळास सुखी करुन मोटा कीर्तिघोष करुन यश घेतलें, पूर्वीपासून आपणास श्री यश देतच आहे, सांप्रत हें यश आगाध श्रीनें आपलें पदरीं सर्वोत्कर्षे घातलें” असें अभिनंदन चिमाजीआपाचें झालें. शाहूमहाराज, ब्रह्मेंद्रस्वामी, फत्तेसिंह भोसले,जिवाजी खंडेराव चिटणीस या सर्वांनी चिमाजीचा गौरव केला कीं, “सिद्दीसात केवळ रावणासारखा दैत्य. तो मारुन हबशाचा मूळ कंदच उपटून काढिला. चहूंकडे लौकिक विषेषात्कारें जोडिला.” शाहूनें तर चिमाजीस बहुमानवस्त्रें, हिरेजडित पदक, मोत्याची कंठी, रत्नजडित तरवार, इत्यादि वस्तु अर्पण केल्या. चिमाजीच्या यशाची बातमी शाहू शिकारीस गेला होता तेथें त्यास कळली. अत्यंत खुष होऊन त्यानें बातमीदारास सोन्याचें कडे बक्षीस दिलें “आणि आनंदाप्रीत्यर्थ तोफांची सरबत्ती दिली, नौबत वाजविली, खुशाली केली.”
जंजिर्याचा सिध्दी हा मोंगल बादशहाचा हस्तक होता; त्याचा पाडाव करण्याची योजना शिवकालांतहि झाली होती. सिद्दीसात मराठयांच्या उच्छेदास प्रवृत्त झाला होता. ब्रह्मेंद्रस्वामींच्या परशुराम मंदिराचा विध्वंस करणारा सिद्दीसात नाहींसा झालेला पाहून मराठेमंडळास आनंदाचें भरतें आलें. मराठयांच्या सत्तेचा दरारा सर्वत्र चालू झाला.
- १४ एप्रिल १७३६