वैशाख शुद्ध १४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
सर्वत्र परमेश्वर भरला आहे !
वैशाख शु. १४ या दिवशीं श्रीनृसिंह प्रकट झाले. दशावतारांतील हा चौथा अवतार. भगवान् विष्णूचे व्दारपाल जय - विजय हे सनकादिकांच्या शापामुळें भ्रष्ट होऊन दैत्य झाले होते. हिरण्यकश्यपु व हिरण्याक्ष अशीं त्यांचीं नांवें होतीं. विष्णूनें वराहरुप धारण अरुन हिरण्याक्षाचा वध केला. तेव्हां हिरण्यकश्यपूला अत्यंत क्रोध आला. त्यानें आपल्या राज्यांत तप, यज्ञ, वेदपाठ इत्यादि व्रतें करण्यास बंदी केली आणि तो अत्यंत उग्र असें तप करुं लागला.तेव्हां ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्यानें वर दिला कीं, सृष्टींतील कोणाहि पुरुषाच्या हातून तुझा मृत्यु घरामध्यें अगर बाहेर, रात्रीं अथवा दिवसां, पृथ्वीवर अगर आकाशांत होणार नाहीं. वरप्राप्तीनंतर हिरण्यकश्यपु देवादिकांना फारच त्रास देऊं लागला. त्याचा ज्येष्ठ पुत्र प्रल्हाद हा मोठा विष्णुभक्त होता. पित्यानें अनेक शिक्षा केल्या तरी त्यानें हरिभक्ति सोडली नाहीं. शेवटी संतत होऊन हिरण्यकश्यपु बोलला, “सांग, तुझा परमेश्वर कोठें आहे ?” प्रल्हादानें उत्तर दिलें, “तो तर सर्वत्र भरला आहे.” यावर त्यानें क्रोधानें आपल्या हातांतील गदा जवळच्या खांबावर मारली. त्या क्षणीं त्यांतून एक सिहाकृति स्वरुप निघालें. या नृसिंहरुप विष्णूनें हिरण्यकश्यपूला पकडून त्याचें पोट फाडून त्यास ठार मारलें.
“नृसिंहावतार हा परमेश्वराचें सर्वसाक्षित्व सिध्द करीत असून परमेश्वर स्थिर, चर, काष्ठपाषाणादिकांत भरुन उरला आहे. याचें तो उदाहरण होय. प्रवृत्तिपर विचाराचें जे लोक असतात त्यांच्या हातून अनुचित कृत्यें घडतात. त्यांना स्वत:च्या पराक्रमाची घमेंड असतें. परंतु, पापाचा घडा पूर्ण भरतांच त्यांचा नाश अकल्पित रीतीने कसा होतो, हें नृसिंहावतार सिध्द करीत आहे. प्रल्हाद हा या देशांत भक्तीचें बीं पेरणारा पहिला विष्णुभक्त असून तो कुलानें दैत्य होता. तरी देवांनाहि वंद्य झाला. सत्यमाग श्रेष्ठ मानून पित्याची अवज्ञा करणारा प्रल्हाद, मातेची अवज्ञा करणारा भरत, बंधूचा पक्ष सोडणारा बिभीषण, गुरुशीं युध्द करण्यास तयार झालेला भीष्म, मामाचा वध करणारा कृष्ण, या सर्वाना श्रेष्ठ मानण्यांत येतें”
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP