आत्मबोध टीका - श्लोक ६३
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
जगद्विलक्षणं ब्रह्म ब्रह्मणोन्यन्नकिंचन ।
ब्रह्मान्यद्भाति चेन्मिथ्या यथामरुमरीचिका ॥६३॥
जगताहुनी ब्रह्म असे वेगळे । परि ब्रह्माहूनि जग नसे निराळे । ब्रह्मावीण भासति ते मृगजळे । मारवाड देसि जापरि ॥६२॥
सिष्या येथें बरवेपण । सूक्ष्म करोनिया मन । हें अन्वयव्यतिरेकाचें वचन । समजोनि घेइ चांगले ॥६३॥
आगा व्यतिरेक जालिया वाचुन । वास्तवीक नोव्हे आत्मज्ञान । अन्वयव्यतिरेक दोन्हिविण । जिवन्मुक्तिपण न संभवे ॥६४॥
शुद्ध - ब्रह्म दृश्यातीत नेणे । वेदांत ऐकोनि सर्व ब्रह्म ह्मणे । व्यर्थ जाणावें त्याचें जिणें । किं नेणोनि समजले ह्मणतसे ॥६५॥ तयाचा अन्वय ना व्यतिरेक । तो सर्वस्वे जाणावा बहिर्मुख । किं दृश्यातेचि आत्मा नि:शेख । न समजोनि ह्मणतसे ॥६६॥ कोण्हि येक गुरुमुखे करुन । शुद्धात्मा व्यतिरेकें समजुन । साधोनि हाटयोग साधन । मस्तक भेदोनि जाति पै ॥६७॥
ते ब्रह्म लोकाप्रति जाति । तेथें चिरकालत्वें राहाति । जेव्हां विराट विलया पावे निश्चिति । तेव्हां ब्रह्मयासह मुक्ति त्यातें ॥६८॥ कारण किं दृशयतीत आत्मा कळला । परि दृश्याभास नाहिं निमाला । अद्वैत भाव नाहीं जाला । ह्मणोनि परंपरामुक्ति तया ॥६९॥ आतां जयाचा व्यतिरेक जाला । तेणें हाटयोग नाहिं संपादिला । आणि अन्वयहि नाहिं कळला । तो मागति जन्मा येतसे ॥७०॥ ये विषइं भगवान् सांगति गीतेत । योगभ्रष्ट ह्मणोनि त्या पुरुषाते । तो योगि अथवा श्रीमान् ग्रहाते । जन्माप्रति घेतसे ॥७१॥
तेथें त्यातें पूर्व बुद्धिकरुन । अन्वयरूप आत्मा समजोन । मग अद्वैतबुद्धि पुर्णपणें । सेवोनि मुक्त होतसे ॥७२॥
त्यातें जन्म घ्यावयाचें कारण । हेंहि तूंतें सांगतो जाण । ध्येय ध्यान हे त्रिपुटि क्षीण । जाली नाहिं तयाचि ॥७३॥
आत्मयाचें करितो ध्यान । ध्याता मी असे तयाहूनि भिन्न । ऐसे करित असतां देहपतन । जाला तया पुरुषाचा ॥७४॥
बैसलि होति चिज्जडग्रंथि । ती लिंगदेह - भेदें सुटलि नव्हति । म्हणोनि तयालागि मागति । जन्मासि येणे पडे पै ॥७५॥
आसो जो अन्वय - व्यतिरेकेसि । समजता जाला आत्मयासि । तो तेव्हांचि मुक्त निश्चयेसि । जाला येथील येथेचि ॥७६॥
तोचि ज्ञानिया जगताहून । ब्रह्म पाहातसे वेगळेपण । आणि जग ब्रह्माचा वाचुन । न पाहीची सर्वथा ॥७७॥
हा शब्दचक्रविभु अतिकठिण । परि अद्वैतवेत्ता करि हा भेदन । येर अनुमानि येथें गुंतुन । मरमरु जाति फिरफिरु ॥७८॥
जैसा डोळस जाय झाडि लंघुन । आणि अंध पडे तेथेचि गुंतुन । परोक्ष अपरोक्ष ज्ञानिया लागुन । तैसे येथे होतसे ॥७९॥
असो हा कैसा असे प्रकार । तो तुज सांगतों सविस्तर । होवोनि येकाग्रबुद्धि सादर । ऐकोनि घेइ सत्सिष्या ॥८०॥
अगा हें नामरूपात्मक जग दिसतें । त्याहूनि वेगळेंचि ब्रह्म असे तें । तुजप्रति जें सांगितलें होतें । आकाशदृष्टांते करोनि ॥८१॥
तें या जगाहूनि असे कि नसे वेगळें । हे शोधोनि पाहे पा इये वेळे । सांडोनिया चर्माचे डोळे । ज्ञान द्रिष्टि विलोकि ॥८२॥
आतां त्या सच्चिदानंद वस्तुविण । हें जग कांहींच नसे जाण । जैसा वोतप्रोत तंतु पटालागुन । तैसेंचि ब्रह्म या जगातें ॥८३॥ आतां नामरूपें जे दिसति कांहि । ते मिथ्याचि भासति वस्तुचे ठाइं । वेगळेपणें पाहातां नाहिं । ठाव तयातें दूसरा ॥८४॥
जैसें रविरस्मीचिये स्थानि । मिथ्याचि दिसु लागे पाणि । परि तें मृगजळ पाहातां शोधोनि । रस्मिच अवघ्या आसति ॥८५॥
तैसें नामरूपातें ठिकाण । नसे सच्चिदानंद वस्तुविण । जेथें भासतसे अज्ञानें करुन । तेथेंचि ज्ञाने लय पावे ॥८६॥
संमत स्वात्मानंदप्रकाश आर्या - दंतिनि दारुविकारे दारु तिरोभवतिसोपितत्रैव । जगति तथा परमात्मा परमात्मन्यपि जगत्तिरोधत्ते ॥१॥
काष्ठाचा कोरोनि हात्ति केला । मुले काष्ट नेणोनि गज मानिला । विचारे करोनि पाहात काष्ठाला । गजहि तेथेंचि उपरमे ॥८७॥ तैसा अज्ञानियाते आत्मा संपूर्ण । दिसे जगद्रूपें करून । परि ज्ञानि तया जगतातें व्यापुन । आत्माचि पाहे सर्वहि ॥८८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2016
TOP