मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक २३

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


प्रकाशोर्कस्य तोयस्य शैत्यमग्नेर्यथित्कता ।
स्वभाव: सच्चिदानंदनित्यनिर्मलतात्मन: ॥२३॥

आत्मा सच्चिदानंदस्वरुप । कर्मधर्मातीत निष्पाप । नित्यस्वभाव निर्मळरूप । आहे ऐसा जाण तुं ॥७१॥
जयासि दृश्याचा नाहीं मळ । म्हणोनि जाणिजे तो निर्मळ । दृश्य आनित्य असे चंचळ । आत्मा अढळ नित्य पैं ॥७२॥
सद त्रिकाळ बाधातीत । जगदउत्पत्ति स्थिति अंत । जाले तरि आत्मा असे निश्चित । जैसा तैसा निर्भयत्वें ॥७३॥
चिद म्हणजे ज्ञानघन । जाचे योगें अग्निसूर्यमन । होवोनिया प्रकाशमान । दृश्यालागि प्रकाशिति ॥७४॥
अनंद म्हणजे सुखरूप । जयासि नसे दु:खाचा लेप । अनंत निराकारस्वरूप । संचलें असे पूर्णत्वें ॥२७५॥
ऐसे हे सच्चिदानंद त्रिप्रकार । मिळोनि येकचि आत्मा साचार । स्वरूप नसे भिन्नभिन्नकार । त्रिप्रकारें वेगळालें ॥७६॥
जैसि शर्करा शुभ्र मिष्ट कठीण । असति तीन अभिधान । परि नसे स्वरूप भिन्न भिन्न । वेगळालें तियेचें ॥७७॥
तैसा आत्मा त्रै अभिधानि । येकचि असे अखंडपणिं । हे त्याचे स्वभाव तिन्हि । अक्षयत्वें विलसति ॥७८॥
जैसा सूर्य स्वप्रकाशमान । किं शैत्यस्वभाव उदकाचा जाण । आणि दाहाकात्वें हुताशन । हे स्वाभावीक गुण तयाचे ॥७९॥
तैसे आत्म्याचे स्वाभावीक गूण । नित्यसच्चिदानंदनिर्मळपण । हे नसति आगांतुक गूण । स्वभावचि असे तयाचा ॥२८०॥
तंव सिष्य म्हणे जि सद्गुरुराया । बुद्ध्यादिक जड कथिलि माया । आणि सच्चिदानंद स्वभाव तया । आत्मियाचे सांगितले ॥८१॥ तरि आत्मा असे शुद्ध निर्धर्म । जाणीव नेणीव क्रिया कर्म । सुखदु:ख आदिकरोनि संभ्रम । नसे आत्मस्वरुपिं ॥८२॥
आणि बुद्धि मन इंद्रियें देहे । हे तरि जडचि नि:संदेह । तरि येथें कोण तिसरा आहे । अज्ञानाचा अधिपति ॥८३॥
जया अज्ञानाचिया पोटिं । होति जन्ममरणाचिया कोटि । आणि जाणीवनेणीवभ्रमदाटि । सुखदु:खादी सर्वहि ॥८४॥
ऐसें हें अज्ञानकाळकूट । कोण प्रासितो जि घटघट । हें मज सांगोनिन द्यावें स्पष्ट । स्वामिराया दयाळा ॥२८५॥
मग श्रीगुरुवचनामृतमेघ । वर्षाव करिते जाले अमोघ । जेणें संशयकल्पनात्मक अघ । धुवोनि जाय सर्वस्वें ॥८६॥
आगा सिष्या तुं जे धर्म पुससि । ते न शोभति आत्मयासि । आणि माया तरि जडरासि । तिचे ठाइं न संभवति ॥८७॥
हे त्वां शंका विचित्र घेतलि । ते शोधोनि पाहातां बहूत खोलि । परि त्रै श्लोकेकरोनि सांगितलि । जाइल आतां ऐक पां ॥८८॥ तुझिया प्रश्नाचें उत्तर । सांगतों ऐक सविस्तर । सयुक्तिक आणि परिकर । जातें अनुभवि सत्य म्हणति ॥८९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP