आत्मबोध टीका - श्लोक ४१ व ४२
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
ज्ञातृ - ज्ञान - ज्ञेय - भेद: परे नात्मनि विद्यते ।
परानंदैकरूपत्वा - द्देप्यति स्वयमेवतत् ॥४१॥
टी० :- अगा ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । हे त्रिपुटि स्वरुपि नसे दुजेपण । परानंदैकरूपापासुन । प्रकाशित असे निश्चइ ॥५९॥
जैसें सूर्यापासोनि जालें उदक । त्यामाजि सूय प्रतिबिंबला देख । हे त्रैप्रकार जाले परि येक । प्रकार सर्वा ठिकाणिं ॥६०॥
तो सुर्य उष्णकाळि जळ शोसिता । प्रतिबिंब बिंबिं पावे ऐक्यता । सेखि वर्षावकाळिं जळ प्रसवता । प्रतिबिंब दिसे त्यामाजि ॥६१॥
तैसि आत्म्या पासोनि शुत्ध बुत्धि । आत्माचि बिंबला तयेमधिं । ते त्रिपुटि भासतसे निरवधि । ज्ञेय ज्ञाता ज्ञातृत्वें ॥६२॥
या त्रयस्थळिं आत्मा अनश्युत । तो भेद न म्हणावा गा निश्चित । ज्ञाता ज्ञानस्वरुपि लया जात । सेखि प्रकाशत आत्मसत्ते ॥६३॥
हे त्रिपुटि आसतां वा लया जातां । आत्मा येकचि गा तत्वता । ह्मणोनि भेद न ह्मणे तु सर्वथा । आत्मानुसंधान करी पा ॥६४॥
एवमात्मारणौध्यानमथने सततं कृते ।
उदिता - वगतिर्ज्वाला सर्वाज्ञानेंधनं दहेत् ॥४२॥
टीप :- आत्मा प्रत्यगात्मा अरणि । तेथें सद्बुत्धिचा मंथा योजुनि । निजध्यास दोर वोडिते क्षणि । शुत्ध ज्ञानाग्नि प्रगटे पै ॥६५॥ तेथें मूळ अज्ञानाचें इंधन । जळोनि जाय न लगता क्षण । मग संशय विपर्याय धूम्राते सांडुन । प्रज्वळित विलसे ज्ञानाग्नि ॥६६॥ त्या ज्ञानाग्निचि अत्यंत ज्वाळा । तेहि उपशम पावे तया वेळा । मग सामान्य प्रकाश सोज्वळा । ज्ञप्तिरूप असतसे ॥६७॥
तव सिष्य ह्मणे जि गुरुमुर्ति । येकवेळ ज्ञान जालिया निगुति । मग निजध्यासनाचि प्रवर्ति । कासयासाठिं पाहिजे ॥६८॥
जैसा येकवेळ जाला ब्राह्मण । त्याजला नको ब्राह्मणत्वाचें चिंतन । तैसें सकृत जालिया तत्व दर्शन । निजध्यास न लगे सर्वथा ॥६९॥
ऐसे ऐकोन तयाचें उत्तर । सद्गुरु देति प्रत्योत्तर । आरे त्वा ह्मनतिले हे साचार । परंतु निजध्यसन पाहिजे ॥७०॥
मुलाचा व्रतबंध जालियावरि । विसरोनि कर्में पडाति पहिल्यापरि । तोचि ब्राह्मणत्व स्मरता कर्में करि । ब्राह्मणाचा सारिखे ॥७१॥ तैसा जन्मोजन्मिचा संसार । अज्ञान प्रवाहा बलोत्तर । त्यायोगे स्व - स्वरुप विसर । पडु पाहे मागति ॥७२॥
तूं ह्मणसि तया मुलाचिं कर्में । विपरीत पडोत पूर्व धर्में । परी ब्राह्मणपणाचीये नामें । न मुकेचि तो सर्वथा ॥७३॥
तरि तो ब्राह्मणत्वातें विसरतां ॥ जाला शूद्रासमान आचरतां । मग ब्राह्मणपणाचि अक्षता । न लागे त्याचा कपाळीं ॥७४॥
तैसी असंभावना विपरीत भावना । उठतां त्या ब्रह्मवित् ब्राह्मणा । मग देह्याभिमान शूद्रपणा । आला त्याचा मस्तकिं ॥७५॥ तस्मात् पाहिजे निजध्यासन । तेणें होतसे अढळ विज्ञान । मग दृढतर जालियावरि जाण । विसर नाहि ना आठव ॥७६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2016
TOP