आत्मबोध टीका - श्लोक २५ व २६
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
आत्मनो विक्रिया नास्ति बुद्धे र्बोधोन जात्विति ।
जीव:सर्वमलं ज्ञात्वा कर्ता द्रष्टति मुह्यति ॥२५॥
अगा शुद्ध आत्मा विकाररहीत । तेथें क्रिया कर्तृत्व नसे निश्चित । तैसीच बुद्धि अतिजडपणें स्थित । बोध नसे जयेतें ॥२६॥
तया बुद्धिचिया ठाईं । क्रिया कर्तृत्व संभव नाहीं । तस्मात् जीवचि क्रिया कर्तृत्व सर्वहि । लावि अपणाकडे पै ॥२७॥
जैसा लोहपिंडासवें अग्नि । अपनातें कठिणत्व जडत्व मानि । तैसा बुध्यादिसंगें मोह पावोनि । कर्तृत्व द्रष्टुत्व जीव भावि ॥२८॥
रज्जुसर्पवदात्मानं जीवो ज्ञात्वा भयं वहेत् ।
नाहं जीव: परात्मेति ज्ञातश्चेन्निर्भयो भवेत् ॥२६॥
जैसी जालि असता झांजडवेळ । मार्गांत पाहुनि दोराचें वेटाळें । कोण्हि येक म्हणे हा विशाळ । सर्पचि येथें बैसला ॥२९॥
त्याच्या भयेंकरुनि पळूं जातां । तंव त्यावर्हीच झोक गेला तत्वता । त्या स्थळिं बाभूळ - कंटक होता । तोहि अवचिता वेधला ॥३०॥
तयाच्या योगें निघालें रक्त । चरणतळ होवोनि गेलें अरक्त । मग तो मोठ्यानें अक्रंदत । सर्प डसला म्हणउनि ॥३१॥
त्या भयेंकारोनि जाणा । आलि तयालागि मूर्छना । हाका मारोनि सांगे जना । म्हणे मज सर्पें डंखिलें ॥३२॥
तेथें एक शाहाणा भेटला दुजा । तो म्हणे मि सर्प उतरितों तुझा । तें स्थळ मज दाखवि वोजा । जेथें तूतें डंखिलें ॥३३॥
मग तो मूर्ख दाखवि तेंचिस्थान । जेथें भय जालेंहो दारूण । दीप लावोनिया जाण । स्पष्टत्वेसि पाहाति ॥३४॥
तंव तेथें पडला असे दोर । त्यासंन्निध कंटकाचि पांझर । ऐसें जाणोनीया तो चतुर । भय निवारि तयाचें ॥३५॥
अरे पाहे पा रज्जुचें वेंटाळें । आणि यातेंचि त्वा मानिला होतासि व्याळ । सांडि पा विषभयाचि तळमळ । आपुलिया मनीचि ॥३६॥
मग तो रज्जु पाहातां तयानें । उडालें सर्पत्वाचें भान । भय कंपादीक जालें हारण । तया क्षणिं तयाचें ॥३७॥
तैसा सर्वहि आत्मा असतां । त्याचें वास्तव स्वरूप जीवें नेणतां । जगदाकारें जाला पाहाता । अविनासि आत्मयालागिं पै ॥३८॥ तया विपरित ज्ञानें करून । पावता झाला भय दारून । अत्यंत खेदयुक्त होउन । दु:ख पाहाता जाहाला ॥३९॥
म्हणे मी जन्मतो आणि मरतो । मी या सुखदु:खालागिं भोगितों । मी पापपुण्या लागि करितों । देहपुरींत राहुनी ॥४०॥
अनेक जन्मांतरिं वाहात आलों । या भवनदीचा प्रवाहिं पडिलों । कामक्रोधखल्लाळिं अथडलों । बहुसत्राणें करोनि ॥४१॥
तेथें चिंता - सुसर पायातें वोडि । खेदमच्छ मांसातें तोडि । आशा - सर्पिणि घालोनि अडी । पायालागि गुंडाळे ॥४२॥
मृत्यु - नांगा उभवोनि खेकडाअ । अति भयानक पातला पुढा । अतांचि करील मस्तकाचा खुडा । ऐसें वाटे निश्चइं ॥४३॥
असो ऐसें नानाप्रकारिं भव । मानितसे देहपुरीचा राय । जरि अकस्मात होवोनि पुण्योदय । सद्गुरु दयाळ भेटला ॥४४॥
तरी तो अद्वैत शास्त्र उपदेशून । सांगोनि आत्मस्वरुपाची खुण । करील अज्ञानतमनाशन । ज्ञानदीपें करोनि ॥४५॥
मग जावोनि जगद्विवर्तभ्रांति । होय सर्व ब्रह्म ऐसि प्रतीति । तेव्हां अनेक भयाचि सांडोनि खंति । जीव निर्भय होतसे ॥४६॥
म्हणे मी परब्रह्म चिन्मय । निर्धर्म निष्क्रिय निरामय । जन्ममरणादिकाचें भय । नसेचि मजला कदापि ॥४७॥
अवघा एकचि आत्मा आसतां । म्या द्वैत कल्पना भाविलि वृथा । तया द्वैत योगें भय आणि चिंता । वाहात होतों अज्ञानें ॥४८॥ असो जो जिव अज्ञानें भय पावला । तोचि आत्मज्ञानें निर्भय जाला । मग जीवत्व सांडोनि आत्मत्व पावला । पहिलें अपुलें हातें जें ॥४९॥
तव सिष्य ह्मणे जी गुरुराया । मन - बुद्धि - चित्त - अहंकारासि या । अति सामिप्यता असोनिया । आत्म्यासि कां हो नेणति ॥५०॥
मग श्रीगुरुराय दयाघन । तयातें सांगति दृष्टांतेंकरुन । जेणेंकरोनि समाधान । होय तया सिष्याचें ॥५१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 21, 2016
TOP