आत्मबोध टीका - श्लोक ३६ व ३७
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
एवं निरंतरं कृत्वा ब्रह्मैबास्मीति वासना ।
हरत्यविद्या विक्षेपान् रोगानिव रसायनम् ॥३६॥
याप्रमाणें निरंतर भावना । मी ब्रह्म ऐसें स्मरत असतांना । अविधाकृत चित्त विक्षेपवासना नि:शेष नाश पावतसे ॥२६॥
जैसें उत्तम रसायण । रोगियें चिरकाल करितां सेवन । नि:शेष रोगकरीहाण । तैसें ब्रह्मचिंतन हें ॥२७॥
तूं ह्मणसि हें शब्दज्ञान । मी ब्रह्म मी ब्रह्म ह्मणउन । तरी येताद्विषई तूं तें ध्यान । सांगतों तें ऐक पा ॥२८॥
परी हा सांगितला जो प्रकार । तो साधकिं स्मरावा वारंवार । तेणें अविद्या विक्षेपपरिहार । होत असे निश्चइं ॥२९॥
आगा हा अनादि संसार । देहभावना होता वारुंवार । जीवात्मा जाला देहाकार । अग्नि लोहोपिंडापरी ॥३०॥
जीवात्मा नसता देहाकृति । परि ध्यास जाला काळ बहुति । तेणें पडोनि स्वस्वरूपभ्रांति । देहदसेसि पातला ॥३१॥
सत्यत्वे देह नसतां आपण । परि निजध्यासे पावला देहत्वगुण । तैसा स्वस्वरूप आत्मा चिद्घन । निजध्यासें का नोव्हे ॥३२॥ तव सिष्य म्हणे जि श्रीगुरूमुर्ति । ऐकोनि घ्यावि माझि विज्ञाप्ति । देह प्रत्यक्ष दिसे याज - प्रति । म्हणोनि देह मी म्हणतासे ॥३३॥
तैसा देहासारिखा अपरोक्ष । आत्मानुभव होइल प्रत्यक्ष । तेंव्हा तेथें ठेवोनिया लक्ष । ब्रह्मरूप होइल पै ॥३४॥
ऐसि ऐकोनि सिष्य - वाणि । सद्गुरु ह्मणति धन्य तू ये क्षणिं । जे मुमुक्षता उपजालि तुझे मनि । अपरोक्ष ब्रह्म स्वरूपाचि ॥३५॥ आतां ब्रह्म स्वरूप किंलक्षण । तें मी तुतें सांगतों जाण । मग तें अंतरिं करोनि मनन । निजध्यासन करी त्याचें ॥३६॥
साधन आणीक साध्यता । या दो श्लोकिं सांगतों तत्वता । जेणें वस्तुचि चढे हाता । साधकाचा तात्काळ ॥३७॥
विविक्त देश आसीनो विरागोविजितेंद्रिय: ॥
भावयेदेकमात्मानं तमनंतमनन्यधी: ॥३७॥
॥टी०॥ वैराग्यें इंद्रियें जिंकुन । शुद्ध एकांत स्थळिं बैसून । अनंत ब्रह्म स्वरूपा लागुन । अनन्यबुद्धि चिंतावें ॥३८॥
यास्तव बैसावें येकांतिं । जनाचा अखंड विषयाकार मति । साधकें बैसतां त्याचे निकटवर्ति । मन होतसे तैसेंचि ॥३९॥
जैसा पाणियाचा वोहट । चाले भूमि पाहोनि सपाट । पुढें लागलीया अवघड घाट । फिरे मागति उलटुनि ॥४०॥
तैसि मनासि विषय - सुख - गोडि । म्हणोनि धरि जन - संग - आवडि । तेथें दु:ख होतां कडोविकडि । खेदालागि पावतसे ॥४१॥
ये विषइं श्री भगवंत । अर्जुनाप्रति सांगति निश्चित । किं संगें करोनि मोठा घात । होत अशे साधकाचा ॥४२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 21, 2016
TOP