मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ३९

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


आत्मन्येवाखिलं दृश्यं प्रविलाप्य धियासुधी: ॥
भावयेदेकमात्मानं निर्मला - काशवत्सदा ॥३९॥

टी० :- अनंतस्वरूप आत्मा पूर्ण । त्यामाजि पंचभूतात्मक ब्रह्मांड जाण । माया अविद्या तिन्हि गुण । दृश्य जात सर्वहि ॥८८॥
ऐसें हें दृश्य जात संपूर्ण । लयाति नेवोनि शुत्ध बुत्धिनें । शुत्ध आकाशा समान । आत्मा चिंतावा सर्वदा ॥८९॥
स्थावर जंगम जीव समस्त । त्यांचा लय करावा पृथ्वि आंत । पृथ्वि लया न्यावि आपा अंत । आप अग्निंत लया न्यावें ॥९०॥ अग्नि न्यावा वायोनें झडपुन । गगनिं हरपोनि द्यावा पवन । त्रिगुणिं लया न्यावें गगन । मायेंत त्रिगुण मेळवावे ॥९१॥
मायेचें स्वरुपिं ऐक्य करावें । तें आत्मस्वरुप आकाशवत् पाहे । शुत्ध बुत्धि करोनि बरवें । साधकानें सर्वदा ॥९२॥
आता ऐके गा सिष्य - सिरोमणि । येथवरि जालि शास्त्राचि उभारणि । आत्मा दृष्टांतें करुनि । आकाशवत सित्ध केला ॥९३॥ दृष्टांत बोलति श्रुति स्मृति । परि द्राष्टांताचि न करवे प्राप्ती । येथें पाहिजे सद्गुरुचि युक्ति । मग आत्मप्रतिति रोकडि ॥९४॥
जरि ते युक्ति ह्मणसील कैसि । तरि तुज सांगतों ते विन्यासि । स्वस्थ करोनिया मानसिं ऐक अता वचन तें ॥९५॥
अरे हे युक्ति अति सखोल । वाउगा बोलूं नये हा बोल । परि तूं श्रोता मिळालासि सुसिळ । ह्मणोनीया बोलतों ॥९६॥
अगा हे जीवापलिकडिल बोल । केवळ अमृतसंजिवनिचि फुल । ठेविले हाते अति सखोल । स्वरुपामाजि अछादुनि ॥९७॥
जैसें कृपणें आपुलें धन । ठेवि पृथ्विचे पोटिं नेउन । परि सुपुत्र जालिया संतान । तयालागि दाखवि तें ॥९८॥
तैसा तुं श्रोता अति चतुर । मिळालासि विश्वासुक वृत्तिस्थिर । मग जीवापैलिकडिल उत्तर । काय ह्मणोनि न बोलुं ॥९९॥
शुत्ध गगनासारिखें चिंतन । करावें ब्रह्मस्वरुपाचें जाण । ह्मणोनि मि दृष्टांतें करुन । बोलता जालों वचनातें ॥५००॥
परि अन्य दृष्टांतासमान । हा आकाशादृष्टांत नोव्हे जाण । जो दृष्टांतपणें । येथें जाणीला पाहिजे ॥१॥
ये विषइ श्रीरामापरति । वसिष्ठ बोलते जाले वचनोक्ति । तेचि योजोनिया संमति । बोलतों तें ऐक पा ॥२॥

संमत वासिष्ठ ॥श्लो०॥ निरंशत्वाद्विभुत्वाच्च तथा नश्वर भावत: । ब्रह्मव्योम्नोर्न भेदोस्ति चैतन्यं ब्रह्मणोधिकं ॥१॥

टी० निरवयव विभु अनश्वर । सारिखेंचि ब्रह्म आणि अंबर । परि चैतन्यता येक अधिकोत्तर । नभापेक्षा ब्रह्मिं असे ॥३॥
चैतन्ययुक्त म्हणजे ज्ञानाकाश । करि बुद्धिमन - इंद्रियातें प्रकाश । जाणे शून्यासहित सर्वांस । चिदरुपत्वें अपुल्या ॥४॥

संमत वासिष्ठ ॥श्लो०॥
सर्वमेव चिदाकाशं ब्रह्मेति घननिश्चये । स्थितिं याते शमं याति जीवोनि:स्नेहदीपवत् ॥१॥
सत्यानंद - चिदाकाश - स्वरूप: परमेश्वर: । मृद्भाजनेषु मृदिव सर्वत्रास्य पृथक् स्थिति: ॥२॥

तें चिदाकाश ब्रह्म परिपूर्ण । सर्व पदार्थ मात्रिं अशे व्यापुन । नशेचि त्या चित्स्वरूपावांचून । आणिक कांहिं दूसरें ॥५॥
आतां एकेठाइं दृष्टांत द्राष्टांत । कैशे संभवति पै निभ्रांत । तें श्रवण करि पा सप्रचीत । अनुभवें करोनि ॥६॥
आगा हें जैसें घटाकाश । तैसेंचि असे पै मठाकाश । तयासारिखें महदाकाश । अहे किं नाहिं पाहे पां ॥७॥
या महदाकाशासारिखें पाहि । चिदाकाश म्हणविजे ब्रह्मांडाबहि । मग त्या चिदाकाशा पैलीकडे कांहिं । नसे अणिक दुसरें ॥८॥ तिन्हि आकाश दृष्टांतस्थानिं । चवथें चिदाकाश द्राष्टांत मानि । परि चिदाकाश पाहातां सर्वा स्थानिं । दृष्टांत द्राष्टांत येक पै ॥९॥ घटाचा नाश जाल असतां । घटाकाशासि येतसे मठाकाशता । तो मठ नासलिया तत्वता । महदाकाशता येइ त्यातें ॥१०॥
तैसें हें सप्तावर्ण ब्रह्मांड नासतां । महदाकाश पावे चिदाकाशता । मग तें चिदाकाश निरोपाधिक तत्वता । तेंचि तें असे पै ॥११॥ आरे हें तुज सांगितलें उकलुन । जैसें लेकरातें खडें मांडुन । परि सर्वहि उपाधि मिथ्या माणुन । अवघेंचि पाहे चिदाकाश ॥१२॥ घटाचीये स्थानिं हा तुझा देहे । मठाचिये स्थानिं हें ब्रह्मांड पाहे । घटमठत्यागें महहाकाश राहे । तैसें पिंडब्रह्मांडत्यागें चिदाकाश ॥१३॥
व्याव्हारीक प्रतिभासिक अवच्छिन्न । हे जीवाचि असति त्रै लक्षण । त्यांतिल हें अवच्छिन्न लक्षण । तूंतें उकलून सांगितलें ॥१४॥
जीवेश्वराचा लक्षांश भाव । तेंचि हें जाण चिदाकाश सर्व । महावाक्यें जहदाजहदलक्षणें बरव । ऐक्य होय यें स्थळिं ॥१५॥
ऐसा पिंड ब्रह्मांडादि उपाधीचा । त्याग करोनिया निज साचा । जीवात्मा परमात्मा या उभयाचा । येक रस पाहे चिदाकासि ॥१६॥ मग तया चिदाकाशाचे ठाइं । देशकालवस्तु परिच्छेद नाहिं । चित्स्वरुप चिद्घनादि नामें पाहि । याजलागिच आसति ॥१७॥
आतां सेवटिल सांगतों उत्तर । जेणें बोलणें नलगे वारुंवार । होय आत्मस्वरुप साक्षात्कार । श्रवणमात्रें जयाचा ॥१८॥
जैसि पितळेचि काळिमा उडावितां । मग तें पितळचि पावे सुवर्णता । तैसि नभाचि शब्द आणि शून्यता । सांडितां होय ब्रह्मचि तें ॥१९॥
ऐसें सद्गुरुचें ऐकोनि वचन । सिष्यासि जालि येकतान । चिदाकाशाचें करितां ध्यान । वृत्ति गेलि वितळोनि ॥२०॥
जीव ईश्वराचा पुरला अंत । वृति स्वरुपिं जालि निवांत । जया स्वरुपाचा नलगे अंत । तेंचि अवघें कोंदाटलें ॥२१॥
जैसे सप्तार्णव जाले येकवट । तैसें त्वरुप देखिलें घनदाट । जिकडे तिकडे ब्रह्माचि अफाट । पाहूनि वृत्ति निमालि ॥२२॥
नाठवति स्वर्ग मृत्यु पाताळ । नाठवे दशदिशा धृवमंडळ । नाठवे मेरु आणि सर्व भुगोळ । पंचभूतें नाठवति ॥२३॥
नाठवति देव यक्ष किन्नर । नाठवति चारण उरग विद्याधर । नाठवति गंधर्व आणि अप्सर । दानव असुर नाठवति ॥२४॥ नाठवति चंद्रसूर्य तारांगणें । नाठवति मेघपडळ गंधर्व - भुवनें । नाठवति अष्टादिग्पाळांचि स्थानें । अर्यमादि पितर नाठवति ॥२५॥ नाठवति ऋषि दश अवतार । नाठवति हरिहाराची चरित्रें । नाठवति तिर्थ आणि क्षेत्रें । देश पवित्र नाठवति ॥२६॥
नाठवति नर आणि नारि । नाठवति पशु - पक्षि - गण खेचरी । नाठवति वृक्षनद्या विहिरि । जळचरें नाना नाठवति ॥२७॥
नाठवे विषयजात संपूर्ण । गुरु आणि सिष्यपण । नाठवे मी माझेपणाचें भान । भयसुखदु:खें नाठवति ॥२८॥
ऐसें जें जें दृश्यमात्र संपुर्ण । तें तें कांहींच नाठवति जाण । येक वस्तुमात्र सच्चित् घन । परिपुर्णत्वें आठवे ॥२९॥ संकल्पविकल्पात्मकमन । तें स्वरुपिं गेलें वितळुन । निश्चयात्मिका बुद्धि जाण । तेही स्वरुपीं निमालि ॥३०॥
जागृती ना स्वप्नसुषुप्ती । तुरीया परतली देवोनि प्रतीति । प्राप्त जाहली उन्मनी स्थिती । स्वरुपालागि अभिन्न जे ॥३१॥
काढोनि अज्ञानाचि बुंथि । सुटलि हृदइंचि चिज्जड ग्रंथि । प्राप्त होउनि अद्वय स्थिति । गाढ समाधि लागलि ॥३२॥
ऐसा लोटतां बहुत काळ । सद्गुरु बोलते जाले दयाळ । सावध होइरे लडिवाळ । येइ पूर्व स्थितिवरि ॥३३॥
ऐश्या मारिल्या बह्तु हाका । तंव सिष्यें उकलिलि नेत्र - रेखा । अवलोकुनिया सद्गुरुमुखा । मागति नेत्र झाकिले ॥३४॥
वृति लागुनि उठउं जाय । तंव ति स्वरुपिं घेतसे थाय । जैसे उठवण करि गुरुपाय । नधरि प्रयासें उठवितां ॥३५॥
मग श्रीगुरुरायें हास्य केलें । स्वकरें तयासि थापटिलें । बळेचि वृत्तिवरि आणिलें । तया सिष्यवर्यातें ॥३६॥
मग तेणें उठोनिया प्रणिपात । घातला साष्टांग दंडवत । कर जोडोनिया करित । स्तुतिलागि ते काळी ॥३७॥
जि जि सद्गुरु स्वामि दयाघना ॥ ब्रह्मविद्यादायक निधाना । उद्धरिलेंहो मज दीन जना । अनाथालागि श्रीगुरु ॥३८॥
धन्य धन्य अजि उगवला दिन । जे बोधामृताचा वर्षला घन । मी कृतार्थ जालो असे जाण । स्वामि - चरण - प्रसादें ॥३९॥
आजि भाग्याचि जालि सिमा । जे पातलों अपुल्या निजधामा । काय सांगावा जि महिमा । तया आत्मसुखाचा ॥४०॥
बरा होतों मि स्वरुपिं निमग्न । कासिया चेवविलें मज लागुन । अतां तेंचि सुख सर्वदा संपूर्ण । असो स्वामि - प्रसादें ॥४१॥
मग श्रीगुर ह्मणति रे बुद्धिमंता । बरवि अनुभविलि आत्मसत्ता । परि हें बोलु नये गा तत्वता । नास्तिक जनापासि पै ॥४२॥ कोण्हि असेल पूर्ण अनुभवि । तोचि येथें मान तुकावि । येरा पाशांडियासि गाथागोवी । असे हे जाण निश्चित ॥४३॥
आतां आसो हे सर्वही देख । तू ह्मणसि किं आत्मसुख । अखंडित असावे नि:शंख । अविनाशत्वें सर्वदा ॥४४॥
तरि ये विषइंचि युक्ति । तूतें सांगतों यथा निगुति । जेणें सर्वकाळ आत्मस्थिति । न भंगेचि निश्चित ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP