उपदेशपर पदे - भाग ९
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे
१५११
म्हणोनि करावें साधन ॥ साक्ष आपुलें मन ॥ध्रु०॥
हरि हरि नारायण हें ॥ अखंड जपत जावे ॥१॥
मायाजाळीं ममत्व खोटें ॥ हळुं ह्ळुं त्यजावें ॥२॥
मन मोकळें असत गेलें ॥ तेणें सकळ बुडालें ॥३॥
शिकत शिकत जावें ॥ तेणें पोट भरावें ॥४॥
दास म्हणे परलोक साधणें ॥ येणें रितीं तरावें ॥५॥
१५१२
( राग-श्रीराग; ताल-द्रुतएकताल; चाल-हर हर० )
नाना पिकाची भोय ॥ वाहिल्याविण जाय ॥ शोधिल्याविण उपाय ॥ व्यर्थ चि होय ॥१॥
नाना औषधें घेतो ॥ पथ्य न करितो ॥ तैसा वचनें करितो ॥ परि वतेंना तो ॥२॥
रामदास म्हणे ॥ भीक चि मागणें ॥ आणि वैमव सांगणें ॥ तैसें बोलणें ॥३॥
१५१३
( राग-कामोद; ताल-धुमाळी; चाल-लावूनियां लोचन० )
नेणोनि जाणतेपण । तेणें गुणें नागवण । तयासि हरिविण नाहीं रे ॥ध्रु०॥
सावध होउनि पाहें । मुलला आहेसि काय । तुझें आयुष्य निघोनी जाय रे ॥१॥
म्हणे रामी रामीरामदास । ठायीं पाडीं जगदीशा । जननीजठरवास खोटा रे ॥२॥
१५१४
( चाल-धर्म जागो० )
जाणत्याचा संग घरा । हित आपुलें करा । नित्यानित्य प्रचीतीनें । निरूपणीं विवरा ॥ध्रु०॥
जाहलें कोठूनि येणें । पुढें कोठवरीं जाणें । आपणें शोधुनियां । चुकवावें येणें जाणें ॥१॥
देव तो ओळखावा । शोध आपुला घ्यावा । मुख्य ते भक्तियोगें । जन्ममृत्यु चुकवावा ॥२॥
जन्मासि येऊनियां । बहू कष्टचि जाहले । दास म्हणे सुखदुःखें । बहु भोग भोगिले ॥३॥
१५१५
( राग-कानडा; ताल-दादर )
हरि आनंद मंदला । कोण पुसे इतरांला ॥ध्रु०॥
गोप गोपिका गोवळवत्सें । समुहो फूटला ॥१॥
गोवर्धन वृंदावन मथुरा । सकळ रंगरस गेला ॥२॥
कौरव पांडव यादव गेले । न पुसत हि कोणाला ॥३॥
धन्य द्वारका रम्य गोकुळ । संपत्तिचा भर जाला ॥४॥
कोण वैमव कोण संपदा । दास म्हणे सकळांला ॥५॥
१५१६
( राग-मारु; ताल-धुमाळी; चाल-कैवारी हनु० )
अंतर वेगळें रे । वेडिया । अंतर वेगळें रे ॥ध्रु०॥
येक कढविलें एक लुंचिलें । एक भादरिलें सावकाश ॥१॥
विभूति लाउनि जंगम जाला । इंद्रिय कापुनि तुरुक केला ॥२॥
अंतर शोधितां अंतर जाला । दास नवाजिला राघवानें ॥३॥
१५१७
( राग-सोहोनी; ताल-दीपचंदी )
सज्जन संत मुनीजन योगी । मानिसी तरि जाणीव सांडीं ॥१॥
षड्रिपुकुळभव भ्यासुर थापा । हाणसी तरि जाणीव सांडीं ॥२॥
दास म्हणे गुण निर्गुण ते खूण । बाणसी तरि जाणीव सांडीं ॥३॥
१५१८
( चाला-सामर्थ्याचा गामा )
धन्य तो साधक । व तेंना बाधक । सारासारें येक । विचारें नेमक ॥ध्रु०॥
टाळाटाळी टाळी । ज्ञानें लावी टाळी । अविद्या कुटाळी । विवेकें उटाळी ॥१॥
अहंतेचा मोटा । वाजतो चपेटा । केल्या बारा वाटा । साधकु तोचि मोठा ॥२॥
मन करितें चाळे । कल्पना उफाळे । तत्त्व साळे । तेव्हां होती फाळे ॥३॥
संदेहाची धाडी । विवेकें विमांडी । केली काढाकाढी । प्रबोधाची वाढी ॥४॥
देह दासपणें । सार्थक करणें । विचाराच्या गुणें । ब्रह्मांड ठेंगणें ॥५॥
१५१९
( चाल-धर्म जागो० )
सगट संत म्हणों नये । म्हणतां मोडतो उपाय । अज्ञानास कळे काय । अवघा होतो अपाय ॥ध्रु०॥
जाणता विद्य भेटे । रोगव्याधि सर्व तुटे । रोकडी सप्रचिती । लोकां आनंद वाटे ॥१॥
कर्मकांड उपासना । थोरा आघार जनां । न्यायनीति विवंचना । मुख्य अधिकार ज्ञाना ॥२॥
अनुतापें उदासीन तेणें शोभतें ज्ञान । हरिकथानिरूपण । दास म्हणे हें प्रमाण ॥३॥
१५२०
( राग-तोडी; ताल-धुमाळी )
कांहीं येक प्रचीतिवीण ॥ उगाचि होतसे सीण ॥ शीण शीण चि कठिण ॥ हीन हीनाहुनि हीन ॥ध्रु०॥
कष्टीं काम साधलें ॥ खोटें नाणें बांधलें ॥ ऐसें कैसें रे केलें ॥ केलें व्यर्थ चि गेलें ॥१॥
धातु कराया गेला ॥ तेथें मुळीं चळकला ॥ शब्द खराचि मानिला ॥ लटिका होउनि गेला ॥२॥
हिरा कंकरा म्हणोनि ॥ ठेवी बळकट बांधोनी ॥ पुढें पारखीचेनि ॥ लाजे आपुले मनीं ॥३॥
मोलें औषध घेतलें ॥ मरणावरि घातले ॥ वेडें उगेचि मातलें ॥ नाहि शोधुनि घेतलें ॥४॥
गुरु अवचितां केला। सोधृनि नाहीं घेतला ॥ उगाचि भ्रष्टोनि गेला ॥ भक्तिपंथ चुकला ॥५॥
उगीच धरिली संगति ॥ परि तें तस्करें होतीं ॥ जाली मोठी फजिती ॥ अवघें घेउनि जाती ॥६॥
आळसें विश्वास गेला ॥ तेणें फजित पावला ॥ दुसर्यावरि विश्वासला ॥ ऐसा बहुत बुडाला ॥७॥
दास म्हणे रे वेडें ॥ आतां दिसतें बापुडें ॥ दुःख येतां हें रडें ॥ जालें जीत ना मढें ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2011
TOP